थांग वर्तनाचा! : धर्म, कर्मकांड, श्रद्धा, आध्यात्मिकता

आपापल्या धर्मश्रद्धांविषयी वादविवाद, स्पर्धा, टीका करत अनेक समूह जिज्ञासूपणे तत्त्वचिंतन करत नावीन्याचा शोध घेत असत.

अंजली चिपलकट्टी anjalichip@gmail.com

अन्नवेचे-शिकारी ((hunter-gatherer) अवस्थेतून शेतीकडे वळताना स्थिर होऊ लागलेल्या समूहांत देवतांचं एकत्रीकरण व वचक ठेवणाऱ्या नैतिक देवतांचा उगम झाला. राजाला ईश्वरी अंश मानण्याच्या श्रद्धा आणि कर्मकांडातून समूह बांधले गेले. पण तयार झालेल्या उच्च-नीच व्यवस्थेतून समूहाच्या एकत्वाच्या भावनेला मात्र तडा गेला असावा. सामान्यजनांनी कष्ट करून संपत्ती तयार करावी आणि ‘पवित्र, ईश्वरी’ लोकांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं ही व्यवस्था सुस नसणारच. पण दु:ख/ वेदना म्हणजे ईश्वरासाठी केलेला त्याग किंवा पूर्वजन्मीचं पाप अशा कल्पित कथांचा वापर करून कर्मकांडांत, रीतींमध्ये गुंगवून ठेवणं राजांना पुरोहितांच्या मदतीनं जमलं असावं. संघभावना क्षीण झालेल्या या मनांना वेदना विसरायला लावू शकणाऱ्या उदात्त अशा धर्मश्रद्धांची उणीव जाणवत असावी हे नंतर झालेल्या घडामोडींवरून म्हणता येतं. अंदाजे इ. स. पू. १५०० ते इ. स. ३०० या काळात मध्य-पूर्वेत एकाच सुमारास उदयाला आलेले गौतम बुद्ध, कन्फ्युसिअस, लाओ-त्सू, सॉक्रेटिस, पायथागोरस या तत्त्वचिंतकांनी धर्मश्रद्धांविषयीच्या माणसाच्या कल्पना आमूलाग्र बदलल्या. यानंतरच्या काळात करुणेचा विस्तार करणाऱ्या ख्रिस्ताचा उदय झाला.

भारतीय उपखंडात सिंधू संस्कृतीपासून (इ. स. पू. ३३००) ज्ञात झालेली आचारपद्धती नंतर वैदिक कालखंड (इ. स. पू. १५००), नंतर न्याय्य-वैशेषिक, सांख्य, मीमांसा, योग, श्रमण परंपरा (जैन, बुद्धविचार), उपनिषदे, वेदांत, लोकायत अशा स्थित्यंतरांतून जाताना दिसते. खूप तपशिलात जाणं शक्य नसलं तरी समूहांच्या श्रद्धांविषयक बदल/ विविधता या दर्शनांमध्ये स्पष्ट दिसतात. उदा. ऋग्वेदात वर्णव्यवस्थेचा उल्लेख नाही. निसर्गदेवतांना प्रसन्न करण्याविषयी स्तोत्रे आहेत; पण यजुर्वेद व अथर्ववेदात वर्णव्यवस्थेतून आलेली असमान बांधणी, बुद्धिजीवी व कष्टकऱ्यांची फारकत, कष्टकऱ्यांना नाकारण्यात आलेलं ज्ञान यातून समाजाची झालेली पडझड दिसते. न्याय्य-वैशेषिक या ईश्वर आणि वेदांतील कल्पनांशी सुसंगत नसलेल्या दर्शनांत जडवादाला (materialism), तर्काला केंद्रस्थानी धरून केलेलं तत्त्वचिंतन, परमाणूची कल्पना, अक्षय्यतेचा नियम अशी वैज्ञानिक मांडणी दिसते. आपापल्या धर्मश्रद्धांविषयी वादविवाद, स्पर्धा, टीका करत अनेक समूह जिज्ञासूपणे तत्त्वचिंतन करत नावीन्याचा शोध घेत असत. तर सांगायचा मुद्दा हा की, भारतीय उपखंडात प्राचीन काळापासूनच विविध विचार-दर्शनांचे सहअस्तित्व होते. धर्म-श्रद्धांविषयीच्या विविधतेचं हे सहअस्तित्व मध्ययुगापर्यंतही भारतात होतं. म्हणूनच भारताबाहेरून आलेल्या ग्रीक, शक, हूण टोळ्या, सुमेरियन लोकांशी व्यापार, मुगल(मंगोल), पोर्तुगीज (गोवा), इंग्रज यांच्याबरोबरच्या आदानप्रदानातून इथल्या कला, राहण्या-खाण्याच्या पद्धती (काजू, जिलेबी, बिर्याणी!) ते कालगणना (शके १८९२), भाषेची देवाणघेवाण (जश्न = यज्ञ!, पेशवा, पदर, दरवाजा यांसारखे असंख्य पारसी शब्द) यातून हिंदू संस्कृती घडली आहे. मुळात हिंदू हे नावच ‘सिंधू नदीच्या पलीकडचे’ असं आपल्याला बाहेरून आलेल्यांनी दिलं आहे, हे आता सर्वाना माहीत झालंय. तर हो, हिंदू ही जगातली प्राचीन संस्कृती आणि धर्मश्रद्धांचा समुच्चय आहे आणि त्याचं बीजच अनेकत्ववादी (pluralist) आहे.

