समीर शिपूरकर
डॉक्युमेण्ट्री बनवण्याचा माझा प्रवास हा माझ्या बदलत्या धारणांचा प्रवास आहे. जिथं जायचं होतं त्यापेक्षा वेगळ्या जागी पोचलो. ‘जग बदलण्या’च्या प्रक्रियेत आपला सहभाग असला पाहिजे, या भावनेनं सुरू झालेला प्रवास ‘जग बरंच गतिमान आहे आणि परिवर्तन खूपच सावकाश होणार आहे’ या टप्प्यापर्यंत आला. मात्र या प्रवासातले सगळे थांबे झिंग आणणारे होते. प्रवास झपाटलेला होता.

कुणीतरी विषय सुचवून, पैसे देऊन करवून घेतलेली ‘कमिशंड फिल्म’ असं माझ्या डॉक्युमेण्ट्रीजचं स्वरूप नाही. आपल्यालाच महत्त्वाचा वाटणारा विषय समजून घेऊन सामाजिक बदलासंदर्भात आपली भूमिका कोणती आहे हे स्पष्ट करत, अनेकांच्या मदतीनं निधी गोळा करत, संशोधन-स्क्रिप्ट-प्रॉडक्शन-वितरण या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याच अंगावर घेत केलेली ही कामं आहेत.

Kannada film director Guru Prasad Found Dead
कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघडकीस, पोलिसांची प्रतिक्रिया आली समोर
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

७०-८० च्या दशकातील परिवर्तनवादी चळवळी, राष्ट्रसेवादल, आंतरभारती अशा गोष्टींनी मला वैचारिक पाया पुरवला होता. आई-वडिलांचा सामाजिक चळवळींमधे प्रत्यक्ष सहभाग होता. त्यातून अशी मनोभूमिका तयार होत गेली की, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली व्यवस्था आणण्यात आपला सहभाग असला पाहिजे. हे पक्कं होतं की राष्ट्र म्हणजे केवळ जमीन नव्हे, तर त्यावर वावरणारी हाडामांसाची जिवंत माणसं आणि त्या माणसांची सुखदु:खं! सामाजिक उतरंडीच्या सर्वांत खालच्या स्तरातल्या व्यक्तीला मुक्त करणाऱ्या व्यवस्था कशा असू शकतील या मुद्द्यांभोवती माझे विचार फिरत होते. आपल्या डॉक्युमेण्ट्रीज केवळ प्रश्न मांडणाऱ्या नसाव्यात तर उत्तरांचा शोध घेणाऱ्याही असाव्यात असा प्रयत्न होता.

डॉक्युमेण्ट्रीवाले आपापल्या वृत्ती-प्रवृत्तीप्रमाणं – संघर्षात्मक, प्रबोधनात्मक, संशोधनात्मक, कलात्मक इ.- आपल्या कामाला भिडतात. मायकेल मूर धुरळा उडवून देतो, खिल्ली उडवतो, जहरी टीका करतो आणि झेलतोही. जॉन पिल्जर जिवाची भीती न बाळगता आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं उघडकीला आणतो. आनंद पटवर्धन समाजातल्या दांभिकपणाचा दीर्घकाळ शांतपणे शोध घेत राहतात. मला जाणवत गेलं की माझ्या डॉक्युमेण्ट्री या माझ्या स्वभावप्रकृतीच्या अंगानं बनत गेल्या आहेत. आपल्या जिव्हाळ्याचे मुद्दे हाती घ्यावेत, त्याचे पदर उलगडून बघावेत, प्रश्नांचा पैस समजून घ्यावा, प्रेक्षकांवर विश्वास ठेवावा आणि हाती असलेल्या पर्यायांची सकारात्मक, प्रेरणादायी मांडणी करावी ही दिशा मी आपसूक घेत गेलो. पानफुटीच्या झाडाला जशी एका पानातून दुसरी पानं येत जातात, तशी एका डॉक्युमेण्ट्रीमधून दुसरी आपोआप जन्म घेते. आपल्याला त्या हाका फक्त ऐकाव्या लागतात.

