‘लोकरंग’ (३० ऑक्टोबर) मधील ‘‘प्रवाहपतित’ नसलेला अन्य माध्यमांचा प्रवाह’ तसेच ‘पर्यायी माध्यमांचा अवकाश’ हे अनुक्रमे अनुक्रमे पार्थ एम. एन. आणि रवीश कुमार यांचे लेख वाचत असताना एका घटनेची आठवण झाली. मारिया रेस्सा आणि रशियाच्या दमित्री मुरातोव या पत्रकारांना २०२१ चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. नेल्सन मंडेला, दलाई लामा, जिमी कार्टर, कोली अन्नान, बराक ओबामा, कैलास सत्यर्थी, महमद युनूस, ऑग सॅन स्यू यांच्या प्रभावळीत पत्रकारांचा समावेश झाल्याबाबत तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; पण जिवे मारण्याच्या – बलात्काराच्या धमक्या, चौकशीचा ससेमिरा आणि त्याआडून पत्रकारांचा ‘आतला आवाज’ दडपण्याच्या प्रयत्नांविरोधात दिलेली निकराची झुंज, प्रस्थापितांविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्याकामी या दोघा पत्रकारांनी जिवाची पर्वा न करता दिलेला लढा, केलेला संघर्ष लक्षात घेता शांततेचा नोबेल पुरस्कार या दोघांना का मिळाला, हे लक्षात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या आपल्याकडे पत्रकारांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले जात आहेत, त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. हाथरस बलात्कार प्रकरणाचे वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार कप्पनला यूएपीएसारख्या बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. तर ‘आल्ट न्यूज’च्या मोहम्मद झुबेरला पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून २०१८ सालच्या कथित भावना दुखावल्यावरून अटक केली. गेल्या आठ वर्षांत देशभरात तीनशेहून अधिक पत्रकारांची हत्या झाली आहे, तर ६०० हून अधिक पत्रकारांना अटक झाली आहे.

२०१४ च्या निवडणुकांत तेव्हाचा विरोधी पक्ष असलेल्या भाजप पक्षाच्या जाहिराती, बातम्या म्हणून दाखवल्या गेल्या. ‘जी दडवली जाते ती बातमी असते, उघड केली जाते ती जाहिरातबाजी’, असे विख्यात राजकीय भाष्यकार जॉर्ज आरवेल म्हणत. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणारा नवा मीडिया भारतीय पत्रकारितेत २०१४ नंतर पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांच्या ध्येयधोरणांचीच पत्रकारांना जास्त दखल घ्यायची असते. तसेच पत्रकारांना तळातल्या माणसाच्या बाजूनं असलं पाहिजे. याचा काही सन्माननीय अपवाद वगळता इतरत्र विसर पडलेला दिसतो. मध्यंतरी ‘वल्ड प्रेस मीडिया इंडेक्स – रिपोर्टर्स विदाऊट बॉरडर्स’च्या अहवालात भारताची माध्यमस्वातंत्र्य श्रेणीत घसरण नोंदवली आहे. तसेच माध्यमे, नागरी समाज आणि विरोधकांसाठीच्या संकुचित होत जाणाऱ्या अवकाशामुळे, भारत आपला ‘लोकशाही राष्ट्रा’चा दर्जा गमावण्याच्या मार्गावर जलदगतीने मार्गक्रमण करत आहे, असे निरीक्षण स्वीडन येथील व्ही – डेम इन्स्टिटय़ूटने नोंदवले आहे. एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने ‘मोदींनी देशाला करोनाच्या खाईत लोटले’ असे आपल्या बातमीत म्हटले असता मोदी सरकारने सदर ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

माध्यमस्वातंत्र्य या निकषात भारत १८० देशांच्या क्रमवारीत १४० व्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलिया २५ व्या स्थानावर आहे. सरतेशेवटी, देशावर प्रेम असण्यासाठी आणि ते व्यक्त करण्यासाठी देश चालविणाऱ्या सरकारविषयी प्रेम आणि निष्ठा असायलाच हवी, असा काही नियम असू शकत नाही, अशा आशयाच्या वचनाची यानिमित्ताने आठवण झाली.– बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>

विचार करायला लावणारा लेख
‘लोकरंग’मधील (६ नोव्हेंबर) ‘निसर्गावतार आणि हवामानकल्लोळ’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. हा लेख निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टींना स्पर्श करणारा आहे. निसर्गाविषयी विचार करायला लावणारा लेख आहे.– डॉ. डी. व्ही. मायदेव

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers reaction on lokrang articles readers amy
First published on: 13-11-2022 at 00:01 IST