निद्रानाशाच्या कविता

‘निद्रानाश’ हा महेश केळुसकर यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या आधीच्या सर्व कवितासंग्रहांतील विशेष घेऊन आलेला आहे.

|| हेमंत गोविंद जोगळेकर

‘निद्रानाश’ हा महेश केळुसकर यांचा नवा कवितासंग्रह त्यांच्या आधीच्या सर्व कवितासंग्रहांतील विशेष घेऊन आलेला आहे. त्यांच्या ‘मोर’ किंवा ‘झिनझिनाट’ या कवितासंग्रहांत भेटणारी कोवळ्या प्रेमातील उत्कटता याही संग्रहात पुन:प्रत्ययाला येते. ‘पहारा’मधील तीव्र राजकीय उपरोध याही संग्रहात रोखून पाहतो. ‘मस्करिका’ आणि ‘मी (आणि) माझा बेंडबाजा’ या संग्रहांतील मिष्किली या नव्या संग्रहातील अनेक कवितांतून डोळे मिचकावते. ‘कवडसे’ आणि ‘दूर डोंगरात लागतो दिवा’ या संग्रहांप्रमाणे वृत्तबद्ध कविताही या नव्या संग्रहात रुणझुणतात. पण या संग्रहाचा अंत:स्वर आहे तो निद्रानाशाचा! कवी कितीही बहिर्मुख होऊन अनुभवांना भिडत असला, तरी त्याची नजर आत वळलेली आहे. त्या अनुभवांतून जातानाही तो पुन:पुन्हा स्वत:लाच तपासून पाहत आहे. या तपासातून हाती लागणारे आत्मज्ञान त्याची झोप उडवते आहे. झोप यावी म्हणून तो व्यसने करू पाहतो. दैनंदिन कर्मकांडात स्वत:ला बुडवतो. तरीही ‘आपल्या अशा जगण्याचा अर्थ काय?’ या प्रश्नाच्या उत्तरांची भुते मध्यरात्री त्याच्या मानगुटीला बसतात. त्यांना पाहून ‘दर्दरून घाम येऊन निमूट झोपी गेलो’ असे तो म्हणत असला, तरी प्रत्यक्षात त्याला ती सुखाने झोपू देत नाहीत. आपल्याला परिस्थितीविरुद्ध लढता येत नाही, देशासाठी रडताही येत नाही म्हणून आपण तिरंगी झेंडय़ासारखे नुसतेच फडफडत व या सुजलाम् सुफलाम् वाळवंटात तडफडत आहोत, असे त्याला वाटते (‘तसा उतरलो झेंडय़ाबरोबरच’).

हे वैफल्य केवळ आपल्या देशापुरते मर्यादित राहत नाही. व्हिएतनामच्या रस्त्यात ज्वालाग्रही पदार्थाच्या हल्ल्यात होरपळणारी किम फूक, अफगाण-पाकिस्तान सीमेवरच्या निर्वासितांच्या छावणीतील शरबत गुल, सुदानमधल्या दुष्काळात मरायला टेकलेली मुलगी किंवा तुर्कीच्या समुद्रकिनाऱ्यावर मरून पडलेला आयलान कुर्दी कवीला आठवत राहतात (‘आठवते का तुम्हाला?’). बाह्य़ परिस्थितीच नव्हे, तर स्वत:ची कृतीदेखील कवीला प्रश्नांत पाडते. मुलाच्या मांडीवर, तो अभ्यास करीत नाही म्हणून चापट मारताना- आपण त्याला असे करून काय शिकवीत आहोत, या विचाराने कवी अस्वस्थ होतो (‘चापट’). सर्वाच्याच आत्म्यावर काजळी धरू लागलेय आणि आपणही त्यात सामील आहोत ही कवीला अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते (‘आंघोळ्यांमागून आंघोळी’). लोकांना दोष देताना आपणही काही वेगळे नाही हे त्याला माहीत असते (‘आपल्याच लोकांविरुद्ध’). बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे खंतावताना, त्याची जबाबदारी तो स्वत:वर घेतो व निद्रानाश ओढवून घेतो. अशा समजूतदार भूमिकेमुळेच केळुसकरांच्या कविता कंठाळी होत नाहीत.

