‘लोकरंग’ मधील (८ जून) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘चरित्र’वीणा!’ हा लेख वाचताना लेखकाच्या भावविश्वात आपण नकळत प्रवेश करतो आणि त्यातून उलगडत जातं वीणा गवाणकर यांचं एक साहित्यिक म्हणून असलेलं थोर कार्य. या लेखात केवळ त्यांच्या लिखाणाचं कौतुकच नाही, तर त्यांच्या लिखाणामागील संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि दुर्लक्षित इतिहास उजळून दाखवण्याची त्यांची तळमळ यांचं प्रभावी चित्रण आहे.

वीणाताईंनी लिहिलेल्या चरित्रांतून सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची ओळख होते. त्यांनी केवळ ऐतिहासिक किंवा राजकीय व्यक्तिरेखाच नाही, तर समाजाच्या गर्तेत हरवलेल्या, पण मूल्यांनी समृद्ध अशा व्यक्तींची चरित्रं लिहून, त्यांच्या आयुष्याचा समाजाशी असलेला संबंध जिवंत केला आहे. त्यांच्या लेखनातून केवळ माहितीच नव्हे, तर एका काळाचा श्वास, त्या व्यक्तींच्या भावना, त्यांची दु:खं आणि त्यांच्या संघर्षाचं सत्य जिवंत होतं.

लेखकाने लेखात मांडलेलं वीणाताईंचं निर्भीड, स्पष्टवक्तेपण आणि परखड दृष्टिकोन हे आजच्या काळात विशेष महत्त्वाचं वाटतं. कारण आज आपल्याला जे लेखन सर्वदूर दिसतं, त्यात प्रामाणिकपणा, सखोल संशोधन आणि सामाजिक भान यांची कमतरता दिसते. अशा काळात वीणाताईंचं लेखन म्हणजे एक स्फूर्तीदायक आदर्श आहे. लेखकाने व्यक्त केलेला आदर हा एका सखोल जाणिवेतून आलेली श्रद्धा आहे. अशा प्रकारचं लेखन वाचकांना केवळ माहिती देत नाही, तर त्यांच्या विचारांची दिशा बदलवू शकतं. म्हणूनच हा लेख म्हणजे एक साहित्यिक स्तुती नव्हे, तर विचारप्रवृत्त करणारी साहित्यिक साक्ष आहे.- सतीश घुले, अहिल्यानगर

वसईचे सुंदर वर्णन

‘लोकरंग’ मधील (८ जून) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘चरित्र’वीणा!’ हा लेख वाचला. लेखकाने वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक शालेय जीवनात वाचून तो प्रभाव दीर्घकाळ स्मरणात राहिल्याचा अनुभव कथन केला आहे. वसईकर मित्रांशी कार्यक्रमोत्तर केलेल्या कार्यक्रमांची मनमोकळी कबुलीही लेखकाने दिली आहे. वसई म्हणजे प्रति गोवा असून लेखकाने वीणाताईंच्या घराच्या वर्णनानिमित्ताने संपूर्ण वसईचे कल्पनाचित्र उभे केले आहे.- बेन्जामिन केदारकर, विरार

चित्रकृतीचा जादूई किमयागार…

‘लोकरंग’ मधील (८ जून) ‘पुलंवजा पंचवीस वर्षं… ’ मध्ये ‘न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण’ हा उत्पल व. बा. व सॅबी परेरा यांचा ‘बटाट्याच्या चाळीचं रिडेव्हलपमेंट’ हे दोन्ही लेख वाचले. तसं तर पुलंशिवाय पंचवीस वर्षंच काय शेकडो वर्षे निघून गेली तरी पुलंना सोडून कुणीच जगू शकत नाही. पुलं आपल्यातच होते, आहेत आणि राहतील… साहित्य कधी मरत नसतं. शब्दांच्या घरट्यात, चित्रमय सृष्टीच्या पिल्लांना भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवणारा, रसिकांच्या हृदयावर अनभिषिक्त साम्राज्याचा ठसा उमटवून, आपल्या लेखनात रमवून ठेवणाऱ्या सर्जनशील कलाकाराला विसरताच येत नसतं. साधी भाषा म्हणजेच लोकांची भाषा. सृजनशील कथानकातून जीवनाचं रहस्य, जगण्याचं मोल शब्दांत गुंफून माणसांचा गोतावळा उभा करण्यात पुलंनी जादूई किमया केली. अशा अनेक पिढ्या निघून गेल्या तरी पुन्हा पुलं होणे नाही. विनोदी शब्दांचा खजिना मोकळा करून, वाचक असोत की प्रेक्षक असोत, आपल्या शब्दांची गोफण भिरकावून घायाळ करण्याचे अजब कसब त्यांच्यात होते.- डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, संभाजीनगर.

मुलंही लिहिती होतील

‘लोकरंग’मधील (८ जून) मधील ‘बालमैफल’ सदरात श्रीजा वीरेंद्र पतकी या एका शाळकरी मुलीने लिहिलेली ‘शब्द’ ही कविता खूप आवडली. ही कविता मोठ्यांनासुद्धा विचार करायला लावणारी आहे. निर्मोह मेढेकर याचा ‘नागझिऱ्यातला शिकारीचा थरार’ हा अनुभवपर लेख उत्तम आहे. मुलांनी लिहिलेल्या अशा लेखांमुळे अन्य मुलेही वाचन-लिखाणाकडे वळतील.- सां. रा. वाठारकर, चिंचवड

ओसाड गावांच्या व्यथा…

‘लोकरंग’ (१ जून) मधील ‘हरवलेला मामाचा गाव…’ या संकल्पनेअंतर्गत लिहिलेले ‘भुंड्या डोंगरांची भटकंती? -प्रवीण दशरथ बांदेकर, ‘‘आजोळ’ संकल्पनाच धोक्यात ’-दासू वैद्या, ‘कचकड्या विकासाची बटबटीत वाळवंटं…’ -अक्षय शिंपी हे लेख तीनही लेख वाचले. हे लेख विकासाच्या नावाखाली गावांना आलेले भकासपण अधोरेखित करणारे आहेत. गावाची ओढ आता गावात जन्म घेतलेल्या पिढ्यांनाही उरली नाही. शहरालगतची शेती राजकारणी, विकासक आणि भूमाफियांनी बळकावून गावाला ओसाड करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. या शेती विक्रीच्या रकमेतून उभे राहणारे आर्थिक हितसंबंध नात्यांची राखरांगोळी करून कोर्टाच्या दारापर्यंत गेले आहेत. त्यामुळे मामा, आजोळ, मावशी यांतील भावबंध द्वेषाने राख होत चालले आहेत.

गावातील अनेक लोक आता असलेली शेती उद्ध्वस्त करून एका नव्या स्वप्नात दंग होत आहेत असे चित्र आहे. आता गावात आढळतात ते फक्त ओसाड गावची पाटीलकी करणारे त्या त्या घरचे वृद्ध. दिवस ढकलणे याशिवाय त्यांना पर्याय नाही. स्थलांतरित जागेत यांच्यासाठी कोणताही कोपरा नाही. गावांचं गावपण टिकण्यासाठी आणि जगण्याची उमेद निर्माण होण्यासाठी नव्या विकास कार्यक्रमात कोणताही आराखडा नाही. नेत्यांमधली जमिनीची भूक सातत्याने दिसून येते. त्यांना पूरक वातावरण निर्माण करणारे गावातील बेकार युवक आणि संगनमत असणारे दलाल, कर्मचारी यांची युती गावांना अधिक भकास करीत आहेत. मामाच्या गावाची ओढ अनुभवलेली पिढी आता वातानुकूलित वातावरणाची आश्रित झाली असल्याने त्यांची पुढची पिढी नात्यांची ओढ ठेवेल असे समजणे म्हणजे मृगजळ होय.- अनिरुद्ध कांबळे, राजर्षीनगर, नागपूर</strong>

