scorecardresearch

संज्ञा आणि संकल्पना : आनंदयात्री

ज्ञानापर्यंत पोहोचण्याची आणि त्याचे सत्त्व समजून घेण्याची. या लेखमालेच्या निमित्ताने याचा अनुभव मला वारंवार आला.

(संग्रहित छायाचित्र)
पराग कुलकर्णी

‘संज्ञा आणि संकल्पना’ या लेखमालेतील आजचा हा शेवटचा लेख. बावन्न आठवडे चाललेल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. वर्षभर आपण या लेखमालेतून अनेक विषय बघितले, नवीन माहिती मिळवली आणि अनेक नव्या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर नवीन गोष्टींबद्दल वाचण्यात, त्या समजावून घेण्यात आणि त्यातून मिळालेल्या नवीन दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूचे जग समजावून घेण्यात एक वेगळाच आनंद असतो. वेगवेगळ्या विषयातल्या संकल्पना समजून घेत असताना मला मिळणारा आनंद हा दुसऱ्याला देता येईल का? त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल का? या भावनेनेच या लेखमालेची सुरुवात झाली होती. बऱ्याचदा शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंत आणि त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांनी केलेले काम त्या विषयातल्या लोकांपुरतेच मर्यादित राहते. तसेच त्यांच्या कामातून आलेल्या आणि त्यांनी शोधलेल्या बौद्धिक, काहीशा पाठय़पुस्तकी वाटणाऱ्या संकल्पना आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांचे रोजचे जगणे म्हणजे दोन स्वतंत्र एकमेकांशी संबंध नसणारी वेगळी विश्वे आहेत, असे आपल्याला उगाचच वाटत असते. पण शिकण्यातल्या निखळ बौद्धिक आनंदासोबतच यातील खूप साऱ्या संकल्पनांचा आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचा आपल्या रोजच्या जीवनात निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे मला नेहमीच वाटत आले आहे. गरज असते ती आपण त्या माहितीपर्यंत, त्या ज्ञानापर्यंत पोहोचण्याची आणि त्याचे सत्त्व समजून घेण्याची. या लेखमालेच्या निमित्ताने याचा अनुभव मला वारंवार आला.

खरं तर आनंदाचे जास्त विश्लेषण करू नये असे म्हणतात. पण या संपूर्ण प्रवासात अनेक प्रकारचे आनंद मिळाले. आनंदाचा एक मुख्य स्रोत होता प्रत्यक्ष लिखाणाचा. हा तसा माझा वैयक्तिक आनंद, जो मला दुसऱ्यांबरोबर वाटता तर येणार नाही, पण कदाचित शब्दात पकडताही येणार नाही. शब्द, वाक्य, कल्पना, उदाहरणे, पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे असे सगळे रंगबिरंगी तुकडे वेगवेगळ्या प्रकारे मांडून त्यातून दिसणारे नवे आकार, नवे संबंध आणि नवे अर्थ शोधणे हा एक विलक्षण अनुभव होता. अर्थात, याला कोंदण होते ते लेख पूर्ण करण्याच्या डेड-लाइनच्या दडपणाचे आणि ‘लेख मनासारखा झाला आहे’ असे कधीही वाटायला न लावणाऱ्या अपूर्णतेच्या भावनेचे! लिखाणाचा आनंद हा वैयक्तिक आणि म्हणायचं झालं तर ज्यावर माझे नियंत्रण असू शकणार होते असा होता. तो मिळवण्यासाठी धडपड होती आणि तो तसा मला मिळालाही. वर्षभर चाललेल्या या प्रवासात साथ देणाऱ्या गाडीचे इंजिन म्हणजेच हा आनंद होता. पण या प्रवासात अजून एक आनंद होता, ज्यावर माझे नियंत्रण नव्हते- जो मिळण्यामागे कदाचित नशिबाचा हात असतो आणि त्यामुळे त्याला मी ‘बोनस’ समजत आलोय- तो म्हणजे वाचकांचा प्रतिसाद! रविवारी लेख वाचल्यानंतर सकाळपासूनच अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होत होती. ‘चांगल्या कामाला लोक पुढे येऊन प्रोत्साहन देत नाहीत’, ‘लोक खुलेपणाने दुसऱ्याचे कौतुक करत नाहीत’ या समजातून आणि मुख्य म्हणजे, काळजीतून अनेकांनी आवर्जून मला पत्र पाठवून प्रोत्साहन दिले. लिखाणाचे कौतुकही केले. एकंदरीतच काही (गैर?)समज माझ्या पथ्यावरच पडले! अनेकांनी लेखांची कात्रणे जमवत असल्याचे कळवले. शाळा, कॉलेज, क्लासेसपासून ते कॉर्पोरेट जगतात होणाऱ्या टीम मीटिंगपर्यंत या लेखमालेतल्या अनेक लेखांचे नियमितपणे सामुदायिक वाचन आणि त्यावर चर्चा करत असल्याचेही अनेकांनी कळवले. असा प्रतिसाद थक्क करणारा तर होताच, पण त्याबरोबरच अतीव समाधान आणि पुढच्या लेखासाठी ऊर्जा देणाराही होता.

