‘लोकरंग’ (१४ डिसेंबर)मधील ‘बदलती बैठक’ हा केशवचैतन्य कुंटे यांचा लेख वाचला. संगीताच्या मैफलींचे स्वरूप बदलू लागले आहे. आम्ही आणि आमची मित्रमंडळी पुण्याला मित्राच्या घरी राहायला जाऊन सवाई गंधर्व महोत्सवाचा मनमुराद पहाटेपर्यंत बसून आनंद घेतला आहे. लेखकाने म्हटल्याप्रमाणे प्रभा अत्रे आणि किशोरी आमोणकर यांचे शास्त्रीय गायन, मालिनी राजुरकर यांच्या टप्पा गायकीचा आनंद, झाकीर हुसेन आणि शिवकुमार शर्मा यांच्या जुगलबंदीचा एनसीपीएसारख्या अतिशय विलक्षण सभागृहात ऐकणे आणि पाहणे परत होणार नाही. पण एक नक्की की, सवाई गंधर्व समारोहाची मैफल हा आनंद वेगळा पण छोट्या सभागृहातील वर आदरणीय उल्लेखित गायक गायिकांना बंदिस्त सभागृहात ऐकणे, पाहणे हासुद्धा सवाई गंधर्व महोत्सवाइतकाच अविस्मरणीय आनंद ठरला आहे.

लेखकांचे म्हणणे अगदी बरोबर आहे की, छोट्या मैफलीतील संगीत विचारपूर्वक पेश केलेले असते ते आम्हा श्रोत्यांना विचार करायला लावणारे असते. ही मंडळी ‘कलासंगीतकार’ होती. लावणी हा प्रकार ही लोककला नक्कीच आदरणीय आहे, पण त्याची मजा बंद सभागृहात नसते. आजकालचे संगीत महोत्सव व्यावसायिक स्वरूप घेऊ लागले आहेत त्यामुळे गायकीचा निखळ आनंद मिळत असेल असे वाटत नाही. रिमिकचे नवीन फॅड म्हणजे गायन असा नवीन ट्रेंड आला आहे. अर्थात कलाकार ताकदीचे असतील तर आनंद नक्कीच मिळतो. पण गायकाने त्याला आणि आपल्याला देणारे गायन ऐकायला मिळाले की कान आणि मन दोन्हीही तृप्त होतात. काळाच्या ओघात संगीत आणि संगीताच्या बैठकीचे स्वरूप बदलणे हे स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.

  • नीता शेरे, दहीसर

नेमेचि येतो…

‘लोकरंग’ (२१ डिसेंबर)मधील ‘सणांतून धर्म वजा होताना…’ हा सॅबी परेरा यांचा लेख वाचला. माणसाच्या अभ्युदयाच्या वृत्तीमुळे निसर्गावर कसा ताण पडतोय हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. उत्क्रांतीने माणसाला बुद्धिमता देऊन मोठी चूक केली असंच म्हणावं लागेल. रोजच्या एकांगी जीवनापासून मनाला अलिप्त ठेवण्यासाठी पूर्वजांनी सण आपल्या संस्कृतीत रुजू केले. उत्सवांच्या कार्यक्रमात काल वर्तमानप्रमाणे नवचैतन्य देणारे सत्त्व नष्ट झाले तर असल्या दिवाळखोर सणांचा काय उपयोग? प्रत्येक सणाचा इतिहासात त्याचे राष्ट्रकार्य ठळक असते. दिवाळीत धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा, लक्ष्मीपूजन- पाच-पन्नास रुपयांची पूजा आणि भाऊबीजेला बहिणीकडे जाऊन पोटभर खाऊन येणे यापलीकडे दिवाळी साजरी होत नाही. उत्सवातली स्फूर्ती आज नष्ट झाली आहे. मानवी जीवनात सणांना मोठे स्थान आहे, त्यामुळे सामाजिक ऐक्य सहजपणे सांगता येते. धर्मपालनाचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने सर्वांना दिले आहे. सण साजरे करताना भान हरपले तर जीवित आर्थिक आणि पर्यावरणीय हानी होते. सध्याचे चंगळवादी सण बुद्धी गहाण ठेवल्याची साक्ष आहे असेच म्हणावे. भागात वरचढ कोण या ईर्षेत सणांचे पालन धूमधडाक्यात केले जाते परिणामी मूळ उद्देशाला बगल दिली जाते आणि विद्रूप रूप प्राप्त होते.

सणांचे बदलते स्वरूप…

‘लोकरंग’ (२१ डिसेंबर)मधील ‘सणांतून धर्म वजा होताना…’ हा सॅबी परेरा यांचा लेख वाचला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून साजरे होणारे सण तसेच आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याच्या भावनेतून साजरे होणारे सण याबद्दल लेखातून उपयुक्त माहिती मिळाली. पूर्वापार प्रथेनुसार साजरे होणारे सण-उत्सव आणि त्यामध्ये होत चाललेले बदल हे नवीन जीवनशैली व राहणीमानामुळे झाले आहेत. आजकाल छोटे छोटे घरगुती धार्मिक कार्यक्रमसुद्धा एखाद्या इव्हेंटचे स्वरूप घेऊ लागले आहेत. मार्केटिंगच्या जमान्यात प्रत्येक वस्तू, प्रत्येक कार्यक्रम आणि अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा समाजमाध्यमांच्या माध्यमातून स्वत:चे मार्केटिंग केले जात आहे.

मागील काही वर्षांत सण-उत्सव हे विशिष्ट जात किंवा धर्मापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य झाले आहेत. विशेषत: आजची तरुण पिढी सर्व जाती-धर्मांचे, काही प्रमाणात समानता असलेले सण-उत्सव उत्साहाने व आनंदाने साजरे करू लागली आहे. ऑनलाइन युगात आणि मार्केटिंगच्या विश्वात सण-उत्सवांचा हेतू व उद्देश जरी कालबाह्य होत नसला, तरी त्यांचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे आणि त्यात जात-धर्माची आडकाठी उरलेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. विविधता, प्रथा आणि परंपरा कितीही असल्या तरी स्वरूप बदलले असले, तरी सणांचा मूळ हेतू आणि उद्देश कालबाह्य होत नाहीत. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

  • पुरुषोत्तम कृष्णाजी आठलेकर, डोंबिवली

निसर्गप्रेम वाढवणे गरजेचे

‘बालमैफल’मधील राधिका विंझे यांच्या ‘ते काय असतं?’ या सदरातील ‘‘निसर्ग… एक प्रयोगशाळा’ हा लेख आवडला. या लेखात निसर्गातील विविधता, नियम, घटनांचा अभ्यास म्हणजे विज्ञान असे मत व्यक्त केले आहे. सध्या निसर्ग, पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष पाहता शाळकरी मुलांना परिसरातील व दूरच्या अंतरावरील निसर्ग, जंगल, अभयारण्य या ठिकाणी सहलीला नेऊन तेथील माहिती सांगणे आवश्यक वाटते. यातून लहानपणापासून त्यांच्या आयुष्यात निसर्ग, पर्यावरण यांविषयी योग्य जाणीव निर्माण होईल.

  • अर्चना काळे, नाशिक