मित्रा, आपल्या आयुष्यात दोन मिनिटांना फार फार महत्त्व असतं. अगदी भल्या पहाटे १० वाजता आपल्याला कुणी वैतागून जरी उठवत असेल तरी आपण दोन मिनिटांची अधिकची झोप मागतो. दोनच मिनिटं का? तर आपल्याला माहीत आहे की एक मिनिटांची झोप पुरेशी होणार नसते आणि पाच मिनिटांच्या झोपेची आपल्याला परवानगी नसते. या दोन मिनिटांत अर्धवट चाललेले एखादे स्वप्न पूर्णही होऊ शकते.

दोन मिनिटांची ही मालिका इथेच थांबत नाही. पुढे दात घासताना, शॉवर खाली मज्जा करताना, आरशासमोर सजताना, समुद्रात भिजताना, टीव्ही पाहताना, मोबाइल चॅट करताना, गेम खेळताना, रीळ पाहताना, गप्पा मारताना ही अधिकची दोन मिनिटं हवीच असतात. या दोन मिनिटांत इतकी मोठी शक्ती असते की म्हणून जाहिरातीतील आईपण इतर काही जेवण न बनवता दोन मिनिटांचे नूडल्स करते.

हा… हा… हा… या दोन मिनिटांची मी इतकी शेपूट का वाढवत आहे ते ओळखले का?

सध्या अनेकांच्या परीक्षेचा काळ चालू आहे. त्यात अभ्यासाचा कंटाळा आलाय आणि अभ्यास करण्यावाचून पर्याय नाही. या अडचणीच्या वेळी बाहेर जाऊन टाइमपास करायला पूर्ण बंदी आहे. अशा वेळी आपण चित्र काढायचे, तेही केवळ दोन मिनिटांत.

आजवर चित्र काढताना आपण मन शांत करत, संगीत ऐकत, वेळ घेत चित्र काढली. पण आज मात्र वेगात चित्र काढावं लागणार आहे.

दोन मिनिटं म्हणजे फक्त १२० सेकंदात… न ११९ ना १२१!

तेही मोबाइलमध्ये स्टॉप वॉच, अलार्म टाइमर वगैरे लावून. आधी चित्र काढण्यापूर्वीची तयारी करूयात.

पहिल्यांदा एक मोठा कागद घे. तुझ्या घरी असणारा शक्य तितका मोठा ब्रश घे. लाडावलेला असलास तर बाबांचा दाढीचा किंवा आईचा मेकअपचा ब्रशही चालेल. रंगाच्या बाटलीतला कुठलाही एक रंग घे. तो थोडा वाटीत काढून घे. फार पातळ होऊ न देता त्यात गरजेनुसार पाणी मिसळ. रंग पाणी एकजीव कर. ब्रश त्यामध्ये घोळव. मोबाइलवर वेळ सेट करून तो आईबाबांच्या हाती दे.

आणि आता गेट सेट गो…

वेळ सुरू झाल्याबरोबर मनात येणार्‍या कुठल्याही एका विषयासाठी पाच ते दहा सेकंद असल्यानं वेगानं रेषा काढायची आहे. अजिबात विचार करायचा नाही. त्यामुळे कागदावर येणारे विषय एकमेकांपासून भिन्न असतील. उदा. मला पटकन पक्षी, बंदूक, केक, चिकन लॉलीपॉप, खुर्ची, ढग असे एकापाठोपाठ एक आठवत गेले आणि त्यांचा अनुभव चित्रात काढतही गेलो… कशीही, कुठेही, कितीही मोठ्या-छोट्या आकाराची, एकमेकांवर आलेली, एकमेकांत गुंतलेली… वस्तूंची चित्र.

पूर्ण चित्र झाल्यावर दिसेल की, विचार केलेला एकेक आकार आता वेगळा राहिला नाहीये. त्याला दुसरा आकार चिकटल्याने भलताच न समजणारा आकार झालाय. कदाचित एक आकार पूर्ण झालाही नसेल आणि दुसराही अपूर्ण असेल. यात वेळ न घालवता तू दुसरा आकार काढत जायचे आहे. काहींचे एक, दोनच आकार होतील तर काहींचे चाळीस. पण अलार्म वाजल्याबरोबरच तू थांबायचे आहेस. प्लीज प्लीज दोन मिनिटे आणखी अशी स्वत:ला सूट द्यायची नाहीये.

कदाचित तुझ्या डोक्यात मासा म्हणजे पापलेट, बोंबील किंवा भला मोठा शार्कही असेल. ज्याचे फक्त तू दात काढण्याचा विचार केला असशील… त्यापुढे चमचमीत चिकन लॉलीपॉप चितारले असतील… आणि त्याला लागूनच एक ढग. पण हे सर्व एकाच हिरव्या रंगात असल्याने समजायला कठीण असेल. असू देत. दोन मिनिटांत काढलेले आकार कोणते हे केवळ तुलाच माहीत असेल. तुझ्या माझ्या शिवाय तिसर्‍यासाठी हा विचार अमूर्तच असेल. असेही चित्रात त्या वस्तूच्या आकारापेक्षा वस्तूच्या अनुभवाचा छाप उतरणार आहे. ज्यात तुझ्या वेगवान विचारांशी स्पर्धा ब्रशनं केली असेल. त्या ब्रशमध्ये हातातून आलेली ऊर्जा उतरली असेल.

कागदावरच्या काही रेषा तुटल्या असतीलही, कागदाचे कोपरे रिकामे असतीलही… पण मित्रा, हे कल्पनेच्या वेगाला कागदावर उतरवणारे तुझे पहिले चित्र आहे. कुणी विचारलेच की तू किती वेगात विचार करतोस तर त्याला खुशाल हे चित्र दाखव.

तुझा चित्र मित्र… श्रीबा.

शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…

  • १. घड्याळ हाती घेऊन तुम्ही वेळेच्या बाबत कठोरता बाळगा. पण मोठ्याने काउंटडाऊन करून मुलांना घाबरवू नका.
  • २. या कागदावर जे काही होईल त्याचे तुम्हाला कौतुक वाटू देत. हे जग दोन मिनिटांत बदलेल की नाही ते माहीत नाही, पण मुलांचे विश्व या दोन मिनिटांच्या चित्राने नक्की बदलू शकते.

मुलांचा प्रतिसाद

डोळे बंद करून मी कसं बरं चित्र काढू? हा पेच तुमच्या समोर होता. परंतु डोळे बंद करूनही तुम्ही खूप छान चित्र काढू शकता, कागदावर मनमोकळेपणने व्यक्त होऊ शकता, हे तुम्हाला आता कळलं ना! एक वेगळीच मज्जा आहे ना यात! आपले डोळे बंद आहेत, पण कागदावर रंगांचे फटकारे मात्र उमटतायत…

आभा तावडे, वय : ९ वर्षे
जिनाया कुबोडिया, वय : ८ वर्षे
प्रीती भीमसेन पारधी, इयत्ता- सातवी, जिल्हा परिषद शाळा नं.१, ता. मुरबाड, जि. ठाणे</figcaption>
विधी अनुष्का विशाल पवार, इयत्ता- आठवी, कनकिया इंटरनॅशनल स्कूल, मीरा रोड
अनुष्का मनीष गांगरकर,
इयत्ता- आठवी, इंडियन एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्यमिक शाळा, भांडुप.

shriba29@gmail.com