‘लोकरंग’(जुलै ४)मधील नयन डोळेलिखित ‘दक्षिणी सिनेमांचा दिग्विजय’ लेख वाचला. लेखात वेगळ्या दक्षिणी चित्रपटांचा ऊहापोह केला आहे. हे सिनेमे एवढे यशस्वी का झाले, या प्रश्नाची वेगळा विषय, प्रयोगशीलता, सिनेमाची प्रगल्भता, प्रेक्षकांची विकसित झालेली अभिरुची इत्यादी कारणमीमांसा केलेली दिसते. पण लेखाच्या शेवटी हे नमूद केले आहे की, ‘सिनेमात कुठेही हिरोपण नाही’ हेच खरे या यशाचे मर्म आहे. मराठीतील ‘सैराट’मधील परशा-आर्ची या हिरो-हिरॉइनना कोण ओळखत होते? किंबहुना, त्यातले सगळेच कलाकार नवीन होते. तिथे हिरोपण नव्हतं. म्हणूनच तो चित्रपट मराठी प्रेक्षकांना भावला. जोपर्यंत मराठी चित्रपट साचेबद्ध स्टारकास्टच्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत कितीही नवीन विषय हाताळला तरी तो मराठी प्रेक्षकांना भुरळ घालू शकणार नाही. मराठी प्रेक्षक आता तेच ते चेहरे पाहून पार पकले आहेत. म्हणूनच नागराज मंजुळेंचे सिनेमे ते आवर्जून पाहतात. मग तो ‘सैराट’ असो, नाही तर ‘नाळ’! कारण त्यांत कुठेही ‘हिरोपंती’ नसते.

– अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई</strong>

दक्षिणी चित्रपटांची पर्वणी

नयन डोळे यांनी लिहिलेला ‘दक्षिणी सिनेमांचा दिग्विजय’ हा लेख खूप आवडला. मराठी माणसाने मराठी वगळता हिंदी सिनेमांसोबतच दक्षिणी सिनेमा त्यांतील विषयवैविध्यामुळे नक्कीच बघायला हवा असे वाटते.   लेखात केवळ दक्षिणी चित्रपटांची जंत्री न देता त्यांच्या कथानकातील वेगळेपण आणि आगळी पात्रे यांचे रंजक विश्लेषण केले आहे. परिणामी लेखाचे मूल्य खचितच वाढले आहे.

– केदार केंद्रेकर, परभणी</strong>