चहाच्या पेल्यातील वादळ

थोर चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचा ९८ वा जन्मदिन २ मे रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील एका अकल्पित घटनेचा वेध..

|| विजय पाडळकर

थोर चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचा ९८ वा जन्मदिन २ मे रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील एका अकल्पित घटनेचा वेध..

ही गोष्ट आहे १९८८ सालची.

सत्यजित राय आणि त्यांच्या पत्नी विजया राय हे कोलकात्यातील बिशप लेफ्रोय रोडवरील घरात राहत असताना एके दिवशी अचानक काही मंडळी त्यांच्याकडे आली. ‘Clarion’ या सुप्रसिद्ध जाहिरात एजन्सीचे ते पदाधिकारी होते. सत्यजित राय कामात व्यग्र होते म्हणून विजयाबाईंनी त्यांचे स्वागत संदीपच्या (त्यांच्या मुलाच्या) खोलीत केले. मात्र, ही मंडळी ज्या कारणासाठी त्यांना भेटायला आली होती, ते ऐकल्यावर त्या अतिशय आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी आणलेल्या प्रस्तावासारखा प्रस्ताव यापूर्वी कुणीच राय यांच्याकडे आणला नव्हता. एका सुप्रसिद्ध चहाच्या कंपनीसाठी ते जाहिरात बनवीत होते. या जाहिरातीसाठी ‘मॉडेल’ म्हणून सत्यजित आणि विजया यांनी काम करावे अशी विनंती करण्यासाठी ते आले होते.

‘‘आता या वयात आम्ही जाहिरातीत काम करावे अशी तुमची अपेक्षा आहे का?’’ विजयाबाई म्हणाल्या. सत्यजित राय त्यावेळी ६७ वर्षांचे होते आणि विजयाबाई ७० वर्षांच्या.

‘‘तसे फारसे काम आहे अशातला भाग नाही,’’ सर्वजित नावाचा त्यांचा प्रमुख म्हणाला, ‘‘तुम्ही दोघांनी हातात चहाचे कप घेऊन बसायचे व आम्ही वेगवेगळ्या कोनांतून तुमचे फोटो काढू. मग तुम्ही एक-दोन वाक्ये बोलायची. झाले!’’

ही कंपनी या लहानशा जाहिरातीसाठी त्यांना घसघशीत मानधन द्यायला तयार होती.

विजयाबाईंनी थोडा विचार केला. त्या म्हणाल्या, ‘‘मी रायबाबूंशी बोलते व तुम्हाला सांगते.’’

हे बोलणे चालू असताना संदीप तेथेच होता. पण तो काही बोलला नाही. आलेली माणसे उठून गेल्यावर विजयाबाईंनी सत्यजित यांच्याकडे हा विषय काढला. त्यांचे बोलणे ऐकताच सत्यजित यांचे डोळे विस्फारले. ते आश्चर्याने म्हणाले, ‘‘काय म्हणतेस? हे तर अनपेक्षित आहे. मला जाहिरातीत काम करण्यासाठी बोलावणे येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.’’

विजयाबाई हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘एवढेच नव्हे, तर त्यांनी भरपूर मानधन देण्याचे कबूल केले आहे. तुम्हाला पैशाविषयी प्रेम नाही हे मला ठाऊक आहे, पण यावेळी तुम्ही होकार द्यावा अशी माझी इच्छा आहे.’’

‘‘तुझे काय मत आहे?’’

‘‘यात नाही म्हणण्यासारखे काय आहे?’’

‘‘तू बाबूला याबद्दल त्याचे मत विचारलेस काय?’’

संदीपला सारेजण घरात ‘बाबू’ म्हणून हाक मारीत.

‘‘तो त्यावेळी तेथेच बसलेला होता. तो काही बोलला नाही. आणि जाहिरातीत काम करणे यात काय वावगे आहे? आपल्या माहितीचे अनेक जण जाहिरातीत काम करताना दिसतात की! शिवाय आपण नेहमी नेहमी थोडेच हे काम करणार आहोत?’’

राय थोडा वेळ गप्प बसले. मग ते म्हणाले, ‘‘तू फक्त पैशांचा विचार करते आहेस. होय ना?’’

‘‘हो. या घरात कुणीतरी पैशांचा विचार केला पाहिजे ना! सगळ्यांना तुमच्यासारखे संत बनून कसे चालेल?’’

सत्यजित यांच्याकडे हा विषय काढण्यापूर्वी विजयाबाईंनी पैशाचाच विचार केला होता. आणि या विचारामागे त्यांचा सुमारे ४० वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा अनुभव होता.

