scorecardresearch

बिबटय़ा आणि माणसातील संघर्ष

शाश्वत जीवनपद्धतीचा विचार करताना, पर्यावरणाचा समतोल सांभाळणं हे मोठं आव्हान ठरतं. प्रचंड वेगानं वाढत जाणारं माणसांचं जग, आजूबाजूच्या जंगलांवर, अन्नसाखळीवर, परिसंस्थांवर खोलवर परिणाम करतं. आणि मग मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षांला सुरुवात होते.

वैशाली सोमणी
शाश्वत जीवनपद्धतीचा विचार करताना, पर्यावरणाचा समतोल सांभाळणं हे मोठं आव्हान ठरतं. प्रचंड वेगानं वाढत जाणारं माणसांचं जग, आजूबाजूच्या जंगलांवर, अन्नसाखळीवर, परिसंस्थांवर खोलवर परिणाम करतं. आणि मग मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षांला सुरुवात होते. अधिवास आणि अन्न यांच्या शोधात अनेक वेळा हे प्राणी माणसांना सामोरे येतात. आपल्याकडे अशा संघर्षांमध्ये अगदी ठळकपणे समोर येतो तो बिबटय़ा.
अगदी चतुर, देखणा आणि सावधपणे वावरणारा बिबटय़ा. या संघर्षांचे वेगवेगळे पैलू उलगडणारं एक छान पुस्तक म्हणजे ‘बिबटय़ा आणि माणूस.’ पुस्तकाचे लेखक आहेत प्रभाकर कुकडोलकर. ते वन्यजीवप्रेमी आहेतच. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षित अधिकारी म्हणून वनखात्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे ‘बिबटय़ा आणि माणूस’ या संघर्षांत ते फक्त ‘माणूस’ किंवा फक्त ‘वन्यजीव’ अशी एकच बाजू उचलून न धरता, या संघर्षांचा साकल्यानं विचार करतात आणि साध्या, सोप्या भाषेमध्ये हा विचार वाचकांपर्यंत समर्थपणे पोहोचवतात. वेळोवेळी शहरात, गावांत दाट लोकवस्तीमध्ये, मोकळय़ा जागी, शेतात, विहिरीत (पडलेले) बिबटे, तिथे का आणि कसे पोहोचतात आणि त्यांची सुखरूप सुटका करून वनखातं त्यांना त्यांच्या अधिवासात पुन्हा कसं नेऊन सोडतं, याबाबतची संपूर्ण माहिती लेखक देतात. अशा वेगवेगळय़ा घटनांबरोबरच, बिबटय़ांचा वावर, वर्तणूक, खण्यापिण्याच्या सवयी यांविषयीची निरीक्षणंही वाचायला मिळतात. जुन्नर तालुक्यातल्या ‘माणिकडोह’ गावामधल्या ‘बिबटा निवारा केंद्र’ या यशस्वी प्रकल्पाचं कामही समोर येतं. आपल्यापैकी बहुतेकांना, अशा निवारा केंद्रामधल्या सोयी आणि त्यातल्या तांत्रिक बाजू माहीत नसतात. मानव वन्यजीव संघर्षांत अशी निवारा केंद्रे ही महत्त्वाची भूमिका बजावतात.
बिबटय़ांची जपणूक आणि प्रत्यक्ष लोकसहभागातून त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न कसे करता येतील याचं विवेचन हा या पुस्तकाचा आत्मा आहे. शहरीकरणाचा रेटा, वाढती वाहतूक, रस्ते, वीज आणि इतर अनेक गरजांसाठी झपाटय़ानं कमी होणारी जंगलं, शेतीच्या पद्धतींमधले बदल, हे सगळं आता वास्तव आहे. यामुळे मानव आणि बिबटय़ा किंवा इतर वन्य प्राणी हा संघर्ष अटळ आहेच. पण त्याची धार कमी करण्यासाठी सशक्त वन धोरण, त्याची सुनियोजित अंमलबजावणी, स्थानिक जनता आणि पर्यटकांचं प्रबोधन तसेच वन्य संशोधनाचं व्यवस्थापन व्हायला हवं. अशा व्यवस्थापनाची, उपाय योजनांची माहिती हे या पुस्तकाचं वेगळेपण आहे.
बिबटय़ांबरोबरच गवा, मगर, रानडुकरं यांच्या विषयीचे अनुभवही वन्यजीव संघर्षांविषयी बरंच काही सांगतात. त्यामुळे वन्यजीवांसोबत संघर्षांऐवजी सहजीवनाकडे कसं जाता येईल, याचा विचार सुरू होतो. समृद्ध वनवैभव असणाऱ्या महाराष्ट्रात स्वतंत्र वन धोरणाची आवश्यकता हे पुस्तक पुन्हा पुन्हा स्पष्ट करतं.
‘बिबटय़ा आणि माणूस’- प्रभाकर कुकडोलकर, ज्योत्स्ना प्रकाशन,
पाने- १६०, किंमत- १७५ रुपये.
vaishali.somani@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopards humans lifestyle environment food chain ecosystems conflicts wildlife amy

ताज्या बातम्या