‘लोकरंग’ मधील (२२ जून) गिरीश कुबेर यांचा ‘इब्सेन बरोबरच होता…!’ हा लेख वाचला. आजवर अमेरिकेने जगभर आपल्या पैशाचा माज ( तोही इतर देशांना लुटून मिळवलेला) करत आणि इतर युरोपीय देशांना आपल्या सोबत घेत अनेक उचापती केल्या आहेत. युद्धे घडवून अनेक निष्पाप जीव घेतले आहेत, मग तिथे कुठल्याही पक्षाचे सरकार असो- रिपब्लिकन किंवा डेमोक्रेटिक- अमेरिकेच्या आजवरच्या सर्वच अध्यक्षांनी वेळोवेळी मुखवटे धारण करत आपल्या भूमिका कशा बदलल्या याचे अनेक दाखले देता येतील. या लेखात भारताने इराणच्या पाठीशी उभे राहायला हवे असे म्हटले आहे, ते केवळ इराण सार्वभौम इस्लामिक राष्ट्र आहे म्हणून. हाच इराण काश्मीरबाबत मात्र उघडउघड पाकिस्तानचे समर्थन करतो तेव्हा काय म्हणावे? अण्वस्राधारी इराण आणि त्याशिवायचा इराण यांची भारताविषयीची भूमिका काय असेल, याची शाश्वती नाही. भारत सरकारचे मौन हे इस्रायलला पाठिंबा किंवा अमेरिकेच्या मागे फरफटत जाणे आहे, असा अर्थ काढणे हा घाईचा निष्कर्ष काढणारे ठरेल, नाही का? आपल्या जनतेचे या विषयावर मत असणे किंवा नसणे याचा कुठलाही थेट परिणाम दोन्ही देशांच्या धोरणावर किंवा आजच्या युद्ध परिस्थितीवर प्रभाव टाकणारा नाही हे सत्य आहे. अशा वेळी जनता आणि पर्यायाने सरकारचे ‘थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण श्रेयस्कर आहे.- संदीप दातार, बदलापूर.

परराष्ट्र धोरणावर ठाम राहावं

‘लोकरंग’ मधील (२२ जून) गिरीश कुबेर यांचा ‘इब्सेन बरोबरच होता…!’ हा लेख वाचला. जागतिक स्तरावर तुलनेने घनिष्ठ मैत्री असलेल्या इराणला समर्थन देण्याऐवजी वरवरची मैत्री असलेल्या इस्रायलची भारत पाठराखण करीत आहे, याचाच अर्थ मोदी सरकार आपल्या धोरणावर ठाम नसून ते कोणाच्या तरी (अमेरिकेच्या?) इशाऱ्यानुसार काम करीत आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही का? महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारताचे परराष्ट्र धोरण इतके कमकुवत, कचखाऊ आणि लवचीक असणे नक्कीच शोभादायक नाही. दुसऱ्या एका सार्वभौम देशाचा अधिकार आपल्याला मान्य नाही का! आपण इतके असंवेदनशील का बनलो? भारत लोकशाहीची जननी असल्याने दुसऱ्या लोकशाहीवादी देशांप्रती आपला आदरभाव कसा आणि कुठे लुप्त झाला म्हणायचा? आपण आपली मतं व्यक्त करण्यास का कचरावे? भारताने कुणाच्या दबावाखाली येऊन काम करण्याऐवजी आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत ठाम राहून काम केले तर तथाकथित बडी राष्ट्रे नक्कीच भारताला दचकून राहतील, यात तिळमात्र शंकाच नाही !- बेन्जामिन केदारकर, नंदाखाल, विरार.

युद्ध योग्य नाही

‘लोकरंग’ मधील (२२ जून) गिरीश कुबेर यांचा ‘इब्सेन बरोबरच होता…!’ हा लेख वाचला. सध्या इराण आणि इस्रायलचा संघर्ष सुरू आहे. खरे तर हे दोन्ही देश आपली मित्र राष्ट्रे आहेत. सद्या काळात युद्ध योग्य नव्हेच! पण नुकतेच चारच दिवसांचे का होईना, पण पाकिस्तानशी आपण युद्ध केलेले आहे. सध्या आपण देशात विकास घडवत आहोत. दोन्ही देशांशी असलेले मित्रत्व आपल्याला टिकवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांशी कटुता होईल असे करणे योग्य नसल्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी तटस्थ भूमिका घेतलेली असावी.- रमेश नारायण वेदक, चेंबूर.

