‘शुभ्रतेच्या शोधात काळवंडलेली पात्रे!’ (१४ नोव्हेंबर) हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वास्तववादी होता. ग्लासगो येथे झालेल्या हवामानबदल परिषदेत चर्चा झाल्या, प्रदूषण पातळी कमी करण्याचा निर्धार व्यक्त झाला; पण त्यावर ठोस उपाययोजना केव्हा होणार? आणि याबाबत बडी राष्ट्रे खरेच उपयुक्त ठरतील असे काही उपाय करणार आहेत का? त्यातून काही  निष्पन्न होणार आहे का? पर्यावरणासंदर्भात त्वरित पावले उचलली तरच तापमानवाढ व हवामानबदल यांविषयी काही सकारात्मक घडू शकेल असे वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर, नाशिक

प्रदूषण पातळीच्या समस्येचा वेध

‘शुभ्रतेच्या शोधात काळवंडलेली पात्रे!’ (१४ नोव्हेंबर) या अतुल देऊळगावकर यांच्या लेखात त्यांनी ग्लासगो येथील जागतिक हवामानविषयक परिषदेचा वृत्तांत देऊन भारतीयांचे लक्ष जागतिक प्रदूषण पातळीच्या समस्येकडे वेधले आहे. जागतिक कर्बउत्सर्जनात आपला वाटा जेमतेम ४ टक्के एवढाच आहे ही काहीशी जमेची बाजू; पण असे असूनही कर्बवायू प्रदूषण शून्यावर नेण्यासाठी भारताने २०७० पर्यंतची मुदत मागणे हा आपल्या राज्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा कमकुवतपणा दर्शवितो. खरं तर केंद्रात आपले पूर्ण बहुमताचे सक्षम सरकार असल्याचा डांगोरा पंतप्रधान ऊठसूट पिटत असतात. केवळ म्हणूनच आपण कित्येक गोष्टी समर्थपणे करू शकतो, असा दावा ते करतात; मग २०३० पर्यंत कर्बउत्सर्जन निम्म्यावर, तर २०५०ला शून्यावर नेण्याचे जागतिक आव्हान त्यांना का पेलता येऊ नये? मोदींच्या एका निर्णयावर सर्व सरकारी गाडय़ांवरचे लाल दिवे काढले गेले, मग याच जोशात कर्बउत्सर्जनाचे जागतिक उद्दिष्ट गाठण्याचे धोरण आखत जगद्गुरू बनण्याची संधी ते का बरं दवडताहेत? की आपल्याकडचे ऊर्जा धोरण सरकारच्या नव्हे तर अंबानी व अदानी यांच्या मर्जीने व सोयीनुसार चालते, यावर ते शिक्कामोर्तब करताहेत. आपण विकसित राज्यांकडून प्रतिवर्षी १.३ लाख कोटी डॉलर्सचा निधी कोणतीही टाळाटाळ न करता वेळच्या वेळी मिळावा म्हणून ठणकावून मागणी करताना या निधीचा विनियोग कोणत्या पद्धतीने करत आपण कर्बउत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत याविषयीचे काही तरी धोरणही ठामपणे जगासमोर मांडणे गरजेचे होते. पेट्रोल- डिझेल वाहनांना पीयूसीही आपण अपरिहार्य करू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. इथून पुढे सर्व सरकारी वाहने फक्त विजेवरच चालणारी असतील असे धोरण जाहीर करून पंतप्रधान स्वत: २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी विद्युत वाहनातून राजपथावर आले तरी केवढा तरी मोठा इशारेवजा संदेश ते भारतातील अतिश्रीमंतांना देऊ शकतील. अन्यथा अशा जागतिक परिषदेतील भाषणे म्हणजे फक्त शब्दांचे बुडबुडे हेच खरे!

अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई

अपयशही सहज पचवता यावे

डॉ. संजय ओक यांच्या ‘मोकळे आकाश’ या सदरातील ‘मनपसंत अपयश’ (१४ नोव्हेंबर) हा लेख आवडला. यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक, नोकरशहा, पोलीस अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर, लेखक, चित्रकार, गायक, वादक यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यातील काही सन्माननीय व्यक्ती आत्मकथनपर लेख, आत्मचरित्रही लिहितात. अशा व्यक्ती आयुष्यातील अनेक खाचखळग्यांतून, वादळी अनुभवातून गेलेल्या असतात. समाजाला त्यांचे यश, कीर्ती, पैसा, प्रतिष्ठा दिसते; परंतु त्यामागे आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांत त्यांनी घेतलेले निर्णय, केलेला त्याग, काढलेले बरे-वाईट दिवस, उपसलेले कष्ट, अपयशाशी केलेला सामना, सुधारलेल्या चुका याचीही माहिती जर जनसामान्यांना मिळाली तर ती मार्गदर्शक व प्रेरक ठरेल. यशाचे ढोल बडविले जातात; परंतु अपयशातून यशाकडचा प्रवास नेमका कसा झाला, याचा उलगडा होत नाही. हा प्रवास अधोरेखित होत नाही. तो व्हावा हेच या लेखानिमित्ताने लक्षात आले. डॉ. संजय ओक यांनी या लेखात हे पारदर्शकपणे मांडले आहे.

