‘लोकरंग’मधील (२८ डिसेंबर) संजीव खांडेकर यांच्या ‘तिसरा हेलिक्स’ या लेखावर ‘तिसर्या हेलिक्स’च्या निमित्ताने…’
(४ जानेवारी) ही डॉ. सदानंद मोरे यांची प्रतिक्रिया वाचली. या लेखाची त्यांनी गंभीर दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्रत्येकाचे काम ही सौंदर्यनिर्मिती असावी, हे मार्क्सचे स्वप्न होते असे ईगलटन म्हणतो. त्यामुळे प्रत्येक मार्क्सवाद्याला कलेबद्दल आस्था वाटतेच वाटते, त्यामुळे मार्क्सवादी सौंदर्यशास्त्राने आणि कलेने मानवी जीवन समृद्ध करण्याचा ध्यास घ्यावा हे साहजिकच आहे. मोरे यांनी एका अंतर्विरोधावर नेमके बोट ठेवले आहे. चांगली मार्क्सवादी कला साम्यवादी समाज स्थापन झालेल्या देशातच कशी काय निर्माण झाली नाही?
आपण रशियाचे उदाहरण घेऊ. इथे अव्वल क्रांतीच्या काळात कलेतले अस्सल प्रयोग झाले. मायकोव्हस्कीसकट इतर कवींच्या कविता आजही चकित करतात. त्या काळातल्या रशियन सिनेमाने केलेले प्रयोग तर अद्भुतच म्हणावे लागतील. रंगभूमीवरही अनेक प्रयोग झाले. त्या सर्वांत एक खुलेपणा होता. माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर बॉल्शेव्हिक क्रांतीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जर्मन दिग्दर्शक इर्विन पिसकॅटर याने कम्युनिस्ट राजवटीच्या साह्याने अख्खे मॉस्को शहर हेच नेपथ्य आणि सारी जनता त्यात भाग घेणारे कलाकार असा अचाट नाट्यप्रयोग केला होता. कलानुभव हा सामान्य जीवनाचा अतूट आणि जैव हिस्सा बनला पाहिजे ही क्रांतीचीच प्रेरणा होती.
पण मग माशी कुठं शिंकली? त्या नवजात मानवी प्रयोगाचा गळा घोटण्यासाठी साम्राज्यवादी देशांनी कसा हस्तक्षेप केला हे आपण जाणतोच. जन्मत:च अनुभवावे लागलेल्या जीवघेण्या शत्रुत्वाने रशियन क्रांतीच्या मानसिकतेवर जबर आघात केला. आपल्याला आता सततच्या युद्धजन्य परिस्थितीत या नवजात समाजाचे रक्षण करावे लागणार आहे, हे तेथील राज्यकर्त्यांच्या मनात खोलवर रुजले. त्याची उजळणी दुसर्या महायुद्धात झाली आणि ते झाल्यावरही शीतयुद्धाच्या छायेत सतत राहावे लागल्याने राज्यकर्त्यांना सतत आपण शत्रूंनी घेरले गेलेले आहोत, ज्याला इंग्रजीत साई मेंटालिटी म्हणतात तिने ग्रासले. सत्तेला कोपर्याकोपर्यावर शत्रू आहे असे भासू लागले. शीतयुद्ध केव्हाही तप्त झाले असते अशी वास्तव परिस्थिती होतीच होती. अफगाणिस्तान, इराक, लिबिया, येमेन, इराण, मुख्यत: गाझा आणि आता व्हेनेझुएला प्रकारानंतर तर व्हिएतनाम आणि क्यूबा हे अपवाद नव्हते हे स्पष्ट झाले आहे. कुणा कम्युनिस्ट राजवटीसोबत भांडवलशाही देशांनी सौख्याचे आणि सहकार्याचे धोरण ठेवले आहे? गोर्बाच्योव्हसारख्याचा तर त्यांनी विदूषकच करून टाकला. हे सारे विषयांतर वाटेल, पण पहिले समाजवादी राष्ट्र कोणत्या खोल जखम करणार्या दिव्यातून गेले, त्याच्या नेतृत्वातील मानुषता कशी लोप पावली याची कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अतिशय धारदार चिकित्सा आयझॅक डॉयश्चर यांनी स्टालिनच्या चरित्रात केली आहे.
रशिया, चीन आदी साम्यवाद प्राप्त केलेले समाज आहेत असा गैरसमज कुठल्याही सुजाण कम्युनिस्ट नेत्याने वा विचारवंताने आजवर केला असल्याची मला माहिती नाही. साम्यवादी पक्षांच्या पुढाकाराने कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली भांडवलशाहीतून समाजवादाकडे संक्रमण करणारी पावले त्या राजवटी उचलू पाहात होत्या, अजूनही ती वाटचाल प्रयोगाच्या अवस्थेतच आहे. त्यामुळे तेथे साम्यवाद प्रस्थापित होऊनही श्रेष्ठ प्रतीची कला का निर्माण होत नाही या प्रश्नामागे एक सहानुभूतिपूर्वक कळकळ असली तरी ती अपूर्ण समजावर आधारलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. जिथे समाजवादाने चार- दोन पावले उचलली जातात न जातात तोच तिची कित्येक योजनेत पीछेहाट होते अशा परिस्थितीला साम्यवाद ठरवल्याने श्रेष्ठ कलानुभवाची अपेक्षा करणे अनैतिहासिक होईल.
