|| डॉ. आशुतोष जावडेकर

हाय अरिन! महाबळेश्वरलाही इतकं उकडेल असं आधी माहीत असतं, तर इथं आई-बाबांसोबत मुळीच आले नसते! पण संध्याकाळनंतर जरा हवा बरी झाली आहे आणि आत्ता रात्री हॉटेलच्या स्विमिंग पूलपाशी बसून तुला हा ई-मेल लिहिते आहे, तेव्हा मात्र छान गार झुळूक अंगाला सुखावते आहे. आई-बाबा खोलीत जाऊन कधीच झोपले आहेत आणि मी सगळा दिवस पुन्हा आठवते आहे. भल्या सकाळीच पसरणीचा घाट मी ड्राइव्ह करत असताना मागे बसलेल्या आईनं विचारलं, ‘‘माही, काळे काकूंनी एक चांगलं स्थळ आणलं आहे. निदान भेटून तर घेशील.’’ आणि मग ट्रिपमध्ये माझ्यापुढे काय वाढून ठेवलं आहे, याचा अंदाज आल्यावर वैतागण्याऐवजी मी फक्त मनोमन हसले. माझं भलं होण्याचा- एकमेव नसला तरी- अत्यंत महत्त्वाचा मार्ग ‘लग्न’ नावाच्या गोष्टीतून जातो यावर आईचा दांडगा विश्वास आहे! काय करायचं आता अऱ्या!

पण मला तेव्हा तू आठवलास. तू मला परवाच विचारलं होतंस, ‘‘माही, तुझा लग्नाचा काही प्लॅन आहे, का नाहीच करायचंय तुला लग्न?’’ तेव्हा मी हसलेले फक्त आणि तुला अगदी वेडगळ थट्टेत म्हणालेले, ‘‘तुझ्याशी नक्की करणार नाही अरिन!’’ तेव्हा तू चमकून हसलेलास आणि मी तुझा चेहरा निरखत हसले होते. कारण तू मला कितीही मधेच ताईसारखं बघायला गेलास, तरी शेवटी पुरुष आहेस. रंगपंचमीच्या दिवशी मी भिजून खेळताना तुझी आणि तेजसची माझ्यावर असलेली नजर मी नीट टिपलेली एवढंच सांगते.. पण तेवढं चालायचंच. सहसा तुम्ही दोघं माझ्याशी मी तुमची मत्रीण नसून मित्र असल्यासारखेच वागता. आणि ते मला अत्यंत आवडतं. खरं सांगते अरिन, इतपत अशी सहज मत्री करणारा मुलगा जरी मला कुणी मिळाला ना, तर मी आनंदात लग्न करेन.

नाहीतरी आता लग्नामध्ये प्रेम असावं ही अट मी मनातून काढून टाकलीच आहे. प्रेम तर अनुभवलं मी. रिकी माझ्यासोबत चार वर्ष होता. आणि तो अत्यंत गुणी होता व आहे असंच मी आजही म्हणेन. आईच्या भाषेत सांगायचं, तर आमचा ‘लग्नाचा योग नव्हता’ असंच मी म्हणेन. आज सकाळी आम्ही नाश्त्याला पाचगणीच्या मॅप्रो गार्डनमध्ये थांबलो, तेव्हा एक दणकट खांद्याचा माणूस पाठमोरा उभा असलेला मला दिसला. त्यानं जांभळा सँडो घातलेला. क्षणभर वाटलं, हा रिकीच असणार! अगदी हातातला सँडविच टाकून हाक मारायला सरसावले मी आणि मग जाणीव झाली की, मी अमेरिकेत नसून इथं पाचगणीत आहे आणि मग वाईट वाटलं रे!