भावविवश करणारे लेखन

‘लोकरंग’ (१ जून) मधील ‘हरवलेला मामाचा गाव…’ या संकल्पनेअंतर्गत लिहिलेले ‘भुंड्या डोंगरांची भटकंती? -प्रवीण दशरथ बांदेकर, ‘‘आजोळ’ संकल्पनाच धोक्यात ’ -दासू वैद्या, ‘कचकड्या विकासाची बटबटीत वाळवंटं…’ -अक्षय शिंपी या लेखांनी आमच्यासारख्या अति ज्येष्ठ नागरिकांचे भावविश्वच ढवळून काढले आणि दहा दशकांपूर्वीच्या मंतरलेल्या दिवसांत मी स्वत:ला हरवून गेलो. ‘मामाचा गाव’ ही संकल्पनाच आम्हाला मोहरून टाकत असे. केव्हा एकदा परीक्षा संपतेय आणि मामाच्या गावी जातोय असे होत असे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. परस्परांत अकृत्रिम जिव्हाळा होता. कारण जागतिकीकरण/ उदारीकरणाचे वेगवान वारे खेडोपाडी पोहोचले नव्हते. मर्यादित सुखसोयीत अमर्याद आनंद होता. मावशीच्या गावी जाण्यासाठी अडीच तीन किलोमीटर चालावे लागले, पण त्याचे श्रम कधी वाटलेच नाहीत. कारण मावशीच्या कुशीची ऊब, तिच्या हाताच्या गुळपापड्या, चिरमुऱ्याचे लाडू, शेवखंड आम्हाला खुणावत असतं. चॉकलेट, पिझ्झा, बर्गर यांनी ग्रामीण संस्कृतीत घुसखोरी केली नव्हती. एक पैशाची चिक्की आणि लिमलेटच्या गोळ्या यांची चव अवर्णनीय होती. गेल्या काही दशकांत विकासाच्या गोंडस ध्यासापोटी माणसाने निसर्गाशी अघोषित युद्धच पुकारले आहे. वनसंपत्तीचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे. डोंगर-टेकड्या भुईसपाट होत आहेत. नद्या, नाले, ओढे यांचे प्रवाह आपल्या सोयीने वळविले जात आहेत आणि तिथे मोठमोठे कारखाने/ प्रकल्प उभे राहत आहेत. बांदेकर आणि वैद्या या दोघांनीही निसर्गाच्या या ऱ्हासाचा आकृतिबंध प्रत्ययकारी शब्दात मांडला आहे. जणू आजोळचे सौंदर्यच झाकोळले आहे. वाळू आणि गाळ यांच्या अमर्याद उपशामुळे नद्या शुष्क झाल्या आहेत. त्यामुळे डुंबणे इतिहासजमा झाले आहे. भाचे मंडळींना एकत्र आणणारे आजी-आजोबांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणारे आजोळ काळाच्या पडद्याआड जाते आहे. त्याचबरोबर अस्सल बेळगावी तुपासारखी रवाळ, खमंग असणारी नाती आता वनस्पती तुपासारखी होत चालली आहेत-अशोक आफळे, कोल्हापूर</strong>

मामाचं गाव हरवलं

‘लोकरंग’ (१ जून) मधील ‘हरवलेला मामाचा गाव…’ या संकल्पनेअंतर्गत लिहिलेले ‘भुंड्या डोंगरांची भटकंती? -प्रवीण दशरथ बांदेकर, ‘‘आजोळ’ संकल्पनाच धोक्यात ’ -दासू वैद्या, ‘कचकड्या विकासाची बटबटीत वाळवंटं…’ -अक्षय शिंपी हे लेख खूप भावले. खरंच, आपल्या सर्वाचा मामाचा गाव हरवला आहे. मामाच्या जुन्या वाड्यासमोर मातीत संध्याकाळी सर्व लहान मुले-मुली गोल करून ‘मामाचं पत्र हरवलं तेच मला सापडलं’ याऐवजी आता ‘मामाचं गाव हरवलं, ते नाही सापडलं’ हे म्हणण्याची वेळ आली आहे. या विकासाने मामाचा गाव गिळून टाकला. किती झाडे, किती लागवडीखालील जमीन रस्त्याखाली गाडली गेली याचा आपण विचार करणार आहोत की नाही? मुंबई, नागपूर बारा तासांऐवजी सहा तासांत पोहोचणार हे खरे, पण मधे कोठे मामाचा गाव लागतो? लागतात ते पेट्रोल पंप आणि मोठे मोठे ढाबे!! एका दिवसांत आम्ही सरासरी एवढे किमी रस्ता तयार करतो म्हणून फुशारकी मारीत आहोत; पण ते आम्ही किती झाडे तोडली हे मात्र सांगत नाहीत. यात किती मामांच्या जमिनी, घरे उद्ध्वस्त झाली याबद्दल आपण काहीच बोलत नाही.- नरेंद्र थिगळे, संभाजीनगर

