चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हटलं जातं. पुराणानुसार ब्रह्मानं याच मासात विश्वानिर्माणाचा प्रारंभ केला. नवनिर्मितीची सुरुवात झाली. या नवनिर्माणाची आठवण म्हणजे चैत्र. आजपासून तो सुरू होईल; पण त्याचा उत्सव साजरा करण्याचा प्रगल्भपणा आपल्यात आता उरलाय का? चैत्रचाहूल नीरव पावलांनी येते. तिचा ध्वनी, नाद ऐकता येईल का आपल्याला…? ‘‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही, झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली’’ धामणस्करांच्या या कवितेच्या ओळी दर चैत्रारंभी काही कवीमित्र धाडत असतात. अतिपरिचित झालेली असली तरी मला ही कविता अजूनही आवडते. तिचा शांत, समंजस सूर आवडतो. तिचं अल्पाक्षरीपण अन् अर्थपूर्णता आवडते. पण ही कविता आता मला भवताली ‘दिसत’ नाही. चैत्र पांघरून आलेली कविता सर्वव्यापी धुरळ्यात झाकून गेल्यासारखी वाटते! फक्त ही कविताच नाही तर वसंतात येणाऱ्या चैत्राविषयी जे जे काही वाचलंय ते ते असंच दूरस्थ वाटायला लागलेलं आहे. परकं नव्हे, पण दूरस्थ निश्चितच. निर्भेळ अन् विलंबित लयीतला चैत्र कधीकाळी अनुभवला होता. त्यातलं निर्भेळपण कमी कमी होत चालल्यानंतर पुस्तकांच्या खिडकीतून चैत्राच्या आवारात डोकावून पाहिलं, पण आता या खिडक्यांमधून चैत्राचे नुसते अवशेष दिसत राहतात. खचलेल्या घरासारखे. ज्या घरात आपण कधी तरी राहिलो, खेळलो, बागडलो, त्या घरांचे अवशेष बघताना जी हुरहुर वाटत राहते, तशीच आताशा चैत्र आल्यावर मनाला विळखा घालते.

चैत्र आगमनाच्या ज्या ज्या खुणा निसर्ग शांतपणे उलगडतो त्या त्या खुणांच्या जागा आताशा भलत्याच गोष्टींनी घेतल्या आहेत. मुळात निसर्गातल्या खुणा पाहाव्यात असा निसर्ग अन् वेळ आपल्या थोर्थोर व्यवस्थेनं आपल्यापाशी ठेवलेला नाही. पण ‘सेलिब्रेशन’ मोड मात्र जबरदस्त ऊर्जेनं तयार केलेला आहे.

सगळं ‘साजरं करणं’ आता अनिवार्य होऊन बसलं आहे. दिनदर्शिकेतला कुठला ना कुठला दिवस कशाच्या तरी नावावर जमा आहे, अन् तो ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी २४×७ बाजारही सज्ज आहे. बाजाराला शरण न गेल्यास कालबाह्य, निराशावादी, माणूसघाणा वगैरे शिक्के लगेचच मारले जाऊ शकतात. भरीस भर आता ‘आपण’ अन् ‘ते’ अशी जोरकस विभागणीही झालेली आहे. अशा विभागणीत ‘आपलं’ सोडून ‘त्यांचं’ बघण्यात बराच रस दिसतोय, वगैरे वगैरे वाग्बाण झेलावे लागले तर त्यात नवल काय?

मराठी नववर्षाची जागा आता हिंदू नववर्षानं घेतलेली आहे. सध्या हिंदू धर्माचा अभिमान प्रदर्शित करण्याचे दिवस ऐन भरात असल्यानं भगवं लेणं सर्वत्र मिरवणं अत्यावश्यक झालेलं आहे. ‘आपला सण’ साजरा करून ‘त्यांना’ आपली ताकद दाखवून देणं, जगण्या-मरण्याचा प्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळेच चैत्र गुढीपाडव्याला ‘शोभायात्रा’ काढून, ढोलताशे वाजवून सण साजरा करावाच लागतो. आनंद म्हणून सण साजरे करण्याचे दिवस मागे पडून कर्तव्य म्हणून साजरे करण्याच्या दिवसांची सद्दी आहे. काही तरी दाखवल्याशिवाय सेलिब्रेशन झाल्यासारखं वाटतच नाही!

