डॉ. केशवचैतन्य कुंटे
जेष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी एका लेखात नमूद केलं होतं, ‘‘समजा हत्तीसारखा महाकाय प्राणी हरणाएवढा बनवला किंवा सशासारखा एखादा लहानसा प्राणी हत्तीएवढा महाकाय केला तर काय होईल? ते बेंगरूळ, विचित्र दिसेल. एवढंच नाही, तर महत्त्वाचं म्हणजे त्या त्या प्राण्यांची शरीरयंत्रणा कोलमडून पडेल; शिवाय त्यामुळे एकंदर जीवसृष्टीत बऱ्याच समस्या उद्भवतील. लहान गावांची उपनगरं, नगरं आणि आता महानगरंही होत असताना या अवाजवी फुगलेल्या बेढब, बकाल शहरांच्या समस्या आपण सगळे रोजच अनुभवतोय.’’

आता तुम्ही म्हणाल की, नारळीकरांच्या या म्हणण्याचा संगीताशी काय संबंध? तर मंडळी, याचा संगीताशी संबंध नक्कीच आहे. तो कसा हे पाहा… नारळीकरांच्या म्हणण्यातून लक्षात येणारं सूत्र काय? तर, एखाद्या गोष्टीचं प्रमाण, मूळचा संदर्भ बदलला की त्या गोष्टीचं केवळ रूप पालटत नाही, तर ती गोष्ट जीवसृष्टीचा समतोल बिघडवू लागते. हे असंच कलेच्या, संगीताच्या बाबतीतही घडतं. कलेचा मूळचा संदर्भ, तिच्या निर्मिती आणि आस्वादामागचा विचार, तिचा अपेक्षित रसिकवर्ग बदलला तर त्या कलेचा कसा खेळखंडोबा होतो याचं प्रत्यंतर हल्ली संवेदनशील कलाकार आणि रसिकांनाही येतंय. आता असं बघा की, छोट्या जागेत, मोजक्या जाणकार लोकांपुढे नजाकतीनं सादर करायची एखादी कला जर हजारो लोकांपुढे, अवाढव्य मंडपांत सादर होऊ लागली तर?

एखादी कला प्रांगणीय-कला आहे की समीप-कला, यानुसार तिच्या सादरीकरणाची गणितं बदलतात. उघड्या माळावर सादर होणारा एखादा लोककलेचा प्रकार शहरातल्या बंदिस्त, वातानुकूलित रंगमंचावर आला की तो अस्सल मातीतली रग गमावून बरेचदा सपक, अळणी वाटू लागतो. समीप-कलेत तरल, सूक्ष्म, नाजूक असणारी गोष्ट प्रांगणीय-कलेत बटबटीत, भडक आणि ओंगळही वाटू शकते… हे असं का होतं? कारण तिचा मूळचा संदर्भ, प्रमाण आणि देता-घेता बदलतो! (हां, मूळच्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात आणताना नेमका, ठोस विचार करून त्या कलेच्या आविष्कारातच फेरफार केले असतील, तर मग तो मुद्दाच निराळा! पण तसं विचारपूर्वक केलेलं कलात्म परिवर्तन अभावानंच दिसतं.)

कलांचं अभिसरण हे नेहमीच होत आलंय आणि सर्वच प्रयोगकला नाना संस्कृती, समाज, प्रदेश, प्रस्तुतीच्या अवकाशांतून मार्गक्रमणा करत बदलत गेल्या आहेत, हा नोंदवला गेलेला इतिहास आहे. असं अभिसरण होण्यात काहीच गैर नसतं. अशा अभिसरणात त्या कलेचं स्वरूप बदलतं आणि परिवर्तनशील असलेल्या कलेचे वेगवेगळे पैलू पुढे येतात. अर्थातच, कलेच्या अभिसरणामुळे लाभ नक्कीच होतो. कलामर्मज्ञ कला-अभिसरणाला विरोध करत नाहीत, त्याचं स्वागतच करतात. पण मग संदर्भबदल करण्याला त्यांचा विरोध का असतो? त्या विरोधाचं कारण एवढंच असतं की कला कशी सादर होणार, ती आस्वादली आणि विकली-घेतली कशी जाणार हे त्या संदर्भांवरच अवलंबून असतं. संदर्भ बदलल्यानं हे सारं बदलतं आणि वर म्हणल्याप्रमाणे सशाचा हत्ती किंवा उलट असं काही तरी घडतं… कलेच्या जीवसृष्टीचा समतोल हरपून जातो.

अगदी हीच बाब मुळातलं ‘बैठकीचं संगीत’ आणि हल्ली फोफावलेलं ‘महोत्सवी संगीत’ यांत दिसते. हिंदुस्थानी रागसंगीताची कला मुळात समीप-कला आहे. ‘चेंबर म्यूझिक’ असलेलं हिंदुस्थानी रागसंगीत कधी मंदिराश्रयी तर कधी राजाश्रयी होतं, पण आता ते लोकाश्रयी झाल्यानं ‘चेंबर म्यूझिक’ न उरता उन्मादी ‘पब्लिक म्यूझिक’ बनतंय. ‘जे घाऊक ते पौष्टिक’ अशा उफराट्या न्यायानं रागसंगीताच्या अंतर्मुखी कलेचं रूपांतर बहिर्वर्ती कलेत झालंय.

छोटेखानी बैठकीत कलेचा देता-घेता हे दोघेही समीप असतात. तिथे कलाकार जणू कलेचं गूज ‘ये हृदयीचे ते हृदयी’ सांगतात. एक कलाकार एखाद्या रागाचा मन:पूत विस्तार करताना रागाच्या अंतरंगात शिरतो. तिथे दाद आपोआप मिळते – दाद घेण्यासाठी करामत केली जात नाही. शाब्दिक दाद देण्याचीही गरज तिथे नसते, कारण अनेकदा नजरेचा एखादा इशाराही पुरेसा असतो! श्रोत्यांना अपरिचित, अनवट असं काही मांडताना ‘हे लोकांना आवडेल का? झेपेल का?’ असा कद्रू, भित्रा विचार कलावंत करत नसतो; उलट ‘हे मीच मांडायला हवं, तेव्हाच तर ते लोकांना कळेल, मग झेपेल आणि नंतर आवडेलही’ अशी आव्हान पेलण्याची जबाबदारी घेणाऱ्या पवित्र्यात कलावंत असतो. छोट्या मैफलीतलं संगीत विचारपूर्वक पेश केलेलं असतं, आणि ते श्रोत्यांनाही एक तर विचार करायला लावेल असं किंवा विचार पूर्णत: विसरायला लावेल असं असतं! छोट्या मैफलीत कलात्मक जोखीम (आर्टिस्टिक रिस्क) घेता येते; तिथे केवळ लोकानुनय करणारं विकाऊ वृत्तीचं बोटचेपं धोरण नसतं. (लोकांना आवडेल ते देण्यात गैर काहीच नाही. मात्र फक्त लोकांना माहीत असलेलं, आवडलेलं तेच आणि तेवढंच देत राहण्यात कलावंताचा ओशाळा मिंधेपणा असतो, हे लक्षात घ्यावं!)

कारण काय?

करोना काळात सांस्कृतिकसांगीतिक कार्यक्रमांना थांबा मिळाला. पण कलाकार थांबले नाहीत. त्यांनी ऑनलाइन माध्यमांच्या आधारे संगीताचे वातावरण जिवंत ठेवले. पुढे करोना ओसरल्याने टाळेमुक्तीनंतर देशात विविध शहरांतील कलाकारांचे जलसे आणि बैठका खासगी स्वरूपात होऊ लागल्या. अगदी कुटुंबातील वीसपंचवीसपन्नास श्रोत्यांपुढे बैठका होऊ लागल्या, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, सेवा क्षेत्रातील संस्थांनीदेखील कलाकारांच्या बैठकींचे आयोजन करून मर्यादित; परंतु जाणकार प्रेक्षकांपुरते मैफलींचे आयोजन केले. समाजमाध्यमांद्वारे जाहिरात करून छोट्या जागांमध्ये, बंगल्यांमध्ये नव्याजुन्या कलाकारांना बैठकीसाठी बोलावण्याचा नवा प्रवाह आता दिल्लीमुंबईमध्ये लोकप्रिय होत आहे.

शुद्ध शास्त्रीय मैफल…

दिल्लीमधील तन्वी सिंग आणि अनुभव जैन यांनी २०१९ मध्ये एकत्र येऊन ‘इब्तिदा: एक मैफल’ या बैठकीच्या सांगीतिक कार्यक्रमांना सुरुवात केली. फार्महाऊस, जुन्या हवेल्या, साडीची दुकाने आणि हॉटेल्समध्ये त्यांनी ५० ते १०० श्रोते असलेल्या शुद्ध शास्त्रीय मैफली आयोजित केल्या. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, तारांकित हॉटेल्समध्ये त्यांचे कार्यक्रम आता सादर होतात. अलीकडेच त्यांनी तीन पिढ्यांतील सरोदवादकांची मैफल जुळवून आणली. त्याला मोठे प्रायोजकसुद्धा उपलब्ध झाले. दिल्लीचे विनोद कपूर यांची व्हीएसके बैठक गेल्या दोन दशकांपासून सक्रिय आहे. ‘इब्तिदा: एक मैफल’सारख्याच बैठकी विविध शहरांतून आता तयार होत आहेत.

मौसिकी आणि शायरी…

विविध कला प्रकारांतून उर्दूचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘जश्न ए रेख्ता’ला देशभरातील तरुणाईचा तुफान प्रतिसाद असतो. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रेरणेतूनच मुंबईसह देशभरातील विविध भागांत मौसिकी (संगीत) आणि शायरीच्या मैफली एकत्रितरीत्या होतात. समाज माध्यमांमधून या मैफलींमध्ये श्रोतावर्ग जोडला जातो. हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची गोडी पुढल्या पिढीला लागावी या उद्देशाने या बैठकी आयोजित केल्या जातात.

मंदिरं, रईसांच्या हवेल्या आणि राजदरबारांत सीमित झालेलं रागसंगीत गेल्या शतकाच्या आरंभकाळात सर्वसामान्यांपर्यंत आणलं गेलं. या ‘संगीताच्या लोकशाहीकरणा’चं मोठं कार्य पलुसकर, भातखंडे अशा अनेक महारथींनी केलं. त्यामुळे रागसंगीत केवळ टिकलंच नव्हे, तर समृद्धही झालं. पण संगीताच्या लोकशाहीकरणाच्या पुढचा टप्पा संगीताच्या व्यापारीकरणाचा असणार आहे आणि आपण केलेल्या प्रयत्नांचं पर्यावसान अपरिहार्यपणे रागसंगीताच्या सपाटीकरणात होणार आहे याची त्या महाभागांना कल्पनाही नसेल. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, विशेषत: १९९०च्या दशकानंतर रागसंगीताच्या क्षेत्रातही व्यापारीकरणाचे वारे वेगात वाहू लागले. मोठमोठे व्यावसायिक संगीतमहोत्सव आयोजित होऊ लागले. आता संगीतमहोत्सव करायचा म्हणजे त्याला प्रायोजक हवेत. प्रायोजकांना केवळ नामी आणि गर्दी खेचू (क्राउडपुलर) कलाकार हवे असतात. त्यामुळे मोठे प्रायोजक असलेल्या समारोहांमध्ये तेच ते ठरावीक गायक-वादक दिसतात. शिवाय दोन दिवसांच्या ‘महोत्सवा’त फक्त दोनच कलाकार असून कसं भागेल? म्हणून प्रत्येक सत्रात तीन-तीन कलाकार असतात. त्यामुळे कुणाच कलाकाराला पुरेसा अवधी मिळत नाही. नवोदित कलाकाराला अर्धा-पाऊण तास आणि ज्येष्ठ कलाकाराला दीड तास म्हणजे डोक्यावरून पाणी! त्यामुळे ‘तबीयतदारी’ने एखाद्या रागाच्या अंतरंगात शिरून त्या रागाचा रंग जमवेपर्यंत वेळ संपलेली असते. मग काय? कलाकार ‘हमखास टाळी फॉर्म्युला’नं रागाची पेशकश करू लागतात. याला रागसंगीत तरी कसं म्हणावं? हे तर ‘व्याज-रागसंगीत’ आहे. या प्रकारच्या संगीताला ‘महोत्सवी संगीत’ असं वेगळं नाव मी दिलंय.

आलापचारी म्हणजे रागाच्या सूक्ष्म अंतरंगात अलवारपणे उतरण्याची प्रक्रिया; आणि ही आलापचारी म्हणजेच रागसंगीताचा खरा प्राण! पण या आलापचारीचं महत्त्व ‘महोत्सवी संगीता’त संपुष्टात आलंय आणि उरलाय रागाच्या कलेवराला चमत्कृतीच्या बेगडी अलंकारांनी शृंगारण्याचा सोहळा! तानफिरत, सरगम, तिहाया, सवाल-जवाब असे घटक पूर्वी ‘चेरी ऑन दी टॉप’ असायचे, तेच आता मुख्य ऐवज बनलेत! हे असलं सांगीतिक जंकफूड खाऊन वाढत असलेला श्रोता खरा रसिक बनत नाही – त्याच्यावर दिसते फक्त संगीतप्रेमाची आभासी सूज! रागसंगीतात नेमकी दाद कशाला द्यायची असते हे ज्यांना ठाऊकच नाही अशा लोकांच्या दावणीला कलावंत स्वत:ला बांधून घेऊ लागलेत. त्यामुळे गाण्या-बजावण्यातला ठहराव, सुकून गेला – उरली आहे चमत्कृती, चटपटीतपणा आणि दिखावूपणा. ‘लोकांची मागणी’ ही सबब पुढे करून जेमतेम एखादा राग कसाबसा ‘उरकायचा’ आणि मग तीच ती तथाकथित लोकप्रिय नाट्य-भावगीतं, अभंग-भजनं यांची ‘फटाक्यांची माळ’ लावायची असा सारा मामला असतो. ‘संगीतमहोत्सवांत आपलं दुकान मोजके ८-१० राग आणि दिग्गजांनी आधीच गाजवून ठेवलेल्या २०-२५ लोकप्रिय रचना अशा ऐवजावर उत्तम चालू शकतं’ असा भ्रम हल्लीच्या कलाकारांना झालाय. रागविद्योचा व्यासंग हे आयुष्यभराचं व्रत असतं हे कलावंत जणू विसरू लागलेत!

महोत्सवी संगीताचा अजून एक तोटा म्हणजे संगीताचं सपाटीकरण! पूर्वी वेगवेगळ्या बानी, बाज, घराणी, परंपरांमुळे गाण्या-बजावण्यात वैविध्य होतं; प्रत्येकाची खासीयत, आगळी ओळख होती. आता हे वैविध्य, खासीयत दिसत नाही, कारण सारे एकसारखेच, एकाच फॉर्म्युल्याने गाऊ-वाजवू लागले आहेत. आणि या फॉर्म्युल्यात तुम्ही बसत नसाल तर तुम्ही जणू कलाकारच नाही अशी उपेक्षा वाट्याला येते. कित्येक उत्तम तालीमदार कलाकार त्यामुळे दुर्लक्षिले जाताहेत. बरं, एकदा का या महोत्सवी संगीताच्या चक्रात एखादा कलाकार गोवला गेला की त्याला ‘वाहवाची हवा’ लागते. त्याचं कलात्मक अध:पतन होतंय हे त्या बिचाऱ्याला लक्षातही येत नाही; आणि लक्षात आलं तरी सतत मिळणाऱ्या धन-प्रसिद्धीच्या ओघात आपले हात धुऊन घेण्याच्या स्वार्थानं आंधळ्या झालेल्या त्याला ‘रागसंगीताच्या गृहलक्ष्मीला आपण बाजारबसवी बनवून विकतोय’ याचं भानही उरत नाही, हा दैवदुर्विलास आहे.

बैठकीचं संगीत विरुद्ध महोत्सवी संगीत हा संघर्ष खरं तर कलासंगीत आणि जनसंगीत या दोन संगीतकोटींतल्या मानसिकतेच्या फरकामुळे उद्भवणारा संघर्ष आहे. ‘केवळ कलेसाठी कला सादर करणं’ आणि ‘कलाकारापेक्षा कला मोठी असते, त्यामुळे कलेचा उत्कर्ष महत्त्वाचा; कलेचा उत्कर्ष झाला की कलाकाराचा उत्कर्ष आपोआपच होतो’ अशी कलासंगीतकाराची भूमिका असते. उलट जनसंगीतकाराची भूमिका ‘लोकांना रिझवणं आणि त्यातून स्वत:चा उत्कर्ष साधणं हेच महत्त्वाचं’ अशी असते. ‘प्रयत्न फसला तरी चालेल, पण कलेत वेगळं काही अजमावून पाहणं, नवनिर्मिती आणि प्रयोग करणं महत्त्वाचं’ ही कलासंगीताची मूलभूत मानसिकता असते. उलट ‘नवनिर्मिती, प्रयोग, आव्हान वगैरे काही नको. लोकांना जे आवडतं ते आणि तेवढंच सादर करावं आणि भरपूर टाळ्या, भरपूर पैसा मिळवावा’ ही जनसंगीताची मूलभूत मानसिकता असते. श्रोत्यांच्या बाबतीत ‘संख्येनं कमी, पण रसिकवत्तेनं मोठा असा श्रोता आम्हाला मोलाचा आहे; गाणं न कळणारी भाऊगर्दी काय कामाची?’ ही कलासंगीतकारांची भूमिका असते. उलट, ‘गाणं कळो वा न कळो, खूप श्रोते येणं हेच महत्त्वाचं. खूप श्रोते म्हणजे खूप पैसा आणि प्रसिद्धीचा लाभ! तेच तर महत्त्वाचं आहे’ असं जनसंगीतकाराचं समीकरण असतं. या दोन्ही भूमिका आणि मानसिकता त्यांच्या त्यांच्या ठिकाणी न्याय्यच आहेत, त्यांत अयोग्य असं अजिबात काही नाही. पण मग संघर्ष कधी निर्माण होतो? जेव्हा कलासंगीताला जनसंगीतातल्यासारखे लोकप्रियतेचे आणि चटपटीतपणाचे निकष लावून तोललं जातं तेव्हा.

कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, आमीर खां अशी मंडळी ही खरी ‘कलासंगीतकार’ होती. ‘माझ्या कलेतून मला काय म्हणायचं आहे तेच मी ऐकवेन, भले ते आत्ता लोकांच्या डोक्यावरून जावो’ या भूमिकेला चिकटून होती. म्हणूनच, त्यांची गाणी त्या काळच्या मोठ्या महोत्सवांपेक्षा छोट्या मैफलीत अधिक रंगत असत. मात्र आजच्या महोत्सवी संगीताच्या आखाड्यात लागणारे डावपेच वेगळेच आहेत. आजच्या महोत्सवी संगीतकारांना मी काही अजिबात कमी लेखत नाही, हेही लक्षात घ्या. आता असं बघा की, समोर हजारो (आणि तेही विशिष्ट सांगीतिक अभिरुची नसलेले) श्रोते असतील तर त्या सर्वांना काबूत ठेवेल असं संगीत पेश करणं म्हणजे काय सोपं काम आहे? त्यासाठी कलावंताकडे काही वेगळी हत्यारं लागतात. वेगळी सांगीतिक आणि संगीतबाह्य अशीही गुणवत्ता लागते. तेही काही सोपं काम नाही आणि त्यालाही कलेच्या जगात एक निश्चित महत्त्व आहेच. पण हे लक्षात घ्यायला हवं की लोकप्रिय महोत्सवी वर्तुळाच्या पलीकडे रागसंगीताचं बरंच मोठं जग आहे, व्यापक वास्तव आहे. दुर्दैवानं महोत्सवी संगीताच्या रेट्यात गंभीर, सकस रागसंगीताची अवहेलना होतेय याकडे काणाडोळा केला जातोय. बैठकी संगीत आणि महोत्सवी संगीत या दोन्ही मैदानांत तुल्यबळ कामगिरी करू शकणारे कलावंत पूर्वी आणि आताही विरळाच आहेत. पूर्वीच्या काळी बडे गुलाम अली, भीमसेन जोशी ही मंडळी दोन्ही ठिकाणी तेवढीच प्रभावी असत. आज असे कलावंत अभावानेच दिसतात.

संस्कृति-संगीतशास्त्र असं मानतं की, संगीत आणि संस्कृती सतत एकमेकांना साद-प्रतिसाद देत राहतात. सांस्कृतिक जीवनात असो की संगीतात, एखादी प्रवृत्ती रुजली की तिची विरोधी-प्रवृत्तीदेखील जागी होते. बैठकीचं रागसंगीत आणि महोत्सवी संगीत या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती आहेत. बैठकीचं रागसंगीत पूर्वीपासून होतंच, पण जसजसं महोत्सवी संगीत वाढू लागलं तसतशी ‘बैठकीचं रागसंगीत लोप पावणार की काय’ अशी चिंता वाढू लागली, आणि या वाढत्या महोत्सवी संगीताला प्रतिसाद देत गेल्या १०-१५ वर्षांत काही लोक छोटेखानी मैफली आयोजित करून पुन्हा बैठकीच्या संगीताला प्राधान्य देऊ लागलेत. ‘मोठाले प्रायोजक न घेता, लोकांच्या आर्थिक सहभागातून छोटेखानी मैफल आयोजित करायची – त्याला १००-१५० श्रोते असले तरी पुरे; मैफलीत फक्त एकाच कलावंताची पेशकश तबियतदारीने होईल; कधी अशा बैठकीत काही संकल्पना-सूत्रही असेल’ असा आराखडा ठेवून अनेक लोक, संस्था छोटेखानी मैफली आयोजित करतात. अशा आयोजनांतून त्याच त्या महोत्सवी कलाकारांपेक्षा बरेच वेगळे कलाकार, वेगळी संगीतधाटणी, वेगळी वाद्यां, वेगळा रचनासंच आता मांडला जातोय. दिल्लीचे विनोद कपूर, अहमदाबादचे मिहीर ठाकोर, चेंबूरचे खडके, साताऱ्याची ‘पंचम’, लातूरची ‘आवर्तन’, सुधीर नायक यांची ‘कलाकोस्ट’, पुण्या-मुंबईच्या ‘फर्स्ट एडिशन आर्ट्स’, ‘सुश्रुत’, ‘बैठक’, ‘कलानिधी’, ‘शुद्धनाद’, ‘कलावधान’ची अंतरंग मालिका, इ. संस्था आणि व्यक्ती बैठकी संगीताला टिकवण्याची जणू एक चळवळच चालवत आहेत. विशेष म्हणजे असे उपक्रम तरुण पिढीतले अनेक कलावंत स्वत: पुढाकार घेऊन करू लागले आहेत. कलावंतांनीच आयोजित आणि प्रायोजितही केलेल्या अशा उपक्रमांत कलावंत आणि रसिकांमधले सांगीतिक अभिसरण बाळसं धरतंय. महोत्सवी संगीताला, ते सादर करून पैसा-प्रसिद्धी मिळवायला माझा अजिबात विरोध नाही – ते आजच्या काळातलं ‘अपरिहार्य सांगीत वास्तव’ म्हणून आपल्याला स्वीकारावंच लागेल. परंतु, छोटेखानी मैफलींतून बैठकी संगीताचा, अस्सल रागसंगीताचा अंत:स्वर जपला जातोय, ही बाब मला नक्कीच आशादायक आणि सकारात्मक वाटते.

पॉप आणि फिल्म संगीतही…

गेल्या दोनतीन वर्षांपासून या खासगी बैठकींमध्ये चित्रसंगीत, गझल, काव्य आणि पॉप संगीतातील कलाकारदेखील दिसू लागले आहेत. पूर्वी तारांकित व्यक्तींकडे असलेल्या पार्ट्यांचे हे बदलते कलात्मक स्वरूप. ज्यांत प्रसिद्ध संगीतकार, गझल गायक आणि लोकप्रिय गायक एकत्र येऊन एकमेकांच्या गाण्यांना सादर करतात. या कार्यक्रमांतील सादरीकरणाच्या छोट्या आकाराच्या रील्स बनवून त्यांना इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमांवर जोडण्यात येते. अशा प्रकारे आवडीच्या कलाकारांचे संमेलन असलेल्या या रील्स तरुणांमध्ये भरपूर लोकप्रिय आहेत. सोनू निगम, अनुप जलोटा, कुमार शानू, शान, मिका सिंग, उदित नारायण आदी कलाकारांचे जाहीर मोठे कार्यक्रम सुरू असतातच. पण अधूनमधून त्यांच्या खासगी बैठकींच्या रील्सदेखील जोरदार पसरत असतात.

–डॉ. केशवचैतन्य कुंटे

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतरचनाकार, गुरू आणि संस्कृतिसंगीतशास्त्राचे अभ्यासक आहेत.)