‘मूलगामी’मध्ये टपोऱ्या डोळ्यांची, शाळेत जाताना नाचत जाणारी मुले दिसतील. ‘सृजन आनंद विद्यालय’ या प्रयोगशील शाळेची अनेक तत्त्वं इथं स्पष्ट केली आहेत. मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लावणारी ही शाळा. मोठेपणी चिकित्सा करायची असेल तर मुलांच्या कुतूहलाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. शाळा-मुलं-पालक-समाज हे परस्परपूरक भूमिका कशा पार पाडतात हे इथं दाखविण्याचा प्रयत्न झाला. शिक्षण हे आनंददायी असतानाच प्रत्यक्ष जगण्याशी कसं जोडलेलं असू शकतं याचा हा शोध. हे सगळं शिक्षण सर्वसामान्य पालकांना परवडेल असं आहे, हा त्याचा आणखी एक विशेष.

विज्ञान आश्रमाचा गाभाच हा होता की ग्रामीण भागातले प्रश्न सोडवण्याची क्षमता असलेला युवावर्ग शिक्षण व्यवस्थेतूनच तयार व्हावा. जीवनाशी जोडलेलं शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रश्न, तंत्रज्ञानाचा उपयोग, वैज्ञानिक दृष्टिकोन, भारताचं समाजशास्त्रीय वास्तव, नापासांचा प्रश्न या सगळ्या मुद्द्यांना तोंड देणारी शिक्षण व्यवस्था कशी असू शकते याचा माग ‘विज्ञान आश्रम… शिक्षणातून विकास’ यामधे काढता आला. ‘कॉपी-लेफ्ट’ संकल्पनेवर विश्वास असणाऱ्या अरविंद गुप्ता यांनी लगोलग ही फिल्म यूट्यूबवर अपलोड केली होती. हा आम्हाला मिळालेला मोठाच पुरस्कार.

‘उत्पादक काम और स्कूली शिक्षा’ या मुलाखतीत डॉ. अनिल सदगोपाल अनेक संकल्पना मांडतात. नापास होणारी मुलं ही ड्रॉप आऊट होत नाहीत तर ती शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडतात. हा नवाच दृष्टिकोन त्यांनी मांडला. भारतीय समाजात असलेली वर्णाश्रम व्यवस्था ही शिक्षण व्यवस्थेत कशी घुसली, हे मांडून ते म्हणतात की, प्रत्यक्ष अनुभव घेत शिकवणारी जीवनकेंद्री शिक्षण व्यवस्था हाच त्यावरचा खरा उपाय आहे. आणि अशा व्यवस्थेची मागणी करण्यासाठी जनतेतूनच रेटा तयार झाला पाहिजे. ही डॉक्युमेण्ट्री बघून एका मित्राचा फोन आला होता की त्या मुलाखतीमुळे त्यानं आत्महत्येचा विचार सोडून दिला. या मित्रानं त्याच्या उमेदीच्या वर्षांमध्ये शिक्षण व्यवस्थेची फारकत घेऊन स्वत:च्या बळावर काही काम उभं केलं होतं. या मुलाखतीतून त्याला हे लक्षात आलं की आपण करतो ते काम खूप मोलाचं आहे. आणि त्याच्या मनातले नकारात्मक विचार नष्ट झाले. आपली शिक्षण व्यवस्था मुलांवर किती जीवघेणे वार करते हे आम्हाला मांडायचे होते.

शिक्षणविषयक या तिन्ही डॉक्युमेण्ट्रीज एकत्र करून एकंदर शालेय शिक्षण कसं असावं याची एक समग्र दृष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक ठिकाणी त्यांचं एकत्र प्रदर्शन करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. गरवारे बालभवनची शैक्षणिक दृष्टी मांडणारी ‘कजा कजा मरू’ ही डॉक्युमेण्ट्री याच मालिकेत बसते.

‘कार्यरत’ ही काव्यात्म धाटणीची डॉक्युमेण्ट्री. यात कॅमेरा हाच निवेदक आहे. तो शब्दांनी बोलत नाही. तो फक्त दिवाकर हरिदास यांना टिपत राहण्याचं काम करतो. दिवाकर हरिदास हे निसर्गकेंद्री जगणारे, सतत कार्यरत असणारे एक शिक्षक-कार्यकर्ता होते. त्यांच्या जीवनशैलीचे चित्रण करत कॅमेरा आपल्यासमोर अनेक मूलभूत प्रश्न उभे करतो आणि ज्या वेगवान हायवेवरून त्यांच्याकडे जातो त्याच हायवेवरून कॅमेरा पुन्हा आपल्या मुक्कामी शहरात परततो.

