पाश्चात्त्य खाद्यान्ने, फळे, भाज्या या अधिक पोषकतत्त्वे असलेल्या आणि आरोग्यकारक असतात, असा दावा आकर्षक जाहिरातींच्या भडिमारातून आपल्यासमोर पेश केला जातो. परंतु त्यात कितपत तथ्य आहे, हे आपण तपासून पाहत नाही. ऑलिव्ह तेल, ओट्स, ब्रोकोली, किवी, परदेशी सफरचंदे इत्यादी गोष्टी आक्रमक व भुरळ घालणाऱ्या जाहिरातींद्वारे आपल्या माथी मारल्या जात आहेत. आणि आपणही त्याला भुलत आहोत. परंतु प्रत्यक्षात हे खाद्यपदार्थ दावा केला जातो तेवढे आरोग्यदायी आहेत का? खरं तर त्यांच्या तुलनेत अनेक भारतीय धान्ये, भाज्या, फळे सकस आणि आरोग्यदायी आहेत.. भारतीयांच्या आहारसवयींसाठी अनुकूल आहेत. पण लक्षात कोण घेतो? 

जगभरातील सर्व मानवांच्या आरोग्याचा मक्ता आपल्या शिरावर असल्यासारखे भासवून त्याच्या आडून आपली खाद्यउत्पादने जगभरातील देशांना विकण्याचा धंदा अमेरिका राजरोस करत असते. त्याचाच भाग म्हणून भारतीयांना अमेरिकी खाद्यपदार्थाची मोहिनी घालण्याचा कार्यक्रम गेल्या दोन दशकांत योजनाबद्धरीत्या राबविला जात आहे. याचे कारण- जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणामुळे खिशात अधिक पसा खेळू लागल्याने क्रयशक्ती वाढलेला, आर्थिक स्थर्य आल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झालेला आणि महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिकतेचा आभास निर्माण करून आकर्षक व आक्रमक जाहिरातबाजीला सहज भुलणारा ४० कोटीहून अधिक संख्येतील मध्यमवर्गीय भारतीय ग्राहक!  ही प्रचंड मोठी बाजारपेठ अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील देशांना आपल्याकडे आकर्षित करते आहे.. त्यांच्याकडे पिकणाऱ्या आणि तयार होणाऱ्या  भाज्या, फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ भारतीयांना विकण्यासाठी! या खाद्यपदार्थात ऑलिव्ह तेल, ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ब्रोकोली, किवी, सफरचंदे, बदाम वगरेंचा अंतर्भाव होतो. त्यांच्या मार्केटिंगसाठी विविध माध्यमांचा हुशारीने वापर करून प्रचाराची अशी काही राळ उडविण्यात आली, की समस्त भारतीय, विशेषत:तरुण पिढी त्याने जणू खुळावलीच.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

आरोग्याशी संबंधित पाश्चात्त्यांनी दिलेला सल्ला म्हणजे हे पदार्थ वैज्ञानिकदृष्टय़ा प्रकृतीकरता उत्तमच असले पाहिजेत, ही धारणा भारतीयांमध्ये सहजी रुजते. आणि पाश्चात्त्य लोक त्यांचे सेवन करतात म्हणजे ते आरोग्याला योग्यच अशी समजूत आपल्याकडच्या तथाकथित उच्चभ्रू व नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गाची झालेली आहे. (त्यांचं अंधानुकरण करणाऱ्या कनिष्ठ वर्गाला तर त्याची शहानिशा करण्याचीही गरज भासत नाही.) मग विषय ऑलिव्ह तेलाचा असो, ओट्सचा असो किंवा किवी-सफरचंदांचा! या उच्चभ्रू वर्गाकडून अमेरिकन व युरोपियनांच्या या खाद्यपदार्थाचे असे काही गुणगान गायले जाते, की हळूहळू मध्यमवर्ग व कनिष्ठ वर्गालासुद्धा वाटू लागते, की हे पदार्थ खाल्ले नाहीत तर आपल्या आरोग्याचे काही खरे नाही.

तथापि या समजुतीमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणे अगत्याचे आहे.

यातील बहुतांश खाद्यपदार्थ भारतीयांच्या गळी उतरवण्यासाठी सर्वप्रथम कोलेस्टेरॉलचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला. आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याच्या कामी भारतीय अन्नपदार्थापेक्षा आमचेच (पाश्चात्त्य) अन्नपदार्थ कसे अधिक उपयुक्त आहेत, हे जाहिरातबाजीच्या भडिमाराने त्यांना पटवले गेले. ‘कोलेस्टेरॉलचा भयगंड’ या मुळातच डळमळीत असलेल्या संकल्पनेच्या आधारावर या पदार्थाचा प्रचार केलेला असल्याने ते तसे व तितके प्रत्यक्षात उपयुक्त आहेत की नाहीत, हे तपासणे इष्ट होय.

ब्रेकफास्ट सीरिअल्स आरोग्यास फायदेशीर?

अमेरिकेला कोणतीही विशिष्ट अशी आहार-परंपरा नसल्यामुळे त्यांच्याकडे मांस, मासे, चीज, अंडी वगरे पदार्थ पावामध्ये कोंबून खाल्ले जाऊ लागले. एकंदर अमेरिकनांच्या आहारात अखंड तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या व फळांचा मुळातच अभाव आहे. हे प्राणिज प्रथिने व रिफाइण्ड कबरेदकांचे अतिसेवन स्थौल्य तसेच अनेक आजारांना कारणीभूत होत आहे. हे ध्यानी आल्यानंतर रोजच्या जेवणात अखंड धान्यांची गरज त्यांच्या लक्षात आली. ज्याचा फायदा काही खाद्यान्न कंपन्यांनी उठवला आणि अपघाताने तयार झालेल्या सीरिअल्सना निरोगी आहार म्हणून दामटले गेले. आणि आज २१ व्या शतकामध्ये दिवसेंदिवस स्थूल बनत चाललेल्या भारतीयांना ब्रेकफास्ट-सीरिअल्स खाण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे.

परंतु वास्तवात सीरियल्स म्हणजे अखंड धान्य नव्हे; तर धान्यावर विविध प्रक्रिया करून तयार झालेला तो एक कृत्रिम पदार्थ आहे. या प्रक्रिया करताना धान्यामधील नसíगक गुण व पोषक घटकसुद्धा नष्ट होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे, की ज्या देशामध्ये बाराहून अधिक धान्ये आणि तेराहून अधिक कडधान्ये वर्षभरात पिकतात, ज्या देशातले लोक निदान तीन धान्ये व कडधान्यांचे सेवन दिवसातून दोन वेळा नित्यनेमाने करतात, त्या भारतीयांना सीरिअल्सची मुळात गरजच काय? भारतीयांच्या रोजच्या जेवणात अखंड धान्यांची कमी कधी नव्हतीच. पण प्रश्न निर्माण झाला तो आपण मदा, साखर, रिफाइण्ड तांदूळ यांचा वापर करू लागलो तेव्हा! त्यामुळे स्थूलत्व व संबंधित रोगांची समस्या ज्या पाश्चात्त्यांचा आहार घेतल्यामुळे आपल्याकडे निर्माण झाली आहे, त्याच पाश्चात्त्यांनी त्या समस्येवर शोधलेले अर्धवट उत्तर आपण स्वीकारायची गरजच काय? घराघरांतून सेवन केल्या जाणाऱ्या ब्रेकफास्ट सीरिअल्समधील अति-प्रमाणातील साखर आणि मीठ हे आरोग्याला घातक आहेत, ही गंभीर बाब इथे पूर्णपणे दुर्लक्षिली जात आहे. आज महानगरांमधीलच नव्हे, तर जिल्हा आणि तालुक्याच्या गावांमध्येही ब्रेकफास्ट सीरिअल्सचा चंचुप्रवेश झाला आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह या आजारांना कारणीभूत असणारी इन्सुलिन-प्रतिरोध ((insulin resistance) ही मूळ विकृती शहरांमध्येच नव्हे, तर अगदी गावागावांमध्येही वाढत जाणार आहे.

ऑलिव्ह तेलाचा गवगवा!

ज्या ऑलिव्ह तेलाचा आज जगभर आरोग्यासाठी उत्तम म्हणून उदो-उदो चालला आहे, त्या ऑलिव्ह तेलामधील चरबीचे प्रमाण कधी कुणी तपासले आहे का? (सोबतचा तक्ता पाहा.) ऑलिव्ह तेलामध्ये चरबींचे प्रमाण अतिशय असंतुलित आहे. वास्तवात या तीनही चरबींचे प्रमाण ४ : ४ : २ असे असणे योग्य; जे केवळ तीळतेलामध्ये आहे. आयुर्वेदाने तीळतेलाला आरोग्यासाठी सर्वोत्तम का म्हटले आहे ते इथे लक्षात येते. धूमांक (स्मोक पॉइंट)- अर्थात ज्या तापमानाला तेल जळायला लागते व घातक चरबी तयार करते; तोसुद्धा तीळतेलाचा ४१० अंश फॅरनहाइट इतका आहे. खोबरेल तेलाचा धूमांक ३५०, तर साजूक तुपाचा ५०० आहे. मात्र, ऑलिव्ह तेलाचा धूमांक आहे- ३२० फक्त. त्यामुळे ते तळणासाठी योग्य नाहीच. म्हणूनच तर ऑलिव्ह तेल वापरताना श्ॉलो फ्रायचा वा ते वरून लावण्याचा सल्ला दिला जातो. मुळात कोणतेही तेल एका ग्रॅममधून नऊ उष्मांक पुरवत असल्याने दिवसभरात पाच ग्रॅमचे तीन चमचे तेल तुमच्या पोटात जाणार असेल तर त्यामधून १३५ उष्मांक तुम्हाला मिळतील; मग ते तेल कोणतेही असो. विशेष म्हणजे- ऑलिव्ह तेल हेआशियाई वंशाच्या लोकांसाठी बनलेले नाही, असे पाश्चात्त्य संशोधकच सांगतात.

पाश्चात्त्य देशांकडून आपल्याला विकल्या जाणाऱ्या या खाद्यपदार्थामधून मानवी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे पोषक घटक मिळतात, असा जो दावा केला जातो तोसुद्धा पूर्णपणे खरा नाही. उलट, अनेकदा तो खोटाच असल्याचे दिसून येते. गेली अनेक वष्रे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’ असे काय पोषण या बदामांतून मिळत- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही? बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांतून त्याहून अधिक म्हणजे ९.३  मि. ग्रॅ. आणि अहळिवांमधून तर तब्बल १००  मि. ग्रॅ. लोह मिळते. बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले किलगडाच्या बियांमधून मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. बदामांतून मिळते ३.५७  मि. ग्रॅ. इतके जस्त. त्याहून जास्त मिळते शेंगदाण्यांमधून- ३.९०  मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ.! हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५०  मि. ग्रॅ.! महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत!

अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे?

हेच सफरचंदाबाबतही! प्रचारामध्ये किवी आणि सफरचंदामधून मिळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र, प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व ((Vitamin C) किती मिळते? सफरचंदामधून मिळते केवळ एक मि. ग्रॅ.! परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे दहा मि. ग्रॅ.! तर किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ. इतके. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या भारतीय फळांमधून कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते. जसे- विलायती चिंच १०८ मि. ग्रॅ., काजू फळ १८० मि. ग्रॅ., पेरू २१२ मि. ग्रॅ. आणि आवळा तब्बल ६००  मि. ग्रॅ.! रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारशक्तिवर्धक आणि प्रजननक्षमतासंवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.

भारतीयांच्या आरोग्यसमस्या म्हणजे रक्तक्षय, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, प्रथिन ऊर्जेचा अभाव, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती.. ज्यांचे निराकरण करण्यासाठी सफरचंद उपयोगी आहे का? सफरचंद खाऊन भारतीयांच्या आरोग्यसमस्या दूर होणार नसतील तर आपण का म्हणायचं- ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे?’ याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ५९ हून अधिक प्रकारची रुचकर व पोषक फळे जिथे उपलब्ध आहेत, त्या भारतीयांना फळांमधून मिळणाऱ्या पोषणाची कमी आहेच कुठे?

ब्रोकोलीमधून काय मिळते?

ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते- जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही? कोिथबीर (४८०० मायक्रो ग्रॅम), अळूपान (५९२० मायक्रो ग्रॅम) आणि माठ (८३४० मायक्रो ग्रॅम) यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी (६२३ मायक्रो ग्रॅम) बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक फॉलिक अ‍ॅसिड ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम) कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. मग लोक का खरेदी करतात ब्रोकोली? ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात, तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर  बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी?

भारतीयांना ओट्सची गरजच काय?

ओट्ससारखे अमेरिकेमध्ये घोडे व डुकरांचा खुराक म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे? केवळ आरोग्यविषयक नियतकालिके आणि आरोग्य विषयाला वाहिलेल्या पाश्चात्त्य चित्रवाहिन्यांवरील आहारतज्ज्ञ तसे सांगतात म्हणून? ज्या देशात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव आणि त्याहून अधिक धान्ये पिकतात, त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे? महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. ओट्सपेक्षा (३६१) अधिक आरोग्यदायी उष्मांक बाजरीतून (३८९) मिळतात. ओट्सहून (११) अधिक चोथा बाजरीमधून (११.३) मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.

इन्स्टंट ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स ७५ हून अधिक असल्याने रक्तामध्ये साखर वेगाने वाढवणारा व सतत सेवनाने इन्सुलिन-प्रतिरोधाला आमंत्रण देणारा आहे. मधुमेह आणि स्थूलत्वाला कारणीभूत म्हणून तांदळाला उगीचच धोपटले जाते. कारण तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स सरासरी ७३ आहे. तांदळाचा ग्लायसेमिक  इंडेक्स अधिक  असला तरी ओट्सप्रमाणे आपण तांदूळ नुसताच खात नाही. वरण-भात-भाज्या या तिघांचा मिळून सरासरी ग्लायसेमिक  इंडेक्स हा साधारण ४८ च्या आसपास असतो; जो आहारशास्त्रानुसार आदर्श आहे. इतकेच नाही तर भारतीयांना स्थूल बनविणाऱ्या ‘इन्शुलिन रेसिस्टन्स’ या विकृतीमध्ये उपकारक अशी क्रोमियम, नायसिनसारखी अत्यावश्यक तत्त्वे कोंडय़ासहित तांदूळ, जव अशा अस्सल भारतीय धान्यांमधून मिळतात. तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.

आहारशास्त्राच्या दृष्टीने विचार करता तृणधान्य व िशबीधान्य यांचे ५ : १ हे प्रमाण प्रथिनेच नव्हे, तर कबरेदके व ऊर्जा यांचे सर्वोत्तम पोषण देते; जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, दोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत: नसíगक स्वरूपात. याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते. ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल. ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच. नाही का?

गुण सांगता.. दोषांचे काय?

याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय? आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?

हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल. आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.

या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते. साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत. मूळ कारणांकडे  दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.

ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले आहे. परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.

आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की. आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.

आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत. हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!

आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत. यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले. यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत. ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?

वैद्य अश्विन सावंत drashwin15@yahoo.com

(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)