पुलंना भेटता आलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकरंग’ मधील (८ जून) ‘पुलंवजा पंचवीस वर्षं… ’ मध्ये ‘न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण’ हा उत्पल व. बा. व सॅबी परेरा यांचा ‘बटाट्याच्या चाळीचं रिडेव्हलपमेंट’ हे दोन्ही लेख वाचले. मन भूतकाळात गेलं आणि पुलंची रेल्वेत झालेली अकस्मात भेट आठवली. १९८० च्या दशकात मी ‘द सेंट्रल पल्प मिल्स लिमिटेड’ या कंपनीच्या शिवाजी नगर, पुणे येथील प्रधान कार्यालयात सेल्स ऑफिसर या पदावर कार्यरत होतो. कंपनीच्या कामानिमित्त नेहमी मुंबईला जावे लागत असल्यामुळे माझ्याकडे डेक्कन क्वीनचा फर्स्ट क्लासचा पास होता. एके दिवशी सकाळी सव्वासातच्या सुमारास डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकावरून सुटण्याआधी पाचच मिनिटे असताना माझ्या शेजारच्या सीटवर सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे ‘हाश्श-हुश्श’ करीत विराजमान झाले. खिशातून रुमाल काढून त्यांनी कपाळावरचा आणि मानेवरचा घाम पुसला आणि मला म्हणाले, ‘‘अहो, कमला नेहरू पार्कसमोरील रुपाली अपार्टमेंटमधून मी भांडारकर रोडपर्यंत चालत आलो. कुठे रिक्षाच मिळेना! शेवटी चालत चालत ‘गुड लक’ रेस्टॉरन्टच्या चौकापर्यंत आलो तेव्हा एका फियाट मोटारीतून जाणाऱ्या सद्गृहस्थाने मला ओळखले आणि त्याच्या कारमधून स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली म्हणून कसाबसा वेळेत पोचलो आणि गाडी गाठता आली! अलीकडे रिक्षाच वेळेवर मिळत नाही आणि हल्ली रिक्षाची भाडी किती वाढली आहेत नाही?’’ ज्या काळात पु. ल. देशपांडे फाऊंडेशनने ५० लाख रुपयांच्या देणग्या दिल्या होत्या त्या दस्तुरखुद्द पुलंचे हे उद्गार ऐकून मी चकित झालो. एवढा मोठा माणूसही किती साधा! त्यांच्या ‘पुणे- मुंबई’ प्रवासाचे कारण समजले. तेव्हा ते नरिमन पॉइंट मुंबईतील सुप्रसिद्ध ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ अर्थात एनसीपीए या सांस्कृतिक कला केंद्राचे संचालक म्हणून काम पाहात होते. आमच्या रेल्वे डब्यात दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे आहेत ही बातमी तेव्हा वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्याभोवती चाहत्यांचा जो गराडा पडला, त्यातून त्यांची प्रवासभर सुटका झाली नाही. त्यांची काव्यशास्त्र विनोदाची मैफल मात्र चांगलीच रंगली. परंतु सुरुवातीच्या संभाषणानंतर ते काही माझ्या वाट्याला आले नाहीत. मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट आणि सहवास हा एक सुखद योगायोग होता.- डॉ. विकास इनामदार