मग आम्ही मस्त हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झालो आणि लगेच पॉइंट्सपाशी गेलो. गाडी चालवताना मागे ‘रे कबिरा..’ हे आपलं लाडकं गाणं सुरू झालं, तितक्यात आम्ही आर्थर्स सीट पॉइंटशी पोचलो. आई पटापट पायऱ्या उतरली, पण बाबांची गती मंदावली. चढताना तर त्यांचे गुडघे चांगलेच दुखू लागले. मला एकदम वाटलं की अजून पाच-सात वर्षांनी कोण बघेल बाबांकडे, आईकडे? मी लग्न करून समजा पुन्हा अमेरिकेत गेले, तर कोण बघणार आहे यांच्याकडे? माझा मोठा भाऊ आहे जपानमध्ये, ते तुला माहितीय. पण तुझ्याशी हे आता शेअर करते. तो काही एकूण बघेल याची शक्यता नाही. सुट्टय़ांपुरता घरी येतो दोन वर्षांत एकदा. आईचे लाड करून घेतो आणि बायकोसोबत पुन्हा निघून जातो. अजून लिहीत नाही. तू समजून घे. जसं मी नंतर मार्केटमध्ये हॅण्डबॅग्जचे प्रकार समजून घेतले तसे! हेऽहे!

अरे, बाबा बोअर होणार होतेच तसे झाले, पण मी आणि आई प्रचंड रमलो. सुंदर हॅण्डबॅग्ज आणि छान पस्रेस. ‘‘माही, ही घे- भाजीसाठी लागेल ही. आणि ही बाहेर जाताना होईल. आणि ही ह्यंच्यासाठीही घेऊन ठेवते एक,’’ असं म्हणत आईनं त्या शंभर-दोनशे रुपयांच्या वेगवेगळ्या डिझाइनच्या बॅग उचलल्या. मला एकदम वाटलं, आईची पिढी वेगवेगळ्या हॅण्डबॅग्जसारखी वेगवेगळी नातीदेखील अशा घाऊक तऱ्हेनं निवडत (आणि जपत) आलेली आहे! त्यात नवरा नावाची वस्तू ठेवलेली हॅण्डबॅग सगळ्यात पेलायला जड आणि तरी मोलाची! तुझी पिढी अगदी वेगळी. जमेल तिथं आणि जमेल तोवर नातं टिकवणारी. नो बॅगेज! माझी थोडी मोठी पिढी. जे वाटय़ाला आलं ते जमेल तोवर टिकवणारी. आणि आपले चाळिशीचे मित्रवर्य तेजस! त्याची पिढी तर अजूनच वेगळी. आपण जणू विशीचेच प्रियकर-प्रेयसी आहोत असं समजून आधीची नाती बेदरकारपणे विसरून नव्या अध्र्या-कच्च्या नात्यात गुंतणारी.

‘‘माही, त्या काळेकाकूंना स्थळाचं काय सांगू? त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप आला आहे,’’ आई चपला बघत म्हणाली. मला एक क्षण इतका वैताग आला, की वाटलं समोर टांगलेल्या त्या कोल्हापुरी चपलेनं दुसऱ्या कुणाला नाही, पण आपल्यालाच मारून घ्यावं आणि स्वत:लाच विचारावं, ‘माही, सांग, बावीस-तेवीस वर्षांची असतानाच लग्न का करून टाकलं नाहीस? का गेलीस अमेरिकेत पुढे शिकायला?’ पण मग खोल श्वास घेतला आणि दुकानाबाहेर आले.

