scorecardresearch

पडसाद : सच्चा माणूस

समारंभातील सर्वच मान्यवरांनी हे पत्रवाचन भारावून टाकणारे असल्याचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख केला.

‘लोकरंग’मध्ये (२० मार्च) धर्मराज पाटीलच्या शेवटच्या श्वासाबद्दल कवी सौमित्र यांचं अनुभवकथन ‘मेरी आवाज सुन रहे हो ना धर्मराज..?’ वाचलं. हे अनुभवकथन काळजाला भिडणारं होतं. त्यातून एक गुणी अभिनेता आणि प्रतिभावंत कवी यापेक्षा एक सच्चा माणूस म्हणून सौमित्र यांची वेगळी ओळख झाली. यानिमित्ताने पंचवीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. दरवर्षी ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनी राज्यभरातील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा शासकीय समारंभ आयोजित केला जातो. त्या वर्षी समारंभामध्ये ‘अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र’चे वाचन करण्याचे ठरवले होते. कोणतेही आढेवेढे न घेता सौमित्र यांनी ते करण्याचे मान्य केले. सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर स्थानापन्न झाले तरी कार्यक्रमाला सौमित्र यांचा पत्ता नव्हता. आयोजकांच्या मनावरील ताण वाढत होता. तेवढय़ात सौमित्र दारात हजर झाले आणि पुढच्या मिनिटाला पडद्यामागून माइकवरून सौमित्रच्या धीरगंभीर आवाजात लिंकनचे पत्रवाचन सुरू झाले. सभागृहात स्तब्धता पसरली. जेमतेम दोनच मिनिटांचे प्रभावी वाचन.. पण सारे त्या अप्रतिम वाचनाने मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्या ऐकण्यापूर्वीच सौमित्र ज्या टॅक्सीतून आले त्यात बसून परत गेलेही. त्यांच्या हाताला सलाइनची सुई, पट्टी व नळी पाहून समजले की ते मलेरियामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असून अंगात ताप असताना ते पत्रवाचनासाठी हजर राहिले होते. कोणालाही कळू न देता, गुपचूपपणे दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी केलेली ती धडपड कौतुकास्पदच होती. समारंभातील सर्वच मान्यवरांनी हे पत्रवाचन भारावून टाकणारे असल्याचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख केला.

एका अनोळखी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी असो किंवा दिलेला शब्द पाळण्यासाठी केलेली धडपड असो, एक सच्चा माणूस म्हणून सौमित्र यांचा अभिमान वाटतो.

बसंती रॉय

सकारात्मक लेख

‘लोकरंग’मध्ये (२७ मार्च) ‘समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?’ हा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा लेख वाचला. पु. ल. देशपांडे आजही का आठवतात, त्याचा वेगळाच कोन लेखकाने मांडला.. जो सद्य:परिस्थितीत बोलका आहे. समोरील व्यक्ती आपलं नुकसानच करणार, ही भावना म्हणजे नित्य जीवनातील नकारात्मकताच आहे. विठोबा व रखुमाई मला आवडतात. ते नि:शस्त्र व बिनधास्त उभे. कुणाचीही भीती नसलेले. आपण असं का होऊ शकत नाही? पुलंही तेच सांगतात. या लेखाने वाचकांना पुन्हा सकारात्मक केलं.   – रंजन जोशी

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers reaction on lokrang article zws 70

ताज्या बातम्या