‘लोकरंग’ (२५ ऑगस्ट) मधील डॉ. प्रदीप पाटील यांचा ‘नास्तिक्याची परंपरा’ हा लेख वाचला. हा लेख प्रत्येकाला विचार करायला उद्याुक्त करणारा आहे. प्रत्येकाने नास्तिक व्हावे असा लेखकाचा आग्रहही नाही. पण सध्या समाजात लोक कर्मकांडात पूर्णपणे बुडाले आहेत हेच दिसून येते. गल्लोगल्ली ठरावीक देवाचे ‘अंगात येणे’ वाढत चाललेलं आहे. ज्यांना हे पटत नाही ते हतबल आहेत. कमीतकमी सुशिक्षित असणाऱ्यांनी तर्कबुद्धी वापरून या सर्वांपासून अलिप्त राहण्याची वेळ आली आहे. श्रद्धा स्वत:पुरती मर्यादित ठेवली तर इतरांनाही त्रास होणार नाही. प्रसंगी योग्य-अयोग्य विचार केला गेला पाहिजे. तसेच समाजासाठी अथवा स्वत:साठी त्याची उपयुक्तता विचारात घेणे तार्किक ठरेल-स्नेहलता काशीकर, वडगाव.

बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख

‘लोकरंग’मधील (२५ ऑगस्ट) वृन्दा भार्गवे यांचा ‘लोभस माणूस’ हा डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्याविषयीचा लेख वाचला. डॉक्टर ज्या पद्धतीने मृत्यूला सामोरे गेले ते पाहून त्यांचं कौतुक वाटतं. मला विनाकारण कोणताही लाइफ सपोर्ट चालू ठेवू नका, असे निक्षून सांगणारे डॉक्टर माझ्यासारख्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करतात. लाइफ सपोर्ट हे खरोखरच लाइफला सपोर्ट करणारे आहे की वैद्याकीय व्यवसायाला सपोर्ट करणारे आहे असा विचार येऊन जातो. या लेखामुळे डॉक्टरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.-संभाजीराव खोचरेइचलकरंजी

दळवींच्या भाषणाने चाहते तृप्त

‘लोकरंग’ (रविवार – ११ ऑगस्ट) च्या अंकातील ‘सीमेवरचा नाटककार’ हा माधव वझे यांचा लेख वाचला. माझ्या आवडत्या लेखकांपैकी दळवी एक. ते मितभाषी होते, पण त्यांच्या मित्रमंडळाच्या गोतावळ्यात फारच मिश्कील स्वभावाचे होते, प्रिय होते. १९९४ सप्टेंबर मध्ये ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ने ‘कोकण साहित्यभूषण पुरस्कार’ देण्याचा कार्यक्रम बोरिवलीच्या गोखले हायस्कूलच्या हॉलमध्ये ठेवला होता. आयोजकांचा अंदाज चुकला असावा, कारण हॉलमध्ये त्यांचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी काही मान्यवरांची भाषणेही झाली. त्यांनी दळवींची खूपच प्रशंसा केली. दळवींनीही समारोपाला खूपच छान भाषण केले. त्यांच्या भाषणाने चाहते तृप्त झाले. अजूनही त्या कार्यक्रमाचे विस्मरण झालेले नाही ही महत्त्वाची बाब.नरेश नाकती

सरकारी ‘बाबू’ मानसिकता उघड

‘लोकरंग’मधील (१८ ऑगस्ट) मधील सुरेश भटेवरा यांचा ‘दिल्लीत अडकलेले मराठी’ हा लेख वाचला. या लेखात नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी अध्यासनाच्या स्थापनेकडे महाराष्ट्र सरकारच्या होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षावर प्रकाश पडला. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल लेखकाचे आभार. या लेखामुळे एक कोटी रुपये भरूनही मराठी अध्यासन सुरू करण्याकडे पाठपुरावा केला गेला नाही, ही गंभीर बाब उघड झाली. राज्य सरकारने मराठी भाषा विभाग सुरू केला आहे. या विभागाचे नेतृत्व मराठी मंत्र्याकडेच आहे. इतकेच नव्हे तर अनेक मराठी आयएएस अधिकारीही होते. त्यांना मराठी विभागाच्या आढाव्यात ही बाब आढळली नाही का? अशा परिस्थितीत आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे दिल्लीश्वराला अधिकारवाणीने सांगू शकतो का? यातून सरकारी अधिकाऱ्यांची बाबू मानसिकता उघड झाली.राजलक्ष्मी प्रसादमुलुंड, मुंबई</p>

समस्या रास्तच

‘लोकरंग’मधील (१८ ऑगस्ट) ‘दिल्लीतला ग्रंथविक्री प्रश्न!’ हे दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरील मराठी प्रकाशकांच्या प्रतिक्रिया वाचल्या. या प्रकाशकांनी मांडलेल्या समस्या योग्यच आहेत. आपल्या राज्यातसुद्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉलवर फारसे लक्ष दिले जात नाही, तर दुसऱ्या राज्यात काय परिस्थिती होईल? तसेच तिथे किती पुस्तकांची विक्री होईल? प्रवास व वाहतूक खर्च परवडेल का? तिथल्या व्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत त्यांना उत्तरे मिळतील का? हाच एक मोठा प्रश्न असून त्यावर समाधानकारक उत्तरे अपेक्षित आहेत.-प्रफुल्लचंद्र काळेनाशिक.

फक्त जनतेच्या पैशांची उधळण

‘लोकरंग’मधील (१८ ऑगस्ट) ‘दिल्लीत अडकलेले मराठी’ हा सुरेश भटेवरा यांचा लेख दिल्लीत २०२५ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भवितव्य रेखाटणारा होता. संमेलनाची तारीख ठरली की मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी जोर धरते आणि संमेलन संपले की ती तशीच वाऱ्यावर विरून जाते. ७५ वर्षांनी दिल्लीत होणारे हे संमेलन काही वेगळे करू शकेल का, जेणेकरून अमृतातेही पैजा जिंके अशा या मराठीला तिचे हक्काचे काही मिळवून देईल का? ‘माझ्या मराठीची बोलू कौतुकें’ असा अभिमान बाळगणाऱ्या ज्ञानेश्वरांपासूनचा ७०० वर्षांचा हा जुना इतिहास आहे. भारतातील इतर भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठी अजूनही यासाठी लाचार होऊन विनवणी करीत आहे. संमेलनामुळे विचारांची घुसळण होते, नवे विचारप्रवाह सर्वांसमोर येतात ही जमेची बाजू आहे. परंतु या संमेलनांकडे मूळ हेतू बाजूला ठेवून केवळ मिरवण्याची हौस म्हणून काही जण पाहत असतील तर पैसे आणि वेळेचा तो अपव्यय आहे असे म्हणावे लागेल. अगामी संमेलन केवळ परिसंवाद व चर्चासत्रे यांपुरते मर्यादित न राहता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारे ठरावे. अन्यथा जनतेच्या पैशांची उधळण होऊन संमेलनाची सांगता होईल.-सूर्यकांत भोसले, मुलुंड.