साठी-सत्तरीची दशके भारतात, महाराष्ट्रात सर्वव्यापी घुसळण करणारी होती. या घुसळवणुकीच्या पार्श्वभूमीवर १९७८ सालात दिवंगत डॉ. अरुण लिमये यांचे ‘क्लोरोफॉर्म’ प्रकाशित झाले. त्या काळात शिक्षणाप्रमाणे वैद्याकीय व्यवसायदेखील सेवाभावी वृत्तीने चालवला गेला पाहिजे, नफेखोरीसाठी निश्चितच नाही ही धारणा समाजमनात खोलवर रुजलेली होती. ‘क्लोरोफॉर्म’ने वैद्याकीय व्यवसायात वाढणाऱ्या काही अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकला. गेल्या ४५ वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे.

हल्ली श्रीमंत-गरीब सर्वच कुटुंबांचा प्रत्यक्ष संबंध खासगी क्षेत्रातील महागडे डॉक्टर्स, इस्पितळे, वैद्याकीय चाचण्या, औषधांशी येतोच येतो. सर्वच जण जवळपास एकाच अनुभवातून जात असल्यामुळे वैद्याकीय क्षेत्राच्या वाढत्या नफेखोरीबद्दल इथे वेगळे सांगण्याची गरज नाही. मग प्रश्न असा विचारावयास हवा की, काय डॉ. अरुण लिमयेंनी इशारा दिलेल्या अपप्रवृत्तीनी आता सारेच वैद्याकीय क्षेत्र पादाक्रांत केले आहे? एकाच वेळी सर्व डॉक्टर्स, व्यवस्थापक, औषध कंपन्या, धोरणकर्ते अपप्रवृत्तीचे कसे झाले असतील? ज्या वेळी त्यांच्यापैकी अनेक व्यक्ती स्वत: निम्नमध्यमवर्गातून, गरिबीतून आलेले असतात? असे घडत असेल तर त्याची मुळे व्यक्तिकेंद्री अपप्रवृतींमध्ये कमी वैद्याकीय क्षेत्राच्या राजकीय अर्थव्यवस्थेत मधल्या काळात झालेल्या मूलगामी बदलात शोधावी लागतील. सध्याच्या वैद्याकीय क्षेत्राची अशी ‘सिस्टीम केंद्री’ चिरफाड डॉ. अरुण गद्रे यांनी ‘ऱ्हासचक्र’ कादंबरीतून केली आहे. हा योगायोग नाही या कादंबरीची कालपट्टी १९८० ते २०२२ हीच आहे.

Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Criticism between the ruling party and the opposition vidhan sabha election 2024
‘दशकभराच्या पीछेहाटी’वरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
The Safekeep novel in marathi
सेफकीप – हिमनगाच्या टोकासारखं नाट्य
young man killed due to dispute over bursting firecrackers
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी
Firecrackers video
ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral

इस्पितळांसारख्या वैद्याकीय सुविधा तयार करायला पूर्वीदेखील भांडवल लागतच होते. पण ते मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मालकीचे होते किंवा सेवाभावी. तंत्रज्ञानामुळे या वैद्याकीय सुविधा अधिकाधिक भांडवल सघन बनल्या आहेत हे खरे. पण मूलभूत कारण आहे या भांडवलाचे बदललेले वर्गीय चारित्र्य. या क्षेत्राचे होत असलेले कॉर्पोरेटीकरण आणि वित्तीयकरण. ‘ऱ्हासचक्र’ याच कॅनव्हासवर उलगडत जाते.

सेवाभावी इस्पितळांची आणि डॉक्टरांची ससेहोलपट, राजकीय नेते/ बिल्डर्स, महाकाय कॉर्पोरेट, वॉलस्ट्रीटचे प्रायव्हेट इक्विटीचे भांडवल यांचे आरोग्य क्षेत्रात धो धो वाहत येणारे भांडवल, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषध कंपन्या, त्यांचे पगारी फूट सोल्जर्स, वैद्याकीय क्षेत्रात धोरणवकिली करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांत होणारे बदल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून येणारे फंड्स, नवमध्यमवर्गाकडे आलेला बक्कळ पैसा, मेडिकल टुरिझम आणि स्वत: वैद्याकीय व्यावसायिक नसणाऱ्या, फक्त ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स’ या एकमेव निकषावर हजारो कोटी रुपयांचे वैद्याकीय क्षेत्र चालवणाऱ्या व्यक्ती, लेखकाने सद्याकालीन वैद्याकीय क्षेत्रात घडणाऱ्या जवळपास प्रत्येक घडामोडीला स्पर्श केला आहे.

