बालमित्रांनो, आपल्या पहिल्या लेखात झाडावरून पडणार्‍या सफरचंदाचा उल्लेख झालेला आहे. मात्र आपण सगळे अशा प्रदेशात राहतो, जिथे झाडावरून पडणारं सफरचंद पाहणं आपल्या नशिबात नाही. तरीही आपण भाग्यवान आहोत बरं का!

बाजारात किंवा मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सफरचंदं आपल्या सहज नजरेला पडतात आणि ती चाखता येतात. या फळांकडे जेव्हा एका वेगळ्या दृष्टीने पाहू तेव्हा त्या फळांचं टवटवीतपण आणि रसरसलेपण सहजच लक्ष वेधून घेतं.

बघा ना, शीत प्रदेशात, उंच पहाडात पिकणारं हे फळ मैलोन्मैल प्रवास करून समशीतोष्ण किंवा उष्ण प्रदेशात पोहोचतं. एवढा प्रवास झाला, एवढ्या वेगळ्या हवामानात यावं लागलं याबाबत त्याच्या चेहर्‍यावर आठी दिसत नाही, ते आपलं टवटवीतपण आणि रसरसलेपण सोडत नाही. इथे आल्यावरही विक्रेते त्याला हातगाडीवरून गल्लीबोळातून फिरवताना दिसतात.

सहज पाहिलं तरी लक्षात येईल की फळबाजारात सफरचंदांना खूप वेगळी किंवा विशेष वागणूक दिली जात नाही, तरीही कोणतीही अपेक्षा न ठेवता हे फळ बर्‍याच कालावधीसाठी अत्यंत टवटवीत आणि रसरशीत राहतं.

बदललेलं हवामान, खूप काळ करावा लागलेला प्रवास, इतर फळांच्या तुलनेत दिली जाणारी सर्वसामान्य वागणूक याचा कोणताही त्रास करून न घेता इतरांना आनंद देणं आणि स्वत: आनंदी राहणं हेच बहुधा त्याच्या टवटवीतपणाचं आणि रसरशीतपणाचं गमक असावं.