सत्यकथाची होळी करणे म्हणजे प्रस्थापित साहित्याविरोधातील प्रतीकात्मक बंडखोरी होती. अंक जाळताना त्याच्या ठिणग्या कुठे उडणार नाहीत, याची काळजी घ्या,’ असे संपादक श्री. पु. भागवत यांनी होळी करणाऱ्यांना सांगितले होते. या ठिणग्या खरोखरच फारशा उडाल्या नाहीत की काय, असा प्रश्न आज पडतो

Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

‘विरतात वाऱ्यावर

दिवसासारखे दिवस

पाझरतात माठासारख्या

हिवाळी रात्री..’

कवितेच्या या चार ओळी वसंत गिरटकर यांच्या ‘विरतात वाऱ्यावर’ या कवितेतल्या.

‘सांज घेरून यायला लागली. पिवळट-पातळ ऊन आक्रसत चाललं. नुकताच बाहेरून आलो होतो. हातातल्या पुस्तकात बोट ठेवून रिकाम्या मनानं कुठंतरी पाहात बसलो होतो..’

या ओळी सुधाकर जयवंत यांच्या ‘परीची गोष्ट’ या लघुकथेतल्या.

‘मनोहर ओक अभिव्यक्तीचे जे नवे संकेत निर्माण झालेले आहेत त्यांच्या आहारी जातात. ई. ई. कमिंग्ज, पु. शि. रेगे यांचेच ओक हे तिसरे टोक..’

हा वेचा मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ या काव्यसंग्रहावरील समीक्षेतील. समीक्षक : वसंत आबाजी डहाके.

या तीनही मजकुरांमधील समान दुवा म्हणजे हे सारे ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेले. सप्टेंबर १९७१ चा हा अंक. किंमत- दीड रुपया. संपादक- वि. पु. भागवत. कार्यकारी संपादक- राम पटवर्धन.

आता वसंत गिरटकर, सुधाकर जयवंत, वसंत आबाजी डहाके यांची नावे एका रकान्यात ठेवू या आणि दुसऱ्या रकान्यात गुरूनाथ सामंत, सतीश काळसेकर, राजा ढाले, तुळशी परब, मनोहर ओक, वसंत दत्तात्रेय गुर्जर ही नावे ठेवू या. हीच नावे निवडण्याचे कारण एक जुनी घटना- जी साहित्यवर्तुळाशी परिचितांना चांगलीच माहितीची. वरील दुसऱ्या रकान्यात ज्यांची नावे आहेत त्यांनी मौज प्रकाशनाच्या कार्यालयाखाली ‘सत्यकथा’ अंकाची प्रतीकात्मक होळी केली होती. ‘सत्यकथेचा भागवत संप्रदाय झाला आहे,’ हा या मंडळींचा तेव्हाचा आक्षेप. आणि ‘सत्यकथे’च्या अंकाची प्रतीकात्मक होळी म्हणजे त्या आक्षेपाला दिलेले दृश्यरूप. या मंडळींकडे ‘सत्यकथा’चे अंक जाळण्यासाठी अंकच नसल्याने श्री. पु. भागवत यांनीच ते त्यांना देण्यासाठी राम पटवर्धन यांना सांगितले होते. ‘अंक जाळताना त्याच्या ठिणग्या इतरत्र उडणार नाहीत याची काळजी घ्या.. कारण सगळीकडे कागद आहेत,’ असेही श्री. पुं.नी या दुसऱ्या रकान्यातील मंडळींना आपल्या स्वभावानुसार सौम्यपणाने सांगितले होते, ही या घटनेसोबतची जोडआठवण.

साठोत्तरी, नव्वदोत्तरी वगैरे आणि त्याहीपुढील कुठल्या कुठल्या नवतांच्या पाश्र्वभूमीवर ते टोक अगदी आजच्या लेखक-कवींपर्यंत आणून ठेवले तर ‘सत्यकथे’ची होळी करण्याच्या घटनेकडे कसे बघायचे? त्या होळीमागील तात्त्विक भूमिका तपासताना आज काय हाती लागते? त्या तात्त्विक भूमिकेस ‘बंडखोरी’ असे नाव दिले, तर ती बंडखोरी आजच्या मराठी साहित्यात दिसते आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे केवळ रंजकच नव्हे, तर उद्बोधकही ठरू शकते.

