scorecardresearch

Premium

पडसाद : ..तर मानवसमाजाचा विलय!

अगदी दोन डिग्रीपर्यंत तापमानवाढ रोखायची तरी यापुढे जगातील एकूण कर्ब-उत्सर्जन ४०० गिगा-टनच्या आत ठेवलेच पाहिजे.

readers reaction on lokrang article
(संग्रहित छायाचित्र)

बॅटरीवर चालणारी वाहने, पवन/ सौरऊर्जा, हरित इंधने यांचे नुसते गुणगान गायचे, पण त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय व इतर प्रश्नांकडे सोयीस्कर डोळेझाक करायची हे योग्य नाही, हा गिरीश कुबेरलिखित  ‘पर्यावरणाचा विवेक’ या लेखातील मुद्दा योग्यच आहे. पण हेही खरे आहे की, २०५० पर्यंत खनिज तेल, कोळसा, तेल इ. जीवाश्म इंधनांचा वापर शून्यावर नेणे अत्यावश्यक असल्याने मुख्यत: पवन/ सौरऊर्जेची कास धरण्याला पर्याय नाही. आय. पी. सी. सी.च्या रिपोर्टनुसार, २०३० पर्यंत जगातील कर्ब-उत्सर्जन निम्म्यावर आणि २०५० पर्यंत शून्यावर आणले तरच तापमानवाढ २०५० पर्यंत १.६ अंश सेल्सियसपर्यंत रोखता येईल. हे साधणे अशक्यप्राय दिसते आहे. अगदी दोन डिग्रीपर्यंत तापमानवाढ रोखायची तरी यापुढे जगातील एकूण कर्ब-उत्सर्जन ४०० गिगा-टनच्या आत ठेवलेच पाहिजे. त्यासाठी जीवाश्म इंधने २०६० पर्यंत तरी शून्यावर नेणे अत्यावश्यक आहे. बायो-फ्युएल मिळवण्यासाठी पुरेसे पाणी व जमीन उपलब्ध नाही. तर ग्रीन हायड्रोजन पवन/ सौरऊर्जेच्या मदतीने बनवावे लागल्याने ते अटळपणे महाग पडते. त्यामुळे ऊर्जा-गरज भागवण्यासाठी अक्षय, विपुल अशा पुनर्जीवी पवन/सौरऊर्जेची कास धरण्याला पर्याय नाही.

तापमानवाढीचे प्रलयंकारी संकट टाळण्यासाठी इतर पावलं उचलणे तितकेच महत्त्वाचे आहे. कर्ब-उत्सर्जन घटवण्यासाठी पुढील गोष्टींना फाटा दिला पाहिजे : ऊर्जा- घन, पर्यावरणविनाशी विकासाची दिशा व पद्धत, त्याचाच भाग असलेला उपभोगवाद, तसेच ‘वापरा व फेकून द्या’ ही संस्कृती, नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळमाधळ व अकार्यक्षम वापर. त्याऐवजी वस्तूंचा काटकसरीने वापर, टाकाऊ मालापासून विविध उत्पादने साधणारी चक्रीय अर्थव्यवस्था व जैविक कृषी-औद्योगिक विकासाकडे वाटचाल, वने/ कुरणे/ शेती विकासामार्फत नैसर्गिकरीत्या हवेतून कर्बवायू शोषण्यावर भर, कमी ऊर्जेत जास्त काम करणारी अधिक कार्यक्षम यंत्रे/ उपकरणे/ प्रक्रिया यांचा वापर, वैयक्तिक खासगी वाहनांऐवजी बस, रेल्वे इ.वर आधारित वाहतूक व्यवस्था.. अशी दिशा आपण सर्वाच्या भल्यासाठी घ्यायला हवी. नाहीतर प्रलयंकारी तापमानवाढ होऊन इ. स. २१०० च्या आतच मानवी समाज विलयाला जाईल.