विषयच वैद्याकीय असल्यामुळे अनेक इंग्रजी वैद्याकीय संज्ञांचा वापर पुस्तकात येणे अपरिहार्य होते. हल्ली सारेच नागरिक, अगदी ग्रामीण भागातले देखील एक्सरे, सोनोग्राफी, स्टेण्टसारखे इंग्रजी वैद्याकीय शब्द दैनंदिन जीवनात वापरतात. साऱ्या इंग्रजी वैद्याकीय संज्ञा तशाच्या तशा देवनागरीत लिहिण्याचा लेखकाच्या निर्णयामुळे अशा तांत्रिक विषयावरची कादंबरी क्लिष्टतेपासून वाचली आहे. त्यात सहजपणा आला आहे. कादंबरी जरी मुंबई महानगरात घडत असली तरी तशाच घटनांचे लोण अगदी जिल्हा, पातळीपर्यंत पोहोचले आहे. पोहोचत आहे. त्या अर्थाने ऱ्हासचक्रचा पट वैश्विक आहे.

राजकीय अर्थव्यवस्थेबाबतचे विश्लेषणात्मक लिखाण प्राय: वैचारिक साहित्यात मोडते. एवढा क्लिष्ट विषय कादंबरीच्या फॉर्मच्या कवेत घेणे सोपे नाही. डॉ. गद्रे यांनी ते आव्हान लीलया पेलले आहे. या कादंबरीमध्ये लेखक एकत्र गुंफलेल्या अगणित छोट्या प्रसंगांतून, असंख्य प्रमुख, दुय्यम पात्रांमार्फत आपल्याला गोष्ट सांगत राहतो. पात्रे परस्परांशी संवाद साधतात, कधी तरी स्वत:शी देखील बोलतात. खिळवून ठेवणारी पटकथा वाचताना मनाच्या पडद्यावर एखादा चित्रपट सरकत राहावा तशी ऱ्हासचक्र उलगडत राहते. सुन्न होऊन, अंतर्मुख होऊन चित्रपटगृहातून बाहेर यावे अशी भावना पुस्तक हातावेगळे करताना होते.

वैद्याकीय क्षेत्र शुष्क आणि निर्दयी बनण्याचे बिल ‘अपौरुषेय’ कोर्पोरेटीकरण आणि वित्तीयकरणावर फाडता येईल कदाचित. पण कॉर्पोरेट, वित्त भांडवलाचा हा सारा अजेंडा हाडामांसाची माणसेच राबवतात. हा अजेंडा निर्दयी, असंवेदनशीलतेने राबवताना त्याचा विपरीत परिणाम या हाडामांसाच्या माणसांवर होणारच होणार. कॉर्पोरेट/ वित्त भांडवल शेवटी त्याचा अजेंडा राबवणाऱ्या माणसांचाच बळी घेते, जसा ‘ऱ्हासचक्र’ मधील मध्यवर्ती पात्र डॉ. सुकेतू धर्माधिकारीचा घेतला गेला.

तांत्रिकदृष्ट्या ‘ऱ्हासचक्र’ काल्पनिक पात्रांची गोष्ट आहे. खरे तर ती आपल्या सर्वांच्या घुसमटीची कथा आहे. हे असेच सुरू राहू शकत नाही आणि तसे नसावेदेखील. यात अर्थपूर्ण, शाश्वत बदल राजकीय सत्तेच्या हस्तक्षेपाशिवाय होऊ शकणार नाहीत. लोकशाहीत असा राजकीय हस्तक्षेप घडवून आणणे तत्त्वत: शक्य आहे. सार्वभौम मतदार जनतेने ठरवले तर जनतेला तो निर्णय आज ना उद्या घेणे भाग पडेल. सद्याकालीन वैद्याकीय क्षेत्रामुळे जनता अस्वस्थ तर आहेच, पण तिने अंतर्मुख होण्याची गरज आहे. ‘ऱ्हासचक्र’ वाचणाऱ्याला अस्वस्थ करतेच, पण अंतर्मुखदेखील करते. ही या कादंबरीची ताकद आहे.

‘ऱ्हासचक्र’, – डॉ. अरुण गद्रे, प्रकाशक- देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने- ३८६, किंमत- ५५० रुपये.

chandorkar. sanjeev@gmail.com