सूर्य आपली बॅग वगैरे भरून समुद्रात बुडण्याच्या तयारीला लागलेला, पण समुद्राचे त्याकडे लक्ष नव्हते. तो इथल्या माणसांना पाहून जास्तच चेकाळत होता. पाळीव कुत्रा जसा धावत येऊन झेपावतो तशा लाटा किनाऱ्यावर गर्दी केलेल्या माणसाकडे धावत होत्या. काहींना खेचून स्वत:बरोबर बागडायला नेत होत्या. इतके काय असेल माणसात बघण्यासारखे? मग मी इथल्या माणसांना पाहू लागलो. गोरीपान माणसे उन्हात सांडग्यासारखे स्वत:ला शेकत पहुडलेली. काही लाटेवर स्वार तर काही ओपन जिममध्ये.

आईशप्पथ सांगतो, इतक्या उघड्या माणसांना पहिल्यांदाच इतके नीट पाहिले. मला जाणवले की, मी शाळेत जी माणसे काढायला शिकलो तशी ही माणसे अजिबात दिसत नव्हती. किती तरी अनोळखी शरीरे प्रथमच पाहत होतो. डोळ्यांनी म्हटले आता शरीरे ऐकू येतायेत तर पाहून घेऊ.

तर चित्रास कारण की,

नियमित व्यायाम करणाऱ्या माणसांचे स्नायू वजन उचलताना जेव्हा आतून पिळले वळले जात असतात; तेव्हा त्वचेवर अनेक फुग्यांची नक्षी येते. हाडे, चरबी, यांना लपवून पूर्ण शरीरावर स्नायूंचे नृत्य चालू असते. दुसरीकडे छातीपासून घरदार सुटलेल्या पोटाचा नगारा, थुलथुल लटकणारे दंड, गळ्याखाली, पूर्ण पाठीवर आलेल्या चरबीच्या वळ्या, हे सर्व तोलून धरणारे काटक पाय हेदेखील तितकेच बघणीय वाटले. पिळदार हातापायावर स्नायू आणि रक्तवाहिन्यांची सळसळ दिसते. अशा शरीराची खूप चित्रे आणि शिल्पे पाहिलीत, पण साचलेल्या चरबीची त्वचेवर स्वत:ची जी एक नक्षी उमटते, ती चित्रात किंवा शिल्पात कुणी काढली होती का?

माणसाचे शरीर म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या चालत्या फिरत्या पोत्यात भरलेले पाहणे हा एकूण सुंदरच अनुभव. रात्री आरशासमोर मीही स्वत:च स्वत:ला पाहून घेतले. दंड फुगवले… फुगलेच नाहीत. फुगवून फुगवून पाहिले तरीही त्यातल्या बेंडकुळी गाढ झोपेतच होत्या. मग उतरलेले खांदे पाहिले. पोटाच्या जागी तर सध्या फक्त कणीक मळून गोळा ठेवला होता. त्याची बिस्किटे होण्याची काहीच शक्यता नव्हती.

खरे तर हे जसे आहे तसेच राहू द्यावे. हे गोलाकारदेखील पाहायला छानच. जणू काही आपला गणोबा किंवा लहान गुटगुटीत बाळे. दोस्ता, मला इथे माणसेही काढायची नव्हती. केवळ त्यांची चरबी, हाडे आणि स्नायूचे आकार काढलेत.

तू एखाद्या वस्तूतून जे आवडले तितकेच चितारू शकतोस का? म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या केवळ फांद्या? विविध माणसांचे डोळ्यांचे रंग? मांजरांच्या अंगावरची डिझाईन? सध्या गणपतीच्या विविध आकारांतील मूर्ती दिसतील. त्यांच्या शरीरातील फरक ओळखू शकतोस का?

तुझाच मित्र,श्रीबा