‘प्रधान विचार प्रधान चरित्र’ या त्यांच्या मुलाखतीत प्राध्यापक ग. प्र. प्रधान यांनी त्यांच्या आयडियॉलॉजीविषयी आणि जीवनाविषयी प्रांजळ आणि आरस्पानी मनोगत व्यक्त केलं आहे. स्वत:च्याच विचारांची चिकित्सा करून त्यातली शक्तिस्थळं आणि त्यातल्या मर्यादाही नोंदवण्याचं हे प्रामाणिक धाडस इतर कुठल्या विचारसरणीच्या लोकांना जमलेलं नाहीये, हे नोंदवण्याजोगं.

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांनी मानवी आयुष्याला स्पर्श करणाऱ्या अनेक विषयांची सखोल मांडणी केली. हे विषय सहजासहजी कवेत न येणारे होते. दृश्यभाषेत ते कसे मांडू असा विचार करता करता गोष्टी सांगण्यापर्यंत येऊन पोहोचलो. पळशीकरांनी केलेली आधुनिकतेची चिकित्सा मांडण्यासाठी बारा गोष्टींचा घाट घातला आणि ‘पळशीकरांच्या निमित्ताने… एक टीजर’ बनवला. विकासाची संकल्पना, आजची शहरं, चक्रव्यूहात अडकलेला २१ व्या शतकातला अभिमन्यू, पारंपरिक राष्ट्रवादापासून मुक्तता अशा विविध विषयांवर वेगवेगळ्या फॉर्ममधल्या गोष्टी बनवल्या. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान अशा विषयांच्या अभ्यासकांना या पूरक ठरल्या. याशिवाय वसंत पळशीकर यांच्याविषयी अनेक तज्ज्ञ लोकांच्या मुलाखतींचा एक संच बनवला. भारतीय समाजातले स्वातंत्र्योत्तर सामाजिक राजकीय बदल ज्यांना अभ्यासायचे असतील त्यांना पळशीकरांच्या संदर्भातली आम्ही केलेली कामं नक्कीच उपयुक्त ठरतील.

डॉक्युमेण्ट्री बनवणं ही माझ्या दृष्टीनं एक सामूहिक गोष्ट आहे, तो मैत्रीचा एक उत्सव आहे. सेलिब्रेशन ऑफ फ्रेंडशिप. आपल्या प्रयत्नातून जग बदलणार आहे असा (भाबडा) विश्वास बाळगणारे मित्र एकत्र आले की डॉक्युमेंटरीची सुरुवात होते. अनेक मोलाचे मित्र मिळत, मिसळत गेले आणि आम्ही सगळ्यांनी त्या कामाची मजा अनुभवली. विविध विषयांचा एकत्र अभ्यास करायचा, त्यावर वादविवाद करायचे, चेष्टामस्करी करायची हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. ज्यांच्याशिवाय हे काम पूर्ण होऊच शकलं नसतं असे शिल्पा बल्लाळ, अमितराज देशमुख आणि स्वप्नाली अरुणा चंद्रकांत, राधिका मूर्ती, मिलिंद जोग, अतुल पेठे… अनेक मित्र सोबत होते. माझी जोडीदार अंजली चिपलकट्टी हिनं मुळात मी डॉक्युमेण्ट्री बनवण्यासारख्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याच्या उद्याोगात जावं यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आशय आणि फॉर्म याबाबत आग्रही राहिली. दृक्श्राव्य माध्यमातलं हे काम तंत्रज्ञानाधारित, खर्चीक आहे. अनेक व्यक्तींनी या प्रकल्पांसाठी डोळे झाकून आर्थिक मदत केली. या सर्व सहकाऱ्यांबाबत आणि मार्गदर्शकांबाबत माझ्या मनात प्रेमभरी कृतज्ञता आहे. एक नक्की कळालं की उत्पन्नाचा दुसरा स्राोत असल्याशिवाय हे काम दीर्घकाळ चालवणं महाकठीण आहे.