Chatgpt
विश्लेषण : रिअल टाइम अपडेट, संवाद आणि बरेच काही… अद्ययावत चॅटजीपीटी किती उपयुक्त?
rashi parivartan 2023
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ३ ग्रह एकत्र येताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता
hypertension
चारपैकी एका व्यक्तीला होतोय उच्च रक्तदाबाचा त्रास, लक्षणे न दिसताच कसा वाढतो धोका? हृदयरोगतज्ज्ञ सांगतात…
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!

डॉ. अनंत फडके

नकारात्मक सूर खटकला..

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख वाचला. सर्वप्रथम green energy generation बाबतीत सारासार साक्षरतेची गरज आहे या लेखकाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. काहीही अभ्यास न करता प्रवाहासोबत वाहवत जाणं अयोग्यच. असे असूनदेखील या लेखासंदर्भात काही मुद्दे खटकले. ते असे : १. Green Energy ची निर्मितीदेखील पर्यावरणास हानीकारक असू शकते, म्हणून मग ती निर्माण करू नये असाच जणू या लेखाचा सूर वाटतो. २. केवळ वर्तमान विचारसरणीला आव्हान देत intellectual counter view मांडणं हे लेखाचं एकमेव उद्दिष्ट असावं असं जाणवतं. ३. पर्यावरण अनुकूल ऊर्जानिर्मिती हा एक गहन विषय असून त्याचे अशा पद्धतीने सुलभीकरण करणे चूक आणि धोकादायक आहे. ४. ऊर्जानिर्मितीच्या प्रत्येक वाटेवर पर्यावरणहानी अटळ आहे, तर मग कमीत कमी नुकसान होईल असा पर्याय अवलंबणं हाच मार्ग योग्य नसावा का?

५. कोबाल्टच्या निर्मितीबाबतची मांडलेली समस्या ही पर्यावरणाशी संबंधित नसून मानवीय आहे. ती दूर करण्याऐवजी कोबाल्टनिर्मितीच बंद पडावी असे सुचवायचे आहे का?

६.  Green Energy Generation हीदेखील पर्यावरणास हानीकारक असू शकते. मग त्यास पर्याय काय? कोळशावरच अवलंबून राहणे? ७. सौरऊर्जा हीदेखील बॅटरीमध्ये साठवली जाऊ शकते, हा मुद्दा सोयीस्करपणे दुर्लक्षित केल्याचे जाणवते. आज ७०% वीज कोळशापासून बनते म्हणून  बॅटरीमध्ये ती साठवली जाते हे साहजिक आहे. भविष्यात हे समीकरण बदलेल असे मानायला हरकत नाही. ८. समतोलपणा हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. वाहवत न जाता जाणीवपूर्वक  sustainable solutions  चा अवलंब करणे गरजेचे आहे. याबाबतीत अधिक संशोधन व पुराव्याची मागणी योग्य वाटली असती. ९. शिवाय ऊर्जास्त्रोत अचानक बदलून पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यापेक्षा energy transition चं महत्त्व मांडणं जास्त योग्य होतं. १०. एकंदरीत लेखाचा सूर नकारात्मक असाच वाटला.

समीर गोडबोले

अभ्यासपूर्ण विवेचन

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख अभ्यासपूर्ण वाटला. शाश्वत पर्यावरणाच्या मार्गात येणाऱ्या छुप्या गोष्टींचा पर्दाफाश लेखात केला आहे. या विश्वात फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आणि या सृष्टीला जगण्यासाठी पृथ्वीवर संसाधने आहेत. पण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड लोकसंख्येसाठीे पारंपरिक तसेच अपारंपरिक ऊर्जासाधनांचा बेसुमार वापर सुरू आहे. आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात आपण पर्यावरण गमावून बसलो आहोत. मानवाने कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या अनेक गोष्टींचा तो विल्हेवाट लावू शकत नाही. मानवाच्या प्रगतीचे अंतिम ध्येय हे चांगल्या निसर्गात जगणे हेच असावे. पण पैशाच्या मागे लागलेल्या दुनियेला पर्यावरणाचा ऱ्हास करून प्रदूषित झालेल्या, हरितगृह वायू वाढलेल्या, जागतिक हवामान- बदलाशी झुंजत नाइलाजाने जगावे लागत आहे. यातून मार्ग म्हणजे नैसर्गिक साधनांचा जपून वापर, लोकसंख्या नियंत्रण, दारिद्रय़ निर्मूलन, शिक्षण या गोष्टी गरजेच्या आहेत.