भारताच्या अणुऊर्जेचा उल्लेख अपेक्षित

‘लोकरंग’ मधील (२२ जून) गिरीश कुबेर यांचा ‘इब्सेन बरोबरच होता…!’ हा लेख वाचला. सामान्य वाचकांसाठी तपशीलवार व माहितीपूर्ण असाच हा लेख होता. परंतु अणुचाचण्यांमुळे भारताला जे महत्त्वाचे दोन फायदे झाले त्याचा लेखकाने उल्लेख केलेला नाही. अणुचाचण्यांमुळे भारताला अणुऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळाली. भारताने अणुऊर्जेचा वापर शांततापूर्ण कामांसाठी, जसे की वीजनिर्मिती आणि वैद्याकीय उपचारांसाठी करण्यास सुरुवात केली. अणुचाचण्यांमुळे भारताच्या शास्त्रज्ञांना आणि अभियंत्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात प्रगती झाली. हे दोन्ही उद्देश अण्वस्त्रे तयार करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत आणि भारतानेही जगासमोर हीच भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली. इराणने मात्र या वापराबाबत मौन बागळलेले दिसते. त्यामुळेच भारताच्या अणुचाचण्या आणि इराणच्या अणुचाचण्या यामध्ये मूलभूत फरक आहे व तो उल्लेख लेखात अपेक्षित होता.- भीमण्णा कोप्पर, भांडुप, मुंबई.

वस्तुनिष्ठ परामर्ष

‘लोकरंग’ (८ जून) मधील ‘पुलंवजा पंचवीस वर्षं…’ या अंतर्गत ‘न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण’ हा उत्पल व. बा. यांचा लेख वाचला. एखादा लेख वाचून जेव्हा वाचक कळत नकळत मनाने वैभवशाली भूतकाळात जातो, अनेक व्यक्तींचा, घटनांचा आठव त्यांच्याभोवती साखळी करतो तेव्हा मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय असतो. हा लेख वाचून वाचकांची अशीच काहीशी अवस्था होते. पुलं हे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- ज्यांनी वाचकांवर, दर्शकांवर, रसिकांवर तीन तपांहून अधिक काळ अधिराज्य केले. त्यांची नाटके, चित्रपट, गाणी, प्रवासवर्णने आणि बरेच काही हे आमच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग ह़ोते. पुलं हे खरे आनंदयात्री होते. आजीवन त्यांनी आनंदाची मुक्तहस्ते उधळण केली आणि आसमंत भारून टाकला. इतकेच काय, पण जे मिळाले तेही विधायक कार्यासाठी देऊन टाकले. माझ्या शाळकरी जीवनातील ही आठवण. तेव्हा पुण्यातील पी. वाय. सी.च्या मैदानावर ‘बटाट्याची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’चे प्रयोग असत. ते जाहीर झाले की काही तासातच प्रयोग हाऊस फुल्ल व्हायचा. इतके त्यांचे रसिकांवर गारूड होते. लेखात त्यांच्या बहुआयामी कलाजीवनाचा अतिशय वस्तुनिष्ठ परामर्ष लेखकाने घेतला आहे.- अशोक आफळे, कोल्हापूर.

पुलं कायम लक्षात राहतील

‘लोकरंग’ (८ जून) मधील ‘न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण’ हा उत्पल व. बा. तसेच ‘बटाट्याच्या चाळीचे रिडेव्हलपमेंट’ हा सॅबी परेरा यांनी लिहिलेले लेख वाचले आणि सदा हसतमुखी असा विनोदी साहित्याचे बादशहा पु. ल. देशपांडे डोळ्यांसमोर आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील सभागृहात, गिरगाव, शिवाजी पार्क, परेल या विविध ठिकाणी पुलंची खदखदून हसवत ठेवणारी भाषणे मी ऐकली आहेत. चाळवस्तीत लहानाचे मोठे झालेल्या आमच्या पिढीला त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या नाटकाने वेड लावले. त्यांचे विनोद म्हणजे प्रसंगानुरूप खेळीमेळीच्या सोप्या शब्दांत, पण गर्भितार्थ मात्र काहीसा वेगळा आणि साहित्यिक उंची गाठणारे होते. कोकणची माणसे फारच रसाळ म्हणून सुनीताने मला पती म्हणून निवडले असे सांगून त्यांनी त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांना लाजवले. अगदी मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांच्यावर ‘रेकी’चा इलाज करण्यासाठी एक माणूस त्यांच्या घरी आला. पुलं आतल्या खोलीत होते. बाहेर बसलेला बराच वेळ सुनीताताईंना रेकी म्हणजे काय हे समजावून सांगत होता ते त्यांनी आतून ऐकले. सुनीताताई त्यांना बोलवायला गेल्या तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी येतो, पण तू बाहेर जाऊन जो अतिरेकी बसला आहे त्याला घरी पाठव.’’ पुलं आमच्या पिढीला अखेरच्या श्वासापर्यंत स्मरणात राहतील.- सूर्यकांत भोसले, मुलुंड, मुंबई

स्वत:वरही विनोद करणारे पुलं

‘लोकरंग’ (८ जून) मधील ‘न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण’ हा उत्पल व. बा. तसेच ‘बटाट्याच्या चाळीचे रिडेव्हलपमेंट’ हा सॅबी परेरा यांनी लिहिलेला लेख वाचताना जाणवले की, पुलंना जेवढा माणूस कळला होता तेवढा अन्य कोणत्या लेखकाला कळला असेल. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती. व. पु. काळे हे विनोदी लिखाण करत नव्हते, पण सर्वसामान्य माणूस त्यांनाही खूप चांगला कळला होता. माझी पुलंच्या बाबतीतील एक अतिशय सुंदर आठवण आहे. त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली होती म्हणून किंग्ज जॉर्ज शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. ते सत्कारासाठी उभे राहिले आणि म्हणाले की, ‘‘मी तुम्हाला घाबरलो आहे म्हणून थरथरत आहे.’’ त्या वेळेला त्यांना कंपवात सुरू झाला होता.- नीता शेरे, दहिसर (पूर्व)

…याचं मूळ भारतीय मानसिकतेत !

