एकेकाळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात अभ्यासकांना तातडीने दुर्मीळ पुस्तके, लेख उपलब्ध करून देणारी व्यक्ती पुढे प्रकाशनात उतरली. पारंपरिक प्रकाशकांप्रमाणे कुठलाही अनुभव आणि यंत्रणा नसताना करोना काळात वितरण तसेच विक्रीबाबत मिळतील ती कामे करीत पुस्तके काढण्यासाठी सरसावली. कथा-कादंबर्‍यांसह गंभीर विषयांवरचे ग्रंथ आणणार्‍या मुंबईतल्या ‘ललित पब्लिकेशन’ची गोष्ट…

पुस्तक प्रकाशित करणे म्हणजे केवळ एखादी संहिता छापून बाजारात आणणे नव्हे. चांगले लेखन शोधणे, त्यावर संपादकीय संस्कार करणे, पुस्तकाचे स्वरूप घडवणे आणि शेवटी ते योग्य वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही खरी तर सर्जनशील प्रक्रिया. बदलत्या काळात या प्रक्रियेला नव्या तंत्रज्ञानाची, बाजारपेठेची आणि वाचकांच्या काळानुसार घडत चाललेल्या अभिरुचीची जोड मिळाली. अशा काळात प्रस्थापित चौकटींपेक्षा नवे आणि अधिक सकस शोधण्याच्या गरजेतून मी प्रकाशनविश्वात आलो. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, एकांकिका, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक साहित्य, मुलाखती, साहित्यसमीक्षा आणि वेगळ्या विषयांवरील अकथनात्मक ग्रंथ अशी दशकभरात ‘ललित पब्लिकेशन’ची शंभरच्या जवळपास पुस्तके आलीत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथील संदर्भ विभागात सहाय्यक ग्रंथपाल म्हणून मी अनेक वर्षे काम केले. तिथे पीएच.डी., एम.फिल.चे विद्यार्थी तसेच इतर संशोधक संदर्भासाठी येत. त्यांना आवश्यक संदर्भ जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयवार सूची तयार करण्याचे काम मी करीत असे. त्यामुळे अभ्यासकांना त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक साहित्य शोधणे आणि त्यांना योग्य ती मदत करणे अधिक सुलभ होई.

‘चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात’ या ग्रंथासाठी जया दडकर यांनी केलेली ग्रंथसूची मला भावली. त्यानंतर मी विविध प्रकारच्या ग्रंथसूची तयार केल्या. यामध्ये लेखक-लेखिकांच्या साहित्यसूची, ‘मौज’ दिवाळी अंकांची सूची, मराठी भाषाविषयक सूची, संत तुकारामांच्या साहित्याची सूची यांचा समावेश आहे.

प्रिया तेंडुलकर गेल्यानंतर काही वर्षांनी यांच्या साहित्याची सूची तयार करीत असताना त्यांच्या काही अप्रकाशित कथा माझ्या निदर्शनास आल्या. त्यांचे एक पुस्तक व्हावे असा हा ऐवज होता. कुणी त्या कथा पुस्तक रूपात का आणल्या नाहीत याबाबत विचारणा करून झाल्यानंतर, त्या आपणच का प्रकाशित करू नये असा विचार समोर आला. या कथा प्रकाशित करण्यासाठी माझे स्नेही, ज्येष्ठ व्यंगचित्रकार बळी लवंगारे आणि प्रा. संदीप कदम यांनी आवश्यक ती मदत केली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच पहिले पुस्तक काढता आले. ‘तिहार’ या नावाने प्रकाशित झालेला प्रिया तेंडुलकर यांचा संग्रह माझे पहिले पुस्तक.

समाजमाध्यमांच्या उदयानंतर एक वेगळे जग समोर आले. फेसबुकसारख्या माध्यमांवर अनेक नवे कवी आणि लेखक उत्तम लिहितात, मात्र त्यांचे लेखन अनेकदा याच माध्यमांपर्यंत मर्यादित राहते. त्यांतील उत्तम लेखकांना शोधून, त्यांच्याशी चर्चा करून पुस्तकाची इमारत उभी राहते का, याचा अदमास घेत नव्या लेखकांची काही पुस्तके काढली. अविनाश उषा वसंत या तरुण लेखकाची पहिलीच कादंबरी ‘पटेली’ प्रकाशित केली. तेव्हा प्रकाशनातल्या लहान-सहान बाबी शिकून घेतल्या. संपूर्ण चार रंगांतील मुखपृष्ठ न वापरता कृष्ण-धवल मुखपृष्ठाचा प्रयोग केला. ही कादंबरी मुंबईवरची आणि खास करून गिरणगावाची. तिथल्या गोष्टींना अनुरूप असे मुखपृष्ठ झाले. कृष्ण-धवल मुखपृष्ठातूनदेखील पुस्तक देखणे बनू शकते हे उमजले. या कादंबरीला राज्य शासनाचा प्रथम कादंबरीसाठीचा पुरस्कार मिळाला.

करोनाने प्रकाशन व्यवसायाच्या जुन्या समीकरणांनाच धक्का दिला. टाळेबंदीच्या काळात पुस्तकांची दुकाने बंद झाली, वितरणव्यवस्था विस्कळीत झाली आणि पारंपरिक विक्रीला मोठा फटका बसला. त्या काळात मराठी पुस्तकांच्या प्रत्यक्ष विक्रीत मोठी घट झाली तर ऑनलाइन विक्रीला तुलनेने चालना मिळाली. करोनानंतरचा सर्वांत मोठा बदल म्हणजे वाचकाला पुस्तक मिळवण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जाण्याची गरज उरली नाही. ऑनलाइन व्यासपीठ, प्रकाशकांची स्वत:ची संकेतस्थळे आणि समाजमाध्यमातून पुस्तके थेट वाचकांच्या घरापर्यंत पोहोचू लागली. फेसबुक आणि व्हॉट्सॲपसारख्या माध्यमांमुळे स्वतंत्र पुस्तकविक्री आणि वितरणाचेही नवे मार्ग निर्माण झाले. पारंपरिक दुकानांवर पूर्णपणे अवलंबून न राहता ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि स्वत:च्या संकेतस्थळावरून थेट विक्रीवर भर देणे हे मोठा आर्थिक डोलारा नसलेल्या सर्वच प्रकाशकांचे धोरण बनले. यामुळे भौगोलिक मर्यादा कमी झाल्या आणि महाराष्ट्राबाहेरील, अगदी परदेशातील वाचकांपर्यंतही पोहोचण्याची शक्यता वाढली. पूर्वी एका पुस्तकाच्या सुमारे हजार प्रतींची आवृत्ती छापण्याची पद्धत असताना, करोनानंतर आवृत्तीची संख्या कमी झाली. त्यामुळे पैशाची गुंतणूक कमी झाली. मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मागणीनुसार पुनर्मुद्रण करणेही शक्य झाले. यातून नफ्याचे गणित थोडे तरी सुधारत गेले.

माझ्या प्रकाशनाची ओळख प्रामुख्याने नवे लेखन, कविता, कादंबरी, कथासंग्रह आणि वेगळ्या विषयांवरची अकथनात्मक पुस्तके यांच्याशी जोडली गेली. प्रकाशन व्यवसायात कागद, मुद्रण, बाइंडिंग, संपादन, डिझाइन, साठवणूक, वितरण आणि परताव्याचा खर्च असतो. त्यात पुस्तकाची विक्री किती होईल, हे आधीच निश्चित नसते. अविनाश उषा वसंत, डॉ. श्रीधर पवार आणि साहिल कबीर यांची पुस्तके प्रामुख्याने वाचकांपर्यंत पोहोचवली. यामागे एकच भूमिका होती- हे लेखक प्रागतिक भूमिका घेऊन लिहीत आहेत; त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.‘पटेली’ या कादंबरीने प्रकाशक म्हणून मला महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली. तेव्हा मी अगदीच नवखा होतो. आर्थिक बचतीचे मार्ग शोधत असताना निर्मितीत प्रयोग केलेल्या या कादंबरीच्या आजवर जवळपास पाच हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्यात.

तरुण कवी जितेंद्र अहिरे यांचा ‘आम्ही हिशोब घेऊ’ हा काव्यसंग्रह, गो. पु. रायबोले यांच्या ‘फटिंग’ आणि ‘अनभिषिक्त देवदासी’ या दोन कादंबर्‍याही प्रकाशित केल्या. साहिल कबीर यांची काव्यात्मक कथने असलेले ‘सोलोकोरस’ प्रकाशित केले. ‘सविनय अस्वस्थ’ हा कथासंग्रह तसेच ‘सहिष्णुता खरी-उपरी’ या पुस्तकात मुस्लीम युवकांची अस्वस्थता व्यक्त झालीय. तरुण लेखक अक्षय दया मोहिते यांची ‘बिल्लाबॉन्ग’ कादंबरी नुकतीच प्रकाशित केली असून, ती सध्या खूप वाचली जातेय. प्रा. नागेश शेळके यांनी ‘महाराष्ट्रातील अस्वस्थ तरुण’ या ग्रंथात राज्यातील ग्रामीण तरुणांची अस्वस्थता या विश्लेषित केलीय. या ग्रंथाला य. दि. फडके प्रगत केंद्रासोबत प्रकाशित केले.

कॉ. डॉ. श्रीधर पवार यांच्या ‘ब्लॅक पँथर’ ग्रंथात अमेरिकेतील या संघटनेने वंशवादाविरुद्ध लढा पुकारलेल्या चळवळीचा इतिहास मांडलाय. या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पारितोषिक आणि इतर पुरस्कारदेखील मिळाले. कोकणातील कवी आ. सो. शेवरे यांचा ‘आ. सो. शेवरे : समग्र कविता’ हा संग्रह आणि कॉ. सुभाष थोरात यांनी घेतलेल्या मुलाखतींचे संपादन ‘विचारवंतांच्या मुलाखती’ या नावाने प्रकाशित केले. प्रख्यात चिनी लेखक लू शुन यांचा ‘आह क्यूची खरी गोष्ट’ या साहित्यकृतीचा कॉ. डॉ. श्रीधर पवार यांनी केलेला अनुवादही चांगल्यापैकी पोहोचवता आला.
कवितासंग्रह अनेक दुकानांकडून विक्रीसाठी घेतले जात नाहीत; मात्र ऑनलाइन विक्रेते ते विक्रीसाठी घेतात. खपवूनही दाखवतात. करोना काळात पुस्तकविक्रीची पारंपरिक यंत्रणा जवळपास ठप्प झाली होती आणि प्रकाशकांकडे छापील पुस्तकांचा साठा पडून राहत होत होता. परिणामी नवीन वितरण व्यवस्थेची गरज भासू लागली. त्यातदेखील मी शिरकाव करून पाहिला.

पुढे कथासमीक्षेच्या पुस्तकांसाठी प्रयत्न केले . प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचे ‘कथावकाश’, जयंत पवार यांच्या कथांवर डॉ. संदीप दळवी यांनी संपादित केलेले ‘हा ऋतू वेगळा आहे’, आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहावर डॉ. संदीप कदम यांनी संपादित केलेले ‘आलोक : शोध समीक्षा’ अशी पुस्तके त्यातून तयार झाली. प्रा. केदार काळवणे यांनी संपादित केलेले प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या कथांवरील ‘भूमी आणि भूमिकेची कथा’ हेही या प्रवासातील महत्त्वाचे पुस्तक. डॉ. रमेश साळुंखे यांनी गो. पु. देशपांडे यांच्या नाटकावरील ‘राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे’ हे पुस्तक तसेच डॉ. नितीन रिंढे यांनी संपादित केलेल्या ‘मराठी साहित्य : स्वरूप आणि भूमिका’ यांसारखे गंभीर विषयांतील ग्रंथ करता आले त्याचा आनंदच.
पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ या कादंबरीवर डॉ. संदीप कदम यांनी संपादित केलेले ‘सावित्री : एक अवलोकन’, तसेच डॉ. रामचंद्र काळुंखे यांचे ‘मराठी कादंबरी : आकलन आणि अवलोकन’. संतसाहित्याच्या विभागात संत तुकारामांच्या अभंगांवर डॉ. विकास बाहेकर यांचे ‘मना पाहिजे अंकुश’, तसेच तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर आधारित ‘ग्रामगीतेतील श्रमप्रतिष्ठा’ ही पूर्णपणे भिन्न विषयांवरील पुस्तके काढली. प्रा. एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या काव्यसंग्रहालादेखील राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.

आजच्या काळात प्रकाशन करणे जोखमीचे असले, तरी वाचकांपर्यंत अधिकाधिक चांगली पुस्तके पोहोचवता यायला पाहिजे. तसे झाले तर नफ्याबाबत चिंता करायची गरज उरत नाही. वाचकांनी मागणी केल्यानंतर पुस्तके अधिकाधिक सवलतीत विकली. वेळोवेळी विक्री योजनांच्या माध्यमातून पुस्तके गावोगाव पोहोचवली. विद्यार्थ्यांना भरघोस सवलतीत पुस्तके दिली. आजचा वाचक बदलला आहे. त्याच्या हातात पुस्तकाबरोबर मोबाइल आहे. तो पुस्तक खरेदी करण्याआधी समाजमाध्यमांवर पुस्तकाबद्दल जाणून घेतो आणि त्यानंतर पुस्तक ऑनलाइन मागवतो. नव्या पिढीतील लेखक तर या डिजिटल जगातच आपला वाचकवर्ग तयार करण्यासाठी पुढाकार घेतायत. त्यामुळे भविष्यातील प्रकाशन हे केवळ मुद्रित पुस्तकांचे राहणार नाही; ते मुद्रित, डिजिटल, सोशल मीडिया आणि थेट वाचकांशी संवाद अशा अनेक माध्यमांचे मिश्रण असेल. ई-बुक आणि ऑडिओबुकचा भारतीय भाषांमधील बाजार अजून विकसित होण्याच्या टप्प्यात असला, तरी डिजिटल वितरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रकाशकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्याची भूमिका स्वीकारण्याची गरज तीव्रपणे जाणवतेय. शेवटी, प्रकाशनाचा खरा अर्थ केवळ ‘किती पुस्तके छापली?’ हा नसतो. किती चांगले लेखन वाचकांपर्यंत पोहोचवले, किती नवे आवाज शोधले आणि बदलत्या काळात पुस्तकासाठी नवे वाचक कसे निर्माण केले, हेही तितकेच महत्त्वाचे.
बाजारात जे आधीपासून चालले आहे त्याची पुनरावृत्ती करण्याऐवजी, अजून ज्यांना आवाज मिळालेला नाही त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न मला दशकभरात करता आला. त्यातून लोकसाहित्यापासून (‘कोकणातील नमन-खेळे) ग्रामीण-शहरी तरुणांची संवेदना, इतिहासापासून ते तमाशा-संगीतबारी या विषयांवरील नवी माहिती देणारी पुस्तके करता आली. नव्या साहित्यिक शक्यतांना उमलण्यासाठी सावली आणि संधी असेच प्रकाशनाचे स्वरूप पुढेही राहील.