बुद्ध आणि ख्रिस्तामुळं गवसलेल्या नव्या श्रद्धेच्या आश्रयाला गेलेल्या कष्टकऱ्यांचं दु:ख कदाचित कमी झालं असावं. पण रोमनांनी ख्रिस्ती पंथाचा उपयोग स्वत:च्या सत्ताविस्तारासाठी करून प्रचंड हिंसा आणि बळजबरीतून धर्मप्रसार घडवला आणि ख्रिश्चन हा संघटित धर्म उदयाला घातला. या नव-ख्रिस्तांनी एकछत्री सत्तेसाठी मध्ययुगात इस्लाम, ज्यू व पेगन लोकांविरुद्ध छेडलेल्या धर्मयुद्धात (crusade) त्यांचा छळ, संहार आणि ज्ञानाची हानी इतकी प्रचंड होती की अंदाजे हजारेक वर्ष युरोपात अंधारयुग होतं. पोप/ चर्चच्या निरंकुश सत्तेनं बायबलविरुद्ध बोलणाऱ्या विद्वानांचा छळ केल्यानं काहीही नवनिर्मिती झाली नाही. पण याच काळात ज्ञानाची मशाल पेटती ठेवली ती इस्लामी वैज्ञानिकांनी. उदा. इब्न-सिना (औषधशास्त्र), अल-बिरुनी (मानववंशशास्त्र), अल-ख्वारिज्मी (अलजेब्रा), अल्हाझेन (ऑप्टिक्स)  इत्यादी.

बुद्धाची शिकवण सर्वदूर पोहोचवून अशोकानं त्याला संघटित धर्माचं रूप दिलं. (त्यानेही बुद्धाला न मानणाऱ्या आजीविकांची हत्या केली असावी असे काही इतिहास संशोधक म्हणतात.) सातव्या शतकात उदयाला आलेल्या पैगंबरांचा इस्लाम हाही संघटित धर्म बनला तो खलिफांच्या सत्ताकांक्षेतून. एक धर्मग्रंथ, एक ईश्वर आणि मुळात अमन, शांती आणि मानवजातीचं कल्याण अशी शिकवण असणाऱ्या या धर्माचं स्वरूप संघटित धर्मात बदलण्यात राजसत्ता सहभागी होत्या. हिंदू हा वरील अर्थानं संघटित धर्म नसला तरी भारतीय उपखंडात वावरणाऱ्या विविध आचार-विचार-श्रद्धाविश्वातून ‘प्लुरॅलिस्ट’ धागा बळकट असलेल्या लोकांच्या ‘एकत्र असण्यातून आकाराला आलेला धर्म’ असं म्हणता येईल.