सत्यजित राय हे जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असले, असंख्य पुरस्कार त्यांनी मिळवलेले असले, तरी त्यांची आर्थिक बाजू सर्वसाधारणच होती. भरपूर असा पैसा त्यांना कधी मिळाला नाही. एवढेच नव्हे, तर शेवटपर्यंत त्यांना आपले स्वत:चे घरही घेता आले नाही. सार्वजनिक जीवनात ते अतिशय सचोटीने वागत. खरे तर आतापर्यंत त्यांनी २४ चित्रपट दिग्दर्शित केले होते. निर्माते त्यांच्या म्हणण्याबाहेर सहसा नसत. मात्र, वावग्या मार्गाने पैसा कमवावा असे त्यांना कधीच वाटले नाही. सुरुवातीच्या काही चित्रपटांनंतर ते आपल्या प्रत्येक चित्रपटाला स्वत:च संगीत देत. मात्र, ते निर्मात्यांकडून फक्त दिग्दर्शनासाठी ठरलेली रक्कम घेत. संगीतासाठी वेळ व श्रम खर्चूनही वेगळी रक्कम त्यांनी कधीच मागितली नाही. (या संदर्भात एक खंत विजयाबाईंना नेहमी वाटायची. ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटाला बंगाल सरकारने अर्थसाहाय्य केले होते. हा राय यांचा पहिलाच चित्रपट होता व तो परदेशात वगैरे लोकप्रिय होईल असा त्यांनी विचारही केला नव्हता. त्यामुळे सरकारशी करारपत्र करताना राय यांनी चित्रपटाच्या परदेशातील वितरणाच्या हक्काबद्दल काहीच नमूद केले नव्हते. पुढे ‘पाथेर पांचाली’ने इतिहास घडवला. बंगाल सरकारने जो पैसा गुंतवला होता, त्याच्या २५ पट रक्कम त्यांना परत मिळाली. मात्र, या रकमेतून सत्यजित यांना काहीच हिस्सा दिला गेला नाही.)

पैशांची आवक आणि जावक यांचे गणित सत्यजित रायना कधीच जमले नाही. आणि ते गणित जमवता जमवता विजयाबाईंच्या नाकीनऊ  येत.

राय हसले आणि म्हणाले, ‘‘तुझ्या बोलण्यावरून आपल्याला पैशांची गरज आहे असे मला वाटते. ठीक आहे. तू म्हणशील तसे होऊ  दे. आतापर्यंत मी कॅमेऱ्याच्या मागे उभा असायचो, आता पुढे उभे राहून पाहू.’’

हे जाहिरातीचे काम आपण स्वीकारावे असे विजयाबाईंना वाटत होते याचे आणखी एक कारण होते. आधीच्या सुमारे पाच वर्षांत सत्यजित राय यांनी एकही चित्रपट दिग्दर्शित केला नव्हता. त्यामुळे येणारे उत्पन्न एकदम आटले होते. तशात १९८३ साली त्यांना हृदयविकाराचा मोठा धक्का येऊन गेला होता. त्यांच्या औषधोपचारावर होणारा खर्च खूप वाढला होता. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही होती, की राय हे लोकप्रिय लेखकदेखील असल्यामुळे त्यांच्या पुस्तकांच्या, अनुवादांच्या मानधनातून घर चालविण्यापुरती रक्कम मिळे आणि त्यामुळे कुणाकडे मदत मागण्याची पाळी अजून आली नव्हती.

विजयाबाईंनी Clarion च्या अधिकाऱ्यांना होकार कळविला.

मात्र, ही गोष्ट जेव्हा संदीपला समजली तेव्हा तो थोडासा नाराज झाला. त्याने आईला विचारले, ‘‘बाबा या जाहिरातीला कसे काय तयार झाले?’’

त्याचा सूर विजयाबाईंना जाणवला. त्या म्हणाल्या, ‘‘का? तुझी काही हरकत आहे काय? ती माणसे आली त्यावेळी तू तेथेच होतास. तू काही बोलला नाहीस. मला वाटले, तुला हे मान्य आहे.’’

‘‘मी फक्त तुझी आणि त्यांची भेट घालून दिली. आई, मला हे खरेच आवडलेले नाही.’’

आश्चर्यचकित होऊन त्या म्हणाल्या, ‘‘त्यात प्रॉब्लेम काय आहे?’’

‘‘लक्षात घे आई, बाबांच्या दर्जाचा माणूस पैसे मिळवण्यासाठी जाहिरातीत काम करतो हे बरे दिसेल का? त्यांना ते किती कमीपणाचे वाटेल याचा तू विचार केला आहेस का?’’