हा झाला आतापर्यंतचा प्रवास. नवी डॉक्युमेण्ट्री कशी असेल? अनेक प्रश्न आहेत. डॉक्युमेण्ट्रीने स्वप्नं बघावीत की वास्तवाच्या माऱ्याखाली शरणागती पत्करावी? नदी-नाले-पशु-पक्षी आकांत करतायत, पृथ्वीला ताप येतोय… या अवकाळी सगळे धर्म कुठं गेले? नैतिकतेचा ताजा स्राोत काय? विश्वाचे आर्त समजणारे ते लोक आत्ता आत्ता इथं होते ना? बलात्काऱ्यांचा सत्कार करणाऱ्यांना नेतेपद देऊ नये इतकंही भान समाजात उरलं नाही?… मी डॉक्युमेण्ट्रीमध्ये जी मूल्यं मांडत आलो त्यांचा समाजातून जणू लोप झाला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. भीती, संशय, राग वाढू लागले आहेत. शासकीय, सामाजिक, नैतिक संस्था डगमगू लागल्या आहेत. कुटुंबंसुद्धा विघटित होत आहेत. कोणतीही डॉक्युमेण्ट्री करा, तिचा आशय भेगांमधून आत जात पार पृथ्वीच्या पोटात गडप होईल. आमचा समाज = आमची जात अशी परिस्थिती असताना ‘कोणत्या समाजासाठी’ डॉक्युमेण्ट्री बनवायची हा मोठाच पेच निर्माण झालेला आहे. जातिव्यवस्था अधिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अधिक क्लायमेट चेंज अधिक अस्मितेच्या लढाया अधिक आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यातलं वास्तव अधिक मनोरंजनातला बीभत्स रस अधिक राजकारणानं गाठलेली नीच पातळी… आधुनिकता आणि परंपरेचं एक चमत्कारिक मिश्रण अनुभवायला मिळतंय. हाच खरं तर नव्या डॉक्युमेण्ट्रीचा विषय. पण आज प्रश्नांच्या गाभ्याला भिडण्याचा समाजाचा दमसास संपत चालला आहे आणि चिमुकल्या रिळांमधेच तो उत्तेजना शोधतो आहे.

सध्या मी मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या कामात पूर्ण वेळ असतो. माणसाच्या मनाचा तळ नेहमीच समोर येत राहतो. मानवी मनाची उदात्तता आणि अभद्रता दोन्हीही समोर येत राहतं. मनात प्रश्न सुरू राहतात- मानवी विकार हेच सुखी, न्याय्य समाजाच्या स्वप्नाच्या आड येत असतील, तर वाट कशी काढायची? आपल्या धारणा आतून हलतात तेव्हा श्रद्धा कशावर ठेवायची? इथं मदतीला येतो तो बुद्धाचा पिपिलिका मार्ग. आणि अल्बर्ट एलिसची धारणा तपासून बघण्याची पद्धत. हे दोघे सांगतात की आपल्या धारणा घासूनपुसून, दुरुस्त करून पुन्हा जागेवर ठेवता येतात आणि आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवरच विश्वास ठेवत आपल्या स्वप्नाच्या दिशेनं हळूहळू जात राहता येतं. म्हणूनच बहुदा मी संवादाचे वेगवेगळे मार्ग हुडकतो आहे. ‘मला बोलायचं आहे’ या उपक्रमांमधून वेगवेगळ्या गटांमधे संवादाची आणि विश्वासाची जागा नव्यानं मिळत जावी असा प्रयत्न करतो आहे. न जाणो, त्यातूनच नवी डॉक्युमेण्ट्री तयार होईल.

आधीच्या डॉक्युमेण्टऱ्या मला असं सांगायच्या की माझं काम अजून संपवू नकोस, कारण ते खरंच संपलेलं नाही. तसंच आता मला माझी पुढची डॉक्युमेण्ट्री सांगते आहे की माझं काम अजून सुरू करू नकोस, कारण तुझ्या मनात ती कल्पना अजून शिजलेली नाही. तर या दूरवरच थबकून राहिलेल्या डॉक्युमेण्ट्रीचं म्हणणं ऐकणं सध्या मला भाग आहे. मी वाट बघेन. मला स्वत:ला तितका अवकाश हवा आहे. तोपर्यंत चालत राहेन.

bold

पर्यावरण कार्यकर्ते आणि समुुपदेशक. दहाहून अधिक डॉक्युमेण्ट्रीजचे दिग्दर्शन. शंभरहून अधिक माहितीपटांचे संकलन. बहुतांश फिल्म्सची निर्मिती ‘अवकाश निर्मिती’ गटाकडून. शोभा भागवत, अरविंद गुप्ता यांच्या कार्याबाबत प्रदीर्घ मुलाखती, ‘स्टोरी ऑफ स्टफ’ या मालिकेचे मराठी रूपांतर.

(या सर्व डॉक्युमेंटरी Avakash Nirmitee Documentaries या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील.)

sameership007@gmail.com

Story img Loader