बरे, एखाद्या तथाकथित मुक्त समाजात श्रेष्ठ कलाकृती जन्माला येतात आणि त्या कलाकृती ज्या जाणिवांचे पोषण करते, त्या जाणिवा निर्माण होऊनही ट्रम्पसारखे जगबुडवे त्या सुसंस्कृत जगाचे सारथ्य करू लागतात, एकदा नव्हे दोनदा करू लागतात, त्या समाजाच्या सांस्कृतिक धारणांचे काय करावे?
ख्रिस्टोफर कॉडवेल यांनी ‘स्टडीज इन ए डाईंग कल्चर’ आणि ‘फर्दर स्टडीज इन ए डाईंग कल्चर’ ही पुस्तके मागील शतकाच्या दुसर्या-तिसर्या दशकात लिहिली होती. आता त्या मृत कल्चरवरच नवी पुस्तके लिहावी लागतील. युजेन योनेस्कोच्या एका नाटकातील बेडरूममध्ये ठेवलेले प्रेत फुगत फुगत दरवाजा तोडून दिवाणखान्यात घुसू लागते. ते दिवाणखान्यापर्यंत येऊन थांबणार नाही हे घरी जाणार्या प्रेक्षकांना योनेस्को सांगतो. ब्रेख्तच्या सुरात सूर मिसळून आज म्हणावे लागेल, ‘‘विनाशकाळातही गीत असेल काय? होय, विनाशकाळाचेच गीत असेल.’’संजीव खांडेकरचा लेख या द्वंद्वाचा निर्देश करतो. – उदय नारकर
विस्थापितांची प्रगती व आवश्यक
‘लोकरंग’ (१८ जानेवारी) मधील मिलिंद बोकील यांचा ‘उद्याचे विस्थापित’ हा लेख अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक आहे. कोरडवाहू शेतीच्या दुर्दशेमुळे निर्माण झालेला रोजगाराचा अभाव, रोजगार हमी योजनेची हेळसांड यांमुळे दारिद्र कायम राहते. आदिवासी ग्रामस्थांना खनिजातल्या स्वामित्वधनाचा हिस्सा मिळायला हवा. प्रदूषण करणे म्हणजेच विकास नव्हे. आदिवासींचा कणा लोखंडासारखा ताठ करणे व त्यांच्या ्त्रिरयांच्या रक्तातील हिमोग्लोबीन वाढविणे हा विकास हवा. नवीन शाळा, शिकलेली मुलं, पशुसंवर्धन व पशुपालन या व्यवसायात पडू इच्छित नाहीत. नागरी औद्योगिक जगण्याकडे वाटचाल होत आहे. स्थलांतर स्थित्यंतर हवे, पण कृषी ग्रामीण व्यवस्था उजाड करून नव्हे. कृषी ग्रामीण व्यवस्था स्थिर व संपन्न करण्यात यावी. घरातील दोन व्यक्तींना पंचक्रोशीतच वर्षभर रोजगार मिळाला पाहिजे. आरक्षण व स्पर्धा परीक्षा ही लोकांना झुलवावयाची साधने आहेत. ग्रामीण वंचित समूहाच्या विकासासाठी साधे सूत्रच उद्याच्या विस्थापितांचा प्रगती व आरोग्यास फलदायी ठरेल.-अरुणभाऊ धर्माळे, ठाणे
वास्तववादी लेख
‘लोकरंग’ (१८ जानेवारी) मधील मिलिंद बोकील यांचा ‘उद्याचे विस्थापित’ व हृषीकेश गावडे यांचा ‘बदलती धनगरवाडी’हे दोन्ही लेख वाचले. संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालक वर्ष (कल्ल३ी१ल्लं३्रःल्लं’ ीं१ ःऋ फंल्लॠी’ंल्लि२ ंल्लि ढं२३ः१ं’्र२३२) म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हे काळाची गरज ओळखणारे व अत्यंत प्रासंगिक लेख आहेत. –संजय दाणे, पुणे
आदिवासींना विस्थापित करण्याचा उद्योग
‘लोकरंग’ (१८ जानेवारी) मधील मिलिंद बोकील यांचा ‘उद्याचे विस्थापित’ हा लेख वाचताना २०११ सालचा ‘मानव विकास अहवाल’ आठवला. यात जबरदस्त अंतर्विरोधांनी भरलेल्या राज्याचे चित्र नमूद केले होते आणि आजही ते कायम आहे. आपल्या देशात किंवा राज्यात वंचितांसाठी काही करण्यावर भर दिला जात नाही हे अतिशय वाईट आहे. हा वर्ग फक्त घोषणांमध्ये असतो. केवळ नियोजन, खर्चात त्यांच्यासाठीचे आकडे वाचायला मिळतात. मग हा नियोजनाचा पैसा जातो कुठे? आपल्या राज्यात नियोजन फक्त कागदावर असते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच हा वंचित समाज अविकसित राहिला आहे. त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक व्यवस्था आजही पोहोचलेली नाही. काही वंचित शिक्षित होऊन शहरात येऊन रोजगार मिळवून स्थिर आयुष्य जगतही आहेत, पण हे प्रमाण खूपच कमी आहे. शासनाने तर कायदा करून आदिवासी क्षेत्र ताब्यात घेण्याचे उद्योग सुरू केले आहेत. वन विभाग आदिवासींच्या मागे उभे न राहता शासनाच्या आदिवासींना विस्थापित करण्याच्या उद्योगांना मदत करीत आहे.- नीता शेरे, दहिसर
भावलेले व्यक्तिमत्त्व!
