अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

अरुंधती देवस्थळे.. इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या अभ्यासक. प्रकाशन व्यवसायात सरकारी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपमेंट क्षेत्रांत कार्यानुभव. युनेस्कोच्या दोन प्रकल्पांत काम. बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थांमध्ये काम केल्याने अनेक देशांत भ्रमंती. कला आणि बालसाहित्यातील शोधकार्यासाठी युनिव्हर्सिटीज्च्या फेलोशिप्स. इंग्रजी, हिंदी आणि मराठीत लेखन व अनुवाद. सध्या हिमालयातील एका खेडय़ात वाचनालयांचे नेटवर्क चालवत साक्षरतेचे कार्य करतात.

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
vasai gold chain theft marathi news
वसईत ‘बंटी बबलीची’ अनोखी चोरी, प्रख्यात ज्वेलर्स दुकानाला हातोहात गंडवले
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! आता एक्सवर येणार ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’; जाणून घ्या सविस्तर…

शिल्पांच्या प्रांगणातून पहिल्या मजल्यावर नेणाऱ्या जिन्याच्या समोरच मधोमध ‘व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस’चं इसवी सनापूर्वीचं पॅरिअन संगमरवरातलं २. ४३ मीटर्स उंचीचं विशाल शिल्प भेटतं. ग्रीक हेलेनिस्टिक काळाची भव्य प्रतिनिधी. कर्ता अज्ञात. एजिअन बेटांवर भग्न अवस्थेत सापडली तेव्हा ही निर्मिती सॅमोथ्रेस बेटावर देवांना अर्पण करण्यासाठी उंचीवर मांडलेली असावी असं जाणवलं. मस्तकहीन विजयी योद्धय़ाच्या रूपात जहाजावर ओल्या फडफडत्या वस्त्रांनिशी उभी विजयदेवता.. तिला उभारलेला एक पंख. ती भग्नावस्थेत सापडली होती. तिला एकसंध करण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले. तिच्या हाताचा तुटलेला पंजा खाली एका काचपेटीत ठेवला आहे. १९व्या शतकात ती लूव्रमध्ये दाखल झाली. तिचं लूव्रमध्ये स्थान निर्माण करणं आणि साजेसं आसपासचं वातावरण बनवणं हेही सोपं नव्हतं. ते दोन-तीनदा बदललं गेलं. आणि आता दोन्ही बाजूला अर्ध्या उंचीपर्यंत हुबेहूब दगडी भिंतींसारखा भासणारा वॉलपेपर लावला गेलाय.

पौर्वात्य कलेचं फारसं प्रतिनिधित्व इथे नाही हे जाणवतं. पण असंच एक १९व्या शतकातलं, पौर्वात्य निओक्लासिकल शैलीतलं आगस्त डॉमिनिक इन्ग्रेसचं तैलरंगातलं चित्र म्हणजे ‘दी टर्किश बाथ.’ ४५. ५’’ व्यासाच्या वर्तुळात रंगवलेलं हे चित्र. प्रशस्त स्नानगृहात नवतरुणी ते पुरंध्री.. सगळ्याच मोकळेपणाने आपापलं सौंदर्यप्रसाधन किंवा स्नान करताहेत. गोऱ्यापान, भरल्या अंगाच्या ललना निर्वस्त्र असल्या तरी अंगावर मोजके दागिने. दोघी वाद्यं वाजवताहेत, एक नाचतेय. एखादी नहाणं उरकून कपडे चढवतेय. एकीने फक्त अतिशय सुंदर भरजरी टोपी घातलेली. यात दोन कृष्णवर्णीय स्त्रियादेखील आहेत. त्या दासी असाव्यात अशी त्यांची वेशभूषा आणि हावभाव सांगताहेत. इस्तंबुलच्या कुलीन स्त्रियांच्या हमाममधलं दृश्य वाटावं असं चित्र त्याने काढलं तरी कसं, हा एक प्रश्नच आहे.    

आद्यतन संस्कृती ते विसावं शतक अशी ही सौंदर्ययात्रा असल्याने त्यात नवे विभाग काळानुसार जोडले गेले. त्यासाठी अनेक तज्ज्ञांच्या बैठका आणि परामर्शातून जगभरातील विख्यात वास्तुविशारदांना निवडून ती जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येते. लूव्रचे वेगवेगळे भाग तज्ज्ञांनी प्लॅन केले आहेत. दर्शकांची वाढती संख्या पाहून १९८०-९० च्या दशकात त्याची सगळी कार्यालयं अंडरग्राऊंड करण्यात आली आणि तळमजल्यापासून सगळी जागा केवळ संग्रहालयाला देण्यात आली. त्याबरोबरच आय. मिंग या चिनी-अमेरिकन वास्तुविशारदाने प्रवेशद्वाराशी काचेचा मजबूत पिरॅमिड उभारून ती जागा वाढवून दिली. नंतर त्याला आणखी छोटे तीन पिरॅमिड्स जोडण्यात आले. जुन्या भव्य राजवाडय़ाला लागून आधुनिक काच आणि पोलादाच्या पिरॅमिडचं प्रवेशद्वार उभारणं हे अनेकांना विशोभनीय वाटलं. पण संग्रहाला जागेचं आव्हान कायमच असणार होतं. त्यातून सर्वसंमतीने मार्ग निघणं कठीण होतं.

