‘लोकरंग’ (२१ जून) मधील ‘फेकिस्तान बनत चाललेला देश!’ हा सॅबी परेरा यांचा लेख अत्यंत मार्मिक आणि शालजोड्यांचा आहेरच म्हणावा लागेल. शब्दरंजन करून टाकलेल्या गुगलीमधून समस्त व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. कधी नव्हे एवढ्या प्रचंड प्रमाणात सारा देशच भ्रष्टाचाराने पोखरून काढल्याचे दृश्य भयाण आहे. भ्रष्टाचाराने सारीच जागा व्यापून टाकल्याने ते इतके अंगवळणी पडले आहे की, एके काळी दोन-पाच रुपयांची चोरी मानहानी ठरायची, पण आता कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण खुलेआम होते आहे; आणि त्याबद्दल वाईट वाटण्याऐवजी त्याचे कौतुक केले जात आहे. अमुक पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडण्यासाठी काही कोटी रुपये मोजल्याचे वाचून, ऐकून काहीच का वाटत नाही? सत्ताधीपतींनीच ही सवय लावून ठेवावी, हे देशाच्या चारित्र्याचे हनन करणारे आहे. तीच गत भेसळीची. फेकिस्तान बनत चाललेल्या देशाची ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. लेखकाला वाटते की, ‘चांगला माणूस हाही दुर्मीळच!’ हे मात्र शत प्रतिशत खरे आहे. ज्या मेंदूत भेसळीची संवेदना जागृत झालेली आहे, ज्या मेंदूत खोट्यांचा रक्त प्रवाह जोमाने चालू आहे किंवा ज्या मेंदूत भ्रष्टाचाराचे सर्वच ऋतू मतलई वार्यासारखे वहात आहेत, ती मानवीय संस्कृती ऑरगॅनिक असूच शकत नाही. राहता राहिला प्रश्न तो विश्वगुरूचा. जी व्यवस्थाच वरून खालपर्यंत किडलेली आहे, त्यातील कुणाकुणाला वेगळे काढणार. डिह्युमनायझेशन केल्यास उरेल कोण?
– डॉ. नूतनकुमार पाटणी, छ. संभाजीनगर.
निवडणूक लढवू नये
‘लोकरंग’ (२१ जून ) मधील डॉ. रवींद्र शिवदे यांचा ‘गर्दभभारी पक्ष…’ यांचा उत्तम उपरोधिक लेख वाचला. गाढवाला मानणारे व त्याची पूजा करणारे, ज्यांना ‘गर्दभ’ म्हणजे गाढव हे माहितीही नसलेले लोक तुम्हाला कोर्टात खेचतील अशी परिस्थिती सध्या आहे. गाढवावरील आनेक म्हणी लेखात वाचल्या, पण गाढवाच्या एका प्रसिद्ध गोष्टीने छान संदेश पण दिला आहे. सगळ्या व्यवस्थेतील ‘अप्रामाणिकां’चा उदोउदो चाललाय आणि पारदर्शक, प्रामाणिक काम करणार्यांची ससेहोलपट चालू आहे याची दोन उदाहरणे म्हणजे तुकाराम मुंढे आणि विजय पांढरे या मुख्य अभियंत्यांची. त्यांच्या होत असलेल्या सततच्या बदल्या. सिंचन घोटाळा बाहेर काढणारे विजय पांढरे तर नंतर निवडणूकही हरले. तेव्हा डॉंकी जनता पार्टीने निवडणुकीची कल्पनाही करू नये, हाच सल्ला ‘झुरळ जनता पार्टी’लापण द्यावासा वाटतो.
– श्रीनिवास डोंगरे, दादर, मुंबई.