डॉ. विकास हेमंत इनामदार, पुणे

अस्वस्थ, उद्विग्न करणारी परिस्थिती

डॉ. मंगला आठलेकर यांच्या ‘पुरस्कार अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ऐशीतैशी’ ( ६ नोव्हेंबर) या लेखात अस्वस्थ, उद्विग्न, मानसिकतेचे यथार्थ प्रतिबिंब उमटलेले दिसले. राज्य सरकारच्या पुरस्कारासाठी अर्ज करायला लागणे याइतकी अवमानित करणारी दुसरी गोष्ट साहित्यिकांसाठी नसावी. त्याविरुद्ध आवाज उठवला जात नाही याचे वैषम्य वाटते. साहित्यिकांनी एकही अर्ज दाखल न करता साहित्य क्षेत्रातील मंडळींकडून सरकारला निवड करण्यासाठी भाग पाडणे कठीण असले तरी अशक्य नाही. असे झाले तर साहित्यिकांच्या निवड समितीने जनतेच्या पैशातून दिलेले शासकीय पुरस्कार परत करण्याचा प्रश्न उद्भवू नये असे गृहीत धरता येईल का? पुरस्कार वापसीबद्दलच्या बेगडी अभिव्यक्तिस्वातंत्र्यातील डॉ. आठलेकरांनी उलगडलेल्या पैलूतून केवळ क्षणिक प्रसिद्धीतून बदला घेण्याचे मानसिक समाधान मिळवण्याचा साहित्यिकांचा फार्स म्हणायला हरकत नसावी. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्याच कोत्या मनोवृत्तीवर उभी ठाकल्याने सोईनुसार ही कवचकुंडले वापरण्याची लागलेली सवयच मोडायला हवी. दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांची वार्धक्याने जर्जर होण्याची वाट पाहण्याअगोदरच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून त्यांच्या वैचारिक क्षमतेचा योग्य प्रकारे विनियोग करून घेता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी डॉ. अरुणा ढेरेंचे उदाहरण ताजे आहेच. तसे झाले तर वयोवृद्ध साहित्यिकांनी स्वत:हून बाजूला होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. प्रत्येकाचे मूल्यमापन योग्य वेळीच होणे गरजेचे असते.

पुढील मुद्दा मराठी भाषेच्या जगण्या-मरण्याचा! ती चिंता फक्त लिहिणाऱ्यांना आपले वाङ्मय वाचले जाईल की नाही या भयगंडातून निर्माण झाल्यासारखे चित्र सध्या तरी उभे राहिल्यासारखे वाटते. मुळात मराठीतील बोली भाषेला मरण येणारच नाही. प्रश्न आहे मराठी  पुस्तकांचा! आजकाल अगदी मराठी भाषेबद्दल हिरीरीने बोलणाऱ्यांची मुलेही अपरिहार्यता म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात. त्यांना सामान्य दर्जाचेच कामचलाऊ मराठी समजणार. त्यामुळे ते त्यांना गती असलेल्या इंग्रजी भाषेतील साहित्याकडे वळले तर आश्चर्य वाटायला नको. न उमजणाऱ्या भाषेतील साहित्य वाचण्यापेक्षा सहजसुलभ भाषेतील वाङ्मय वाचणे ही गोष्ट सहजसाध्य म्हणून स्वीकारायला हवी.

मुळात अस्वस्थतेतून उमटणारी साहित्यबीजे ही काही इतरांसाठी साकार झालेली नसतातच. त्याची अनाहूतपणे झालेली निर्मिती लिहिणाऱ्याला समाधान देण्यासाठीच होत असते. त्यामुळे त्याचा गवगवा होणे न होणे यापलीकडील विचार आपोआपच केला जावा.

नितीन गांगल, रसायनी

उदरभरण नोहे..दिशादर्शक ठरेल

मी ‘चवीचवीने..’ हे भूषण कोरगावकर यांचे सदर नियमितपणे वाचते. कुठेही रेसिपी, वेगळा पदार्थ दिसला तरी तिकडे नजर जातेच. तशीच एकदा ‘चवीचवीने..’ या सदरावर गेली आणि हे लेख वाचणे ही एक आवड बनून गेली. या सदरामुळे आम्हाला गावोगावच्या चवी, तिथले रेस्टॉरंटस् यांची छान आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळत असते.

‘उदरभरण नोहे..’ हा लेख तर खासच! घरच्या स्त्रीचा आदर, घरातल्या पुरुषाने ती रोज करत असलेल्या त्याच त्या कामाची थोडी तरी दखल घ्यावी एवढी माफक अपेक्षा घरच्या स्त्रीची असते; पण कितीही काळ, परिस्थिती बदलत असली तरी यात फारसा बदल झालेला दिसत नाही. तिला गृहीत धरूनच कित्येक संसारगाडे पुढे जात असतील. ‘हे बाईचं काम, तिने केलं तर त्यात काय एवढं?’ आणि गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलत राहणे हे तर अनेकींसाठी नेहमीचेच! अनेकींचं श्रावणापासून जे गोळ्या खाणं चालू होतं ते दिवाळीपर्यंत सुरू असतं. अशी आशा आहे की, या लेखामुळे आपल्याकडचे कित्येक पुरुष घरातील प्रत्येक बाईचा थोडा तरी विचार करू लागतील ही आशा.

– डॉ. सुचेता शिंदे-माने, सातारा</strong>

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers reaction on lokrang articles zws
First published on: 05-12-2021 at 01:02 IST