विनाशवेळा-७

‘‘तुझ्या भावाजवळ श्रद्धा आहे, मुली. त्याच्याजवळ जशी श्रद्धा आहे तशी माझ्याजवळही कधी नव्हती.’’

‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..

भाग २
‘अ सीझन इन हेल’मधल्या ‘द इंपॉसिबल’ ह्य भागात एक उतारा येतो. रँबोनं आयुष्यात दु:खाचे जे दशावतार पाहिले त्यांचा अंदाज ह्य उताऱ्यावरून काहीसा येतो. हे त्याचं शेवटचं पुस्तक. वयाच्या अठराव्या वर्षी! ह्य टप्प्यालाही महत्त्व आहे. इथं त्याच्या आयुष्याचे बरोबर दोन तुकडे होतात. त्याचं एक आयुष्य संपतं व दुसरं सुरू होतं. ल्युसिफरप्रमाणे रँबोनंही स्वर्गातून स्वत:ची हकालपट्टी यशस्वीपणानं करवून घेतली होती. त्याच्या तारुण्याचा स्वर्ग! आणि इथे त्याला नेस्तनाबूत कोणी आर्कएंजल करीत नाही, तर त्याची आईच ते करते. रँबोसाठी आई म्हणजे मूíतमंत शासन. आणि त्याचा स्वभावही असा, की आपल्या हतभागीपणाला प्रोत्साहनच मिळेल असंच हा वागणार. हा जबर प्रतिभा असलेला तरुण- त्या प्रतिभेचाच तिरस्कार करतो आणि फटकन् आपल्या आयुष्याचे दोन तुकडे करतो. त्याचं हे वागणं एकाच वेळी भव्यही आहे आणि भयानकही. कुणासमोर न नमणाऱ्या आपल्या गर्वापोटी, अहंकारापोटी रँबोनं स्वत:ला जी क्रूर शिक्षा ठोठावली, तीपेक्षा अधिक क्रूर शिक्षा सतानालाही सुचली नसती. अगदी तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना आपलं सगळं वैभवच असलेली आपली सृजनशक्ती तो मृत्यूच्या त्या अज्ञात प्रेरणेच्या व शक्तीच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवतो. ज्या hydre intime– बहुमुखी सर्पाबद्दल रँबो खूपदा बोलतो, तो सर्प त्याची प्रेमभावना इतकी विकीर्ण करतो, की शेवटी रँबोमध्ये उरते ती हताशा आणि मुजोरी फक्त- असं आपल्याला दिसतं. आपल्या हरवलेल्या निरागसपणाला शोधण्याची चावी त्यानं हरवलीय आणि आशाहीन झालेला रँबो आता ज्याचा तळही लागत नाही अशा खोल, काळ्या विवरात स्वत:ला झोकून देतोय. कृष्णानं गीतेत म्हटलंय : ‘सर्व मी, सर्वगत मी, सर्वातीत मी’! ह्यचं जणू विडंबनच करतोय रँबो आपल्या वागण्यानं.
आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आणि आपण काय दरिद्री निवड केलीय, ह्यबद्दलची त्याची जाणीव पुढील परिच्छेदात स्पष्टच होते.
‘‘ह्य क्षणापासून माझा आत्मा अगदी पापणीही न हलवता जागा राहिला तर आपण सत्याप्रत पोहोचू. ते सत्य कदाचित आपल्याला आताही वेढून असेल आणि सत्याचे देवदूत अश्रू गाळत असतील. आधीच- ह्य क्षणापर्यंत ते जागृत झालं असतं तर मी भ्रष्ट प्रेरणांच्या ताब्यात स्वत:ला दिलं नसतं, एका विस्मरणात गेलेल्या युगाला मी शरण गेलो नसतो. ते सदैव जागृतावस्थेतच असतं तर मी संपूर्ण शहाणपणानंच माझी नाव हाकारली असती!..’’
त्याचं द्रष्टेपण आंधळं करणारं हे काय होतं; ज्याच्यामुळे त्याचा विनाश झाला. ते काय, ते कोणालाही माहीत नाही; आणि कदाचित पुढेही कोणाला माहीत होणार नाही. त्याच्याबद्दलची जी काय वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहे तशी ती असली तरी त्याचं आयुष्य त्याच्या प्रतिभेइतकंच गूढ राहतं. आपल्याला स्पष्ट दिसतं ते एकच. आत्मप्रकाशानं भरलेली तीन र्वष त्याला मिळाली तेव्हा त्यानं स्वत:बद्दल जी भविष्यवाणी केली होती, ती अनेक र्वष अखंड वणवणत त्यानं स्वत:चं वाळवंट करून घेतलं त्यानं प्रत्यक्षात येते. त्याच्या लेखनात वाळवंट, सुन्नपणा, संताप, कष्ट हे शब्द कितीदा म्हणून येतात. त्याच्या आयुष्याच्या दुसऱ्या भागात ह्य शब्दांना एक मूर्त निश्चितार्थ मिळतो आणि तो विदारक आहे. त्यानं जे जे भविष्य वर्तविलं होतं, ज्याचं ज्याचं त्याला भय होतं, ज्याच्या ज्याच्या विरुद्ध तो संतापानं भडकून उठत असे, ते- ते तो स्वत:च सगळं झाला. माणसांनीच निर्माण केलेल्या बेडय़ा तोडून कायदे, संकेत, रूढी, अंधश्रद्धा ह्यंच्यापासून स्वत:ला मुक्त करण्याच्या धडपडीतून काही निष्पन्न झालं नाही. स्वत:च्याच लहरीपणाचा व विक्षिप्तपणाचा तो गुलाम होताना दिसतो; स्वत:च्याच जन्मठेपेच्या शिक्षेच्या फर्मानावर आणखी दोन-चार आलतूफालतू गुन्हे चढवणारी एक कठपुतळी.
आपलं शरीर म्हणजे ‘अविचल ओंडका’ आहे असं म्हणून तो धाराशायी होतो ते कुजकट हसून मनाबाहेर करावं असं नाहीए. रँबो मूíतमंत विप्लवच होता. त्याची जिवट इच्छाशक्ती तिच्या मुळांपाशीच विद्ध झालेली होती. तिला तोडून मोडून टाकायचं तर मनुष्यमात्राला माहीत असलेले सगळे अध:पात, मानखंडना, छळाचा प्रत्येक प्रकार वापरायला हवा होता. शेवटच्या क्षणापर्यंत तो तिरपागडा, आडमुठा, हट्टी राहिला. आशाहीनतेची शीग गाठूनही. जगात त्याच्याइतका प्रमाथी आत्मा कधी झाला नसेल. हे खरंय, की थकून अखेर त्यानं हार मानली; पण तोपर्यंत सगळे चुकीचे रस्ते त्यानं तुडवले होते. सरतेशेवटी जेव्हा आपला अभिमान टिकवायला त्याच्याजवळ काही राहिलं नाही, मृत्यूच्या उघडलेल्या जबडय़ात शिरणं ह्यशिवाय त्याच्याजवळ दुसरं काही उरलं नाही, त्याच्यावर प्रेम करणारी बहीण सोडून इतर सर्वानी ओवाळून दूर फेकलेला हा; दयेसाठी किंकाळी फोडण्याशिवाय त्याला दुसरं काही करायला शिल्लक राहिलं नव्हतं. त्याचा आत्मा छिन्नभिन्न झालाय, तो आता शरणागतीच पत्करणार. फार पूर्वी त्यानं लिहिलं होतं, ‘मी दुसराच आहे.’ आता ‘आत्मा राक्षसी कसा करायचा’ ह्य समस्येवर तोडगा मिळालाय. त्याच्यातला ‘मी’ त्याच्या दुसऱ्या व्यक्तित्वानं त्यागला आहे. त्या ‘मी’नं एक प्रदीर्घ, कठोर शासन भोगलं होतं, झालेल्या प्रत्येक हल्ल्याला तोंड दिलं होतं, ते अखेर शतखंड होऊन शून्यात विरघळून जाण्यासाठीच.