२०१२ मध्ये उघडलेला इस्लामिक कलेचा विभाग ही लूव्रमधली अशीच नवी भर. यातील दहा दालनांत पाच हजारांवर पुराणवस्तू मांडल्या आहेत. मुघल मिनिएचर्स, पर्शियन गालिच्यांचे नमुने, दगड आणि धातूंवरील कोरीवकाम, जुन्या भरजरी कामाचे पेहराव. त्यातल्या अर्ध्याअधिक पुराणवस्तू इराणमधून आणलेल्या. त्यात बॅबिलॉनमध्ये उत्खननात सापडलेल्या इसवी सनपूर्व सहाव्या शतकातील इराणचा राजा सायरसच्या सिलिंडरची २२.५  ७ १० सेंटीमीटर प्रतिकृतीही आहे. यावर कोरलेल्या बॅबिलोनियन क्यूनेफॉम लिपीतल्या ४० ओळी  म्हणजे राजाने प्रजेच्या हक्क आणि अधिकारांसंबंधी दिलेल्या आज्ञा आहेत. मानवी हक्कांवर भाष्य करणारं हे इतिहासातील फारच आधीचं उदाहरण.

प्रश्न केवळ संग्रह व्यवस्थापनाच्या दृष्टीने किती वाढू द्यायचा इतकाच नाही, कलाकृतीच्या निवडीबद्दलची कारणमीमांसा आणि तिच्या सौंदर्याला अक्षत ठेवण्याचं तंत्र- दोन्हीही महत्त्वाचे मुद्दे. उदाहरण द्यायचं तर इथे असलेल्या सर्कल ऑफ रेम्ब्राँमध्ये ‘दि होली फॅमिली’सारख्या चित्रावर आलेली पिवळसर झाक वान गॉगला अस वाटत होती. ती निष्काळजीपणामुळे कालौघात न टिकल्याने यावर वादंग उठलं होतं.

काळाला शरण गेलेल्या किंवा दुरुस्तीपलीकडच्या कलाकृतीची संग्रहालयातून पाठवणी होते. ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि इजिप्तसारख्या काही देशांना मूळच्या तेथून आलेल्या कलाकृती/ कलात्मक वस्तू परत करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सचा पाडाव केला तेव्हा नाझींच्या लुटीपासून वाचवायला तेव्हाचे लूव्रचे उपनिर्देशक असलेले जॅक जूजा यांनी जीवाची बाजी लावून लूव्रमधली लाखो कलाकृती, बहुमूल्य चित्रं, शिल्पं आणि कलावस्तू दोनशे ट्रक्स आणि रुग्णवाहिकांमधून सुरक्षित ठेवण्यासाठी चुपचाप दूरच्या राजवाडय़ात, किल्ल्यात आणि सरदारांच्या प्रशस्त शातूंमध्ये रातोरात हलवली. म्हणूनच लूव्रच्या इतिहासात जूजा यांना मानाचं पान आहे. सगळ्यात वाईट म्हणजे हिटलरला पसंत नसलेले पिकासो, हेनरी मत्तीस आणि साल्वादोर दाली यासारख्यांची चित्रं वाटेल तशी विकून टाकली. जी विकली गेली नाहीत त्यांची समोरच्या बागेत अक्षरश: होळी करण्यात आली. पण हिटलरयुग संपल्यानंतरच्या काही वर्षांत काही कलेचे दर्दी, जाणकार, चित्रकार, क्युरेटर्स आणि वास्तुविशारदांनी वेगवेगळ्या देशांत विविध स्तरांवर प्रयत्न करून यातील अनेक कलाकृती परत मिळवल्या आणि लूव्रमध्ये परत आणल्या. लूव्रनेही नाझींनी जबरदस्तीने आणलेला ज्यू-कलेचा ठेवा शोधून शोधून मूळ मालकांना परत केला. यानिमित्ताने इतरही काही कलाकृतींची घरवापसी झाली. जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणी यापुढे तरी लुटीच्या वस्तू नकोत असा विचार तेव्हापासून सुरू झाला.

लूव्रच्या म्युझियमच्या दुकानांत अनेक कलाकृतींच्या प्रतिमा व त्यावर आधारित छोटय़ा छोटय़ा कलावस्तू- म्हणजे वह्य, रीपिंट्र्स, स्कार्फज् वगैरे मिळतात, त्या आठवण म्हणून नेता येतात. परिसरात छोटे-मोठे सुरुचीपूर्ण कॅफेज् आहेत. बाहेरपेक्षा जास्त किमतीचा, पण लूव्रला शोभेलसा तलम अस्सल ‘फ्रेंच पेस्ट्रिज’, कॉफीच्या मंद स्वादाचं ‘क्रेम ब्रुले’ किंवा रोझा बेनहरच्या सुप्रसिद्ध ‘चीज क्रेप’सारखं खाद्य इतकं नजाकतीने पेश केलेलं, की खावं की बघत राहावं हे कळेनासं होतं. ‘पेती(त) फार्मर्स’सारख्यांनी ‘टेक अवे’ची उत्तम सोय केलेली आहे. लुईस कॅफे तर पिढीजात चालत आलेलं. आतून पाहून झालं की यांच्याकडून काहीतरी घ्यावं आणि मागच्या ऐसपैस बागेत जाऊन खावं. आतल्या शिल्पांची खूप आठवण यायला लागली तर अरिस्टिद मैयोलची अप्रतिम ब्रॉंझेस पाहत डोळे निववावेत.

एकंदरीतच वाढलेला व्याप बघता १९व्या  शतकाच्या मध्यावर लूव्रमध्ये आता आणखी नवीन काही दाखल करून घ्यायचं नाही हे ठरवण्यात आलं. त्यानंतरच्या काळातील नवी कला जवळच्याच म्यूझी डौर्सीकडे सोपवण्यात आली. दरम्यान विषयानुसार/ कलाकारानुसार संग्रहालयं उघडू लागली.. जसं की इथून फारसं दूर नसलेल्या सेन्टर पॉम्पेदूमध्ये समकालीन कला आहे. त्यात वेळोवेळी विषयानुसार कलाप्रदर्शनही आयोजित केली जातात. पण बहुमजली व्यापार केंद्रातलं म्युझियम आणि त्यात दाखवलेली कला (पॉप आर्ट) या दोघांची तबियतच वेगळी. त्यांना अभिजाततेचा खानदानी आब कसा झेपणार?

हा अनमोल कलासंग्रह अवाढव्याच्या पलीकडे जायला लागला तेव्हा २००७ मध्ये फ्रेंच सरकारने युनायटेड अरब एमिरेट्सशी बोलणी करून दोघांच्या सहकार्याने अबूधाबीत दुसरं लूव्र बनवायचा निर्णय घेतला. २,६०,००० चौरस फुटांचं हे संग्रहालय म्हणजे अरबी द्वीपकल्पातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची कलावास्तू. सुरुवातीच्या ३० वर्षांसाठी लूव्रचं नाव वापरण्यासाठी त्यांनी ५२५ मिलियन डॉलर्स मूळ संग्रहालयाला फी म्हणून दिले. करारानुसार यात काही काळासाठी ३०० कलाकृतीही फ्रेंच लूव्रकडून उसन्या घेतल्या गेल्या.

ट्विलरी गार्डन्स हा सौंदर्यासक्त पॅरिसचा अतिशय सुंदर ऐतिहासिक भाग. यात अनेक म्युझियम्स आहेत.. लूव्रजवळच मॉने आणि रोदॉंसारख्या काही थोर चित्रकारांची. मुख्य म्हणजे एका अर्थी लूव्रचा उत्तरार्ध असलेलं म्यूझी डोर्सी सेनच्या समोरच्याच किनाऱ्यावर चालत १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. रंगीबेरंगी फुलांनी आनंदी दिसणाऱ्या विस्तीर्ण बागा आहेत. चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या सेन नदीचा किनारा आहे. तिच्या दोन्ही बाजूंनी इतिहासाच्या साक्षी असलेल्या जुन्यापुराण्या भव्य इमारती आहेत. नदीच्या प्रवाहावर थोडय़ा थोडय़ा अंतरावर कमानी, जवळच नोत्र दामचं धीरगंभीर कॅथ्रिडल आहे. लूव्रइतकंच त्याचं कोंदणही सुंदर आहे. पाहून झालं की नोत्र दामच्या पायऱ्यांवर अगदी शांत बसून घालवलेली संध्याकाळ हा एक उतारा असू शकतो. चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर बहुसंख्य पर्यटकांसाठी आँखों का तारा असणारा आयफेल टॉवर आहे. लूव्रमधील कला, इतिहास वगैरे न झेपणाऱ्यांसाठी तोही बराच. सौंदर्याच्या आणि अध्यात्माच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या. हा भाग सर्वानाच शब्दांत नेमकं न मांडता येणारं समाधान देणारा. आपल्याला कला कळते वगैरे गृहीत धरून लूव्रमध्ये जाऊ नये. आपल्याला ज्ञात असलेले किती कमी आणि अज्ञात कलाप्रांत केवढा विस्तीर्ण आहे, हे पहिल्याच भेटीत उमगते. प्रत्येक कालखंडाच्या कलेच्या सौंदर्यानुभूती आणि अभिव्यक्ती वेगळ्या, तंत्रं वेगळी, परिमाणं वेगळी. म्हणून तर प्रत्येक कलेचे त्या- त्या काळाचे/ कलाकाराचे तज्ज्ञ वेगळे. लूव्रचा पट प्रागैतिहासिक ते १९ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत पसरलेला. इथली प्रत्येक कलाकृती तिच्या काळाची प्रातिनिधिक. हे एका छत्राखाली बघण्याचं असामान्य भाग्य आपल्यासारख्या सामान्य दर्शकाला लाभलेलं असावं, ही भावनाच भारावून टाकणारी!

सबंध दिवस आत घालवला की संध्याकाळी मागच्या विस्तीर्ण बागेत किंवा आता म्युझियम बनलेल्या ऑरेन्जरीत बोर्दो किंवा शार्दोनीसह घालवावा. पॅरिसमधली एखादी संध्याकाळ सेन नदीकाठी चालत घालवण्यात गुजारावीच. नदीकाठी अजूनही जुनं पॅरिस कॅलिडोस्कोपमध्ये जिवंत होऊन सामोरं येतं. नाचणाऱ्यांची भरपूर घोळकी.. त्यात उत्स्फूर्तपणे सामील होणारे विविध वर्णाचे, भाषांचे लोक. कधीतरी सेनवर क्रूज घ्यावा.. संथ डौलाने दुतर्फा ऐतिहासिक इमारती पाहत जावं. सौंदर्य पाहायचं तर असतंच, पण जगायचंही असतं.. सांगणं एवढंच असावं पॅरिसचं!

आपणा सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कुठला अनुभव आपण अगदी घ्यायचाच हे ठरवून, स्वत:ला कबूल केलेली! उत्कट स्वप्नांचे रोडमॅप्स शोधून ठेवायचे असतात, कारण सहजसाध्य नसतंच काही. प्रेम आणि कलेचं प्रतीक असलेलं पॅरिस खूप काही ऐकल्या-वाचल्यामुळे बघणं अनेकांच्या संकल्पात असतं. पॅरिसमध्ये दाखवलं जातं त्यातलं एखाद् दुसरं  स्थळ पाहून घ्यावं.. पण हे शहर  पायी भटकत आपल्या आत उतरवून घ्यायची चीज आहे. अनेक जण पर्यटन कंपन्यांबरोबर पॅरिसयात्रा करतात. ते लोकांना शांजेलिजेमधली खरेदीची दुकानं, डिस्नी लँड वगैरे दाखवू पाहतात. पण बाकी सगळं विसरून जगातल्या सर्वोत्कृष्ट कलासंग्रहालयात- म्हणजे लूव्रमध्ये दिवस घालवावा.. ते पाहिल्यावर  इथली बाकी प्रेक्षणीय स्थळं न पाहिली तरी काही बिघडत नाही. काही अनुभव ‘उरकून टाकण्यासाठी’ नसतातच घ्यायचे. डॉम पेरीयॉनचा एक ग्लास की मर्लोचे चार, हा निर्णय काहींसाठी सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो.. काहींना तो सुजाणपणे करावा लागतो. ही लेखमालिका सुदैवाने माझ्या वाटय़ाला आलेल्या लूव्रचे ‘गुण गाईन आवडी’ म्हणून सुरू होतेय. काम आणि मजा दोन्ही करत मिळालेला मॉनेंची गिव्हर्नी, वेनिस त्रिनाले, कांदिंस्की आणि गॅब्रिएला मुन्टर यांचं नातं आणि म्युझिअम झालेलं घर, पिकासोच्या बायकोशी  स्टुडिओत भेट..  प्रत्येक अनुभव या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यालायक! आयुष्यातल्या तमाम बऱ्या-वाईटाचा विसर  पाडून फक्त सृजनशीलतेच्या सोहोळ्यात वेधून टाकणारी ही सौंदर्ययात्रा अनुभवण्याची संधी प्रत्येक रसिकाला मिळावी, एवढंच!