|| डॉ. कल्याणी हर्डीकर

‘अभिनय चिंतन : भरतमुनी ते बटरेल्ट ब्रेख्त’ हे डॉ. पराग घोंगे लिखित पुस्तक म्हणजे ‘अभिनय’ या संकल्पनेचा मूलभूत विचार करणारे वाचनीय असे सम्यक चिंतन आहे.

‘अभिनय’ संकल्पनेचा शास्त्रशुद्ध सैद्धांतिक विचार अगदी सांगोपांग पद्धतीने भरतमुनींनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘नाटय़शास्त्र’तून केला. आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक असे चार प्रकार त्यांनी केले. ते प्रकार त्यांनी वृत्ती, प्रवृत्ती, स्थायीभाव, व्यभिचारी भावांशी, रसांशी कसे निगडित आहेत हे सांगितले आणि अभिनय ही मूलभूत प्रवृत्ती असून ते परकाया प्रवेशाचे कसे तंत्र आहे, हे स्पष्ट केले. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा सैद्धांतिक विचार आधाराला घेऊन डॉ. घोंगे यांनी जागतिक रंगभूमीचे व्याकरण बदलणाऱ्या स्तानिस्लाव्हस्की, ऑर्तो, ग्रोटोवस्की आणि ब्रेख्त यांचे अभिनयासंबंधीचे विचार व त्यांचा तौलनिक अभ्यास या पुस्तकातून मांडला आहे.

भरतमुनी आणि स्तानिस्लाव्हस्की यांच्या विचारांची तुलना करताना लेखकाने भरतमुनींचे परकाया प्रवेशाचे तंत्र आणि स्तानिस्लाव्हस्कींचे मानसतंत्र यांच्यातले साम्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘मानसतंत्र’ हे स्वयंप्रेरणा आणि अबोध मनातल्या सुप्त जाणिवांशी, प्रेरणांशी निगडित आहेत. स्तानिस्लाव्हस्कींनी मानवी अस्तित्वात असलेले उपस्थित केलेले घटक म्हणजेच भरतमुनींनी प्रतिपादित केलेले स्थायी भाव आहेत, असे साम्य लेखक दर्शवतात.

‘संगीत, चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, स्थापत्यकला, गायनवादन यांचा समुच्चय म्हणजे नाटय़कला’ असे भरतमुनी म्हणतात. स्तानिस्लाव्हस्की यांच्या मते, या सर्व कलांच्या कलात्मक अभिव्यक्ती उत्तम अभिनेत्याच्या अभिव्यक्तीतून व्यक्त होत असतात. भरतमुनींनी नटाच्या वेशभूषा-रंगभूषेला जितके प्राधान्य दिलेले आहे, तितकेच वाचिक, आंगिक, सात्त्विक अभिनयालाही दिलेले आहे. स्तानिस्लाव्हस्कीही अभिनेत्याच्या रंगमंचीय दैहिक सौंदर्याला प्राधान्य देतात. डॉ. घोंगे यांनी अशी साम्यस्थळे वाचकांसमोर ठेवली आहेत.

त्यासाठी त्यांनी स्तानिस्लाव्हस्कींच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्टर प्रिपेअर्स’, ‘बिल्डिंग अ कॅरेक्टर’ आणि ‘क्रिएटिंग अ रोल’ या तीन गाजलेल्या पुस्तकांचा विस्तृत संदर्भ वाचकांसमोर ठेवलेला आहे. अभिनयासंदर्भात स्तानिस्लाव्हस्की हे अभिनेत्यांना कोणत्याही कठोर नियमांमध्ये बांधत नाहीत; फक्त वस्त्रप्रावरणांच्या मुखवटय़ाआड दडून अभिनेत्याने स्वअंतरंगाचे पापुद्रे उकलत भूमिकेचा आत्मा प्रकट करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. अंतस्थ ऊर्जा ही भावना, विकार, वासना या उद्दिष्टांनी भारलेली असते म्हणूनच अभिनयाची कृती बिघडते, हे स्तानिस्लाव्हस्कींचे स्पष्टीकरण भरतमुनींच्या भाव, विभाव, स्थायीभाव, व्यभिचारी भावांशी साम्य दर्शवते.