‘लोकरंग’मधील (१५ जून) ‘सुंदर ही दुसरी दुनिया’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. लेखकाने लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील विस्कटलेली सामाजिक वीण अगदी सुबद्ध पद्धतीने मांडली आहे. अगदी अनादी काळापासून जाती संस्था हे भारतीय समाज जीवनाचे एक अंगभूत वैशिष्ट्यं राहिलं आहे. भारतात जात ही जन्मजात असल्यामुळे व ती दैवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय समाजात असल्यामुळे त्यात आजही सहजासहजी बदल होणे कठीण आहे. त्यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की, जात ही भारतीयांच्या नसानसांत इतकी भिनली आहे की ती आपल्या प्रगतीचे पाय खेचते. ती आपल्याला काही केल्या सोडत नाही, याउलट आपणच दुसरीकडे वेगवेगळ्या स्थानी/ ठिकाणी तिला प्रस्थापित करू पाहतो आहोत. अलीकडच्या काळातही या परिस्थितीत फार काही फरक पडला आहे असे काही नाही.

आपले सरकार जातीयवाद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहसारखे कितीही कार्यक्रम राबवत असले तरी वस्तुस्थिती मात्र आज त्याहून काहीशी वेगळी असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळते. आज भारतीय समाजात अगदी तुरळक अपवाद वगळता सर्व विवाह जाती अंतर्गतच होतात. जाती अंतर्गत विवाह हा नियम आणि आंतरजातीय विवाह हा अपवाद आहे असं म्हणायला आजही वाव आहे. त्याशिवाय गल्लोगल्ली, खेडोखेडी, शहरोशहरी विशेष जातींची आणि समाजाची विवाह मंडळे / जातीच्या संघटना कार्यरत असल्याचं पाहिल्यावर जात किती चिवट असते याची कल्पना आपल्याला येते.

तात्पर्य एवढेच की, केवळ वरवरचे/तकलादू उपाय करून जातीयवादाचे समूळ उच्चाटन होणार नाही, तर जातीभेदाची भावना नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम त्याची निर्मिती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा/ व्यवस्था आपल्याला सर्वप्रथम नष्ट करावी लागेल. त्याशिवाय जातीसंस्था ज्यावर उभी आहे त्या धार्मिक जाणिवांचा समूळ विनाश केल्याशिवाय जातीय भेदभाव नष्ट होणार नाही. दूषित व्यवस्थेचे परिवर्तन करण्यापेक्षा शुद्ध /संतुलित व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून ती व्यवस्था अगदी मुळापासून बदलली पाहिजे. शालेय वयातच मुलांचा संतुलित, व्यापक व सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित होईल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शाळेत शिकवला तरच सुंदर ही दुसरी दुनिया होईल…- डॉ. बी. बी. घुगे, बीड.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाहीची सुंदर दुनिया

‘लोकरंग’मधील (१५ जून) ‘सुंदर ही दुसरी दुनिया’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. सदा सर्वदा व्यवहारांत ‘पाहिजे जातीचे’ हे लोण शाळकरी मुलांपर्यंत आणणाऱ्या ‘प्रबोधन’ प्रक्रियेला संज्ञा शोधली पाहिजे… जातीजातींमधला संवाद क्षीण होत चालला आहे. त्यांना एकत्र आणणारे उपक्रम नाहीत याचा उल्लेख लेखामध्ये आलेला आहे. परस्परविरोधी मते मांडलेली आहेत. जाती घट्ट होत आहेत आणि दुसरीकडे लहान मुलांना एकत्र आणले जात आहे. जातीची भिंत नाहीशी करण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती दिली आहे. पूर्वी अस्पृश्यता होती परंतु द्वेष नव्हता. कारण अस्पृश्य हा खालच्या पायरीवरच होता आणि स्पृश्य वरच्या पायरीवर. त्यामुळे द्वेषाची भावना नव्हती. परंतु ज्या वेळेला अस्पृश्य स्पृश्य जातीबरोबर समान पातळीवर येऊ लागला, त्यावेळेला द्वेषाची भावना वाढीस लागली. ती भावना एवढी वाढली की मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना द्वेषाच्या भावनेचा स्फोट झाला आणि समाजसुधारक म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नामविस्तार करणे भाग पडले. यावरून समानतेमुळे द्वेषाची भावना किती वाढते याची जाणीव सर्वांनाच होईल. जे काही प्रयत्न सुरू आहेत ते त्यामानाने कमी पडत असणार.- युगानंद गुलाबराव साळवे, पुणे</p>