‘‘तू द्रष्टा आहेससं वाटतं. स्वत:ला द्रष्टा कर तू..’’ असं त्यानं कारकीर्दीला सुरुवात करण्याआधी स्वत:लाच सांगितलं होतं. आणि मग एकदमच ते संपलं. त्याची कवी म्हणून कारकीर्द संपली. साहित्याचं त्याला काही देणंघेणं राहिलं नाही; अगदी स्वत:च्याही नाही. त्यानंतर मग पाय तुटेपर्यंत भ्रमंती, वाळवंट, पापभावनेचं ओझं, कंटाळा, संताप, कष्ट आणि मानखंडना, एकाकीपणा, दु:ख, नराश्य, पराभव आणि ते अखेर शरण जाणं. ह्य परस्परांशी झगडणाऱ्या भावनांच्या उजाडीतून, स्वत:च्या मर्त्य शरीराच्या रणभूमीतून, त्याच्या अखेरीच्या क्षणी उमलतं श्रद्धेचं फूल. देवदूतांनी किती आनंदोत्सव केला असेल त्या क्षणी. ह्यच्यासारखा कोणासमोर न नमणारा कधी कोणी झाला नाही. आपण क्षणभरही एक गोष्ट नजरेआड होऊ द्यायला नकोय पण. आपण आपल्या गॉलिक पूर्वजांकडून मूíतभंजन आणि पाखंडीपणा आनुवंशिकतेनं घेतलाय, अशी बढाई मारणाऱ्या ह्य कविश्रेष्ठाला शाळेत ‘कडवा धर्मश्रद्ध’ म्हणत. आणि ही पदवी तो अभिमानानं मिरवायचा. अगदी ‘कायम गर्वसे’! हे सत्य एवढय़ा गर्वानं नमूद करतो तो- ते त्याच्यात एक मवाली आहे म्हणून, की कडवा धर्मश्रद्ध, देवदूत आहे म्हणून, की सतान, पळपुटा आहे म्हणून, की जुलुमीपणा त्याच्यात आहे म्हणून? पण सरतेशेवटी ज्याच्याजवळ रँबोनं ऐटीत कन्फेशन दिलं तो प्रिस्ट काय म्हणतो? रँबोच्या इझाबेला ह्य बहिणीला तो प्रिस्ट म्हणाला, ‘‘तुझ्या भावाजवळ श्रद्धा आहे, मुली. त्याच्याजवळ जशी श्रद्धा आहे तशी माझ्याजवळही कधी नव्हती.’’
जीवनासाठी तहानलेल्या एका अतिशय निराश आत्म्याची ही श्रद्धा आहे. सगळं संपत आलं असताना अखेरच्या मिनिटाला, अखेरच्या क्षणी उदेजलेली ही श्रद्धा आहे; पण ती श्रद्धाच आहे, हे तर खरंच. अशा परिस्थितीत मग त्यानं तिचा किती काळ मुकाबला केला, किती वादळी आवेगानं, ह्यला काही अर्थ उरत नाही. त्याचा आत्मा कंगाल नव्हता; भव्य होता. आपल्या सर्वशक्तिनिशी तो कणाकणाने लढला. म्हणून तर ल्युसिफरप्रमाणे त्याचंही नाव कायम झगमगत राहील. दोन्ही बाजू- स्वर्ग व नरक- त्याला आपल्या बाजूचा म्हणतील. अगदी त्याचे शत्रूसुद्धा त्याला आपल्या बाजूचा म्हणतात! आपल्याला माहीत आहे, त्याचं जन्मगाव असलेल्या चार्ल्सव्हील इथं त्याचं स्मारक आहे पुतळ्याच्या रूपानं; तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी त्या पुतळ्यांचं मस्तकच उडवलं आणि जर्मनीला नेलं. त्याचा मित्र देलाहाये एकदा जर्मन आक्रमक विजेत्यांच्या नि:संशय श्रेष्ठत्वाबद्दल बोलला तेव्हा रँबोनं त्याच्यावर फेकलेले वाग्बाण किती अविस्मरणीय, किती द्रष्टय़ासारखे आहेत! ‘‘ती गाढवं! त्यांच्या किंकाळणाऱ्या तुताऱ्या आणि ढोलताशांचे आवाज करत ती परततील आपल्या देशाला त्यांची सॉसेजेस खायला. अशा मिजाशीत- की संपलं सगळं. थोडा थांब. आता ते सगळे नखशिखांत सनिक झालेले आहेत. काही काळ विजयोन्मादाचा हा कचरा ते गिळतील, पण त्यांना त्यांचे विश्वासघातकी मालक कधी मोकळं सोडायचे नाहीत.. मला आजच दिसतंय की सगळा जर्मन समाज आता पोलादी पकडीच्या, वेडाचाराच्या तुरुंगात बंदिस्त होणार म्हणून. आणि हे सगळं कशासाठी, तर अखेर कुठल्यातरी युतीनं त्यांना चिरडून टाकावं म्हणून!’’
हो. दोन्ही बाजू त्याच्यावर हक्क सांगतात, हे तर खरं. मी म्हणतो, ते वैभवच आहे त्याचं. त्याचा अर्थ असा होतो की, त्यानं अंधाराला आणि उजेडाला, दोघांनाही आिलगन दिलं आहे. त्यानं त्याग कशाचा केला असेल, तर जिवंत मरणाचा; संस्कृती व सभ्यता ह्यंच्या खोटारडय़ा जगाचा. ज्याच्या आधारानं आजचा आधुनिक माणूस जगतो तो सगळा कृत्रिम फापटपसारा ओढून काढून रँबो त्याला नग्नमनस्कच करतो. ‘अबसोल्यूटली मॉडर्न’ असं तो म्हणतो. इथं अबसोल्यूटली, पूर्णत्वानं, हे महत्त्वाचं आहे. पुढे तो आणखी म्हणतो, ‘‘माणसांच्या लढायांइतकीच आत्म्याची लढाई निर्दय असते; पण न्यायाच्या प्रकाशाचं परमभाग्य येतं फक्त देवाच्याच वाटय़ाला.’’ त्याच्या म्हणण्यातला गूढार्थ असा की, आपलं स्वत:शी होणारं युद्ध हे पूर्वीच्या संतांनी जी कठोर, निर्दय आत्मयुद्धं लढली तशा धर्याचं हवं. तो म्हणतो, ते संत खंबीर होते, ऋषिमुनी कलावंत होते; पण आता तसं जगणं कालबा झालंय. शिस्तीचं मूल्य ज्याला कळलं, आत्मशिस्त- जिच्यामुळं जीवन कलेच्या पातळीवर जाऊन पोचतं असं ज्याला वाटतं तोच माणूस त्या पवित्र आत्म्याची अशी गाणी गाऊ शकतो.
एका अर्थानं रँबोचं सगळं आयुष्यच एका प्रकारच्या शिस्तीच्या शोधात गेलं. अशी शिस्त, की जी त्याला स्वातंत्र्य देईल. आधी तो उन्मेषी होता तेव्हा ही गोष्ट स्पष्टच जाणवते- जरी त्याच्या शिस्तीची तऱ्हा आपल्याला पटली नाही, तरी. त्याच्या आयुष्याच्या दुसऱ्या भागात त्यानं समाजापासून पूर्ण फारकत घेतल्यानंतर स्वत:वर लादलेली ‘स्पार्टन’ शिस्त मात्र आकळेनाशी आहे. ऐहिक मिळकतीसाठी फक्त तो हे सर्व परिश्रम आणि उपासमार सोसत होता का? मला शंका आहे. वरवर पाहिलं तर वाटतं, की इतर कोणाही पशाच्या मागे लागलेल्या माणसाप्रमाणे ह्यलाही काही दुसरा जीवनहेतू, ध्येय नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल खवट शंका घेणाऱ्यांना तसं वाटतं. हे सगळे अयशस्वी पराभूत असतात आणि रँबोसारखा गूढ, थोर माणूस आपल्यासारखाच होता, हे दाखवायला त्यांना फार आवडतं. मला वाटतं की, रँबो आपलं स्वत:चंच सन्य तयार करीत होता. तोच सन्य, त्याच्याशीच त्याची लढाई. त्यावेळी त्याला कदाचित हे कळलं नसेल, पण त्याचं वर्तन स्वत:च्याच पाशवी अंशाशी निकराचा लढा देणाऱ्या संतांच्या वर्तनाशी खूप मिळतंजुळतं. तरुणपणी त्यानं ज्या दैवी कृपाप्रसादाला तुच्छतेनं व अडाणीपणानं धिक्कारलं होतं, त्या कृपाप्रसादासाठी तो आता आंधळेपणानं का होईना, स्वत:ला तयार करीत होता. स्वत:चीच कबर खोदत होता, असंही म्हणता येईल. पण त्याला जी कबर प्रिय होती, ती ही नव्हे. जीवजंतूंची त्याला भयंकर भीती. त्याच्या दृष्टीनं फ्रेंचांच्या जीवनशैलीत मृत्यूनं आपला आविष्कार कधीच दाखवला होता. त्याचे भयंकर शब्द आठवून पाहा. : ‘‘सुकलेल्या हातांनी शवपेटिका उघडणं, तीत बसणं, गुदमरणं. असं केलं की म्हातारपण नाही की धोका नाही. भय काही फ्रेंच नाही.’’ जिवंत मरणाच्या ह्य भीतीपोटी त्यानं कष्टाचं आयुष्य निवडलं. प्रवाहाच्या मध्यावर येऊन बुडण्यापेक्षा प्रत्येक भयाचा सामना करायला तो तयार होता. मग अशा ह्य कष्टदायक आयुष्याचं ध्येय म्हणा ईप्सित म्हणा, होतं तरी काय? एक गोष्ट नक्की. आयुष्याच्या सगळ्या कळांचा वेध घेणं. ह्य जगाबद्दल तो म्हणतो : ‘किती भव्योदात्त जागांनी हे जग भरलेलं आहे. हजारो माणसांची आयुष्यं मिळाली तरी त्या सर्व ठिकाणी जाता येणार नाही.’ त्याला असं जग हवं होतं की ‘जिथे त्याची प्रचंड ऊर्जा कुठल्याही अडथळ्याशिवाय आपलं काम करू शकेल.’ स्वत:च्या सर्व शक्ती त्याला खर्च करायच्या होत्या त्या आत्मशोधासाठीच. सरतेशेवटी त्याची महत्त्वाकांक्षा एकच होती. तो कितीही झोडपला गेला, कितीही गलितगात्र झाला, तरी स्वर्गीय प्रकाशानं झळाळणाऱ्या अशा एका जगाच्या उंबरठय़ाशी त्यानं येणं, की त्या जगाचं त्याला सध्याच्या माहीत असलेल्या जगाशी काही म्हणता काही साधम्र्य नसेल.
हे दुसरं जग आत्म्याचं व झगमगणारं असेल. आत्मा नेहमी तरुणाईतच नाही का स्वत:ला आविष्कृत करत? अबिसिनियामधून भयानक विषण्ण मन:स्थितीत रँबोनं आपल्या आईला लिहिलं : ‘‘आपण जगतो, मरतो. आपल्या हाती काही नसतं. नशीब आपलं, की एकदाच आपल्याला हे आयुष्य जगायला लागतं.’’ पण हेच एक आयुष्य आपल्याला मिळालंय अशी त्याची खात्री होती, ती काही पक्की नव्हती. त्याच्या नरकयातना भोगताना त्याला कितीदा वाटलंय की, कदाचित पुन्हा आयुष्यं मिळत असतील. असं त्याला वाटायचं, आणि ही भावना त्याच्या यातनांचाच एक हिस्सा होती. आता मी बोलण्याचं धाडस करतो की, प्रत्येक अपयशी, वाया गेलेल्या जीवनानंतर आणखी एक, आणखी एक अशी खूप आयुष्यं मिळत असतील, त्या माणसाला आत्मप्रकाश मिळून त्याच्याप्रमाणे तो माणूस जीवन व्यतीत करीत असेल, असं रँबोइतकं कोणाला ठाऊक नव्हतं. रणभूमीवरच्या लढाईइतकंच आत्मयुद्धही कठोर व क्रूर असतं. संतांना ते माहीत होतं. पण आजचा माणूस हसतो ह्य कल्पनेला. नरक काय, आपल्याला वाटेल तसा, वाटेल तिथे असतो. आपल्याला वाटत असलं की आपण नरकात आहोत, तर मग आहातच तिथं तुम्ही. आणि आधुनिक माणसासाठी जीवन म्हणजे चिरंतन नरक झालाय. एवढय़ाच एका साध्या कारणासाठी, की त्याची स्वर्गाची आशा आता त्यानं हरवली आहे. आपला स्वत:चाच स्वर्ग आपण निर्माण करू शकतो, ह्यवरसुद्धा त्याचा विश्वास उरलेला नाही. ‘स्वत:च्या इच्छा फक्त पूर्ण करणं’ ह्य अतिखोल फ्रॉडियन नरकापर्यंत त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीनं त्याला शापित करून आणलंय. त्यांचं ते सुप्रसिद्ध द्रष्टय़ाचं पत्र, वयाच्या सतराव्या वर्षी त्यानं लिहिलेलं! अनेक थोरांनी लिहून ठेवलंय त्यानं जेवढी खळबळ माजवली नसेल तेवढी रँबोच्या त्या एका पत्रानं माजली. ह्य पत्रात येऊ घातलेल्या कवींसाठी त्यानं आचारसंहिताच दिलेली आहे. तीत त्यानं जी शिस्तीची नियमावली दिलीय तीबरोबरच तो जोर देऊन सांगतो : ‘‘ह्य शिस्तीबरोबर अमीट यातना भोगाव्या लागतात आणि कवीची सगळी शक्ती तिथं कामी येते.’’ तो पुढं म्हणतो की, ‘‘हा मार्ग चोखाळायचा तर कवी सामोरा येतो तो ‘थोर अपंग, थोर गुन्हेगार, थोर शापित आणि थोर ज्ञानी’ ह्य रूपांमध्ये. कारण तो अज्ञानाशी गळामिठी मारतो.’’ ह्य पारितोषिकाची खात्रीच रँबो देतो कवीला. कारण : ‘‘कवीनं आपला आत्मा संस्कारित केलाय, आणि तो इतरांच्या आत्म्यांपेक्षा कितीतरी समृद्ध आहे.’’ आणि अज्ञातापाशी कवी आला की काय होतं? ‘‘त्याचं आत्मज्ञान संपून तो नाहीसा होतो.’’ (त्याच्याबाबत तेच झालं.) पुढे आपल्या नशिबी काय, त्याची नांदीच असल्याप्रमाणे तो म्हणतो : ‘‘पण त्यानं साक्षात्कार पाहिला, हे थोडं आहे का ? त्याच्या आत्मस्पंदनानं त्याचा ऊर फुटू दे. त्यानं जे कोणी कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही ते आता पाहिलं आहे. त्याच्या मागोमाग दुसरे येतील आणि ज्या क्षितिजावर तो संपला तिथून ते पुन्हा नव्यानं सुरुवात करतील.’’
ह्य आवाहनाचा येणाऱ्या पिढय़ांवर जो परिणाम झाला त्यात खूप लक्षणीय गोष्टी आहेत, हे तर खरंच; पण ते आवाहन मुख्यत: महत्त्वाचं आहे ते कवीची अस्सल भूमिका काय, आणि परंपरेचं खरं स्वरूप काय, ह्यवर स्पष्ट प्रकाश टाकतं म्हणून. कवीनं अनुभवाची नवीन क्षितिजं गाठली नाहीत, त्यांच्या सत्यासाठी स्वत:चं आयुष्य समíपत केलं नाही तर तो कवी कसला? ह्य अफाट माणसांबद्दल, साक्षात्काऱ्यांबद्दल बोलताना त्यांना रोमँटिक म्हणणं खूपच फॅशनेबल झालंय, असं म्हणून त्यांचा आत्मनिष्ठपणा लोकांना अधोरेखित करायचा असतो; आणि ते म्हणजे परंपरेच्या थोर प्रवाहातले जणू अडथळे, व्यत्यय, बांध आहेत असं सुचवायचं असतं. जणू काय हे कवी म्हणजे स्वत:भोवती गरागरा फिरणारे वेडेच आहेत. ह्यापेक्षा खोटं दुसरं काही नसेल. खरं म्हणजे हेच उन्मेषी लोक सृजनसाहित्याची थोर परंपरा निर्माण करतात. ज्या क्षितिजावर ते मावळतात तिथूनच आपण खरं तर सुरुवात केली पाहिजे. नुसतं पडझडीत बसून काचांचे तुकडे जोडत राहायचं आरामात- ह्यला काय अर्थ आहे?
असं म्हणतात की, वयाच्या बाराव्या वर्षीच रँबोची धर्मभावना इतकी पराकोटीची होती, की त्याला हौतात्म्याची आस लागली होती. तीन वर्षांनंतर तो उद्गारतो : ‘‘मांस, संगमरवर, फूल, व्हीनस, तुमच्यावर माझा विश्वास आहे.’’ ह्य अनंत विश्वासावर अपरिमित प्रेम चिरकाल हसत वर्षांवणाऱ्या अफ्रोडाईटबद्दल तो बोलतो. मग तो म्हणतो की, ह्यला जग उत्तर देईल, प्रतिसाद देईल तो ‘प्रदीर्घ चुंबनानं थरथरणाऱ्या एखाद्या महाकाय वीणेप्रमाणे.’ स्वत:च्या पूर्वीच्या निरागसपणाकडे इथे वळताना तो दिसतो. हा त्याचा सुवर्णकाल; जेव्हा ‘‘जीवन मेजवानीसारखं होतं, जिथे हृदयं उमलत होती आणि वारुणी वाहत होती.’’ हा त्याचा आत्मसंवादाचा काळ होता. अज्ञाताबद्दलच्या अवर्णनीय ओढीचा काळ. हा काळ लहान, पण अतिखोल असा होता- समाधीतल्या परमानंदासारखा.
अशी तीन र्वष- हा अठराचा फक्त- आणि तो आपल्या कवित्वाच्या कारकीर्दीच्या अखेरीलाही आलेला आहे. ज्या नरकाचं तो एवढं चित्रदर्शी वर्णन करतो, तो त्यानं अंतरीच्या गूढगर्भात भोगलेला आहे. आता ह्यपुढे तो त्याला प्रत्यक्षात हाडामांसाच्या शरीरानं भोगायचा आहे. अठरा वर्षांचा पोर हे त्याच्या ‘प्रभात’ ह्य भागात कसले मन विद्ध करणारे शब्द लिहितो! त्याचं तारुण्य संपलंय- अठराव्या वर्षी. आणि त्याबरोबर जणू जगातलंही तारुण्य मावळलंय. त्याच्या पराभूत देशानं शत्रूसमोर दंडवत घातलंय आणि त्याच्या आईला ही विचित्र, अस ब्याद घराबाहेर गेली तर बरं असं वाटतंय. भूक, दारिद्रय़, अपमान, झिडकारलं जाणं हे त्यानं कधीच अनुभवलंय. त्यानं तुरुंगवास भोगलाय, रक्तरंजित कम्यून पाहिलाय, पाप आणि अध:पातात तो बुडून आलाय, पहिल्या प्रेमभंगानं तो पोळलाय, समकालीन कवींशी भांडलाय, आधुनिक कलेचा प्रदेश पाहून तो पोकळ आहे असं त्याला वाटतंय आणि आता स्वत:सकट सगळं सतानाच्या हवाली करण्याच्या टप्प्यावर तो आलाय. आपल्या उधळून लावलेल्या तारुण्याबद्दल तो विचार करतो. असाच विचार पुन्हा तो आपल्या मृत्युशय्येवर आपल्या वाया गेलेल्या जीवनाबद्दल करणार आहे. अगदी केविलवाण्या स्वरात तो विचारतो : ‘‘एकेकाळी सोन्याच्या पानांवर लिहित राहावं असं सुंदर, उमदं, शूर तारुण्य माझ्याजवळ होतं, नाही? माझी काय चूक झाली, काय गुन्हा मी केला, म्हणून मी आता असा नबळा झालोय? तू म्हणतोस ना, काही पशू दु:खानं अश्रू ढाळतात, रुग्ण आशाहीन होतात, मृतात्म्यांना दु:स्वप्नं पडतात. मग सांग- आता माझ्या अध:पाताची आणि माझ्या मूढ सुषुप्तीची कहाणी. सतत आवा मारिया म्हणत राहणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे माझं झालंय. मला काही सांगता येत नाही. कसं बोलायचं तेच मला कळेनासं झालंय.’’ (क्रमश:)
महेश एलकुंचवार
(c) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The time of the assassins 7