आदित्य परुळेकर

अंतर्मुख करणारा लेख

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख वाचला. सध्या भारतात कोळसा टंचाई तीव्रतेने भासते आहे. शेतकऱ्यांना विजेची समस्या भेडसावत आहे. ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. सरकार विजेवरील वाहनांचा पुरस्कार करताना ती वाहने कमी प्रदूषण करतात हे लोकांच्या मनावर िबबवत आहेत. पण त्याकरता लागणाऱ्या विजेसाठी कोळसा जाळून वीजनिर्मिती केली जाते आणि त्यातून होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. विजेऱ्यांची विल्हेवाट ही प्लास्टिक आणि रबर यांच्या विल्हेवाटीपेक्षाही जास्त प्रदूषणकारी आहे. सरकारने या विजेऱ्यांसंदर्भात योग्य ते धोरण आखायला हवं. पण सध्या तरी ‘दगडापेक्षा वीट मऊ’ अशीच परिस्थिती आहे.

शंतनू देशमाने

मार्मिक लेख

गिरीश कुबेर यांचा ‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख अत्यंत मार्मिक आणि भ्रमाचा भोपळा फोडणारा आहे. तेल आणि ऊर्जास्रोतांवर कायम आपले नियंत्रण ठेवून पृथ्वीला रसातळाला नेणारा वर्ग एका बाजूला आणि यावर पर्यावरणपूरक उपाययोजनांची शेखी मिरवणारा दुसरा वर्ग असे दोघेही पृथ्वीचे नुकसानच करीत आहेत. हे सर्व प्रगत व श्रीमंत देश, भांडवलदार, सुशिक्षित आणि राजकारणी यांच्या संगनमताने चाललेले शोषण आहे. याची जबर शिक्षा व भुर्दंड मात्र सर्वानाच पडणार आहे.

सुनील वैद्य

हा वाद जुनाच!

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख उत्तम विवेचनात्मक आहे. हा वाद खरे तर जुनाच आहे. संपूर्ण वीज उत्पादन जलविद्युत प्रकल्प वापरून झाले तर काही अंशी ते पर्यावरणस्नेही होऊ शकते. पण ते शक्य नाही. मग कोळसा हाच स्वस्त पर्याय उरतो. अन्यथा लाकडे व मेणबत्त्या जाळून ऊर्जेची गरज भागवणे हाच पर्याय आपल्याकडे उरतो. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाची दररोज वाढती गरज भागवण्यासाठी सौरऊर्जा, पवन ऊर्जा, पारंपरिक वाहनांत इथेनॉल मिश्रणाचा वापर करणे या मार्गानी जाणे याचा अर्थ बोरीवली ते चेन्नई चालत प्रवास करण्यासारखेच आहे.

रवींद्र जोशी

झणझणीत अंजन

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. पर्यावरणाविषयीच्या वास्तवाबाबत या लेखात अचूकपणे मांडणी केली आहे. लेखातील ‘विजेऱ्या’ व ‘लाटा’ या शब्दांचा वापर सुखावून गेला. लेखाची अभ्यासपूर्ण आणि संशोधकीय मांडणी आवडली.

डॉ. भरत पलण

सोप्या भाषेत मांडणी

‘पर्यावरणाचा विवेक’ हा लेख माहितीपूर्ण आणि पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या विजेवर चालणाऱ्या वाहनांची दुसरी बाजू उलगडून दाखवणारा आहे. पर्यावरणासारखा विषय अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडला आहे. – तेजस तुंगारे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers reaction on lokrang article zws 70

First published on: 15-05-2022 at 01:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×