सभासद होण्याजोगा भारी पक्ष
‘लोकरंग’ (२१ जून )मधील ‘गर्दभभारी पक्ष…’ हा डॉ. रवींद्र शिवदे यांचा लेख वाचून अगर्दभराजांसारखं लोटपोट लोळून हसलो. मी व्यावसायिक सनदी लेखापाल असल्यानं आणि अशिलांनी कमावलेले लाखोकरोडोंचे आकडे मोडून खात असल्यानं या पक्षाचा सभासद होण्याचा व्यवसायसिद्ध हक्क आहेच. परंतु ‘बळी तो कान पिळी’ आणि ‘लाथ मारून पाणी काढेन’ अशा मानसिकतेच्या काळात नीतिमत्तेच्या गोष्टी करण्याचा गाढवपणा करू नये असं वाटतं. आणखी एक, आमच्या ऑफिसमधील एका चित्रातला दुसरा भाग अजिबात आवडला नाही. पहिल्या भागात विरुद्ध बाजूला तोंड करून आपापला उकिरडा चिवडणारी दोन गाढवं, दुसर्या चित्रात तो उकिरडा एकत्रितपणे वेळेत सफाचट करतात म्हणे. हा अन्याय आहे. खरं तर एकाला कळायला नको की दुसरा ‘किती’ आणि ‘काय’ खातोय. समाजमाध्यमांच्या बाबतीत डिजिटल क्रांती जरूर झालीय, पण समविचारी लोकांना प्रस्थापित व्यवस्थेच्या संदर्भात प्रत्यक्षात कार्य करण्यासाठी एकत्र आणून, बराच काळ एकत्र बांधून ठेवणं किती अवघड आहे अन् त्यासाठी कितीही बहाणे केले तरी ते हास्यास्पद ठरणार नाहीत याची काळजी घेणं किती आवश्यक आहे, हे मर्म या खुसखुशीत लेखातून लक्षात आलं.
– श्रीपाद पु. कुलकर्णी
दोरखंड की पारंबी?
‘लोकरंग’ (१४ जून) मधील ‘बालमैफल’मध्ये मेघना जाशी यांचा ‘आधारवड’ हा लेख सकाळी चहा घेत घेत वाचला. लेखातील निसर्गविषयक निरीक्षणांनी मन प्रसन्न झाले होते. तेवढ्यात घरामागील निलगिरीच्या उंच झाडाकडे सहज नजर गेली आणि एक विचित्र गोष्ट दिसली. झाडाच्या शेंड्याकडून जणू एखादा मजबूत दोरखंड खाली लोंबकळत असल्यासारखे दिसत होते. साधारण तीस-चाळीस फूट उंचीवरून तो सरळ जमिनीकडे उतरला होता. क्षणभर वाटले, कुणीतरी काही कामासाठी हा दोर बांधला असावा. उत्सुकता चाळवली गेली. मी जवळ जाऊन पाहिले. आश्चर्य म्हणजे तो दोरखंड नव्हताच! तो एक वेल होता- जमिनीतून उगवला होता आणि त्याच्यात कमालीचा ताण निर्माण झाला होता. आणखी नीट पाहण्यासाठी वर नजर टाकली. वेल अगदी सरळ वर गेला होता; कुठेही निलगिरीच्या बुंध्याला विळखा घातलेला नव्हता. मग प्रश्न पडला- आधार न घेता हा वेल एवढा उंच कसा पोहोचला? कुतूहल वाढले. खिशातून आयफोन काढला आणि ‘पॅनोरामा’ पर्याय वापरून मुळापासून शेंड्यापर्यंतचा फोटो घेतला. फोटो मोठा करून पाहिला आणि रहस्य उलगडले. निलगिरीच्या झाडाच्या वरच्या फांद्यांमध्ये एक वडाचे झाड वाढलेले दिसले. पक्ष्यांनी टाकलेल्या बियेतून ते तिथे उगवले असावे. त्यातील एक पारंबी खाली झेपावत आली होती. वर्षानुवर्षे वाढत ती अखेर जमिनीपर्यंत पोहोचली, मातीत रुतली आणि स्वत:चा आधार निर्माण करू लागली. जसजसा तिचा जाडेपणा वाढत गेला तसतसा त्यात ताण निर्माण झाला आणि ती दूरून पाहताना मजबूत दोरखंडासारखी दिसू लागली. निसर्गाचे हे दृश्य पाहताना मला पुन्हा एकदा जाणवले, निसर्गात चमत्कार नसतात, असतात ती संयमाने घडणारी अद्भुत रूपांतरे. आपण फक्त योग्य वेळी वर पाहिले पाहिजे!
– अविनाश गोवर्धन, नागपूर.