असा सगळा आनंदाचा आणि समाधानाचा प्रवास चालू असताना ‘दु:ख पर्वताएवढे’ हा ‘5 Stages  of Grief या संकल्पनेवरच लेख आला. या लेखानंतर खूप वाचकांची पत्रे आली. त्यातल्या अनेक जणांची जवळची, प्रेमाची व्यक्ती कोणत्या तरी अपघातात, आजारपणात गमावली होती आणि ते अजूनही त्या दु:खाचा सामना करत होते. अनेकांनी त्यांचे दु:ख, त्यांच्या भावना पत्रातून मांडल्या. या संकल्पनेमुळे आपण नेमके कोणत्या अवस्थेत (स्टेज) आहोत हे समजल्याचे सांगून, या दु:खातून बाहेर पडण्याचा किंवा किमान त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याची नवी आशा मिळाल्याचेही अनेकांनी सांगितले. यामुळे विचार पोहोचवणारी आणि परिणाम करणारी शब्दांची ताकद तर जाणवलीच, पण त्याचबरोबर काही प्रसंगांमध्ये कोणाला आधार देण्यासाठीचे आपले सांत्वनाचे शब्द किती तोकडेअसतात, हेदेखील अशा प्रतिक्रियांना उत्तर देताना माझ्या लक्षात आले. अनेक पुस्तकी वाटाव्या अशा विश्लेषणात्मक संकल्पनांचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो हे पुन्हा एकदा जाणवले. असाच अनुभव मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानावरच्या काही लेखांनंतरही आला. आजच्या ताण-तणावाच्या आयुष्यात वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या काही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची किती गरज आहे, हेच यानिमित्ताने अधोरेखित होते.

काही दिवसांपूर्वी ‘मॅचिंग  मार्केट/ मार्केट डिझाइन’वरचा लेख आवडल्याचा एक ई-मेल ठाकूर दांपत्याकडून आला. त्यांचा मुलगा हा प्रो. अल्विन रॉथ (ज्यांना मार्केट डिझाइनसाठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे) यांच्याबरोबर स्टॅनफोर्डमध्ये काम करतो, हेदेखील त्यांनी सांगितले. त्याच्यामार्फत तो लेख प्रो. रॉथ यांच्यापर्यंत पोहोचला. एका वेगळ्या भाषेत आपल्या कामाबद्दल लेख आला हे वाचून प्रो. रॉथ यांना आनंद झाल्याचे कळाले आणि त्यांनी  Google translate वापरून तो वाचायचा प्रयत्न केल्याचेही समजले. एका संकल्पनेचा प्रवास हा देश आणि भाषेच्या सीमा पार करून परत त्याच्या जन्मदात्यापर्यंत पोहोचला आणि या प्रवासातल्या सगळ्यांनाच आनंद देऊन गेला. यातील दुसरा एक आनंदाचा योगायोग म्हणजे, हे ठाकूर दाम्पत्य महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आणि दैवत असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचेच कुटुंबीय. दुसऱ्याचे मुक्तहस्ते कौतुक करण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आणि आनंद पसरवण्याचे गुण त्यांच्या कुटुंबातच आहेत हे प्रत्ययास येते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग..’ म्हणजे नक्की काय, हे अनुभवता आले.

येत्या काही दिवसात हे वर्ष संपेल. सरत्या वर्षांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न आपण सारेच करतो. या वर्षांत काय कमावले, काय गमावले याचा हिशेब मांडण्याची हीच वेळ असते. ही लेखमाला, यातील संज्ञा आणि संकल्पना, त्या कोणी, कधी, का शोधल्या याची गोष्ट, त्यातील काही तत्त्वे हे सगळं कदाचित येणाऱ्या काळात विसरायला होईल, पण विषयांचे बंधन न पाळता नवीन काही शिकण्यातला निखळ आनंद जरी आपण लक्षात ठेवू शकलो, तरी ती आनंदाची शिदोरी आपल्या सगळ्यांना पुढे येणाऱ्या अनेक वर्षांसाठी पुरेल एवढे मात्र नक्की!

(समाप्त)

parag2211@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokrang sadnya ani sankalpana article parag kulkarni abn

ताज्या बातम्या