‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ हा लेख वाचला. विजयाबाईंच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलचा हा लेख वाचताना मनात कालवाकालव झाली, पण त्याच वेळी एका प्रतिभावंत कलावंताचा आणि तितक्याच संवेदनशील संपादकाचा प्रवास वाचून एक वेगळाच आनंदही मिळाला.
विजयाबाईंसारख्या शिस्तप्रिय आणि स्वत:च्या कलेशी एकनिष्ठ असणार्या व्यक्तिमत्त्वाचा मुलाखतीचा अनुभव मांडताना लेखकाने जे बारकावे टिपले आहेत, ते खरोखरच वाचनीय आहेत. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून केलेली ‘रिहर्सल’ आणि प्रश्नांच्या मांडणीबाबतचा त्यांचा आग्रह, हे त्यांच्या कामाप्रति असलेल्या गांभीर्याची साक्ष देतात. आजच्या काळात, जिथे मुलाखतींचे स्वरूप तात्कालिक आणि वरवरचे झाले आहे, तिथे बाईंची ही तयारी आणि लेखकाने दिलेली साथ थक्क करणारी आहे. तसेच, बाईंच्या घराचे ‘मिनिमलिस्टिक’ वर्णन आणि त्यांच्या आतिथ्यशील स्वभावाचा केलेला उल्लेख वाचकाला त्यांच्या आयुष्याच्या जवळ घेऊन जातो. एका मुलाखतीसाठी त्यांनी केलेली पूर्वतयारी, रंगमंचावरील कलाकाराप्रमाणे केलेले सूक्ष्म निरीक्षण आणि प्रेक्षकांना समोर ठेवून दिलेली उत्तरे… यातून बाईंचं आपल्या कामावर असलेल्या अफाट प्रेमाची आणि व्यावसायिकतेची जाणीव होते. कसलेला संपादक आणि विजयाबाईंसारख्या अनुभवी कलाकाराची जेव्हा भेट होते, तेव्हा त्यातून उलगडणारा संवाद ही केवळ माहिती नसते, तर तो संवाद वाचकाला समृद्ध करून जातो. बाई गेल्यावर त्यांच्या मुलाखतीचे व्हिडीओ तुकडे समाजमाध्यमांवर फिरणे आणि लोकांकडून आलेली प्रशंसा, हेच सिद्ध करते की त्यांचे व्यक्तिमत्त्व किती उत्स्फूर्त आणि रसिक होते. हा लेख केवळ एका मुलाखतीची गोष्ट नसून, ती एका प्रतिभावान कलाकाराच्या कार्यपद्धतीला दिलेली एक भावपूर्ण आदरांजली आहे. विजयाबाईंच्या साहित्याशी, रंगभूमीशी आणि नात्यांशी असलेली त्यांची एकनिष्ठता या लेखातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. -प्रवीण नारायणराव डोईबळे, अंबरनाथ, ठाणे</p>
चांदण्याची अनुभूती
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ तसेच अंबरीश मिश्र यांचा ‘ती येते आणिक जाते’ या दोन्ही लेखांतून विजयाबाईंना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. हे दोन्ही लेख मी चारपाच वेळा काळजीपूर्वक वाचले. विजयाबाईंचे आंतरिक नाट्यवैभव शब्दांकित करणे, तसेच ‘बाईं’चा मोठेपणा आणि त्यांच्या जीवनप्रवासाची सार्थकता अचूक टिपली आहे. आठवणींची ही अनुभूती चांदण्याची अनुभूती वाटते. दोन्ही लेखकांनी आपल्या मनाचे कल न लपवता लिहिले असल्याचे जाणवले. ‘बाईं’ची जगण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या नाट्यसाधनेतून निर्माण होणारी चेतना खूपच चांगल्या प्रकारे टिपली आहे. दोन्ही लेख अत्यंत काळजीपूर्वकतेने लिहिल्याचे जाणवते. म्हणूनच त्याचे मोल केवळ अलौकिक आहे.- डॉ. कमलेश सोमण
विजयाबाईंचे मोठेपण
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ हा लेख वाचला. लेख वाचून खूप छान वाटलं. माझ्यासारख्या ९०च्या दशकात जन्मलेल्या, इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पिढीला बाईंची ओळख मुख्यत: त्यांच्या मुलाखतीमधूनच झाली. मी त्यांना पहिल्यांदा निखिल वागळे यांच्या ‘ग्रेट भेट’मध्ये पाहिले होते. नंतर हळूहळू त्यांच्या कामाची, व्यक्तिमत्त्वाची आणि मराठी रंगभूमीवरील त्यांच्या स्थानाची जाणीव होत गेली. हा लेख विशेष आवडण्याचं कारण म्हणजे त्यात बाईंच्या मोठेपणाचा गजर नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे छोटे-छोटे बारकावे आहेत. चष्म्यातून गोड हसणे, मुलाखतीपूर्वीची तालीम, आधी प्रश्न पाठवण्याचा आग्रह, हातातला माईक यावरही केलेला विचार, हे तपशील फार सुंदर आहेत. असे तपशील वाचले की समोरची व्यक्ती केवळ मोठी कलाकार म्हणून नाही, तर जिवंत माणूस म्हणून समोर येते. बाईंची ‘तयारी’वरची श्रद्धा आणि मुलाखतीलाही तितक्याच गांभीर्याने घेण्याची त्यांची पद्धत फार आवडली. ‘जसे दिसते तसे नसते’ हे आपण मराठीत म्हणतोच. त्या अर्थाने हा लेख वाचताना बाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पदर उलगडला. पारसी डेरी अजून आहे की माहीत नाही, पण हा लेख वाचल्यानंतर त्या कुकीज खायची इच्छा मात्र नक्की झाली.- सिद्धेश
कौतुकाची नोंद मनोरंजक
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ या विजयाबाई मेहता यांच्या मुलाखतीची कथा व त्यांच्या ‘उत्स्फूर्त’ उत्तरांबद्दल श्रोत्यांनी केलेल्या कौतुकाची नोंद मनोरंजक आहे. रविवार विशेषमध्ये छापलेली मुलाखतही वाचली. आमचा रेनेसॉं हा युरोपियन पद्धतीचा नव्हता असे विजयाबाई म्हणतात व ते या लेखामधूनही स्पष्ट जाणवते. युरोपियन रेनेसॉं म्हणजे सर्व क्षेत्रांतील वैचारिक क्रांती होती- जी आपल्याकडे आजतागायत होऊ शकलेली नाही. वैचारिक क्रांती म्हणजे एक स्फोटक वा नावीन्यपूर्ण दमदार संकल्पना असते. मुलाखतीचाही सराव करण्याचा आग्रह धरणारे सुप्रसिद्ध कलाकार अशी वैचारिक क्रांती कशी घडवणार?- किरण गोखले
उत्तम लेख
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ तसेच अंबरीश मिश्र यांचा ‘ती येते आणिक जाते’ हे दोन्ही लेख वाचले. मुलाखत देणारा आणि घेणारा यांची मानसिकता कशी असते याचे सुंदर विश्लेषण केले आहे. विजयाबाई नुसत्या मंचावर उभ्या राहिल्या तरी त्या कधी समोरच्या श्रोते वर्गात आहेत असं वाटत असते आणि त्याच वेळी पडद्यामागे सूचनादेखील देत आहेत असा भास होतो.- प्रभु अग्रहारकर
नितांतसुंदर अनुभव
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ हा लेख वाचला. लेख खूपच आवडला, तो वाचताना विजयाबाईंची शिस्त व त्याचे फलित किती परफेक्ट असते याची जाणीव झाली. हा लेख वाचताना नितांतसुंदर अनुभव मिळाला.- अशोक भरते, पुणे</p>
अस्सल मराठी विजयाताई
‘लोकरंग’मधील (५ जुलै) गिरीश कुबेर यांचा ‘बाईंच्या मुलाखतीची गोष्ट’ तसेच अंबरीश मिश्र यांचा ‘ती येते आणिक जाते’ हे दोन्ही लेख मनाला स्पर्शून गेले. विजयाताई नाट्य क्षेत्रातील महान व्यक्तित्त्व, संगीत नाटक अकादमी म्हणजे विजयाताई असं समीकरण होतं! जागतिक रंगभूमीवर मराठी नाटक यशस्वीपणे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. विजयाताईंनी केलेल्या भूमिका संस्मरणीय राहतील. ‘बॅरिस्टर’मधली मावशी आणि ‘वाडा चिरेबंदी’मधील आई… दोन्ही अस्सल मराठी भूमिका म्हणजे विजयाताईंचे अप्रतिम स्मारक होय!- एम. सी. जैन
एक विद्यापीठ
लोकरंग’मध्ये (५ जुलै) अंबरीश मिश्र यांचा ‘ती येते आणिक जाते’ हा लेख वाचला. नियोजन, व्यवस्थापन, वक्तशीरपणा, कार्यकौशल्य, शिस्त, माणूस आणि माणुसकी या गुणांचा सुंदर संगम म्हणजे विजयाताई मेहता. या लेखातून एका महान रंगकर्मीच्या व्यक्तिमत्त्वाची अधिक ओळख झाली. कलावंताची अचूक पारख, प्रेक्षकांच्या अपेक्षांची उत्तम जाण आणि नाट्यक्षेत्रातील त्यांचे विलक्षण योगदान पाहता त्यांना ‘एक विद्यापीठ’ का म्हटले जाते, याची प्रकर्षाने जाणीव झाली.
– विश्वनाथ पंडित, ठाणे