पण आजची वस्तुस्थिती अशी की, या सर्व धर्माच्या आधारानं राहणाऱ्या अधिकृत राजसत्तांचे हात हिंसेने माखलेले आहेत. ख्रिस्तांची धर्मयुद्धं (crusade), इस्लामी खलिफांनी राज्य-धर्मविस्तारासाठी केलेला इतरधर्मीयांचा छळ आणि रक्तपात, कॅथॉलिक-प्रोटेस्टंट, शिया-सुन्नी, शैव-वैष्णव संहार, ज्यूंचा हिटलरी संहार, भारतात फाळणीदरम्यान उसळलेल्या हिंदू-मुस्लीम कत्तली, बौद्ध म्यानमारमधला रोहिंग्या मुस्लिमांचा छळ, सीरियातील आयसिसचा दहशतवाद, इस्रायली ज्यूंची आक्रमकता, मुस्लीम राष्ट्रांतील धार्मिक कट्टरता, भारतीय जातिव्यवस्थेतलं ‘शूद्र’ व स्त्रियांचं शोषण ही सर्व आंतरधर्मीय आणि धर्मातर्गत हिंसेची उदाहरणं संघटित धर्माच्या पराभवाची एकच कहाणी सांगतात. सामान्यजनांना दिलासा देणारी मानवीय एकोप्याची आणि सुरक्षिततेची भूमिका आज हे संघटित धर्म निभावताना दिसत नाहीत.

माणसाच्या टोळी-जीवनकाळात समूहाशी बांधून घेतल्यानं जे फायदे झाले त्यामुळे उत्क्रांतीत ती वृत्ती ‘आपण-ते’च्या भेदरेषेच्या रूपात टिकून राहिली. त्याच वृत्तीचं आजचं अवशेषरूप म्हणजे कृत्रिम, सांस्कृतिक भेदरेषा आखून त्याद्वारे होणारे द्वेषाचे संस्करण. यासाठी धर्म हे सत्ताधाऱ्यांचं हत्यार बनलं आहे. परधर्मीयांचा (किंवा वंश) उल्लेख  ‘किडा-मुंगी, झुरळं, लांडगे’ अशी विशेषणं वापरून जणू काही ‘ते’ म्हणजे माणसं नव्हेतच (pseudo-speciation) अशी मेंदूला चकवा देणारी भाषा सत्ताधारी करताना दिसतात.

तर मुख्य मुद्दा असा की, नातं नसलेल्या माणसांशीही ‘जोडून’ घेऊन (pseudo-kinship) समूहात एकोपा तयार होण्याच्या विधायक प्रेरणेपासून धर्मभावनेची सुरुवात झाली खरी; पण त्यापासून फारकत घेत दुसऱ्या धर्माची माणसं म्हणजे जणू ती माणसंच नव्हेत (pseudo-speciation) अशा विघातक प्रेरणेपर्यंत धार्मिक कट्टरतेचा प्रवास झाला आहे.

धर्म माणसाला कशा प्रकारे आक्रमक, संकुचित बनवतो याबाबतचे काही प्रयोग आहेत. त्यापैकी एक- काही सहभागींना बायबलमधली एक कथा वाचायला दिली; ज्यात एका समूहातील लोक दुसऱ्या समूहातील स्त्रीची हत्या करतात. मग तिचा नवरा टोळीतल्या सर्वाना एकत्र आणून दुसऱ्या टोळीतल्या सर्वाचा संहार करून सूड उगवतो. ही कथा सहभागींपैकी निम्म्या लोकांना सांगितली. उरलेल्यांना थोडी वेगळी सांगितली.. नवरा व टोळीतले लोक काय करायचं यासाठी देवाचा कौल मागतात. मग देव त्या दुसऱ्या टोळीला ‘शिक्षा’ करायची परवानगी देतो. त्यानुसार हिंसा करून दुसऱ्या टोळीतल्या सर्वाना मारतात, वगैरे. यानंतर सहभागींना एक स्पर्धा खेळायला सांगितली. प्रत्येक राऊंडनंतर हरलेल्या माणसांवर जिंकणाऱ्यांनी जोरात ओरडायचं अशी रीत ठरवली होती. ज्या सहभागींना आधी ‘शिक्षा’ म्हणून हिंसेसाठी देवाची ‘मंजुरी’ मिळण्याची कथा ऐकवली होती ते सहभागी ही शिक्षा करताना तुलनेत खूप आक्रमक झाले होते!

कोणताही समूह- मग तो धर्म असो की देश किंवा कंपनी- त्यांच्या सदस्यांच्या डोळ्यासमोर सतत दिसतील अशी चिन्हकं (मेटॅफर) तयार करतो. उदा. लोगो, चिन्ह (ओम, आयात क्रॉस), झेंडे, मूर्ती, पुतळे, गांधींचा चष्मा, बुद्ध-पताका वगैरे. त्या चिन्हकांप्रती आपली वैयक्तिक श्रद्धा असते आणि त्याबाबत आपण संवेदनशील असतो. ती चिन्हकं जर कोणी वापरली तर नकळत आपली सहानुभूती त्या गटाला दिली जाते. या भावनिकतेचा ते गट खूप खुबीनं उपयोग करून घेतात.

एका पाहणीत असंही दिसून आलं की, देवालयांच्या (इथे चर्च) जवळून जाताना एरवी सौम्य असणारे लोकही (इतरधर्मीय, समलिंगी किंवा स्थलांतरित लोकांविषयी) अधिक संकुचित मनाचे होतात. व्यक्तिगत प्रार्थना केल्यानं श्रद्धेच्या जाणिवा अधिक तरल बनतात ते ठीक; पण सामूहिक प्रार्थनेमुळे मात्र समूहाचा सदस्य ही जाणीव (ओळख) अधिक धारदार बनते आणि मेंदूच्या फ्रँकोपेक्षा भावनिक मेंदूचं उद्दीपन अधिक होतं. इतर सदस्यांचं अनुकरण/ अनुनय करण्याची इच्छा बळावते. विशेषत: प्रभावी सदस्यांचे विचार अधिक पटतात. झुंडीची मानसिकता ही अशी घडते. पण झुंडीत प्रत्यक्ष सामील नसणाऱ्यांचीही सहानुभूती झुंडीच्या चुकीच्या वर्तनाला मिळते, त्याचं कारण म्हणजे झुंडीने वापरलेली प्रतीकं. एखादा जमाव भगवे झेंडे घेऊन चाललाय की हिरवे की निळे, यावर आपल्या मनात उमटणाऱ्या भावनांना तपासून पाहा.

धर्माचं भवितव्य काय? मानवी समूह धर्मापायी अशीच हिंसा करत राहतील की शहाणे होतील? जगभरात काय ट्रेंड दिसतो? आज जगभरात प्रमुख धर्मीय विभागणी अशी आहे : ३१% ख्रिश्चन, २५% मुस्लीम, १५% हिंदू, ६.६% बौद्ध, तर १६% निधर्मी आहेत! हे सर्व निधर्मी अश्रद्ध नाहीत; पण संघटित धर्मापासून ते दूर गेलेत. SBNR (Spiritual, But Not Religious) अशा लोकांची संख्या युरोपात वाढतेय.

अनेक प्रगत युरोपीय देश एकेश्वरी ख्रिश्चन धर्माचे असले तरी रेनेसॅं आणि त्यानंतरच्या काळात युरोपातील ख्रिश्चन धर्म/ चर्च कठोर अशा धर्मचिकित्सेला सामोरा गेला होता आणि त्यातून अनेक धर्मसुधारणा झाल्या. यामुळे आधुनिक काळात धर्माचं स्थान जनसामान्यांत मर्यादित श्रद्धेच्या स्वरूपात शिल्लक आहे. त्यांची जीवनपद्धती अधिक रॅशनल आणि विज्ञानवादी आहे आणि लोकशाही सुदृढ आहे. अनेक भारतीयांनासुद्धा या देशांत अधिक ‘सुरक्षित’ वाटतं. धार्मिक कट्टरता असलेले देश श्रीमंत असले तरी त्यापैकी बहुतांश देशांमध्ये लोकशाही नाही, उच्च-नीचता आहे आणि सामान्य लोकांच्या जगण्यात स्वातंत्र्याचा संकोच आहे. भारतातही धार्मिक कट्टरता जोपासणारे लोक विज्ञानापेक्षा छद्म-विज्ञानाला, अंधश्रद्धांना बढावा देताना दिसतात. इतर देशांत झालेल्या वैज्ञानिक प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे फायदे (डास मारण्याच्या रॅकेटपासून विमानांपर्यंत) हे लोक घेताना दिसतात; पण त्यामागे असणाऱ्या विज्ञान-विचाराला, तर्काला प्रत्यक्ष जगताना मात्र ते अव्हेरतात. त्यांच्या या दुटप्पीपणाकडे सौम्यधर्मी लोक दुर्लक्ष करतात; ज्यामुळे काळ मात्र सोकावतो आहे.

बहुसंख्य भारतीय लोक धार्मिक कडवे नव्हते आणि आजही नाहीत. श्रद्धेपोटी आपण देवालयांमध्ये जातो, प्रार्थना म्हणतो. आपल्या धर्माची म्हणून जी प्रतीकं असतात ती आपण पवित्र मानतो. तीच प्रतीकं वागवणारे लोक ‘आपले’ आहेत असं सहजी वाटू शकतं. आपल्या श्रद्धांचा वापर करून एकगठ्ठा मतं मिळवणं सत्ताधाऱ्यांना सोपं जातं. भयानं, असुरक्षित वाटल्यानं माणसं आक्रमक, हिंसक बनतात असं मेंदूविज्ञान सांगतं. त्यामुळे भय वाढवणं हे राजकीय फायद्याचं असतं. यावर उपाय काय? धर्म/जातीची आणि राजकारणाची युती नेहमीच सामान्यांसाठी प्रगतीविरोधी ठरली आहे असं इतिहास सांगतो. प्रश्न इतकाच आहे की, या युतीमुळे होणाऱ्या तोटय़ांबाबत सामान्य लोक वेळेत सजग होतील का? प्रगत देशांमध्ये धर्माच्या आधारे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून ‘फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट’ ही वेगळी निवडणूक पद्धत वापरली जाते. त्या पर्यायाचा विचार आपल्यासंदर्भात करता येईल का? अलीकडेच फेसबुकमधून बाहेर पडलेल्या सोफी झँग या व्हिसल-ब्लोअरनं- भारतात सत्ताधारी नेत्यांची धार्मिक तेढ पसरवणारी भाषणं फेसबुक कशी हटवत नाही, हे विस्तारानं सांगितलं आहे. त्यासाठी ती लोकसभेसमोर साक्ष द्यायला तयार आहे. तिच्यासारखंच धैर्य धार्मिक दहशतवाद स्पष्टपणे नाकारण्यासाठी आपल्याला मिळावता येईल का?

पॉल टिलीच हा धर्मशास्त्रज्ञ म्हणतो, ‘समाजात तयार होणाऱ्या विसंगतींना धर्म योग्य उत्तर शोधू शकला नाही तर समाज असुरक्षित होतात आणि धर्म अप्रस्तुत (irrelevant) ठरतात.’ आज सामान्यजनांचे अनेक प्रश्न- विश्वाच्या कुतूहलापासून ते आर्थिक सुबत्तेपर्यंतचे- विज्ञान सोडवत आहे. सॅम हॅरिस हा मेंदूवैज्ञानिक म्हणतो, ‘आत्तापर्यंत नैतिकता हा धर्माचा गाभा होता. पण धार्मिक म्हणवणारे अनेक लोकच अनैतिकतेनं वागतात. त्यामुळे नैतिकतेसाठी धर्मावर विसंबून राहता येणार नाही. त्यामुळे धर्मश्रद्धेच्या जागी विवेक आणि मानवतेवरील श्रद्धा अधिक उपयोगी ठरेल.’     

माणसाला ज्ञान मिळवण्याचे मार्ग कोणते? कुतूहलातून पडणाऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करत स्वत:च उत्तर शोधणे किंवा आधी उत्तरं शोधली आहेत असा दावा करणाऱ्यांवर विश्वास ठेवून ते ज्ञान आत्मसात करणे. बहुतांश लोक दुसरा पर्याय निवडतात. संचित ज्ञानाचा प्रचंड साठा ही फक्त मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीची उपलब्धी आहे. (मानवी मेंदूची लवचीकता आपल्याला साठलेलं ज्ञान शिकण्यासाठी उपयोगाला येते, हा योगायोग नाही. संचित ज्ञान ही मोठी अडगळही आहे! त्यातलं काय राखायचं आणि काय मागे सोडायचं, याचा विवेक मात्र माणसाला अजून जमलेला नाही.) यात दोन मुद्दे आहेत- १. विज्ञानात विश्वास असला तरी त्याचं स्वरूप ‘No questions asked’असं ते नि:संदेह नसतं. शंकेचा झरोका उघडा ठेवण्याची सोय असते. उदा. ५०० वर्षांपूर्वी जी मुलं शाळेत शिकली होती त्यांनी ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ हे ज्ञान विश्वासानं खरं मानलं होतं. पण कोपर्निकसनं त्याकडे श्रद्धेनं न पाहता साशंक मनानं पाहिलं म्हणून आज आपण सत्याच्या अधिक जवळ आहोत. न्यूटनने शोधलेल्या निसर्गनियमांमध्ये त्रुटी असल्या तरी आईन्स्टाईननं त्या शोधू नयेत, कारण न्यूटन दुखावेल असं विज्ञानात कोणी म्हणत नाही. २. ‘नि:संदेह श्रद्धा मनात ठेवून ज्ञान मिळवण्याचं क्षेत्र म्हणजे धर्म’ असं मानलं तर मानवाच्या धर्मभावनेची उत्क्रांतीच झाली नसती. श्रद्धेचं मूळ स्वरूप नि:संदेह असण्याचं असलं तरी कशावर श्रद्धा ठेवावी हे अढळपद तिने धर्माला दिलेलं नाही असं दिसतं. बुद्ध, कबीर, ज्ञानदेव, तुकाराम ते विवेकानंद यांनी कठोर धर्मचिकित्सा केली ती मानवी कल्याणासाठी! ते अढळपद त्यांनी ‘विश्वाचा अंश असलेल्या मानवतेला’ देऊ केलं असावं का? दि. के. बेडेकरांनी त्यांच्या ‘धर्मप्राय श्रद्धा’ लेखात ग्रीक कथेतील फिनिक्स पक्ष्याचं प्रतीक वापरलं आहे. हा पक्षी आपली चिता रचून त्यात स्वत:ला जाळून घेतो आणि त्याच राखेतून पुन्हा भरारी घेतो. आपल्या आधीच्या श्रद्धांना जाळून घेऊन शून्यवत झालो तरच नवीन श्रद्धा मिळू शकतात. श्रद्धा अशा परिवर्तनशील राहिल्या तर कुणी सांगावं, विश्वाशी, मानवतेशी एकरूप होणाऱ्या तरल मानवी श्रद्धा गवसतीलही!               

(उत्तरार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta thang vartanacha anjali chipalkatty article about religion rituals faith spirituality zws

Next Story
चवीचवीने.. : उदरभरण नोहे..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी