‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..

जुल १८८० मध्ये व्हॅन गोनं आपल्या भावाला एक पत्र लिहिलंय. ते अगदी मर्मावर बोट ठेवतं. रक्त काढणारं पत्र आहे ते. ते वाचताना रँबोची आठवण येते. दोघांच्याही पत्रांमधली भाषा इतकी एकसारखी आहे की चमत्कार वाटतो. आपल्यावर झालेल्या अन्याय्य आरोपांचं खंडन करताना दोघंही जसे एकरूप होतात. ह्य विशिष्ट पत्रात व्हॅन गो त्याच्यावर आळशीपणाचा ठपका लावलाय त्याविरुद्ध तो बोलतोय. तो दोन प्रकारच्या आळशीपणाचं वर्णन करतो. अध:पाताकडे नेणारा आळस आणि सर्जनशील आळस. पुन:पुन्हा वाचावं असं हे प्रवचनच आहे आळसावरचं. ह्य पत्रातल्या एका भागात रँबोचा प्रतिध्वनी ऐकू येतो. ‘मी जबाबदारी झटकतोय असं समजू नकोस..’ व्हॅन गो लिहितो, ‘माझ्या अप्रामाणिकपणात मी प्रामाणिकच आहे. आणि मी बदललोय, तरी तोच आहे. माझा जीव एकाच गोष्टीसाठी जळतो. ह्य जगाला माझा कसा उपयोग होईल? एखाद्या ध्येयासाठी जगणं, आणि माझ्या हातून काही भलं होणं- हे व्हायचंच नाही का कधी माझ्याकडून? सारखं शिकत राहणं आणि काही विषयांचं खोल ज्ञान करून घेणं कसं जमेल मला? माझ्या मनात हेच घोळत असतं सारखं. आणि अशावेळी आपल्या दारिद्रय़ाचे आपण कैदी आहोतसं मला वाटतं. सगळ्या जगाच्या बाहेर हाकलून लावलंय आपल्याला असं वाटतं. काही अत्यावश्यक गोष्टीसुद्धा माझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत. माझ्या उदासीचं ते एक कारण. मनात एक पोकळी जाणवते; जिथे मत्रभाव आणि गाढ, गंभीर प्रेम असायला हवं. माझी नतिक शक्ती कुरतडवून टाकणारी भयंकर निराशा! प्रेम करण्याच्या प्रेरणेवर माझं नशीब बंधनं घालतंय असं वाटतं आणि घृणेच्या भावनेने जीव गुदमरतो. देवा, किती दिवस हे आणखी?’
मग पुढे तो दोन आळसांमधला फरक दाखवतो. आळशीपणामुळेच आळशी असलेला, कणाहीन, क्षुद्र आळशी; आणि मनाविरुद्ध आळस करावा लागणारा आळशी- जो मोठ्ठं काम करण्याच्या विचारानं पेटलाय, पण काहीही करत नाही; कारण प्राप्त परिस्थितीत तो काही करू शकत नाही. सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं चित्रं तो रंगवतो आणि मग अगदी दयनीय, हृदय फाडणाऱ्या, दुर्दैवी शब्दांत तो म्हणतो : ‘काही करण्यापासून परिस्थितीच माणसांना रोखते. कुठल्या भयंकर तुरुंगात ही माणसं असतात कळत नाही. आणि ह्यंना मुक्ती मिळते तेव्हा इतका उशीर झालेला असतो! योग्य वा अयोग्य कारणांनी नष्ट झालेली अब्रू, दारिद्रय़, दु:खद परिस्थिती, संकटं- ह्य सगळ्या गोष्टी आपल्याला कोंडून ठेवतात, बांधून ठेवतात, गाडून टाकतात. हे सगळं माझी कल्पनाशक्ती मोकाट सुटल्याचं लक्षण आहे का? असं काही वाटत नाही मला. मी मग विचारतो, ‘देवा! हे खूप काळ, कायम, अनंत काळ सोसायचं आहे का?’ बंधनातून मुक्ती कशानं मिळतेसं वाटतं तुम्हाला? अती खोल, अती गंभीर अशा प्रेमानं. मत्र, बंधुभाव, प्रेम. ह्य तुरुंगाचे दरवाजे ह्यंच्यामुळे उघडतात. एखाद्या जादूई शक्तीसारखे. ह्यंच्याशिवाय मात्र माणूस तुरुंगातच राहतो. जिथे सहानुकंपा जागी होते तिथेच जीवन पुन्हा उमलतं.’ अबिसिनियामधलं रँबोचं तिथल्या स्थानिकांमधलं परागंदा जीवन आणि व्हॅन गोनं स्वेच्छेनं स्वीकारलेली वेडय़ांच्या इस्पितळातली निवृत्ती ह्यंत केवढं साम्य आहे! पण ह्य जगावेगळ्या ठिकाणांमध्येच दोघांना थोडीतरी शांती व समाधान मिळालं. एनिड स्टार्कीनं लिहिलंय की, आठ वर्षांपर्यंत रँबोचा मित्र, सहारा सगळं काही चौदा वर्षांचा द्जामी हा हरारी मुलगा होता. त्याचा नोकर, सहनिवासी. ज्यांची रँबो आठवण काढून प्रेमानं बोले अशा फार थोडय़ा लोकांपकी द्जामी होता. सर्वसाधारणत: अखेरच्या घटका मोजत असताना लोकांना आपल्या ऐन तारुण्यातल्या लोकांच्या आठवणी येतात; पण रँबो अखेरच्या क्षणापर्यंत फक्त द्जामीबद्दल बोलत होता. व्हॅन गोचं असंच. काळोखानं ग्रासलेल्या त्याच्या जीवनात रुलँ हा पोस्टमन त्याच्याबरोबर होता. ह्य जगात कोणाबरोबर तरी राहावं, जोडीनं काम करावं ही त्याची मनीषा कधी सुफळ झाली नाही. गोगांबरोबरचा त्याचा अनुभव नुसताच वाईट नव्हता, तर मरणप्राय होता. अगदी शेवटी शेवटी ओव्हृला त्याला डॉ. गाशेसारखा माणूस सापडला; पण तेव्हा फार उशीर होऊन गेला होता. त्याचं मनोधर्य पार ढासळलं होतं. ‘‘विनातक्रार सोसत राहणं एवढा एकच धडा आपल्याला आयुष्यात शिकावा लागतो.’’ आपल्या दारुण अनुभवातून व्हॅन गो एवढाच निष्कर्ष काढतो. ह्य अलौकिक विरक्तीच्या बिंदूवर येऊन त्याचं आयुष्य संपतं. जुल १८९० मध्ये व्हॅन गो गेला. वर्षभरातच रँबो आपल्या नातेवाईकांना लिहितो, ‘‘लग्न, कुटुंब, जगणं; सगळ्यांना माझा अखेरचा रामराम. हाय! संपलं माझं आयुष्य.’’ स्वत:च्या तुरुंगात अडकलेल्या ह्य दोन आत्म्यांनी मुक्ती वांछिली तशी व तितकी कधी कोणी वांछिली नसेल. अत्यंत कष्टप्रद प्रवास दोघांनीही निवडला. दोघांच्याही जीवनात कडवटपणाचा प्याला भरून उतू चाललेला होता. दोघांच्याही अंतर्यामीची जखम कधी भरून आली नाही. मरणाच्या आठेक वर्ष आधी व्हॅन गो त्याच्या एका पत्राने दुसऱ्या प्रेमभंगानं त्याचं काय होऊन बसलंय ते सांगतो. ‘‘एका फटक्यात मला कळलं की माझ्यामध्ये ह्यबाबत काहीही बदललेलं नाही. ती जखम आहे आणि ती तशीच राहणार आहे. जन्मभर मला तिला सांभाळायचंय. ती खोल आहे. कधीही भरून यायची नाही. अनंत काळ लोटला तरी पहिल्या दिवशी होती तितकीच ती ताजी राहील.’’ रँबोबाबतही असं काही घडलं असावं. जरी आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही तरी त्याचा त्याच्यावरचा परिणाम तितकाच विदारक असणार.
