असमा सौंदलगे बेग
करोना हा शब्द आता आपल्याला परिचित झाला असला तरी त्यामागे दडलेली वेदना, गोंधळ, एकटेपणा, गुदमरलेपणा, श्वासाच्या गरजेसाठी धडपड आणि हळूहळू हरवणारी माणुसकी हे सगळं अजूनही कुठेतरी अंतर्मनात सलत राहतं. समाजाच्या प्रत्येक थरावर एक अनामिक सावली फेकून गेलेली ही महासाथ म्हणजे केवळ वैद्याकीय आपत्ती नव्हे; तर ती माणसांच्या भावविश्वावर, नातेसंबंधांवर, जगण्याच्या पद्धतीवर उमटलेली खोल जखम आहे. डॉ. रमेश साळुंखे यांची ‘भिंगुळवाणे दिवस’ ही कादंबरी या महासाथीच्या काळात जगलेल्या प्रत्येक माणसाच्या आतल्या भावनांचा आरसा आहे.
या कादंबरीचा आत्मा आहे यशवंतराव शंकर कणसे हा पन्नाशी पार केलेला एक पत्रकार. कवलापूरसारख्या शहरालगतच्या गुलमोहर सोसायटीत राहणारा, आपल्याच लयीत, शब्दांशी प्रामाणिक राहणारा एक माणूस. त्याचं जग छोटंसं – पत्नी रमा, एक मुलगा, एक मुलगी- लिली आणि ‘सत्यदर्शन’ नावाचं स्थानिक वृत्तपत्र. पण करोना आल्यानंतर हे सगळं जग हादरतं. घरातल्या भिंती संकुचित होतात, घराबाहेरचं भय वाढतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लिहिणाऱ्या हातात कंप निर्माण होतो. शब्द निस्तेज होतात. अशा काळातही यशवंतराव लिहीत राहतो सत्य यथार्थ आणि वास्तव.
‘भिंगुळवाणे दिवस’ या कादंबरीचा महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये असणाऱ्या दहा पत्रांचं संकलन… पण ही पत्रं सामान्य अर्थाने लिहिलेली नाहीत. यातील प्रत्येक पत्र म्हणजे त्या काळातील एका बाजूचं प्रातिनिधिक चित्रण आहे. एखाद्या मेडिकल स्टोअरवाल्याला लिहिलेलं पत्र केवळ औषधांच्या किमतींबद्दल तक्रार करत नाही, तर ती माणसांची परवड, त्यांच्या असहायतेची आणि आरोग्य यंत्रणेमधल्या मर्यादांची जाणीव करून देते. सामान्य माणसाची होणारी लूट आणि परिस्थितीचा गैरफायदा करून घेत लोकांची असंवेदनशील मनोवृत्ती दर्शवते. नानू नावाच्या भाच्याला आणि गुरुजींना लिहिलेलं पत्र म्हणजे बेरोजगारीचं ओझं, शिक्षण आणि नोकरी यांच्यामधली तुटलेली साखळी, टाळेबंदी, अडकून पडलेले कामगार, व्यर्थ राजकारण आणि वास्तव परिस्थितीचे चित्रण आहे. प्रत्येक पत्र वाचताना असं वाटतं की, लेखक आपल्याशीच बोलत आहे, ही आपल्यावरच बेतलेली व्यथा आहे. लेखकाने पत्रलेखनाची शैली निवडली आहे, ती मनाशी सरळ संवाद साधते. कादंबरीत भाभी आणि चाचा या पात्रांद्वारे वापरलेली ग्रामीण बोली ही केवळ भाषा नाही, ती संवेदनांची साक्ष आहे. ‘‘काय करावं, कोणाला सांगावं, कोणी ऐकावं?’’ असे उद्गार म्हणजे त्या काळातल्या हतबलतेचं रूपक ठरतं. संवादांमध्ये वापरलेले स्थानिक शब्द, तिथल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब आणि मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या वेदनांचं प्रामाणिकपणे केलेलं व्यक्तीकरण- हे सगळं कादंबरीला जिवंत बनवतं.
डॉ. साळुंखे यांच्या लेखनशैलीची एक ताकद म्हणजे त्यांनी भाषिक सौंदर्य टिकवून ठेवत कथनशैलीला नाट्यपूर्ण वळण दिलं आहे. कथेमध्ये प्रचंड वेदना असूनही लेखक कुठेही अतिशयोक्ती करत नाहीत. उलट, त्यांच्या संयत भाषेमुळे वेदना अधिक भिडतात.
कादंबरीत जी विविध सामाजिक पातळ्यांवरची संकटं मांडलेली आहेत, ती वरवरची नाहीत. मजुरांच्या स्थलांतराच्या समस्या, शाळा-कॉलेज बंद असल्याने शिक्षण थांबलेली मुलं, शहरात अडकून पडलेले ग्रामीण लोक, ऑनलाइन शिक्षणासाठी साधनांची अनुपलब्धता, हातावर पोट असलेले कामगार, सरकारची हतबलता, शिक्षकांची पंचाईत शेतकऱ्यांच्या अडचणी, भाजी विक्रेत्यांची भीती या सगळ्या घटना जिवंत वाटतात. चाचा, भाभी, आप्पा, काका, गुरुजी, विमलताई ही सगळी पात्र आपल्या सभोवतालचीच वाटतात.
कोरोना काळात घडलेल्या घटनांचा केवळ सरकारी आकड्यांपुरता विचार केला तर आपल्याला एकसंध चित्र दिसत नाही. पण या कादंबरीमुळे आपल्याला त्या आकड्यांमागची माणसं, त्यांची दु:खं, त्यांच्या आशा-अपेक्षा आणि त्यांचं न उमगलेलं मानसिक स्वास्थ्य याची खरी जाणीव होते. उदाहरणार्थ, अंत्यविधीच्या वेळेस रक्षाविसर्जनही करता न आल्याची वेदना, डॉक्टर नर्स यांचं तासन्तास पीपीई किटमध्ये काम करणं, कोरोना झालेल्या आपल्या माणसाला भेटता न येणं, शिक्षणासाठी शहरात-परदेशात असलेल्या मुलाची ताटातूट, सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं आणि अस्तित्वाचं अवमूल्यन ही दृश्यं कादंबरी वाचताना आपल्या डोळ्यांपुढे उभी राहतात.
सर्वात भावनिक पातळी गाठणारा भाग म्हणजे मुख्य पात्राच्या स्वत:च्या अनुभवांचं कथन. यशवंतरावला करोना झाल्यानंतर त्याला समाजाबाबत वाटणारी भीती, अस्पृश्यतेसारखी वागणूक, नोकरी जाणं, आर्थिक विवंचना आणि त्यातून निर्माण झालेलं मानसिक- भावनिक संकट… या सगळ्या गोष्टी संवेदनशील पद्धतीने मांडलेल्या आहेत. पात्राची ही आत्मस्वीकृती म्हणजे केवळ लेखकाची शौर्यगाथा नाही, तर सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची साक्ष आहे.
या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ त्या काळाची हकीकत सांगत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावते. आपण अशा संकटांना सामोरं जाताना माणूस म्हणून काय गमावतो आणि काय शिकलो, याचा परिपाक यात ठायीठायी दिसतो. कुठेही पोकळ आशावाद नाही, पण निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायची एक जिद्द आहे.
इतिहास हा केवळ राजकीय किंवा आर्थिक घडामोडींचा नसतो, तो माणसाच्या भावनांचा, मनाच्या हालचालींचाही असतो. परिणामी ही कादंबरी केवळ साहित्यिक कृती न राहता, एक सामाजिक, मानवी आणि नैतिक दस्तऐवज ठरते.
ही कादंबरी म्हणजे म्हणजे एका काळाचा हळुवार, संयत आणि तरीही परिणामकारक अशा शैलीत लिहिलेला शब्दचित्रपट आहे. तो काळ पुन्हा येणार नाही, पण त्याच्या जखमा अजूनही जिवंत आहेत. त्या जखमा ओलसर ठेवून, त्यांचं स्मरण करत, त्यातून काही तरी अर्थ शोधायचा असेल तर ‘भिंगुळवाणे दिवस’ ही कृती अनमोल ठरते.
‘भिंगुळवाणे दिवस’- डॉ. रमेश साळुंखे, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, पाने-२८०, किंमत- ३५०
बाजारात दाखल
सिल्व्हर नीड्ल
● सुमेध वडावाला (रिसबूड) ● मनोविकास प्रकाशन
इस्लामी जगत
● बाळ पाटणकर ● प्रकाशक : अतिक बाळ पाटणकर
बालशिक्षण एक उद्भुत सफर
● रती भोसेकर ● ग्रंथाली
अर्घ्य● प्रज्ञा जोशी-कुलकर्णी ● उन्मेश प्रकाशन
माझे बीएआरसीचे दिवस
● सुरेश हावरे ● रोहन प्रकाशन
फूल उमललं विश्वा बदललं● डॉ. मंदार दातार ● मनोविकास प्रकाशन
पारक● अमर गोरे ● पॉप्युलर प्रकाशन
कोवळं ऊन● नीला बर्वे ● प्रकाशिका : अलका भुजबळ
स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज● डॉ. संजय गायकवाड ● साकेत प्रकाशन
नवा परीघ● आश्लेषा महाजन ● दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
asmabaig1002@gmail.com