‘थिएटर ऑफ क्रुएल्टी’ची संकल्पना  मांडणारे ऑर्तो अस्तित्ववादी नाटय़परंपरेचे शिलेदार मानले जातात. ‘माणसाच्या आत दडलेले वैफल्य, क्रौर्य, वासना, विकार, आदिमभावना प्रकट करण्याचे रंगभूमी हे महाद्वार आहे’ असे ऑर्तो म्हणतात. परंपरागत अभिनयाचे सर्व संकेत ते नाकारतात. आधुनिक काळातला जीवनानुभव देण्यासाठी भाषेची संपूर्ण मोडतोड ते अपेक्षितात. त्यांच्या मते, हावभावांची, तीव्र ध्वनिसंवेदनांची भाषाच अधिक समर्पक आणि परिणामकाक असते. त्यामुळे अभिनय हा उन्मादासारखाच असायला हवा. प्लेगच्या साथीच्या रोगाप्रमाणे फैलावणारा, तापदायक, वेदनादायक, हिंस्र. कारण निर्मितीच्या सर्व अभिव्यक्ती लैंगिकता आणि हिंसाचारानेच व्यापलेल्या असतात. हेच आदिम भावांचे प्रकटीकरण विकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल करते. धर्मविधितही माणसाच्या आदिमप्रेरणाच अंतर्निहित असतात. त्यामुळेच नाटकातले विधीही धर्मविधींप्रमाणे असले पाहिजेत. म्हणजे रंगावकाशातील शारीर अभिव्यक्तीमुळे मुक्ततेचा अनुभव अभिनेत्याने घेऊन तो प्रेक्षकांनाही दिला पाहिजे, असे ऑर्तो यांचे म्हणणे. त्यामुळेच त्यांच्या अभिनय संकल्पनेत रंगमंच, संहिता, रंगभूषा, वेषभूषा, रंगभुवन असे पारंपरिक घटक नाहीत. त्यांच्या दृष्टीने नाटक म्हणजे माणसाच्या असहाय अवस्थेविरुद्धचे बंड. त्यामुळे  रंगभूमी, अभिनय, अभिनेता, सादरीकरण याबाबतच्या ऑर्तो यांच्या कल्पना एकदमच वेगळ्या आहेत.

ऑर्तो म्हणतात : अभिनेत्यांनी विविध मुखवटे घालून, कळसूत्री बाहुल्यांचा उपयोग करून, मंचवस्तू वापरून अभिनय करावा. प्राचीन विधिनाटकाची वेशभूषा असावी. प्रकाशयोजनेच्या- म्हणजे प्रकाशझोत व त्यांच्या तीव्र आवर्तनांच्या साह्य़ाने उग्रता, राग, भीती, द्वेष, त्वेष या भावना दाखवाव्यात. मात्र, त्यांचे अभिनयाचे तंत्र भरतमुनी, स्तानिस्लाव्हस्की, ग्रोटोवस्की, ब्रेख्त यांच्यासारखे सुस्पष्ट नाही. त्यांच्या मते, अभिनेत्याच्या मनातील अपराधबोधच त्याला अभिनय करायचे बळ देतो.