कडक ऊन होतं. थंड हवेचं ठिकाण ही नुसती अफवा वाटत होती. आसपास लोक चालत होते. एक हनीमूनर जोडपं त्या उन्हातही जणू सावलीत असल्यासारखं मजेत चिकटून चाललं होतं. हातावर महेंदी-चुडा होता. मुलगा स्मार्ट होता. दणकट हाडापेरांचा होता. मला वाटलं की, आपला नवरा असा दणकट हवा. खेरीज तो हुशार हवा. आणि त्या तुझ्या रूममेटच्या-अस्मितच्या भाषेत सांगायचं तर ‘हॅण्डसम- पकेवाला’ हवा. खेरीज उंच हवा. (कारण मी उंच आहे!) खेरीज समजूतदार हवा. घरातल्या कामांमध्ये मदत करणारा हवा. मी एकटं नाही करणार घरकाम. आणि आमच्या बाबांसारखा ताटात गरम पोळी वाढायचा आग्रह करणारा नसूदे! अरिन, माझं मलाच वाटलं, केवढय़ा या अपेक्षा! पण मुलांच्या नसतात का? गृहकर्तव्यदक्ष, सुंदर, कामसू, विनयशील आणि भरपूर पगार घरी आणणारी बायको हवी असतेच की मुलग्यांना. मग आम्हा मुलींच्याही अपेक्षा नाहीएत का वाजवी?

अरिन, नंतर दुपारी फिरताना माझा मूड गेला. संध्याकाळी मग भटकलो, स्ट्रॉबेरी खाल्ल्या, वेण्णा लेकमध्ये बोटिंग केलं. आणि परत निघणार, तितक्यात मला काय वाटलं काय माहीत, पण मी म्हणाले, ‘‘आई-बाबा, तुम्ही समोर पावभाजी खायला लागा, मी एक एकटी चक्कर मारून येते.’’ मग एक वल्हवण्याची बोट भाडय़ानं घेतली. तिथल्या जेटीवरच्या पोरानं विचारलं, ‘‘साहेब मागून येत आहेत का? कोण बोट चालवणार आहे?’’ मी हसले आणि उत्तरादाखल वल्ही उचलली. ती जड होती, पण मी रोइंग केलेलं स्कूकिल नदीत पूर्वी. मग शक्ती लावून दोन्ही हातांनी वल्ही मारायला घेतली आणि माझी होडी पुढे जाऊ लागली. झपाझप मी होडी तलावाच्या मध्ये आणली आणि दमून थांबले. पाचेक मिनिटंच थांबले असेन, पण छान वाटलं. मस्त, गार वारा वाहिला तेव्हा.. वाटलं, एकटीनं होडी पेलता आली, तसं एकटीनं जगताही येईल. आहोत दणकट आपण स्वत: तेवढे! मग दूरच्या बोटीत सकाळी मॅप्रो गार्डनमध्ये दिसलेला तो जांभळा सँडो घातलेला पुरुष मोटारबोटीत दिसला आणि मग रिकी आठवला. रिकी माझ्या कानाजवळ येत त्याला आवडणाऱ्या ‘गॉन विथ द विंड’ कादंबरीतलं ते वाक्य म्हणायचा : kYou should be kissed, and often. And by someone who knows how!’

अरिन, तूच सांग, कोण नवरा असं हक्काचं उत्तम चुंबन सारखा देणार आहे? हे गमतीत रे..! आत्ता इथं लॅपटॉप ओढत तुला हे लिहीत बसले आहे आणि मागे पूलच्या डेकवर नेमकं मंद आवाजात ते ‘कबिरा..’ गाणं सुरू आहे.. ‘बन्नो रे बन्नो मेरी, चली ससुराल को, अखियों में पानी दे गयी..’ एकदम वाटतंय, जिथं रोज हक्काचं, उत्तम प्रेमाचं चुंबन मिळेल अशा मुलाशी लग्न करून मी सासरी चालले आहे आणि दुखणारे गुडघे विसरून माझी पाठवणी करणारे बाबा मागे डोळ्यांतलं पाणी पुसत उभे आहेत. मग पुढची गाण्याची ओळ येते आहे.. ‘रे कबिरा मान जा, रे फकिरा यूँ ना जा, आजा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ..’

अरिन, पुढे लग्न करून मुलं-बाळं झाली की, सगळ्या धामधुमीत सावलीइतकंही सामान सोबत न घेता, एकटी होडी वल्हवणारं माझ्यातलं कबीरपण गायब तर होणार नाही ना रे? सांग ना मित्रा.. सांग ना..

ashudentist@gmail.com