‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील नीरज हातेकर यांचा ‘इतकी झुरळे आली कुठून?’ हा लेख वाचला. पूर्वी शिक्षण ही एक अशी पद्धत होती की कोणत्याही ऋतूत चार-पाच मैल चालत येऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यावेळची मॅट्रिक पास असलेले शिक्षक अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी घडवू शकले. त्या वेळी कोणताही शिक्षक कुठल्याही राजकीय पक्षामुळे दबावाखाली येत नव्हता. पाचएक मैलांची डोंगरामधून कंबरभर गवतातली वाट तुडवत, पाठीवर छत्री अडकवून शाळेत वेळेवर पोहोचायचा. ते शिक्षक जे शिकवायचे ते शब्दांच्या माध्यमातून थेट काळजाला स्पर्श करायचे. हातात काठी असायची, पण ती संस्कार घडवून जायची. आताची परिस्थिती याउलट आहे. उच्चशिक्षित शिक्षकच घाणेरडं राजकारण आणि राजकारण्यांचे पुरस्कर्ते होताना दिसताहेत. – संतोष शिवाजी बामणे, बेळगाव
नैसर्गिक प्रवृत्ती लोकशाही
‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील वरुण सुखराज यांचा ‘परिपक्व लोकशाहीकडे…’ या लेखामध्ये लोकशाहीची एक नवी व्याख्या दिसते. लोकशाही म्हणजे मुळातच मला जे मान्य नाहीये ते व्यक्त करण्याची ताकद किंवा हिंमत. ‘लुप्त झालेला ‘राजधर्म’’ या लेखांमध्ये दडपशाहीचे वर्णन केले आहे. त्यावरून एक लक्षात येते की, पंतप्रधान सत्तेवर आल्यापासून सतत स्वत:ला असुरक्षित समजत असावेत. त्यामुळे त्यांनी अनेकांना तुरुंगात पाठवलेले दिसते. अगदी वयोवृद्ध माणसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत. त्यांनी सुरक्षेच्या कारणावरून त्यांना तुरुंगात पाठवलेले दिसते. हा मानसिक रोग असावा की काय? असा संशय निर्माण होणे साहजिकच आहे. एवढेच नव्हे तर हे ढोंग असण्याची शक्यतादेखील दिसते. अशा गोष्टीमुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा वाढत नसून पंतप्रधानपद हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसत आहे. नीरज हातेकर यांच्या ‘इतकी झुरळे कुठून आली’ या लेखांमध्ये सरकारला काही उद्योगपती मोठ्या प्रमाणात रसद पुरवितात असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे साहजिकच उद्योगपतींना अनुकूल असे धोरण सरकार बनवत असावे.- युगानंद गुलाबराव साळवे, पुणे</p>
राजधर्माचा विसर पडतो तेव्हा…
‘लोकरंग’ (२६ जुलै) मधील ‘परिपक्व लोकशाहीकडे…’, ‘लुप्त झालेला ‘राजधर्म’’ आणि ‘इतकी झुरळे कुठून आली?’ हे अनुक्रमे वरुण सुखराज, पंकज फणसे, नीरज हातेकर या तीनही लेखांनी वाचकांच्या बौद्धिकतेला साद घालून, खरेच ‘लोकशाही परिपक्व होईल का?’ यावर चिंतन करण्यास भाग पाडले आहे. लोकमाध्यमातून आपली मते मांडता येतात, पण माध्यमांचा आवाज जेव्हा क्षीण केला जातो, तेव्हा जंतर-मंतरवरून आंदोलनाची ठिणगी पडते, हा देशाचा इतिहास राहिला आहे. लोकशाहीवरचे संकट दूर झाल्याचा साक्षात्कार दिसून येतो. पेपर फुटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनातून तरुणाईने सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, पण ‘जर तर’च्या परिघावर लोकशाहीची चक्रे फिरत राहणार आहेत. शिक्षण व्यवस्थाच नव्हे तर अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराने सारा देश पोखरून काढला आहे. त्यामुळे देश कर्जाच्या खाईत बुडतो आहे. विकासाची पावले मंद होऊ लागलीत. खासगी गुंतवणूक कमी झाली. रोजगारीत कमालीची घट झाली आहे. महागाई वाढली. एकेक राज्ये काबीज करून, सत्तेचा अश्वमेध यज्ञ करण्यासाठी विरोधकांचे गढ नामशेष करून टाकण्यात सत्ताधीश इतके गर्क झालेत की, राजधर्म म्हणजे काय असतो, याचाच विसर पडला आहे. युवा शक्तीचा जागर होतो तेव्हा सत्ताबदलाचे वारे वाहू लागतात, हे सत्ताधिपतींनी जाणून घ्यायला हवे. – डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, छ. संभाजीनगर