दूषित होत जाणाऱ्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कवी उपरोधाचा आधार घेतो. मोफत विजेचे शॉक घेऊन शेतकऱ्यांना खऱ्याखुऱ्या आत्महत्या करण्याचा सल्ला देतो (‘अ‍ॅग्रो अ‍ॅडव्हान्टेज’). ‘पुनर्जन्मावर विश्वास होता त्याचा; म्हणायचा, मी पुन्हा जन्म घेऊन गांधींना पुन्हा पुन्हा मारेन.. आता त्याने सकाळची वेळ निवडलीय, नको असलेल्या म्हाताऱ्यांना संपवण्यासाठी, आणि भेकड झालाय अधिकच, गोळ्या घालून पळून जातो मोटारबाइकवरून..’ यातला दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्यांचा संदर्भ उघड आहे. पण कवी गांधीही पुन:पुन्हा जन्म घेत राहणार असा आशावाद बाळगतो.

कधी कधी बिघडत्या वास्तवाचा सामना करण्यासाठी कवी फॅण्टसीत शिरतो. ‘कवी आणि जादूची कांडी’ या कवितेतील कवी जादूची कांडी फिरवून देशाला ‘सारे जहाँ से अच्छा’ बनवतो. पण मग हे केवळ स्वप्नरंजन आहे या जाणिवेने शब्दांची अशी टरफले कांडणारे मुसळ त्याच्याच काळजावर घणाप्रमाणे पडत राहते. गावाची आठवण हा कवीच्या काळजातला एक हळवा कोपरा आहे. त्याच्या बाजूने तो देवाकडे उजवा कौल मागतो (‘गावाच्या बाजूने’). पण गावाच्या बदलत जाणाऱ्या वास्तवात आपणही सामील आहोत हे विसरू शकत नाही (‘हे एक गाव’).

कोवळ्या वयातील अबोध प्रेमाच्या आठवणींच्याही अनेक कविता सुखदपणे या संग्रहात भेटतात. ‘आठवत नाही आता’ असे म्हणत म्हणत कवी अनेक हुरहुरत्या आठवणी काढत राहतो. मग त्यात काळ्या रंगाची साडी, कॉटेज हॉस्पिटलमधील कॉट अशा व्यक्तिगत वाटाव्या अशा गोष्टीही येतात. बालपणी जिच्याशी काही बोलता आले नाही, तिचा खूप दिवसांनी आयुष्याच्या मध्यावर आलेला फोन ‘जंतरमंतर’ करतो, पण अंतरही पाडत जातो. ‘टेलिफोनवरून’सारख्या कवितेतली अल्लड प्रिया आरती प्रभूंची आठवण करून देते. ‘भावुक होऊन काय उपयोग’ असे तिला (खरे तर स्वत:लाच) समजावतानाही या कविता भावुक व्हायला अजिबात लाजत नाहीत!

या संग्रहातील ‘मुंबईच्या कविता’ या चौदा तुकडय़ांच्या कवितेत केळुसकरांच्या कवितेची सर्व व्यवच्छेदक लक्षणे एकत्र अनुभवायला येतात. त्यात ‘पेटवे ऑफ इंडिया’सारख्या खास केळुसकरी कोटय़ा आहेत. मर्ढेकरी शैलीतील काही तुकडे हे तेव्हा मर्ढेकरांनी चित्रित केलेली मुंबईची हलाखी आजही कायम असल्याचे जाणवून देतात. काही तुकडे फॅण्टसीत शिरतात. तसेच ‘लवचिक बापू’ हे नवे पात्र – जो कवी आहे – केळुसकरांनी येथे घडवलेले आहे. ‘बापूला काळजी वाटते आहे का?’ असे विचारीत केळुसकर, रात्री दीड वाजता शाळेच्या युनिफॉर्मवरच गजरे विकायला बसलेल्या मुलीबद्दलच आपल्यालाही काळजी वाटायला लावतात. केळुसकरांच्या कवितेत नेहमीच अतिसामान्य माणसाबद्दलची करुणा झुळझुळत असते. रात्री अर्ध्या वितीच्या रापीला धार लावत बसलेला खपाटय़ा पोटाचा काळा माणूस त्यांना समाधीत निमग्न ज्ञानेश्वरांसारखा भासतो. पण कुणाहीबद्दल केळुसकरांची कविता कधी कडवट होत नाही. बस स्टॉपवर एकाच कुल्ल्यावर बसलेली पोरगी त्यांना ‘जशी काय मुंबईच जणू!’ वाटते आणि त्यातले अनेकार्थ आपल्याला वेगळे काही न सांगता जाणवतात. या मुंबईत टीव्हीवरच्या कविसंमेलनात सहभागी झालेले अरुण, परेन, संदेश, अशोक हे परिचित कवीही भेटतात. मग आपल्याला ‘लवचिक बापू’ म्हणजे महेशच असावा असे आत्मज्ञान होते आणि मग आपणच ‘बापू’ होऊन जातो! शेवटी गणरायच पुढच्या वर्षी लवकर येतो सांगताना, मुंबईकरांनाच ‘शक्यतो जगून वाचून रहा तोवर या मुंबईत’ अशी प्रार्थना करतात!

कवितांच्या आणि कविमित्रांच्या आठवणी काढणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आहेत. कधी त्यांना तात्कालिक कारण असते- नलेश पाटील आपल्यातून निघून जाण्याचे, वसंत सावंतांच्या अंत्यदर्शनाचे किंवा ‘आनंद ओवरी’ पाहण्याचे. पण त्या कविता तात्कालिक राहत नाहीत. पूर्वसुरींच्या अनेक कविता विपर्यस्त होऊन केळुसकरांच्या कवितांतून येतात. ‘कवी आणि जादूची कांडी’ कवितेत केशवसुतांचा ‘पेला’ मराठवाडय़ाचा अनुशेष काठोकाठ भरून फेसाळतो आणि पाडगावकरांप्रमाणे कवी एक हात सत्याच्या ‘टिंब टिंब’वर ठेवून दुसऱ्या हाताने सलाम करतो! ‘तुजविण मज आता’ कवितेत प्रत्येक कडवे वेगवेगळ्या वृत्तांत आहे; पण त्या-त्या वृत्तातील जुन्या दिग्गज कवींच्या कवितांची आठवण करून देते. मग ती समर्थाची करुणाष्टके असतात, कुसुमाग्रजांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ असते किंवा रेव्हरंड टिळकांची ‘क्षणोक्षणी पडे’ असते. त्या कवितांतील उदात्त आशयाच्या पाश्र्वभूमीवर या कवितेतील वर्तमान कोतेपण अधिकच भेसूर भासते. पण कवितेतील मात्रादोष खटकल्यावाचून राहत नाहीत. ‘तसा उतरलो झेंडय़ाबरोबरच’ या कवितेतही काहीतरी राहून गेले आहे असे वाटत राहते.

या संग्रहात अनेक वृत्तबद्ध कविताही आहेत. ‘गावा सोडले तुला’ या कवितेत कवी गावाशी असलेल्या नात्याची ओवी गातो. या संग्रहात ‘चंद्र काळा’सारखी रुबाई आहे. ‘समजुतीने’, ‘बेवक्त’सारख्या गझला आहेत. पण केळुसकरांच्या कवितेत जी प्रमुख आशयसूत्रे आहेत, ती मुक्तछंदातूनच व्यक्त होण्यासारखी आहेत. केळुसकर यांनी विविध प्रकारचं लेखन केलेलं असलं तरी पण ते आतून, मुळातून आहेत कवीच. आणि याचा दाखला म्हणजे ‘निद्रानाश’ हा कवितासंग्रह होय!

‘निद्रानाश’- महेश केळुसकर,

मौज प्रकाशनगृह,

पृष्ठे- ७६, मूल्य- १३० रुपये

hemantjoglekar@yahoo.co.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta lokrang marathi article 10

Next Story
भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे!
ताज्या बातम्या