सांस्कृतिक उपराजधानीचं बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवली उपनगरानं गुढीपाडव्याचा दिवस ‘शोभायात्रा’ काढून साजरा करणं, हा जगाच्या शिरपेचात खोवलेला जणू मानाचा तुराच! त्याचे अनुकरण राज्यातील साऱ्याच सांस्कृतिक जिल्ह्यांनी-उपजिल्ह्यांनी केलं. आता सकाळपासून ते अगदी दुपारच्या कडकडीत उन्हात पार पोळून निघेपर्यंत सर्व वयोगटांतील माणसं रस्त्यांवर उतरून चैत्र सुरू झाल्याचं रणशिंग फुंकतात. नववार साड्या, धोतरं, कपाळावर अर्धचंद्रबिंदी, डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर फेटे अशा वेशांत अन् घोड्यावर स्वार व्हावं तशा आवेशात मोटरबाइकवर स्वार होऊन शहरभर फेरी काढली जाते. पंधराच दिवसांपूर्वी शिमगा होऊन गेलेला असतो, पण खुमखुमी अद्याप शिल्लक असल्यानं गुढीपाडव्याच्या घोषणा शिमग्यातल्या ऊर्जेनं कंठ फाटेपर्यंत दिल्या जातात, गाणी गायली जातात अन् आपलं पावन कर्तव्य पार पाडल्याचं समाधान पावून अखेर थकून भागून आपापलं घर गाठलं जातं.

खरं तर नववर्षाचं स्वागत करण्याच्या प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. त्या कालानुरूप बदलतही असतात. पण या बदलांत सौंदर्यवृद्धी अपेक्षित असते, विद्रूपीकरण नाही. कुठलीही संस्कृती टिकवणं म्हणजे शे-पन्नास वर्षांपूर्वीचं जगणं जसंच्या तसं टिकवण्याचा अट्टहास करणं नव्हे. संस्कृती ही लवचीक अन् परिवर्तनशील असते. पण तिचं सोयीचं अर्थनिर्णयन करून परिवर्तनाची प्रक्रिया प्रभावित केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या कोरीव, टोकदार दाढीची अन् कपाळावरच्या चंद्रबिंदीची नक्कल करून संस्कृती कशी टिकू शकेल? गड-किल्ल्यांचं संवर्धन करू न शकणारा वा राजांच्या अन्य धोरणांचा पाईक न झालेला समाज हा अपराधभाव झाकण्यासाठी शिवाजी राजांच्या रूपाची नक्कल करतो, असा याचा अर्थ घ्यावा काय? पोकळ समाजात प्रतीकांच्या अस्मितांचं राजकारण प्राधान्यानं आणि जोरकसपणे होत असतं अन् सणवार हे त्यांच्या कर्कश्श प्रदर्शनाचे दिवस होऊन बसतात. तिथे आनंद नसतो, असतो तो फक्त आनंदाचा आभास!

आभास अस्मितांचा स्थायिभाव असेल, संस्कृतीचा निश्चितच नाही!! समाजात सर्व काळात, सर्व स्तर-वर्गातील लोक नांदत होते. त्या त्या समूहांचे आपापल्या प्रदेश अन् हवामान- पर्जन्यमानानुसार आपापले वेश होते.

जगण्या-वागण्याच्या, अन्न आणि अन्नसेवनाच्या नाना तऱ्हा होत्या. या सर्वांचं प्रतिबिंब या शोभायात्रांतून पडतं काय? साधी नववार साडी अन् धोतर नेसण्याच्या कैक वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे काय? आपल्या अवघ्या जगण्याच्या फरफटीचीच शोभायात्रा निघालेली आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही काय?

चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हटलं जातं. पुराणानुसार ब्रह्मानं याच मासात विश्वनिर्माणाचा प्रारंभ केला. नवनिर्मितीची सुरुवात झाली. या नवनिर्माणाची आठवण म्हणजे चैत्र. वसंत ऋतूत हा महिना येत असल्यानं स्वाभाविकच नवनिर्माण हे त्याचं अंग अन् शृंगार रसप्रधान स्वभाव. वैविध्य स्थायिभाव असलेल्या सृष्टीच्या जन्माची आठवण. ती साजरी करायची म्हणजे केवढा प्रगल्भपणा हवा, ठहराव हवा. गोंधळात नवनिर्मिती होत नाही, ती शांततेत होते. गोंधळशरण झाल्यानं आपल्याला शांतता वर्ज्य झाली आहे. चैत्रचाहूल कुठलाही वादळी गडगडाटाचा नाद घेऊन येत नाही. ती नीरव पावलांनी येते अन् एकेक पदर अलगद उलगडत जाते. ते ध्वनी, नाद ऐकता येतील का आपल्याला..?

सणबिण सोडा, आपण अखेरचा कुठला दिवस शांतपणे घालवला, हे आठवून पाहू या. शांत म्हणजे आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, काय खातो-पितो आहोत, काय नेसतो आहोत ही सर्व माहिती कुणालाही देण्याची कसलीही घाई नसण्याची अवस्था! स्वत:च स्वत:ला भेटण्याचा दिवस खरं तर चैत्रपाडवा म्हणून साजरा करायला हवा.

प्रत्येक ऋतूची, त्यांत येणाऱ्या महिन्यांची स्वत:ची अशी खास अन् ठळक लिपी असते, लय असते अन् रंगही असतो. निसर्ग अन् मानवसंबंध त्या त्या काळात वेगवेगळी रूपं घेत असतात. फाल्गुन संपून पुन्हा चैत्राचं आवर्तन सुरू होणार असतं. दास्तानमधल्या लांबलचक कहाण्या जशा एकमेकींना जन्म देत पसरत जायच्या, तसंच सृष्टीचक्र फिरणार असतं, पृथ्वीभर आपलं आच्छादन घालणार असतं. तब्बल सहा ऋतू अन् बारा मासांनी पुन्हा तोच राग आळवला जाणार असतो. त्या त्या दिवसांतच फुलणाऱ्या फुलांच्या रंग-गंधात परिवेश न्हाऊन निघणार असतो. या सर्वांच्या साथीला संगीत द्यायला पशुपक्ष्यांचे कंठनाद असतात. ते कर्णकर्कश्श नसतात. आपल्या गोंगाटापल्याडचे हे मधुर नाद आपण ऐकायला हवेत.

सणावारांचे दिवस संकटांप्रमाणे अंगावर धावून येणारे न वाटता, खरोखरच आनंद अन् उत्साह आणायला हे नाद आपल्याला मदतकारक ठरतील. महानगरांच्या अवकाशात मोजक्याच उरलेल्या निसर्गाच्या तुकड्यांतही हे नाद सापडू शकतील काय, याबद्दल शंका असली तरी आपल्या कक्षेबाहेर सर्वत्र मोठी सृष्टी अद्यापही आहे. तिथे हे सगळं निश्चितच सापडेल. निसर्गाची शोभायात्रा सर्वसमावेशक, सम्यक असते, ती आपल्याला सहज सामावून घेईल. या शोभायात्रेत सामील होणं, हा आपल्यालादेखील समृद्ध करणारा अनुभव ठरू शकेल. फक्त स्मार्ट फोनच्या चष्म्यातून न पाहता, आपल्या खऱ्याखुऱ्या डोळ्यांनी बघण्याचा अन् हेडफोन्स काढून मोकळ्या कानांनी ऐकण्याचा अवकाश आहे!

आपल्या पंचेंद्रियांच्या संवेदना गोंगाटामुळे पार बधिर झाल्या आहेत. त्या गोंगाटातून निसटून, विलंबित लयीत येऊन हे सारं आपण अनुभवू शकलो, तर आपल्या चैत्र मधुमासाचा प्रारंभ होईल. धुरळा खाली बसेल. सण आत्म्यातून साजरा होईल. कविता धुळीच्या मजारीतून पुन्हा उगवून येईल, दृग्गोचर होईल. कुठलीही कविता धुरळ्याखाली झाकली जाणं, ही गोष्ट वाईटच, नाही का…!

akshayshimpi1987@gmail.com