दासू वैद्या यांचा लेख वाचला. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण असा हा लेख सद्या:स्थितीचे नेमकेपण सांगणारा आहे. मोबाइलचा समाजमनावर, तरुण पिढीवर होणाऱ्या दुर्दैवी परिणामांवर नेमके भाष्य करणारा असा लेख आहे. मी शाळेत गेल्या ३० वर्षांपासून कलाशिक्षिका म्हणून अध्यापनाचे काम करतेय. या लेखातील अनेक मुद्दे अगदी योग्य आहेत. सध्या आम्ही शाळेत अनुभवतोय की मोबाइलच्या अतिवापराने मुलांची श्रवण, संभाषण, वाचन व लेखन कौशल्येही धोक्यात आली आहेत. एसएमएसची संक्षिप्त भाषा त्यांच्या लिखाणात आलेली दिसते आहे. ‘गूगल’ सर्वच शोधून देते म्हटल्यावर मुलांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होत आहे, असे अनेक शिक्षकांचे निरीक्षण आहे. या लेखातील सर्व मुद्दे अगदी योग्य आणि वास्तव आहेत. मोबाइल डेटाच्या अतिवापरामुळे संयम, एकाग्रता, विवेक, स्मरणशक्ती धोक्यात येत आहे हे आपल्या सर्वांसाठीच अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे.– कामिनी प्रसाद पवार, जळगाव
मोबाइलच्या पलीकडील जग शोधायला हवं!
हे दोन्ही लेख मोबाइल क्रांतीमुळे निर्माण झालेल्या संस्कृतीचे अघोरी दुष्परिणाम अधोरेखित करतात. मोबाइल हे एक तंत्रज्ञान आहे आणि ते स्वत:च्या मर्जीने चालू शकत नाही हे जरी सत्य असले, तरी त्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी होतो यावरच त्याची उपयुक्तता अवलंबून असते. केवळ थ्रिल अनुभवण्याच्या नादात आभासी जगण्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्यास आयुष्याचे प्रचंड नुकसान होते याचे साधे भानही आजच्या तरुण पिढीमध्ये दिसून येत नाही आणि हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंताजनक वाटते. आजच्या आधुनिक युगात मोबाइल क्रांतीमुळे संपूर्ण जग जरी मुठीत आले असले तरी याच मोबाइल संस्कृतीमुळे माणसामाणसांतील नातेही दुरावत चाललेले आहे आणि हे चित्र आता सर्वत्र पाहावयास मिळत आहे. जो तो घरात आणि घराबाहेरही मोबाइलमध्ये डोकावत असल्याने घराघरातील आणि एकूणच समाजातील संवाद हरवत चाललेला आहे. मोबाइलच्या अति आहारी गेल्यामुळे आपली खरी संस्कृती लुप्त होत चालली आहे. समाजमाध्यमांच्या आभासी जगात आज आपण अधिकच गुंतत चाललो आहोत. नको त्या गोष्टी स्वीकारत आणि गरजेच्या गोष्टी विसरत चाललो आहोत. अंतिमत: त्याचा परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. कारण आपणच आपल्या सुखसुविधेसाठी अशा तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे आणि प्रत्येकच गरजेसाठी पूर्णत: त्यावर अवलंबून राहिल्याने त्या गोष्टीला आपणच आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणून स्वीकारले आहे. अशा परिस्थितीत या तंत्रज्ञान, आंतरजाल आणि समाजमाध्यमांना दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. मुळातच समाजमाध्यमाच्या बाहेरही खूप मोठे जग आहे हे आपण या मोबाइल संस्कृतीच्या नादात विसरलो आहोत आणि यातून बाहेर पडणंही आपल्याच हातात आहे. मोबाइल शिवायही उत्तम जीवन जगता येऊ शकते, यावर समाज मंथन आणि विचार मंथन व्हायला हवे.– डॉ. बी. बी. घुगे, बीड
संयम, एकाग्रता धोक्यात
दासू वैद्या यांनी मार्मिक व उत्कृष्ट दृष्टांत देऊन वाचकांना अंतर्मुख केले आहे. लेखातील काही उपहास तर वाखाणण्याजोगे आहेत. उदाहरणार्थ- बीएसएनएल व सरकारी शाळा एकसाथ मरणपंथाला गेलेल्या हे सांगताना कंसात असलेल्या ‘लावलेले’ हा शब्द खूप काही सूचित करून गेला. हा लेख भाषाशैलीचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. जसे की, फोनोग्राफीमुळे जगण्याची कॅलिग्राफी लडखडली. संशोधनाबाबत लेखकाने नमूद केलेले मत आपण ग्राहक आहोत, संशोधन करण्यासाठी आपल्याला वेळ नाही हे विचार करायला लावणारे आहे. मोबाइलमुळे स्मरणशक्ती कमी होत आहे याचा अनुभव दररोज घेत आहोत. पूर्वी लँडलाइन असायचे. त्यावर नंबर डायल करावा लागायचा, त्यामुळे बरेच नंबर तोंडपाठ असायचे. स्क्रीन टच मोबाइलमुळे आता अनेकांना स्वत:चा नंबरसुद्धा माहीत नसतो. मोबाइलच्या अतिवापराने मानवाने कमावलेली स्मरणशक्ती, संयम, एकाग्रता, विवेक धोक्यात येणार नाही ना? हा सवाल माझ्यासारख्या वाचकाला पडतो.– डॉक्टर हेमंत पाटील
डेटाखोरीच्या लाभाचे वास्तव
दासू वैद्या यांच्या लेखातील आरंभीची भयानक बातमी यापूर्वीच वाचलेली होती. या लेखातून तिच्या अनेक बाजू अधोरेखित झाल्या. या नव्या डेटाखोरीचे लाभ आपल्याला सगळ्यांनाच मोहवतात, त्यातून बहुसंख्यांना आपण चौफेर पोहोचलो आहोत, लोकप्रिय आहोत हे समाधान वाटते. स्वत:च्या सामान्य सहली इत्यादींबद्दल सर्वत्र कळवून फोटो पाठवून सगळ्यांकडून लाइक मिळवण्याची हाव वाढताना दिसते. या तात्पुरत्या समाधानात मद्याधुंदीसारखे नुकसान संभवते. पण मूठभरांवर या डेटाखोरीचा आत्यंतिक नकारात्मक परिणाम का होतो? मी वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे, मला कोणी नाही म्हणता कामा नये असे त्यांना का वाटते? परक्या व्यक्तीने एखादी गोष्ट देण्यास नकार दिला तर राग येण्याचे कारणच नाही. कारण मागणे हीच चूक आहे. हे न उमगणारी आठमुठी मने का तयार होतात? समजा राग आलाच तर चार शिव्या, एखादी थप्पड यावर थांबता का येत नाही?
मला नकार देणाऱ्याला मी वाटेल ती अद्दल घडवू शकतो या उन्मादाला स्वत:साठी फासाचा दोर लटकतो आहे किंवा निदान पोलीस कोठडीतल्या तपासणीला सामोरे जायचे आहे हे का दिसत नाही? विचार करायला वेळच नाही एवढेच कारण पुरेसे आहे? आणखीही बरीच कारणे आहेत.– विनया खडपेकर
खुळ्यांची चावडी
मोबाइल डेटाच्या अतिवापरामुळे लोकांवरील विपरीत परिणाम सांगताना लेखकाने जिल्हा परिषद शाळा, सरकारी दवाखाना आणि बीएसएनएल खरोखर गोरगरिबांचे आणि सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे हक्काचे ठिकाण असूनसुद्धा सरकारी धोरणांमुळे मरणपंथाला लागले हे वास्तवही मांडले आहे. निसर्गाशी करावयाची जवळीकसुद्धा माणूस विसरला आहे याचे वास्तविक भान या लेखातून व्यक्त केले आहे. बाकी संशोधन करायला शोध लावायला आपल्याला वेळच कुठे आहे? कोणतीही गोष्ट वापरण्याची अक्कल येण्याआधीच त्या वस्तूंचा भडिमार होऊन जी अवस्था होते, तीच आज आपल्या समाजाची झालेली पाहायला मिळते. हातात मुबलक डाटा व तंत्रज्ञान आले, पण त्याचा वापर कसा करायचा याची बुद्धी नसल्याने समाजात जिकडे तिकडे खुळ्यांची चावडी पाहायला मिळते.-राजेंद्र डांगे, सोलापूर.