‘लोकरंग’ मधील (१८ जानेवारी) अरुंधती देवस्थळे यांच्या ‘जादूई दिवस’ या सदरातील ‘हजार चौराशीर मा’ हा लेख वाचला. लेख खूप मार्मिक वाटला. महाश्वेतादेवी हे एक अष्टपैलू, पण साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची विचारसरणी सुस्पष्ट होती. त्यांनी आदिवासींसाठी केलेले कार्य अनुकरणीय होते, तर त्यांनी वेठबिगारी विरुद्ध उभारलेली चळवळ अनेकांना मार्गदर्शक ठरणारी होती. या लेखामुळे एका बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची सुंदर ओळख वाचकांना झाली. एक वाचक म्हणून ही ओळख खूप भावली.- प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे
मनोज्ञ आकृतिबंध
‘लोकरंग’मधील गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदराची सांगता ‘गेले द्यायचे राहून’ या लेखाने झाली. व्यंकटेश माडगूळकरांच्या शब्दात नमूद करायचे झाल्यास ‘दिवस कसे भराभर, देवापुढे लावलेल्या कापरासारखे संपतात.’ निरोपाची ही भैरवी सादर करताना लेखकाने तीन दिग्गजांच्या देदीप्यमान जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे, अतिशय लालित्यपूर्ण शैलीत. एक प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, दुसरी विश्वविख्यात गायिका- जी मल्लिका-ए-गझल म्हणून ओळखली जाते ती बेगम अख्तर आणि तिसरे प्रयोगशील, अभ्यासू शास्त्रीय संगीताचे गायक पंडित कुमार गंधर्व. या सदरात संदर्भसंपन्नता, भेटींचे फुलोरे, संपर्कातील मांदियाळी यांचा मनोज्ञ आकृतिबंध लेखकाने सहजसुंदर शैलीत रेखाटला. ज्यू समाजावर हुकूमशहा हिटलरने केलेले अनन्वित अत्याचार आपणा सर्वांनाच ज्ञात आहेत. आईनस्टाईन तर स्वत: ज्यू, पण असे असूनही या समाजासाठी वेगळे राष्ट्र असण्याची गरज नाही असे त्याचे परखड मत होते. पण लक्षात राहतो तो त्याने नॉर्मन थॉमस याला लिहिलेल्या सडेतोड पत्रांमुळे. याच्या जीवनाचा परामर्ष घेताना लेखकाने अनेक घटना, संदर्भ नमूद केले आहेत- जे लेखाची वाचनीयता वाढवितात. केवळ विज्ञान आणि संशोधन नव्हे तर त्या बाहेरही त्यांचे प्रतिपादन काळाच्या कसोटीवर उतरले आहे. बेगम अख्तरीबाईंनी तर अवघ्या विश्वास आपल्या दर्दभर्या सुरात सामावून घेतले आहे. त्यांच्या गझलांनी रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले. इंदौरचे रसिकाग्रणी रामुभय्या दाते यांनी दिलेली दाद त्यांना प्रेरक आणि प्रोत्साहक वाटे. आणि म्हणूनच ते रुग्णालयात असताना तिथे जाऊन त्यांना आवडीची गझल ऐकवली होती. त्यांच्या आठवणी लेखकाने सहजसुंदर शब्दांत नमूद केल्या. तिसरे दिग्गज पंडित कुमारगंधर्व. शास्त्रीय अभ्यासू प्रयोगशील व्यक्तिमत्त्व. यांच्यांवरही रामूभय्यांची विशेष मर्जी होती. गायनाबरोबरच कुमारजींनी संगीत क्षेत्रात केलेले संशोधनही मोलाचे. लेखमालेची भैरवी तर रंगतदार झाली, पण यापुढे हे सदर असणार नाही ही चुटपुट लागून राहिली.- अशोक आफळे, कोल्हापूर