या प्रश्नांना सामोरे जाताना पायाभूत मुद्दा असा की, बंडखोरीची.. साहित्यातील बंडखोरीची नेमकी व्याख्या कशी करायची; आणि ती करणार कोण? तर ढोबळ अर्थाने समकालीन साहित्यातील प्रवाह, त्याची धाटणी, मांडणी, आशय, विषय, अपेक्षित वाचक, साहित्यव्यवहार आदींबाबत आक्षेपमत असलेली आणि ती मते लिखाणातून व्यक्त करण्याची ताकद असलेली मंडळी ही अशी बंडखोरी करणार, हे उघड आहे. सामंत, काळसेकर आदी उपरोल्लेखित मंडळींनी असा पवित्रा घेतला तो ‘सत्यकथे’विरोधात. ‘सत्यकथे’ची धाटणी (ज्यातील मजकूर उदाहरणांसाठी लेखाच्या प्रारंभी दिला आहे!) या मंडळींना पसंत पडणारी नव्हती. साहित्याकडे, साहित्यव्यवहाराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा ‘सत्यकथा’कर्त्यांच्या दृष्टिकोनापासून खूपच भिन्न होता. अर्थात वरील नावे केवळ वानगीदाखल झाली. ६०-७०च्या दशकात ‘सत्यकथे’स विरोध करणारी साहित्यिकांची एक मोठी फळीच होती. (मुदलात ‘सत्यकथे’चा उद्भवही तत्कालीन आदर्शवादी साहित्यातील न्यूनत्व, त्याच्या मर्यादा आदीच्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नांतूनच झाला होता. आणि तीदेखील एक बंडखोरीच होती असे म्हणता येईलच.) तर या फळीने त्यांनीच नाव दिलेल्या ‘भागवत संप्रदाया’विरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांची लिट्ल मॅगझिनची चळवळ म्हणजे बंड होते.. साहित्यातील तत्कालीन प्रस्थापित सत्तेविरोधातले. पण आता इतक्या वर्षांनी प्रश्न पडतात ते असे की, हा लढा ‘तुमची सत्ता आम्हाला मान्य नाही!’ असे ठणकावून सांगण्यासाठी होता, की ‘तुमच्या सत्तेत आम्हाला स्थान का देत नाही?’ असा जाब विचारण्यासाठी होता? याच बंडखोरांतील काही मंडळी पुढे त्याच ‘सत्यकथे’त लिहिती झाली तेव्हा त्यांची भूमिका नेमकी काय होती? तर- आता या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनी आपापल्या मनास द्यावीत.

हे प्रश्न, त्यांची उत्तरे आदी पटावर मांडून तेव्हाच्या बंडखोरीकडे पाहू या. आणि आजच्या असलेल्या किंवा नसलेल्या बंडखोरीची वास्तपुस्त करू या.

‘सत्यकथे’विरोधातील बंडखोरीनंतर आजपर्यंत साहित्याच्या पुलाखालून आणि पुलावरूनही बंडखोरीचे विविध प्रवाह वाहून गेले. साठोत्तरी, नव्वदोत्तरी, चौथी नवता आदी त्याचे समीक्षेच्या प्रशासकीय सोयीसाठी कप्पेही पाडले गेले. या बंडखोरीने काय साधले? मराठी साहित्याचा पैस त्यामुळे वाढला का? मराठी साहित्य त्यामुळे पुढे सरकले का? तर- या प्रश्नांची उत्तरे अगदीच नकारार्थी देता येणार नाहीत. अगदीच डोक्याला हात लावून बसावे अशी स्थिती नाही. पण जी उत्तरे हाती येतात त्याने मनपूत आनंदून जावे अशीही स्थिती नाही. त्या- त्या प्रवाहांतील काही मोजक्या मंडळींनी खरोखर कसदार लेखन केले. पण त्या बंडखोरीचा विस्तार व्हायला हवा तितका झाला नाही. त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे कप्पेबाजी. ‘मी अमक्या प्रवाहाचा, तर त्या ढमक्या प्रवाहातील साहित्य मला निषिद्ध!’, ‘मी या गटाचा, तर त्या गटाच्या साहित्याशी मला देणेघेणे नाही..’ असा हा पवित्रा. दुर्दैवाची बाब म्हणजे या कप्पेबाजीत कळत-नकळत वाचकही ओढले गेले आणि त्यातून वाचक म्हणून त्यांच्या वाढीवरही मर्यादा आल्या. दुसरे म्हणजे या प्रवाहांचा विस्तार एका मर्यादेपलीकडे गेला नाही. ‘मौज’, ‘सत्यकथा’ हे समाजापासून तुटलेल्या स्थितीत असल्याचा, ‘१०० टक्के कलावादी’ असल्याचा टोकदार आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. मात्र, असा आक्षेप घेणाऱ्यांच्या आणि त्यापुढीलही बंडखोरांच्या वर्तुळातून जे साहित्य आले त्याचे स्वरूप काय होते? तर- विषय समाजाचे, सामाजिक; मात्र त्यांची मांडणी, भाषा अशी- की मुख्यत्वे ज्यांच्यासाठी हे सारे केले आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचण्यात अनंत अडचणी.

या घटिताकडे आजच्या परिप्रेक्ष्यातून बघताना साहित्याशी थेट संबंधित असलेल्या व थेट संबंधित नसलेल्या अनेक घटकांमध्ये झालेले बदल ध्यानात घ्यायला हवेत. पुस्तक एके पुस्तक असा पाढा गिरवण्याची गरज आज ना लेखक-कवींना उरलीये, ना वाचकांना. फेसबुक, ब्लॉग, ई-बुक, मल्टीमीडिया, ऑडिओ बुक अशी विविध माध्यमे त्यांना आज सहजी उपलब्ध आहेत. पूर्वी आपापल्या ओळखीपाळखीत साहित्य वाचायला वगैरे दिले जायचे. अशा ओळखीपाळखीचा परीघ तो कितीसा असणार? पण आज या माध्यमांचा परीघ जगव्यापी आहे. त्यातून जगापर्यंत क्षणभरात पोहोचता येते आणि प्रतिक्रियाही तात्काळ आजमावता येतात. अर्थात या प्रतिक्रियांची खोली ज्याने त्याने आपल्याशी आजमावावी, हे उत्तम. सोबत मुद्दा आहे तो खिशातील पैशांचा. प्रकाशकाला पैसे देऊन स्वत:चे पुस्तक छापून घ्यायचे, (दर्जाच्या बाबत आजही जागरूक असलेले नामवंत प्रकाशक यात मोजता येणार नाहीत.) हा आजचा अगदी सर्रास होणारा व्यवहार. त्याने लेखनप्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध नसण्याची अडचण अनेकांसाठी दूर केली आहे.

या अशा परिस्थितीत साहित्यिक बंडखोरीचे आज काय होणार?

तर अशा बहुउपलब्धीय स्थितीतही साहित्यिक बंडखोरीस वाव आहेच आहे. मुठी आवळायच्या, कुणातरी विरोधात काहीतरी करायचे, अंक जाळायचे, जुने ते सारेच मोडीत काढायचे, हीच केवळ बंडखोरी नव्हे. केवळ अभिनिवेश म्हणजे बंडखोरी नव्हे. जे होते, जे आहे ते निरखत, पारखत, भोवतालात स्वत:ची काही नवी भर घालणे ही बंडखोरीच की! आणि भवताल तर असे काही नवे स्वीकारण्यास सज्ज आहेच. ते देतही आहे खूप काही. मुद्दा आहे तो आशयाचा, खऱ्या अर्थाने र्सवकष भान बाळगण्याचा, स्वत:च्या सुभ्याबाहेरचाही विचार करण्याचा. आजचे लेखक-कवी या कसोटय़ांवर किती उतरतायत, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर- लेखाच्या प्रारंभी मनोहर ओक यांच्या कवितेविषयी वसंत आबाजी डहाके यांनी केलेली टिपणी आहे, तिच्याकडेच घेऊन जाते. ‘ओक यांचा विद्रोह प्रस्थापितांविरुद्ध जरी घोषित झालेला असला, तरी प्रस्थापितांचे संकेतच चोखाळणारा आहे,’ हे डहाके यांचे त्या समीक्षेतील आणखी एक वाक्य. आजचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अपवाद सोडले तर इतरांच्या लिखाणासाठी ते लागू पडावेत. जी मंडळी कुठलाही अभिनिवेश न बाळगता आणि काय जुने- काय नवे, कालचे काय- आजचे काय, या व्यूहामध्ये न शिरता लिहीत आहेत, त्यांचा प्रश्न नाही. मात्र, ‘आम्ही काहीतरी नवीन करीत आहोत’ असा पवित्रा घेणाऱ्या, तसे सांगणाऱ्या मंडळींना त्यातून सुटता येणार नाही.

‘सत्यकथेची होळी करताना त्याच्या ठिणग्या इतरत्र उडणार नाहीत याची काळजी घ्या,’ असे श्री. पुं.नी सांगितले होते. त्या खरोखरच इतरत्र उडाल्याच नाहीत, की खूपच कमी उडाल्या?

rajiv.kale@expressindia.com