‘‘मी असा विचार केला नाही. मी जाहिरातीतून मिळणाऱ्या पैशांचाच विचार करीत होते. मान्य. पण तू हे ध्यानात घे, की घर चालविण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही कुणीच इकडे लक्ष देत नाही. गेल्या किती दिवसांपासून बाबांनी नवे काम हाती घेतलेले नाही! तुला कल्पना नाही, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी मला काय काय करावे लागते! एका लहानशा जाहिरातीसाठी ते लाखात रक्कम मोजण्यास तयार आहेत. माझे काही अत्यावश्यक खर्च त्यातून निघतील. तू कृपा करून बाबांशी चर्चा करू नकोस. मोठय़ा मिनतवारीने मी त्यांना तयार केले आहे.’’

Clarion च्या अधिकाऱ्यांना ही जाहिरात कोलकात्यात शूट करायची नव्हती. ते म्हणाले, ‘‘रायबाबूंना विचारा, ते म्हणतील त्या ठिकाणी आपण शूटिंग करू.’’

सत्यजित राय यांनी त्यांना काठमांडूचे नाव सुचवले व त्याला ते तयार झाले. संदीप त्यावेळी किशोरकुमारवर एक डॉक्युमेंटरी तयार करण्याच्या कामात गुंतला होता. या कामासाठी त्याला मुंबईला जायचे होते. त्यामुळे सत्यजित, विजयाबाई आणि फोटोग्राफर निमाई घोष असे तिघेजण काठमांडूला गेले. संदीप नाराज असल्यामुळेच तो कामाची सबब काढून मुंबईला गेला असे विजयाबाईंना वाटले. आपण करतो आहोत ते बरोबर की चूक, असा संशय प्रथमच त्यांच्या मनात आला.

काठमांडू येथे ‘हॉटेल ओबेरॉय’मध्ये राय यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. सकाळी Clarion चे लोक आले आणि त्यांनी हातात चहाचे कप घेतलेल्या या जोडप्याचे अनेक फोटो काढले. दुसऱ्या दिवशी संदीपही मुंबईहून थेट काठमांडूला आला. विजयाबाईंनी त्याला सांगितले की जाहिरात शूट झाली आहे, तेव्हा त्याचा चेहरा पडला. सत्यजित राय तेथेच बसले होते. संदीप नाराज आहे हे त्यांच्या एव्हाना ध्यानात आले होते. अकस्मात ते म्हणाले, ‘‘संदीपला योग्य वाटत नसेल तर आपण अजून त्यांना नको म्हणू शकतो.’’

विजयाबाई चकित झाल्या, ‘‘हे तुम्ही गंभीरपणे बोलत आहात? आता एवढे सारे झाल्यावर त्यांना ‘नको’ असे कसे म्हणता येईल?’’

‘‘त्यात काय झाले? आता मला जाणवते आहे, की ही जाहिरात स्वीकारून मी चूक केली आहे. संदीपला एवढे वाईट वाटेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय मी पैशाला कधीच फारसे महत्त्व दिले नाही. आणि या वयात काही रक्कम मिळण्यासाठी मी जाहिरातीत काम का करावे? त्यांना सांग, मला हे मान्य नाही. त्यांना हेही सांग की, काठमांडूला येण्याजाण्याचा व राहण्याचा खर्च माझा मीच करणार आहे. त्यांनी एक पैसाही देण्याचे कारण नाही.’’

राय इतके निक्षून बोलले, की विजयाबाई गप्पच बसल्या. त्यांची प्रकृती पाहता त्यांना अधिक मानसिक त्रास देणे योग्य नव्हते. बाईंनी मुकाटय़ाने त्या कंपनीला राय यांचा निर्णय कळविला. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी कंपनीच्या लोकांची होती. त्यांनी विजयाबाईंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या.

कंपनीच्या लोकांनी तरीही त्यांचा पिच्छा सोडला नाही. सुमारे एक आठवडय़ाने सर्वजित पुन्हा त्यांच्या घरी आला व विजयाबाईंना म्हणाला, ‘‘जर रायबाबूंचे ऑब्जेक्शन पैशासाठीच असेल तर आपण त्यातून एक मार्ग काढू. कंपनीतर्फे मी असे जाहीर करतो, की रायबाबूंनी या जाहिरातीचे कसलेही मानधन स्वीकारलेले नाही.’’

मात्र, या प्रस्तावालाही सत्यजित किंवा विजयाबाईंनी मान्यता दिली नाही. पुढे हा विषय घरात कधीच निघाला नाही. चहाच्या पेल्यातील वादळ अशा तऱ्हेने शांत झाले.

गोष्ट लहानशीच; पण सत्यजित राय यांच्यासारख्या महान कलावंताला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्टय़ा एवढे असुरक्षित राहावे लागते व लहानशा आर्थिक गोष्टीसाठी एवढा मन:स्ताप सहन करावा लागतो, हे सत्य कलावंत आणि त्याच्या जगण्यावर कठोर भाष्य करणारे व मन विषण्ण करणारे आहे.

vvpadalkar@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta lokrang marathi article 9

Next Story
रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन