लोकरंग (३० डिसेंबर)मध्ये शफाअत खान यांनी हसतखेळत एक विदारक सत्य सांगितले आहे, ‘‘सतत उत्तेजीत करणारा टैमपास कुठे शोधावा? काही जण आता आमच्या डोळ्यासमोर उघडय़ावर फाशी द्या म्हणू लागले आहेत, तर त्याहीपेक्षा भारी टैमपासच्या शोधात असणारे काहीजण म्हणतात आम्ही सर्वाना फासावर लटकवतो.’’ तर ‘शब्दारण्य’मध्ये नीरजा लिहितात, ‘‘एकूण माणसाच्या मनात क्रौर्यच वाढत चाललेले आहे. रोजच घडत असतं असं विपरीत कुठे ना कुठे आपण ऐकतो. वाचतो. सुन्न होऊन जातो. काही क्षण आणि पुन्हा शिरतो आपल्याच कोशात.’’ हे सर्व काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि भारतभर चाललेल्या आंदोलनाशी जोडता येते. एका तरुणीवर भर बसमध्ये सामूहिक बलात्कार होतो. अत्याचारही होतात. त्यात ती तरुणी मृत्यू पावते. ही सर्वच लाजीरवाणी गोष्ट आहे. पण त्यावर उपाय शोधण्याऐवजी टोकाच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. एका भगिनीने तिचे स्मारक उभे करण्याची मागणी केली. म्हणजे कोणत्याही घटनेचा आपल्या स्वार्थासाठी फायदा घ्यायला आपले राजकारणी मागेपुढे पाहणार नाहीत. आणि टैमपासच्या शोधात असणारे त्यांच्याभावेती गोळाही होतील.
हल्ली प्रत्येक गोष्टच सरकारने करावी असा आग्रह धरला जातो आहे. राजकीय पक्षही हीच मागणी उचलून धरून त्या वृत्तीला खतपाणी घालत आहेत. आकडे टाकून वीज चोरणाऱ्यांना पकडून देण्याऐवजी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, जाळपोळ करणे यामुळे प्रसिद्धी मिळते.
आजकाल कोणालाही बंधने नको आहेत. रोजच्या जीवनात मी रांग मोडून बसमध्ये घुसतो. सिग्नल नसताना गाडी पुढे दामटतो किंवा रस्ता ओलांडतो. मी माझ्या १०-१२ वर्षांच्या मुलाच्या हातात दुचाकी वाहनांची किल्ली देतो. एवढेच नव्हे तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत त्याच्या पाठीमागे बसून प्रवासही करतो. जेव्हा मी माझ्या मुलालाच असे नियमबाह्य़ वागण्याला प्रोत्साहन देतो, तेव्हा मोठेपणीही तो कोणतेही नियम पाळायचे कारण उरत नाही. अशा वेळी अपघात झाल्यास आंदोलन करायलाही आम्हीच पुढे असतो.
दिल्लीच्या आणि इतर ठिकाणच्या मोच्र्यामध्ये सामील झालेले तरुण-तरुणी ३१ डिसेंबर आणि नवरात्री कशा साजऱ्या करतात हे सर्वश्रुतच आहे. नवरात्रीनंतर आय-पिल्स आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते. हे दरवर्षीच पुढे येते. ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी विवाहपूर्व लैंगिक संबंधांचा अनुभव घेतलेला असतो. लोकशाहीमध्ये ६० टक्के बहुमत असल्याने स्त्री ही सहज उपलब्ध होऊ शकते असा समजही पसरतो आहे. याउलट तरुणांनी योनीशुचितेचा आग्रह धरू नये असेच वारंवार सांगितले जाते. एवढय़ातेवढय़ा कारणांवरून सिनेमांवर बंदी घालणारे, ‘दबंग’सारख्या चित्रपटांना मात्र गर्दी करतात. फक्त वर्दीतील नायकानेच नव्हे तर सर्वानी हाताळले जाणारे स्त्रीशरीर हेच तरुण-तरुणी गर्दी करून बघतात.
तरुण स्त्रीकडे पुरुषाने आकर्षित होणे नैसर्गिकच आहे. पण अगदी आपल्या भावनांवर संयम ठेवणे ही सुसंस्कृतता असते. भावनांवर एका रात्रीत ताबा ठेवणे शिकता येत नाही, तर रोजच्या व्यवहारातील अगदी लानसहान गोष्टींपासून त्याची सुरुवात होत असते. आणि एकदा ही सवय लागली की आपल्या वर्तणुकीवर दंडुका घेऊन लक्ष ठेवायला सरकारची गरज लागणार नाही. आमच्या लहाणपणी आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद देव किंवा चित्रगुप्त ठेवत असतो अशी श्रद्धा होती. पण आता आम्ही देवाला रिटायर केले आहे. पापपुण्य भाकडकथा ठरल्या आहेत. बहुधा त्यामुळेच आमच्या वर्तनावर अंकुश ठेवायला सरकारची गरज भासते आहे.
– शशिकांत काळे, डहाणू रोड, जि. ठाणे

टेल्को ते टाटा मोटर्स
रतन टाटांवरील ‘उपभोगशून्य स्वामी’ आणि ‘जागतिकीकरणाचा मानवी चेहरा’ हे दोन्ही लेख खूप आवडले. दोन्ही लेखांत रतन टाटांचा शालीन स्वभाव आणि उच्चमशीलतेला आवश्यक असणारी धडाडीची निर्णयक्षमता या दोन्ही गुणांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. रूसी मोदींसारख्या वरीष्ठ सहकाऱ्यांची योग्यता ओळखूनही त्यांच्या मर्यादा ध्यानात घेऊन त्यांना सेवेतून मुक्त करण्याचा रतन टाटांचा योग्य निर्णय त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा उत्तम नमूना होय. रतन टाटांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचा उल्लेख मात्र या दोन्ही लेखांत आढळला नाही. रतन टाटांनी प्रथम वाहन उद्योगाची नस पूरेपूर ओळखून केवळ कमर्शिअल वहाने बनविणाऱ्या टेल्कोचे नामांतर टाटा मोटर्समध्ये करताना पॅसेंजर व्हेअिकल्सचे उत्पादन इंडिकाच्या रूपाने सुरू केले. केवळ डिझेल गाडय़ांच्या उत्पादनाचा अनुभव असताना इंडिकासारखी पेट्रोल वापरणारी गाडी बाजारात आणून एकेकाळी तोटय़ात गेलेल्या टेल्कोला टाटा मोटर्सच्या रूपाने नफ्यात आणले.
ख.फ.ऊ. च्या काळातले व्यवस्थापनाचे स्वरूप त्यांना बदलावे लागले आणि त्या निर्णयाची कटुता रतन टाटानी पचवली, परंतु तोटय़ातल्या उद्योगाला नफ्यात आणले. हा त्यांचा निर्णय टेल्कोच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरतो. एका सर्वार्थाने उत्तम उद्योगपतीचे दर्शन घडविल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन!
– राजीव मुळ्ये, दादर.

डॉक्टर म्हणजे देव नव्हे!
लोकरंग व त्यातील ‘संजय उवाच’ या लेखाने वाचन सुरू करणारा मी एक सामान्य वाचक.       डॉ. संजय ओक यांनी ९ डिसेंबरच्या लोकरंगमध्ये ‘अ‍ॅलेक्झांडरच्या इच्छा’ या शीर्षकाखाली बोधकथा विश्लेषणपूर्वक सादर केली आहे. रुग्णावर सुश्रुषा करताना मृत्यू आला तर त्यास डॉक्टरच जबाबदार आहे, हे समजणे खरोखरच गैर आहे. अ‍ॅलेक्झांडर यांच्या इच्छेचा दाखला देताना संपत्ती प्राप्त करताना आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका हा कानमंत्र दिलेला आहे. शेवटी Health is wealth. जाताना मिळविलेले काहीही बरोबर नेता येत नाही, हेही सत्यच आहे. संजय ओक स्वत: डॉक्टर असल्यामुळे ते डॉक्टरांच्या मर्यादा लक्षात घ्या, त्यांना विनाकारण दोष देऊ नका, डॉक्टर म्हणजे देव नव्हे, हेही पोटतिडकीने सांगायला विसरलेले नाहीत.
– कृष्णा काजरोळकर, विक्रोळी.

बोलगप्पा वाचनीय
‘बोलगप्पा’ या नव्या वर्षांतील शरद वर्दे यांच्या नव्या सदरातला ‘ट्रिंग ट्रिंग’ या लेखातील अनुभव वेगळीच अनुभूती देऊन गेला. वर्दे यांनी म्हटल्याप्रमाणे भ्रमणध्वनीवरून निरनिराळ्या योजनांचे फोन येण्याचा आणि ‘काय ही कटकट’ असे वाटण्याचा अनुभव प्रत्येकालाच येत असतो. परंतु कोणत्या परिस्थितीतून ही तरुण मुले-मुली जाहिरात करण्याचे काम स्वीकारतात याची कल्पना कधी येत नाही. दारावर वेळी-अवेळी येणाऱ्या विक्रेत्यांचीसुद्धा काही वेळा चीड येते. पण अनेक वेळा परिस्थितीच अशा तरुणांना भाग पाडते. मात्र काही वेळा काही तरुण विक्रेते म्हणून येऊन चोऱ्या, घरफोडय़ा करतात याचीही उदाहरणे ऐकायला-पाहायला मिळतात. वर्दे यांनी सांगितला तसाच एक अनुभव सांगावासा वाटतो. एका शाळेतले शिस्तप्रिय मुख्याध्यापक शाळा भरण्याच्या वेळी शाळेच्या मुख्य दरवाजापाशी छडी घेऊन उभे राहत. उशिरा येणाऱ्या मुलांना हेडमास्तरांच्या छडीचा प्रसाद मिळत असे. एक विद्यार्थी कायम उशिरा येत असल्याने मुकाटय़ाने छडय़ा खाऊन वर्गात प्रवेश करत असे. महिनाभर हा प्रकार झाल्यावर हेडमास्तरांनी त्या मुलाला आपल्या दालनात बोलावून त्याची चौकशी केली. तेव्हा त्या विद्यार्थ्यांने सांगितले की, तो त्याच्या आईबरोबर एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात आश्रित म्हणून राहत आहे. घरातल्या सर्वाची जेवणं वगैरे झाल्यावर सर्व आवराआवरी करून साफसफाई करून मगच घराबाहेर पडायला मिळते. नाईलाजाने शाळेची वेळ गाठणे शक्य होत नाही. हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांनी त्याला उशिरा येण्याची परवानगी दिली. मात्र मुख्य दरवाजातून प्रवेश न करता शाळेच्या मागील दरवाजाने येण्यास सांगितले.
सुरेश पटवर्धन, कल्याण</p>