ग्रोटोवस्की या पोलिश दिग्दर्शकाच्या पवित्र अभिनयपंथात ऑर्तोच्या हिंस्र रंगभूमीचे विसर्जन झाले, असा उल्लेख डॉ. घोंगे यांनी केला आहे. ग्रोटोवस्कींनी ‘पुअर थिएटर’ची  कल्पना  मांडली. वजावटीचे थिएटर या अर्थी ‘पुअर’ हा शब्द येतो, असे लेखकाने सूचित केले आहे. ग्रोटोवस्की पुअर थिएटरला  ‘लॅबोरेटरी’ म्हणत. मानवी मनाचे खोल खोल अवगाहन करून पाहण्याच्या शक्यता शोधणारी प्रयोगशाळा म्हणजेच अभिनयाची प्रयोगशाळा! ही प्रयोगशाळा केवळ नट व प्रेक्षक यांच्यातल्या संवादामधूनच सिद्ध होते. नेपथ्य, प्रकाशयोजना, मंचवस्तू, संगीत, दिग्दर्शक, संहिता या कोणत्याच घटकांची गरज नाही; अपरिहार्य घटक नट व प्रेक्षक हेच आहेत. दोघांमधले परस्परावलंबित्व आणि सहअस्तित्व महत्त्वाचे आहे. दोघांमधले अवकाश हाच नाटकाचा प्राण आहे आणि हे अवकाश सतत बदलते, लसलसता जीवनानुभव देणारे हवे. अभिनेता जेव्हा स्तब्ध, सतर्क होऊन देहाचा विलोप करून आत्मिक शक्तींना जागृत करतो, सर्व मानसिक आवरणे झुगारून देऊन नग्न होतो, तेव्हाच तो आत्मशोधासाठी तळमळणाऱ्या प्रेक्षकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळेच उत्तम अभिनय करणे म्हणजे भूमिका जगणे नाही, तर स्ववरचे सर्व बुरखे फाडून आत आत शोध घेऊन समर्पण करणे. ग्रोटोवस्की यांचे हे चिंतन त्यांच्या ‘टुवर्ड्स अ पुअर थिएटर’ या पुस्तकाच्या आधारे डॉ. घोंगे यांनी मांडले आहे.

एलिनिएशन तंत्राभिनय ही ब्रेख्त यांनी रंगभूमीला दिलेली अभिनव भेट. एलिनिएशन म्हणजे फारकत, दुरावलेपण किंवा तटस्थता. अभिनेत्याने तो पात्र आहे हे फक्त दर्शवायचे. आपण पात्र आहोत हे भान सतत अभिनयातून जागे ठेवायचे. तरच तो प्रेक्षकांशी चर्चा करू शकतो, सामाजिक अभिसरण घडवू शकतो. एलिनिएशन तंत्राभिनयामुळे पारंपरिक रंगभूमी व आधुनिक वास्तववादी रंगभूमी यांच्यापेक्षा वेगळाच चेहरा रंगभूमीला मिळाला. ब्रेख्त यांच्या मते, जो अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात तटस्थभाव जागृत करू शकतो, तो उत्तम नट!

अशाप्रकारे भरतमुनी, स्तानिस्लाव्हस्की, ऑर्तो, ग्रोटोवस्की आणि ब्रेख्त यांच्या चिंतनांचा तुलनात्मक आढावा या पुस्तकात घेतला आहे. तसेच यानिमित्ताने त्यांच्यातील साम्यस्थळे दाखवण्याचा अभिनव प्रयोगही मराठीत झाला आहे. परंतु ही अभिनय तंत्रे राबविण्यासाठी कोणती अभिजात नाटके नव्या शैलीत रंगमंचावर आणली गेली, याचा उल्लेख पुस्तकात आढळत नाही. उदा. ब्रेख्त यांच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’चा पु. ल. देशपांडे यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’ हा भावानुवाद केला आणि जब्बार पटेल यांनी ते रंगमंचावर आणले. ब्रेख्तच्या अभिनय तंत्राचा ऊहापोह करताना उदाहरण म्हणून तरी हा मुद्दा दहा-पंधरा ओळींचा धनी व्हायला हवा होता. शिवाय ‘हॅम्लेट’, ‘मॅक्बेथ’, ‘किंग लिअर’ यांसारखी अजरामर नाटके पुस्तकात उल्लेखलेल्या अभिनयचिंतकांनी स्वत:ची तंत्रे-मंत्रे वापरून रंगमंचावरून सादर केली का? कशी? असे काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. असे असले तरी नाटय़विषयक जाणिवा समृद्ध व्हायला हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरणारे आहे.

‘अभिनय चिंतन : भरतमुनी ते बटरेल्ट ब्रेख्त’

– डॉ. पराग घोंगे, विजय प्रकाशन,

पृष्ठे- ३७१, मूल्य- ४५० रुपये

hardikarkalyani@gmail.com