‘लोकरंग’ (२२ मार्च) ‘बालमैफल’मधील श्रीनिवास बाळकृष्ण यांच्या ‘तुला वाटेल ते काढ’ ही लेखमाला खूपच छान आणि मुलांच्या कल्पक मेंदूला रंगांच्या दुनियेत धम्माल पिकनिक मोडवर टाकून भरपूर खुराक पुरवणारी अशी आहे. सध्या परीक्षा चालू असल्याने कधी तरी भरपूर अभ्यास झाल्यानंतर थोडा वेळ करमणूक म्हणून हा प्रयोग माझ्या अकरा वर्षांच्या मुलींना करायला द्यायचं मी ठरवलं होतं. पण त्याचा परिणाम पाहता मेंदू ॲक्टिवेट करायलासुद्धा याचा उपयोग होतोय हे लक्षात आलं.

माझ्या मुलींना चित्रकला आवडतेच, त्यामुळे ‘डोळ्यांची घडी कागदावर ब्रश’ या लेखातील वेगळा प्रयोग करायला त्याही उत्सुक होत्याच. फक्त चित्रकलेनंतर जमिनीवर पसरलेलं नक्षीकाम आपल्याला आवरावं लागू नये म्हणून फक्त त्यांनी या वेळी कोरड्या रंगांनी चित्रं काढायचं ठरवलं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोघींनी कागद समोर ठेवून बाजूला पसरलेल्या रंगांमधून एक एक रंग निवडून चित्र काढलं. त्यानंतर ऋषिकाने शेजारी सगळे रंग मांडून ठेवले. एकदा रिकाम्या कागदाचा कॅनव्हास आणि एकदा शेजारी इंद्रधनुष्याच्या पॅटर्नमध्ये मांडलेले रंग दोन्ही काही सेकंद डोळ्यात साठवून घेतले आणि मग चित्र काढायला सुरुवात केली. तर राधिकाने लाल, हिरवा, पिवळा असा एक एक रंग माझ्याकडून मागून घेतला आणि चित्र काढू लागली. कागद छोटा होता आणि क्लिप केलेल्या नव्हता. त्यामुळे रंग घेईपर्यंत तो उडाला की दोघी आपल्या बोटांनी कागद चपापून कोणती बाजू असेल ते तपासून बघायच्या. मी काहीच सूचना न देता शांतपणे त्यांना फक्त बघत बसले होते.

आता हे करताना ऋषिका हातांनी कागदाच्या कडांचा अंदाज घेत स्ट्रोक्स देऊ लागली. आणि राधिका एकेका रंगाचा वास घेऊन बघायची. हे सगळं जाम मजेशीर आणि नवे अनुभव आणि शिक्षण देणारं होतं. डोळे उघडल्यावर राधिका आनंदाने ओरडली, ‘‘आई मला कळालं होतं की यात मी वापरलेला रंग लाल आणि पिवळा आहे!’’ ऋषिका तर डोळे बंद करून काढलेली चित्रं पुन्हा एकदा उघड्या डोळ्यांनी काढून बघत होती. दोन्ही वेळच्या अनुभवांमध्ये, डोळ्यांनी आणि हातांनी चित्र रेखाटण्यामध्ये काय फरक आहे ते समजून घेण्यात ती मग्न होती. राधिकाच्या अजून एक गोष्ट लक्षात आली होती ती म्हणजे, आपलं एक ज्ञाने्द्रिरीय झाकल्यावर बाकीची चार जास्त जोमाने कार्य करू लागली होती.

हा सगळा अनुभव दोघींनी आपला आपण घेणं अतिशय महत्त्वाचं आणि आनंददायी होतं. सरतेशेवटी ‘‘मुलांनो, आपण यातून काय शिकलो?’’ हा तर विषय चर्चेलासुद्धा घ्यायचा नाही, तर जिथला तिथे सोडून द्यायचा, हे माझं मत आहे. तासाभराच्या एवढ्याशा कृतींमधून मेंदूच्या शिरा-खोर्‍यांपर्यंत कित्ती केंद्रं जुळली गेली असतील याची गणती करणं अवघड आहे! हे घरात मोफत चालून आलेले असे अनमोल अनुभव आपण मुलांना दिले पाहिजेत. – प्रज्ञा वझे

सखोल चिकित्सक अभ्यास

‘लोकरंग’ (१५ मार्च) मधील ‘नक्षल चळवळीच्या अपयशाचा चेहरा…’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख नक्षलवादी चळवळीच्या वर्तमान दुरवस्थेवर आणि तिच्या नैतिक अध:पतनावर नेमकेपणाने भाष्य करतो. १९६७ मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या एका छोट्याशा ठिणगीतून ज्या वणव्याची सुरुवात झाली, त्याने सुरुवातीला शोषितांच्या आणि वंचितांच्या मनात समतेच्या राज्याची स्वप्ने पेरली होती. मात्र, सहा दशकांनंतर जेव्हा आपण या चळवळीच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतो, तेव्हा ‘न्याया’ऐवजी केवळ ‘हिंसा’ आणि ‘प्रगती’ऐवजी केवळ ‘दहशत’ उरलेली दिसते. हा लेख म्हणजे एका फसलेल्या आणि भरकटलेल्या क्रांतीचा चिकित्सक शोकलेख आहे. – प्रवीण नारायणराव डोईबळे, अंबरनाथ, ठाणे</strong>