अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खासगी ‘इंटिग्रेटेड’ क्लासेसचे मुंबई-पुण्यासारख्या शहरांत सध्या पेव फुटले आहे. महाविद्यालयांना वळसा घालून थेट १२ वीची परीक्षा देता येण्याचा खुश्कीचा मार्ग हे क्लासेस महाविद्यालयांशी ‘टायअप्’ करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थी कॉलेजला न जाता फक्त क्लासला जातात. त्यामुळे विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग ओस पडत आहेत. महाविद्यालयांना वेठीस धरून हे सारे चालले आहे. सरकार मात्र डोळ्यांवर कातडे ओढून याकडे काणाडोळा करते आहे. यातून भविष्यात शिक्षणक्षेत्रात काय वाढून ठेवले आहे, याचा ऊहापोह करणारे लेख..

१९९९ सालापूर्वी १२ वीच्या विज्ञान शाखेच्या बोर्ड परीक्षेच्या मार्कावर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रथम वर्षांचा प्रवेश अवलंबून असायचा. पण ९९ सालानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी इ. पदवी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा राज्य शासनाने सुरू केली. ९९ पूर्वी सर्वच विद्यार्थी त्यांच्या स्थानिक परिसरात असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊन शिक्षण घेत असत. किंवा मग नजीकच्या शहरातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेत असत. तेव्हा ही महाविद्यालये शिक्षणाचे एकमेव व उत्कृष्ट केंद्र मानली जायची. शिकवणी वर्गाचा (कोचिंग क्लासेस) प्रसारही तेव्हा नगण्यच होता. या शिकवणी वर्गामध्ये बव्हंशी अप्रगत विद्यार्थीच प्रामुख्याने असत.
१९९०-९१ साली भारताने स्वीकारलेल्या खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणांचे चांगले परिणाम २००० सालाच्या सुमारास पाहायला मिळू लागले. त्याअगोदरचा मध्यमवर्ग आता उच्च मध्यमवर्ग म्हणून उदयास येऊ लागला होता. या वर्गाच्या हाती अधिकचा पैसा येऊ लागला व त्याच दरम्यान शासनाने १२ वी बोर्ड परीक्षेतील मार्काची मक्तेदारी काढून त्याऐवजी वैद्यकीय, अभियांत्रिकी वगैरेंतील प्रवेशासाठी नवीन प्रवेशपूर्व परीक्षा सुरू केली. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या महाविद्यालयात प्रवेशपूर्व परीक्षेच्या वर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांची ही गरज भागवायला सुरुवात केली. परंतु ज्या महाविद्यालयांनी अशी व्यवस्था निर्माण केली नाही, त्या विद्यार्थ्यांना मग खाजगी शिकवणी वर्गाची वाट धरावी लागली. यातही दोन गट पडले. एक म्हणजे स्थानिक किंवा जवळच्या शहरातील नामवंत शिकवणी वर्गात प्रवेश घेऊन राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेचा अभ्यासक्रम शिकणे आणि दुसरा म्हणजे कोटा (राजस्थान), मुंबई, पुणे, हैद्राबाद इत्यादी शहरांतील देशपातळीवर होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा (JEE, IIT, AIPMT, etc.) चा अभ्यास शिकणे.
शिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या या दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांचे पालक बऱ्यापैकी आर्थिक सक्षमता असणारे होते. या विद्यार्थ्यांची अभ्यासात आधीच चांगली प्रगती असल्याने या क्लासना जाऊन त्यांनी आपल्या मेहनतीने उत्तम यश संपादन केले.
आपला समाज (मग तो ग्रामीण असो की शहरी!) अनुकरणप्रिय असल्याने त्याला स्थानिक महाविद्यालयांत प्रवेश घेऊन, अभ्यासात खूप मेहनत करून यश संपादन करणारे विद्यार्थी कमी महत्त्वाचे वाटतात. पण शहरात किंवा नामवंत शिकवणी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी थोडं जरी यश मिळवलं, तरी ते शिकवणी वर्ग मोठमोठय़ा जाहिराती देऊन त्यांच्या विद्यार्थ्यांचं यश ‘बढ-चढाके’ सांगतात. आणि आपल्या कार्यबाहुल्यात व्यग्र असलेल्या पालकांना ते महत्त्वाचं वाटतं. ते त्यांच्या पाल्यांना अशा शिकवणी वर्गाला स्वत:ची आर्थिक व पाल्याची शैक्षणिक क्षमता नसतानासुद्धा पाठवतात. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस रोडावत चाललेली आहे. आणि त्याऐवजी खाजगी शिकवणी वर्ग मात्र फोफावत चालले आहेत.
सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच यशासाठी टोकाचा संघर्ष करावा लागत आहे. खाजगी शिकवणी वर्गाने एकदा का नाव कमावले, की त्या नावाचे ब्रँडिंग करून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते. शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वर्गात नको इतके विद्यार्थी कोंबून त्यांना शिकवले जाते. शिवाय त्यांना छापील नोटस् देऊन त्यांची तयारी करून घेतली जाते. होतकरू विद्यार्थी अशाही परिस्थितीत शिकतात. यश मिळवतात. पण त्यांची संख्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अगदीच नगण्य असते. पण क्लासवाले जाहिरातींच्या माध्यमातून त्यांचाच उदोउदो करतात. आणि त्यामुळे पालकांना हे क्लास मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने आश्वासक वाटतात. त्याचवेळी पालकांना आणखीन एक प्रश्न सतावत असतो. शिकवणी वर्गामुळे वैद्यक-अभियांत्रिकीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या तयारीचा प्रश्न मिटला तरी १२ वीची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या तरी महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यकच असते.
पूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालये महत्त्वाची वाटायची आणि शिकवणी वर्ग दुय्यम. परंतु सध्या परिस्थिती उलट झाली आहे. महाविद्यालये दुय्यम दर्जाची व शिकवणी वर्ग महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे जी महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल तगादा लावत नाहीत, विज्ञान प्रात्यक्षिके करण्यास भाग पाडत नाहीत आणि वर प्रात्यक्षिकांचे गुण पूर्णच्या पूर्ण देण्याची हमी देतात, अशा महाविद्यालयांशी साटेलोटे करून हे क्लासेस मुलांचा १२ वी परीक्षेचा प्रश्नही सोडवतात. मग अशा महाविद्यालयांकडे कोणत्याही सोयीसुविधा नसल्या तरी चालतील. अशा महाविद्यालयांचा स्वीकार पालकही करू लागले. परिणामत: जी महाविद्यालये विद्यार्थ्यांवर मेहनत घेऊन त्यांना यश मिळवून देत, ती हळूहळू मागे पडू लागली.
या शैक्षणिक व्यवस्थेत अजून एक विरोधाभास बघायला मिळतो. तो म्हणजे- कोणताही पालक किंवा विद्यार्थी अशा शैक्षणिक व्यवस्थेकडे (महाविद्यालय किंवा खाजगी शिकवणी वर्ग) मोठय़ा अपेक्षेने जातो- की त्यांच्यामुळे आपल्या गुणांत वाढ होईल. याउलट, हे क्लासेस अशा विद्यार्थ्यांच्या शोधात असतात, की जे मुळातच हुशार आहेत. त्याच्यावर थोडीफार मेहनत घेतली तरी तो त्या क्लासचे नाव करेल. या साऱ्या गोंधळात सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा मात्र कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी या क्लासेसमध्ये मोठय़ा आशेने प्रवेश घेतात. परंतु या क्लासमधील शिकवणीमुळे विशिष्ट शैक्षणिक कोर्सला नंबर लागणारे अगदीच कमी असतात. बराच मोठय़ा विद्यार्थी समुदायाला या कोर्सेसच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले किमान गुणही मिळत नाहीत.
कनिष्ठ महाविद्यालयीन या गोंधळाच्या परिस्थितीला कोणताही एकच एक घटक जिम्मेदार नक्कीच नाही.
सुरुवातीच्या काळात महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपल्या खासगी शिकवणी वर्गात अंतर्गत मार्काच्या आमिषाने आकर्षित करून महाविद्यालये खिळखिळी केली. नंतर ब्रँडेड खाजगी शिकवणी वर्गानी त्यात आणखीन भर घातली. त्यात सरकारने विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये व स्वयंसहाय्यता कनिष्ठ महाविद्यालयांना परवाने देऊन प्रस्थापित महाविद्यालयांतून सक्ती वा अति शिस्तीच्या ससेमिऱ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करून खाजगी शिकवणी वर्ग कसे वाढतील, आणि अनुदानित कॉलेजेस कशी बंद पडतील, याचीच तरतूद केली. याहीपुढे जाऊन खएए/ ककळ/ अकढटळ या अभ्यासक्रमांची तयारी करून घेण्याच्या आमिषाने देशपातळीवर अनेक शैक्षणिक संस्था ग्रामीण व शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालये दत्तक घेऊन, प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांकडून फीची प्रचंड रक्कम वसूल करून schooling, coaching & Boarding सुविधा त्यांना उपलब्ध करून देत आहेत. यामुळे जे खाजगी शिकवणी वर्ग अशा उच्च सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत, त्यांच्याकडचे विद्यार्थी कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ते संघटित होऊन शासनदरबारी अशा एकात्मिक शिकवणी वर्गावर (intigrated classes) बंदी घाला म्हणून मागणी करीत आहेत.
या सर्व शैक्षणिक सावळ्या गोंधळाच्या परिस्थितीस कारणीभूत आहे ती एकच गोष्ट : आज शैक्षणिक क्षेत्र हे सेवाभावाचं, व्यासंगाचं, विद्यार्थी घडवण्याचं उरलेलं नाही. ते एक प्रचंड मोठा व्यवसाय म्हणून समोर येत आहे. आणि यास शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटक तेवढाच जबाबदार आहे.
sbchemistry@gmail.com

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या