दोघांमधलं आणखी एक साम्य. ते सांगितलंच पाहिजे. त्यांच्या दैनंदिन जगण्यातला साधेपणा, कमीत कमी गरजा. संतांसारखे विरागी होते दोघंही. काही म्हणतात की, रँबो कंजूष होता म्हणून दरिद्रय़ासारखं जगला. पण त्यानं बऱ्यापकी धन जमा केल्यावरही एका फटक्यात ते देऊन टाकायला तो तयार झालेला दिसतो. १८८१ मध्ये आईला तो पत्रात लिहितो : ‘तुला हवं असेल तर माझं सगळं घे. मला स्वत:शिवाय कोणाची जबाबदारी नाही. आणि मला तर काही नकोच आहे.’
जेव्हा विचार करतो तेव्हा वाटतं, येणाऱ्या सर्व पिढय़ांचे प्रेरणास्रोत झालेले हे- ह्यंना गुलामासारखं राहावं लागलं, चार घास वेळेवर मिळण्याची भ्रांत पडली. एखाद्या हमालाला लागेल तेवढंच जेमतेम त्यांना हवं होतं. अशा वेळी ते ज्या समाजातून आले त्या समाजाबद्दल काय समजायचं आपण? हा समाज आपलं अध:पतन वेगानं करून घेण्याच्या तयारीत आहे, हेच नाही का त्यावरून स्पष्ट होत? त्याच्या हरारेमधून लिहिलेल्या एका पत्रात अबिसिनियाचे स्थानिक लोक आणि ‘सुसंस्कृत गोरे’ ह्यंच्यातला विरोध रँबो दाखवतो. ‘‘हरारेमधले लोक तथाकथित सुसंस्कृत गोऱ्या निगर्सपेक्षा काही खास मठ्ठ, मूर्ख आहेत असं नाही. तऱ्हा वेगळी, एवढंच. त्यांच्यात वाईटपणा कमी आहे, आणि खूपदा कृतज्ञता व एकनिष्ठता ते दाखवतात. त्यांच्याशी माणसासारखं वागलं म्हणजे झालं.’’ आपल्या सामाजिक स्तरावरच्या माणसांपेक्षा तळागाळातल्या, तुच्छ समजल्या जाणाऱ्या माणसांमध्येच तो व्हॅन गोप्रमाणेच सुखी असे. रँबोनं एक स्थानिक स्त्री जवळ केली काही काळ. व्हॅन गोनं त्याच्यापेक्षा सर्वार्थानं कमी दर्जाच्या आणि जिनं त्याला जिणं नकोसं करून टाकलं अशा स्त्रीच्या नवऱ्याची व तिच्या मुलांच्या बापाची भूमिका निभावली. शारीर प्रेमातसुद्धा सर्वसामान्यांना मिळणारी सुखं त्यांना नाकारण्यात आली. जेवढं कमी त्यांनी मागितलं, तेवढं कमी त्यांना मिळालं. सांस्कृतिक सुबत्तेने भरलेल्या जगात ते भुकेकंगालासारखे राहिले; पण त्यांनी आपल्या ऐंद्रिय संवेदना जशा तरल केल्या तशा दुसऱ्या कुणी केल्या असतीलसं वाटत नाही. अगदी थोडक्या कालावधीत हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा व संचित त्यांनी नुसतं खाऊन टाकलं. नुसतंच खाल्लं नाही, तर पचवलंही. भोवतीच्या सुबत्तेत त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली. जगण्याचा साचा शवपेटीसारखा झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतरचा जो काळ आहे त्यात त्यानं साध्या श्वासासाठी तगमगणाऱ्या त्यांच्या अंधाऱ्या आयुष्याला पोटात घेतलंय. सगळं रानटी, खोटं, जे कधी अनुभवलं नाही असं सगळं उसळून आता पृष्ठभागावर येतंय. हे तथाकथित आधुनिक जग किती आधुनिक नाही, ते आता आपल्याला कळायला लागलंय. खरी आधुनिक माणसं होती त्यांना आपण कसोशीनं डच्चू दिलाय. रँबो व व्हॅन गो- दोघांचंही ईप्सित रोमँटिक वाटतंच म्हणा आता. ते आत्म्याची भाषा बोलत होते. आपण मेलेली भाषा बोलतो. प्रत्येकाची वेगळी भाषा. संवाद संपला. आता प्रेताची विल्हेवाट लावा.
‘पुढच्या महिन्यात मी बहुधा झांजिबारला जाईन.’ रँबो एका पत्रात लिहितो. दुसऱ्या एका पत्रात चीन किंवा हिंदुस्थान इथं जाण्याचा विचार करतोय असं तो लिहितो. जगाच्या अंतापर्यंत जायला तो तयार आहे. आपल्या मातृभूमीलाच परतावं, आयुष्य नव्यानं सुरू करावं, व्हावं असं मात्र त्याला वाटत नाही. त्याचं मन नेहमी लोकविलक्षण जागांकडे धावतं.
कसा आम्हा दोघांचा संवादी सूर लागतो! सुरुवातीच्या दिवसांत टिंबक्टूला जायची किती स्वप्नं पाहिली मी. ते अशक्य असेल तर अलास्का, नाहीतर पॉलिनेशिअन बेटं. म्युझियममध्ये करोलाइन बेटांवरच्या लोकांचे चेहरे पाहत मी किती वेळ उभा असायचो. त्यांचे सुंदर नाक, डोळे पाहताना मला एकदा आठवलं की, आमचे दूरचे नातेवाईक तिथं स्थायिक झालेले आहेत. मला वाटलं, आपण तिथं कधी गेलोच तर ‘घरच्यासारखं’ वाटेल. पौर्वात्य देश तर मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असतातच. अगदी लहानपणीच मला त्यांची ओढ लागली. फक्त चीन व जपान नाही, तर जावा, बाली, बर्मा, नेपाळ, तिबेट ह्य दूरच्या देशांमध्ये आपल्याला अडचणी येतील असं कधी मनातसुद्धा आलं नाही. आपलं बाहू पसरून तिथे स्वागत होईल असंच मला वाटायचं. न्यूयॉर्कला परतायचा विचार मात्र कापरं भरवायचा. ज्या शहरातला रस्तान् रस्ता मला माहीत आहे, जिथे मला इतके मित्र आहेत, तिथे चुकूनही जाण्याची वेळ न येवो. माझ्या ह्य जन्मगावी माझं उरलेलं आयुष्य असं जबरीनं घालवण्यापेक्षा मरण बरं. न्यूयॉर्कला मी म्हणजे एकच माझं चित्र डोळ्यांसमोर येतं.. भणंग, मोडलेला.
रँबोची सुरुवातीची पत्रं मी कोण कुतूहलानं वाचतो! त्याचं भटकणं नुकतंच सुरू झालंय. त्यानं पाहिलेली दृश्यं, त्या- त्या देशांतली जीवनपद्धती; सगळ्याबद्दल तो विस्तारानं लिहितो. असं लिहिणं घरचे लोक आनंदानं आणि उत्साहानं वाचतात. गन्तव्यापर्यंत पोचल्यानंतर आपल्याला योग्य तो उद्योग मिळेल ह्यची त्याला खात्रीच आहे. त्याला स्वत:ची खात्री आहे. सगळं चांगलं होणार. तो तरुण, ऊर्जेनं भरलेला. आणि जग असं पाहण्यासारख्या इतक्या गोष्टींनी भरलेलं. त्याच्यामध्ये अपार ऊर्जा आणि उत्साह आहे खरा; गुण आहेत, स्वतंत्र बुद्धी आहे, जिगर आहे, मनमिळावूपणा आहे, सगळं खरं; पण त्याच्या लवकरच लक्षात येतं की, त्याच्यासारख्याला ह्य जगात कुठेही जागा नाही. ह्य जगाला नवीन काही नकोय, तर रुढीबद्धता, गुलामी, आणखी गुलामी हवी आहे. प्रतिभावंतांची जागा आता गटारात; तिथं त्यानं खड्डे खोदावेत किंवा खाणीत काम करावं. उपजीविकेची शोधाशोध करणारा प्रतिभावंत हे जगातलं सगळ्यात दु:खद दृश्य आहे. तो कुठे सामावला जाऊ शकत नाही; आणि कोणालाच तो हवासा नसतो. जग म्हणतं, तो विक्षिप्त आहे. असं म्हणून कायम त्याच्या तोंडावर दरवाजे आपटले जातात. त्याच्यासाठी खरंच का कुठेही एखादा कोपराही नाही? आहे की. अगदी तळाला आहे थोडासा. कॉफीची किंवा तत्सम पोती धक्क्यावर वाहून नेताना त्याला पाहिलं नाहीए का तुम्ही? गलिच्छ उपाहारगृहातल्या स्वयंपाकघरात तो कपबशा कशा छान धुतो तेही पाहिलंय तुम्ही. रेल्वेस्टेशनवर पेटय़ा, संदूकी ओढून नेताना? असंही पाहिलंय तुम्ही त्याला.
मी न्यूयॉर्कमध्ये जन्मलो. सर्वाना वाटतं त्याप्रमाणे यशस्वी होण्याच्या संधी त्या गावात खूप आहेत. नोकरी देणाऱ्या किंवा भीक देणाऱ्या संस्थांसमोर मी रांग लावून उभा आहे असं चित्र डोळ्यांसमोर आणणं मला मुळीसुद्धा कठीण नाही. त्या काळात माझ्या लायकीचं एकच काम मला मिळायचं. कपबशा धुणं. तिथेसुद्धा मी वेळेत पोचायचो नाही. कपबशा धुवायला तयार आणि उत्सुक माणसं हजारोनी कायम असतात. खूपदा तर माझं काम मी दुसऱ्या कुणा भणंगाला- जो माझ्यापेक्षा हजारपट गयाबीता असे, त्याला देऊन टाकत असे. कधी कधी असंही झालंय, की रांगेतल्या एखाद्याकडून जेवणासाठी मी पैसे उसने घेतले आणि मग कामबिम विसरूनच गेलो. शेजारच्या गावात मला बऱ्यापकी वाटणाऱ्या कामाची जाहिरात दिसली की तिथे मी प्रथम जायचो. जाईना का वाया सगळा दिवस जाण्या-येण्यात. हजारो मल मी प्रवास केलाय हजारो वेळा.. एखाद्या वेटरबिटरच्या कामासाठी. खूपदा आता दूर जायच्या कल्पनेनंच मी उत्तेजित व्हायचो. तिथे जाताना मग प्रवासात मी कोणाशी तरी बोलणं सुरू करायचो आणि माझ्या आयुष्याची दिशाच बदलायची. मी इतका काही कडोनिकडीला आलेला असायचो, की स्वत:ला त्याच्या गळीच बांधायचो आणि त्याची कारणमीमांसाही स्वत:च करायचो. कधी कधी ज्या कामाच्या शोधात मी गेलो ते मला मिळायचंही; पण मला खोलवर पक्कं माहीत असायचं, की हे काही आपल्याला झेपणार नाही. की लगेच आम्ही आल्या पावली परत. तेसुद्धा उपाशीपोटी- हे सांगायला नकोच. माझी येणी-जाणी सगळी उपाशीपोटीच. ही दुसरी एक गोष्ट प्रतिभाशाली माणसाच्या बाबत. जेवणाची वानवा. एकतर तो कुणालाच नको असतो मुळात. दुसरं- याच्यासाठी अन्न आणायचं कुठून? तिसरी गोष्ट- डोकं टेकायला त्याला जागा नसणं. तरीसुद्धा सगळ्यांना माहीत आहे की तो ह्य सगळ्या गरसोयींसकट मजेत असतो. तो आळशी, अस्थिर, असंतुलित, विश्वासघात करणारा, खोटारडा, चोर, भणंग असतो ना! जिथे जाईल तिथे हा असंतोष पसरवणार. खरंच! अस माणूस. कोण त्याच्याशी जमवून घेणार? कोणी नाही. तो स्वत:ही नाही. जाऊ दे. उगाच कुरूप विसंवादी गोष्टींचा कोळसा कशाला उगाळायचा! प्रतिभावंतांचं आयुष्य म्हणजे फक्त घाण व दु:ख एवढंच नसतं. सगळ्यांनाच आपापल्या विवंचना असतात. तो प्रतिभावंत असो की नसो. हे तर सत्यच आहे. आणि सत्याचं कौतुक प्रतिभावंतांइतकं कोणाला नसतं. ह्य जगाला कसं वाचवायचं ह्यचा आराखडा वेळोवेळी प्रतिभावंत घेऊन येतो हे पालंय तुम्ही. वाचवणं नाही, तर जीर्णोद्धार तरी. ह्यवर सगळे अर्थातच हसतात ह्यला- युटोपियन म्हणून. तुम्ही म्हणता, बाबा प्रतिभावंता, आधी तू स्वत:चं सांभाळ. जो स्वत:ला सांभाळू शकत नाही तो इतरांना काय सांभाळणार? अगदी बरोबर प्रश्न. नेहमीचा. निरुत्तर करणारा. पण ह्यतून हा प्रतिभावंत काही शिकतच नाही ना! तो जन्मतोच मुळी स्वर्गाची स्वप्नं डोक्यात घेऊन. आणि त्याला तुम्ही कितीही वेडा म्हणा, तो आपलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारच धडपडणार. तो कामातून गेला आहे, सुधारणेच्या पलीकडे. त्याला भूतकाळ समजतो. भविष्याला तो मिठी मारतो. पण त्याला वर्तमान मात्र अर्थहीन वाटतो. यशाच्या गळाला ह्यचा मासा काही लागत नाही. सगळी पारितोषिकं, सगळ्या संधी हा धिक्कारणार. हा कायम असंतुष्ट. त्याचं काम मारे तुम्ही स्वीकारलंही, तरी तो तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही. कारण एव्हाना महाराज दुसऱ्या कामात गुंतलेयत. त्यांचं लक्ष दुसरीकडे वळलंय. उत्साह दुसऱ्याच कामासाठी. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता? त्याला शांत कसं करू शकता? तर काही करू शकत नाही. अशक्याच्या मागे लागलेला तो! तो आपल्या पकडीच्या बाहेरचा आहे.
प्रतिभावंताची ही अनाकर्षक प्रतिमा माझ्या मते बरीचशी बरोबर आहे. थोडय़ाबहुत फरकाने अनागर समाजातही जरा वेगळा असलेल्या माणसाची हीच दशा असेल. आदिवासी झाले तरी त्यांनाही त्यांचे जगावेगळे न्यूरॉटिक्स असणारच. असं असून आपण हट्टानं म्हणत राहतो की, ही परिस्थिती अशीच राहणार नाही. उलट, एक दिवस असा येईल, की ह्य प्रकारच्या माणसाला ह्य जगात नुसतं स्थानच नसेल, तर त्याच्याबद्दल सगळ्यांना आदर असेल, तो सगळ्यांचं प्रेरणास्थान असेल. हेही दिवास्वप्नच असेल म्हणा.
जुळवून घेणं, सुसंवाद, शांती, देवाणघेवाण ह्य सगळ्या सतत दूर सरकणाऱ्या मृगजळाच्याच बाजू आहेत. पण आपण ह्य संकल्पना निर्माण केल्यायत. आपल्यासाठी त्यांना अतीव खोल अर्थ आहे, ह्यचाच अर्थ त्या प्रत्यक्षात येऊ शकतात. गरजेपोटी त्या निर्माण झाल्या असतील; पण इच्छेमुळे त्या वस्तुस्थिती बनतील. प्रतिभावंत असंच समजून जगतो की त्याच्या स्वप्नांची पूर्तता होईल. ह्य स्वप्नांच्या शक्तीने तो इतका झपाटलेला असतो, की सगळ्या माणसांना निर्वाणपद मिळेपर्यंत मी ते स्वीकारणार नाही असं म्हणणाऱ्या थोर अर्हताप्रमाणे तो स्वत:ही आपल्या स्वप्नांचा अनुभव घेत नाही.
‘त्याच्या कवितांच्या फुलोऱ्यातून उडणारे सोनेरी पक्षी!’ कुठून आले रँबोचे हे सोनेरी पक्षी? आणि कुठल्या दिशेला उडतात ते? ते काही कबुतरं, गिधाडं नाहीत. ते सोनेरी पक्षी कायम हवेतच राहतात. अंधारात जन्मलेले आणि आत्मप्रकाशात सोडून दिलेले हे पक्षी. हवेत उडणाऱ्या देवदूतांशीही त्यांचं साम्य नाही. ते आत्म्याचे दुर्मीळ पक्षी आहेत.. सूर्यमंडळापासून सूर्याकडे सतत उडणारे. ते कवितांमध्ये बंदिस्त होत नाहीत; तिथे त्यांना मुक्तता मिळते. उत्कट आनंदाच्या पंखांनी ते उडतात आणि ज्वालांमध्ये नाहीसे होतात.
अत्यानंदाचा भुकेलेला हा कवी एखाद्या अतिसुंदर अनोळखी पक्ष्यासारखा आहे; पण विचारांच्या राखेत रुतलेला. तो हय़ा राखेतून मोकळा झालाच तर सूर्याकडे आत्मयज्ञाची झेप घेण्यासाठीच. नव्या जगाची त्याची स्वप्नं म्हणजे त्याच्या तप्त नाडीच्या ठोक्यांसारखी. जग आपल्याबरोबर येईलसं त्याला वाटतं, पण वरच्या निळाईत तो एकटाच असतो. एकटा- पण त्याच्या निर्मितीनं वेढलेला, अखेरच्या सर्वश्रेष्ठ बलिदानाची शक्ती राखून असलेला. अशक्य गोष्ट शक्य झालीय, लेखकाचा आर्ष लेखकाशी संवाद सिद्ध झालाय. येणाऱ्या सर्व युगांमध्ये त्याचं गाणं पसरत जाणाराय, लोकांना दिलासा देत, त्यांच्या मनात खोलवर रिघून. जग परिघावर मरत असेल; पण केंद्रस्थानी निखाऱ्यासारखं धगधगतंय. विश्वाच्या हृदयसूर्यामध्ये सगळे सोनेरी पक्षी एकत्र येतायत. तिथे कायम उष:काल असतो. चिरंतन शांती, सुसंवाद असतो. एकात्मता असते. कवी उगाचच सूर्याकडे डोळे नाही लावत. सूर्याला तो प्रकाश आणि उब मागतो ते त्याच्या अंत:स्थ आत्म्यासाठी. आनंदानं धगधगत राहावं ही त्याची मोठय़ात मोठी इच्छा असते; जेणेकरून त्याची आत्मज्योत वैश्विक प्रकाशामध्ये विलीन होईल. शांतीचा, सुसंवादाचा, तेजाचा संदेश देवदूतांनी आपल्याकडे परक्या जगातून आणावा म्हणून त्यानं त्यांना पंख दिले ते अशा विश्वासानं, की उड्डाणाची आपली स्वप्नं सुफल होतील. एक दिवस सोनेरी पंखांनी तो स्वत:पलीकडे जाईल.
एक निर्मिती दुसरीसारखी असते; त्यांचं मूलतत्त्व एकच असतं. माणसांचं भ्रातृत्व एकसारखा विचार करण्यात नाही की एकसारखं वागण्यात नाही; तर त्यांनी निर्मितीची स्तोत्रं गाण्यात आहे. ह्य भूमीवरच्या पडझडीतूनच निर्मितीचं गाणं उसळतं. माणसाचं बाह्यंग नाहीसं होतं ते दिव्यत्वाकडे झेपावणाऱ्या सोनेरी पक्ष्याला आविष्कृत करण्यासाठीच.
(क्रमश:)
महेश एलकुंचवार

(c) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक