‘लोकरंग’मधील (१ फेब्रुवारी) प्रताब आसबे यांचा ‘बहाद्दर गडी…’ हा लेख वाचला. अजितदादांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य, दादांचा सुरुवातीपासूनचा प्रवास, कधीही न ऐकलेले दादांचे किस्से, वटवृक्षाच्या छायेखाली वाढलेले नेतृत्व… सर्व काही छान मांडले आहे… राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य याबाबत जो गट सत्तेत योग्य संधी उपलब्ध करून देईल तेथेच सर्व नेते राहतील, असा आजपर्यंतचा मोठ्या साहेबांसमवेत राष्ट्रवादीचाही इतिहास राहिला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जसे प्रस्थापित राजकीय नेतृत्वाच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात मोठे करून घडविले, तसे काही अपवाद सोडले तर बहुतांशी पवार साहेबांनी प्रस्थापित निवडून येणार्‍या नेत्यांची मोट बांधून, सत्तेचे समीकरण जुळवून, त्यांना दिल्ली व महाराष्ट्रात सत्तापदे दिली. काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला कंटाळलेले नेते पवार साहेबांच्या सोबत राहिले. निवडून आणलेले व निवडून येणारे हा ठाकरे व पवार यांच्या राजकारणातील मुख्य फरक ठसठशीतपणे दिसतो.

काळाच्या ओघात महाराष्ट्रातील राजकीय सारीपाट बदलल्यावर लेखात उल्लेख केल्यानुसार, दादांनी पवार साहेबांपासून वेगळं होत सर्व नेत्यांची अडचण ओळखून, त्यांना सत्तेतील गणित लावल्याने, बहुतांश पवार साहेबांचे निवडून येणारे शिलेदार व शिष्य यांनी दादांसोबत जाणे पसंत केले, जे पूर्वी पवारसाहेब करीत होते. तेच जर पवार साहेबांनी सत्तेचे गणित लावले असते तर ती मंडळी त्यांच्या सोबतच असती… पण तो टायमिंग साहेबांनी चुकवला व दादांनी साधला. भाजपला तसे सर्वच स्थानिक पक्ष संपविण्याची मनीषा आहे हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत पोषक राजकीय वातावरण आहे, त्यामुळे दिग्गज पवार कुटुंबीय काय व कशी राजकीय परिस्थिती हाताळतील यावर राष्ट्रवादी व पवार परिवाराचे भवितव्य अवलंबून असेल हे निश्चित

दीपक नंदलाल सावळे, नाशिक

अजितदादा, एक वादळ…

‘लोकरंग’मधील (१ फेबु्रवारी) ‘बहाद्दर गडी…’ हा प्रताप आसबे यांचा लेख वाचला. अजितदादा पवार या वादळी व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध सर्वसमावेशक, अत्यंत समर्पक असा वाटला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर कसे करावयाचे, अफाट लोकप्रियता कशी मिळवावयाची, याचे अजितदादा हे उत्तम उदाहरण. राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी निवडताना अजित पवार यांचीच निवड होणे हे सर्वार्थाने न्याय्य ठरले असते. उत्तम संघटक, लोकप्रिय नेता, सामाजिक परिस्थितीची उत्तम जाण, राज्यातील स्थानिक पातळीपासून ते देशपातळीपर्यंत असलेल्या राजकारणाची उत्तम माहिती, मातीत राहणारा नेता म्हणून तळागाळात लोकप्रिय… असे सर्व गुण असूनही त्याच्यांवर दुर्दैवाने अन्याय झाला. पण त्यामुळे रडत न बसता अजितदादांनी निर्भीडपणे स्वत:च्या हिंमतीवर विजय मिळवला.

प्रदीप करमरकर, ठाणे</strong>

चित्र, शिल्प संवाद साधतात…

‘लोकरंग’मधील (१ फेब्रुवारी) अरुंधती देवस्थळे यांचे ‘जादूई दिवस’ या सदरातील ‘खुदा बंदे से पूछे…’ हा लेख वाचला. सतीश गुजराल किंवा त्यांच्या सखी किरण यांच्याशी माझी कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण या लेखातले एक वाक्य मनोमन पटले- ‘‘चित्र तुमच्याशी बोलत असते. ते तुम्हाला काही तरी सांगू पाहत असते.’’ वेळ मिळाला की जहांगीर आर्ट गॅलरीत विरंगुळा म्हणून फेरफटका मारणे हा माझा एक छंद होता. असाच एकदा चित्रे पाहात असताना एक व्यक्ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. मी एक चित्र पाहून पुढे सरकत असताना त्या व्यक्तीने मला हटकलं आणि विचारलं, ‘‘बस इतकंच! काय कळलं हे चित्र बघून?’’ मी म्हटलं, ‘‘छान आहे.’’ ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘मुळीच नाही, हे चित्र अर्धवट आहे, प्रदर्शनाच्या डेडलाइनमुळे, घाईघाईने ते तयार करून इथे मांडलेले आहे, म्हणून ते चित्र त्याच्या जन्मदात्याला शिव्या देतंय!’’ बापरे! मी सर्दच झालो. ‘‘‘ते चित्र एवढं काही बोलतंय?’’ ‘‘हं!’’ असा सुस्कारा सोडून ती व्यक्ती निघून गेली. मला प्रश्न पडला- ‘‘कदाचित ती व्यक्ती त्या चित्राचा चित्रकार तर नसेल?’’ पण त्या दिवसापासून प्रदर्शनातील प्रत्येक चित्र, शिल्प शांतपणे, थंडपणे त्या कलाकृतीशी तादात्म्य पावत, एकरूप होऊन पाहण्याचा एक वेगळाच छंद मला जडला आणि खरंच सांगतो, अलीकडे प्रत्येक चित्र, शिल्प माझ्याशी बोलतानाची मला अनुभूती होते. एक पुतळा असाच माझ्याशी बोलला, त्याची व्यथा ही होती की, त्याला उभारून आज पन्नास वर्षे झाली होती, लोक आता तो पुतळा कोणाचा आहे, हेही विसरले होते. त्या पुतळ्याला स्वत:ची ओळख हवी होती. मी प्रयत्नपूर्वक त्या पुतळ्याखाली त्याचा नामपट लावून घेतला; आणि काय सांगू नंतर परत एकदा त्याला पाहताना तो पुतळा माझ्याकडे पाहून समाधानाने चक्क हसला. तुम्ही भास म्हणा हवं तर, पण मी मात्र त्याला, त्या शिल्पाचा माझ्याशी झालेला संवादच समजतो.

– ॲड. एम. आर. सबनीस, मुंबई

शोकांतिकेची सुखांतिका

‘लोकरंग’मधील (१ फेब्रुवारी) अरुंधती देवस्थळे यांचे ‘जादूई दिवस’ या सदरातील ‘खुदा बंदे से पूछे…’ हा लेख वाचला. सतीश गुजराल यांनी जीवनाची सुखांतिका केली आणि स्वत:च्या आयुष्याचं शिल्प घडवलं. वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या आजारामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होत पूर्णपणे गेली, इतकंच नव्हे तर वाचा हरवली; परंतु यावर त्यांनी झुंज देऊन एक उत्तम कलाकार म्हणून नाव उज्ज्वल केलं. जाळीदार भिंती, प्रकाश आणि हिरवाईचं नेत्रसुख देणार्‍या विटांनी बांधलेल्या बेल्जियन दूतावासासारख्या वास्तू पाहिल्यानंतर त्यांची सर्जनशीलता दिसून येते. तसेच त्यांच्या घराण्यातील नाती घट्ट आहेत हे वाचून मनाला खूप आनंद वाटला. नियतीसमोर हार न मानता असामान्य मनोबलानं शोकांतिकेची सुखांतिका केली.

– उज्ज्वला मालाडकर, पुणे

माहितीपूर्ण लेख

‘लोकरंग’मधील (८ फेब्रुवारी) ‘माझा खोकला जात का नाही?’ हा डॉ. अनुश्री वर्तक यांचा लेख वाचनीय व माहितीपूर्ण होता. लेख वाचून ‘सुंठी वाचून खोकला गेला’ या म्हणीची आठवण झाली. पूर्वी खोकला बरेच दिवस राहिला की टीबी (क्षयरोग)चे लक्षण असा समज करून वैद्यकीय चाचण्या केल्या जात. कोविडची साथ येऊन गेल्यापासून मात्र खोकल्याची अनेक कारणे पुढे येऊ लागली. खोकल्याचे मूळ कारण घसा नसून पोट आहे, तसेच खोकला हा आजार नसून, ते लक्षण आहे, म्हणून मुखद्वार व गुदद्वार या दोन दरवाज्यांवर पहारा ठेवणे हा उत्तम उपाय आहे. पण टीव्ही व जाहिरातीत मात्र लक्षणावरची औषधे (गोळ्या, काढे) सुचवतात. हल्ली जरा कुठे सर्दी, पडसं, ताप, खोकला आला की ‘व्हायरल इन्फेक्शन’चे निदान करून गरज नसताना ॲन्टिबायोटिक्सचा (१० गोळ्यांची स्ट्रीप असते म्हणून) पाच दिवसांचा कोर्स करायला सांगतात. शरीरातील प्रतिकार शक्तीला वावच देत नाही. खोकला लपवता येत नाही, एवढं
मात्र खरं.

– श्रीनिवास स. डोंगरे. मुंबई

अन्य पॅथींचा द्वेष नको

‘लोकरंग’मधील (८ फेब्रुवारी) ‘माझा खोकला जात का नाही?’ हा डॉ. अनुश्री वर्तक यांचा लेख वाचला. या लेखात अत्यंत बारकाईने सध्याच्या खोकल्याची कारणे आणि उपायांचा आढावा घेतला आहे. या लेखामुळे निश्चितच नागरिकांना योग्य निर्णय घेताना मदत होईल. परंतु हे सर्व लिहिताना इतर वैद्यकशास्त्रांना मात्र खालच्या भाषेत वर्णित करून आपला पूर्वग्रहदूषित मानस लपवता आला नाही असे वाटते. थोडे पुढे जाऊन त्यांनी ॲलोपथीवरचा लोकांचा विश्वास का कमी झाला याचेपण वर्णन केले आहेच, पण त्यात विनाकारण गोमूत्र शिंपडणे अशी वाक्ये पेरून ठरावीक शास्त्र आणि त्याचे अनुयायी यांना संकोच वाटावा अशी व्यवस्था केली आहे. असो, असा शास्त्राचा द्वेषसुद्धा व्याधींना कारणीभूत असतो. ज्ञानाचा अहंकार द्वेषाला कारणीभूत ठरू नये. कॅन्सर उपचारबद्दल पुढे लिहिताना फक्त आधुनिक वैद्यक कॅन्सर बरा करू शकते हा त्यांचा दावा तर जागतिक दर्जाचे कॅन्सरतज्ज्ञ सहज खोडून टाकतील असा आहे. ‘इतर पॅथींची औषधे याबद्दल न बोललेले बरे…’ असे लिहिणे बरे नव्हे.

– डॉ. प्रमोद शांताबाई राजेंद्र पाटील, लातूर.

आता मास्कदेखील गरजेचा होईल

‘लोकरंग’मधील (८ फेब्रुवारी) ‘माझा खोकला जात का नाही?’ हा डॉ. अनुश्री वर्तक यांचा लेख वाचला. ज्या खोकल्याचे आक्रमण आज झाले आहे त्याला जबाबदार अर्थातच आजची जीवनशैली जशी कारणीभूत आहे, तशीच नको ते खाद्यपदार्थ, पेयपान, धूम्रपान असेल किंवा व्यसनीपणामुळेदेखील याच खोकल्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सर्दी आणि खोकला हे संसर्गजन्य आजार आहेत आणि त्यापासून मुक्ती जरी नसली तरी शहरी भागात मास्क लावण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वाढते प्रदूषण आणि अगदी नळाद्वारे येणारे पाणीही सध्या दूषित झालेले आहे. आता बाहेरून शुद्ध पाण्याचे पाच ते दहा लिटरचे कॅन आणण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण पाणी आणि मंडईत मिळणारी भाजीही स्वच्छ पाण्याने धुऊन खावी लागत आहे. खोकला का जात नाही, कित्येक औषधे घेऊनदेखील जात नाही याची खरी कारणे सध्या तरी हीच आहेत. पण करोनाचे भय मात्र खोकल्यानेदेखील कायमस्वरूपी ठेवले आहे. इथून पुढे मास्क लावणेदेखील शहरी भागात गरजेचे होणार आहे. कारण दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि तिथून पुढे तर पुणे ते इतरत्र प्रदूषणाची समस्या म्हणून मास्क गरजेचा होईल.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

सुजाण प्रकाशकाचे कौतुक गरजेचे

‘लोकरंग’मधील (८ फेब्रुवारी) ‘नव्या जाणिवेचे प्रकाशक’ या सदरात सुश्रुत कुलकर्णी यांचा फॉम्र्युलेबाज पुस्तकांपलीकडे’हा अमलताश बुक्स’ या उदयोन्मुख प्रकाशन संस्थेची होत असलेली उत्कर्षपूर्ण वाटचाल सांगणारा लेख वाचला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दशकांची वाटचाल करताना मुळात साहित्यविषयक जाण आणि आवड असल्यामुळे संगणक विषयक पुस्तकांचे लेखन, विज्ञान तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचा, साहित्याचा अनुवाद, लेखक, संपादक, प्रकाशक यांच्याशी या निमित्ताने जोडले जाणे हे सर्व अर्थपूर्ण आणि उद्बोधक वाटले. या संपूर्ण प्रवासातून अमलताश बुक्स या प्रकाशन संस्थेचा जन्म झाला. त्यातही कवितासंग्रहांचे प्रकाशन, ताज्या दमाचे उदयोन्मुख कवी जाणीवपूर्वक निवडणे, त्यांना प्रकाशात आणणे, केवळ आर्थिक निकष वापरून संस्थेचे यश न तोलणे यात वैचारिक स्पष्टता आणि विशिष्ट उद्देश दिसून येतो. अमलताश म्हणजे बहावा वृक्ष! तो जसा पिवळ्याजर्द फुलांच्या घोसांनी चहूकडून बहरून येतो तसा अमलताश बुक्स या प्रकाशन संस्थेचा साहित्यिक प्रवास उत्तरोत्तर विकसित होत आहे ही बाब प्रवर्तक, लेखक, कवी तसेच वाचकांना आनंदित करणारी आहे. डिजिटल युगात प्रकाशन व्यवसायाला इंटरनेटची, माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कमीत कमी खर्चात पुस्तके नेता येतात हा मोठाच फायदा आहे. वाचनाला पर्याय नाही. वाचनाने विचारशक्ती वाढते. वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी सुसंस्कृत आणि जाणत्या वाचकांची गरज असते.

– डॉ. विकास इनामदार

भारत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र

‘लोकरंग’ (१८ जानेवारी) मधील मिलिंद बोकील यांचा ‘उद्याचे विस्थापित’ हा लेख वाचला. लेखाचा समारोप करताना म्हटले आहे की, आठवड्याने आणखी एक प्रजासत्ताक दिन येईल. आपल्याला ठरवावे लागेल, हे राज्य प्रजेचे आहे की पुढार्‍यांचे? २६ जानेवारी १९५०पासून भारत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. महाराष्ट्र राजस्थानसारखा उजाड, वाळवंटी प्रदेश झालेला नसला तरी १८५० पासून भाटघर धरणातून निरा डावा आणि उजवा कालवा आहे. या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील विहिरींना पाणी येत असे. कालव्यांना सिमेंटचे अस्तर केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील विहिरींना पाणी येणार नाही. पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होईल. पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. दुष्काळग्रस्त लोकांचा आवाज इंग्लंडच्या संसदेत पोहोचत होता. भाटघर धरण त्याचे प्रतीक आहे. आपले राष्ट्र लोकशाही प्रजासत्ताक आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना वारंवार करून देणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांना दैवी शक्तीचा भास होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. तरच भारताचे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र टिकेल.

– युगानंद गुलाबराव साळवे, पुणे

सत्य, शिव आणि सौंदर्य

‘लोकरंग’ मधील (२५ जानेवारी) वैशाली चिटणीस यांचा ‘अभिजनांचे लव्ह अफेअर’ हा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ ची ओळख करून
देणारा लेख वाचला. हा साहित्य महोत्सव म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे शब्दरूपी संमेलनच. आता ‘ई बुक्स’च्या जमान्यात एकेकाळची पुस्तकरूपी रत्ने निकामी झाली आणि पुस्तकांनी भरलेली कपाटे कोनाड्यात फेकली गेली. जयपूर फेस्टिव्हलमधील हे साहित्यिक लव्हअफेअर मराठी साहित्य संमेलनात येवो, जेणेकरून राजकीय विळख्यात अडकलेले मराठी अभिजन मोकळेपणाने व्यक्त होतील व देशात मराठी साहित्य स्वबळावर भरारी घेईल.

– सूर्यकांत भोसले, मुंबई