आनंद हर्डीकर
माजी केंद्रीय गृह सचिव माधवराव गोडबोले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक स्पष्टवक्ता, नि:स्पृह आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यास देश मुकला आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून त्यांची देशातील प्रश्नांसंबंधीची खोल समज आणि तळमळ दिसून येते.
माधवराव गोडबोले गेले..
त्यांच्या निधनाच्या ज्या वार्ता प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये १९९३ च्या मार्च महिन्यात केंद्रीय गृहखात्याच्या सचिवपदाचा त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा साहजिकच प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. बाबरी मशीद कारसेवकांकडून उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेची पार्श्वभूमी त्यांच्या त्या निर्णयामागील अनेक कारणांमध्ये प्रमुख होती. ही विवाद्य वास्तू वाचवण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या कृतियोजनेला पंतप्रधान नरसिंह रावांचा पाठिंबा न लाभल्यामुळे माधवराव विषण्ण झाले होते. राजेश पायलट यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्याकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्या विषण्णतेत भर पडत होती. अखेरीस त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला. तो केवळ त्याच वेळी नव्हे, तर नंतरही चर्चाविषय बनून राहिला. अगदी त्यांच्या निधनानंतरच्या बातम्यांमध्येही!
डिसेंबर १९९२ मधील ‘त्या’ वादळी घटनाचक्राबद्दलची आपली बाजू स्पष्ट करणारे आत्मकथन माधवरावांनी पुस्तकरूपाने समाजासमोर ठेवले, ते ‘अनफिनिश्ड इनिंग्ज : रिकलेक्शन्स अॅंड रिफ्लेक्शन्स ऑफ ए सिव्हिल सर्व्हट’ या नावाने. त्याचा मराठी अनुवाद ‘अपुरा डाव’ या नावाने प्रसिद्ध झाला आणि गाजलादेखील. तथापि आता त्यांच्या ८५ वर्षांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर मात्र असे म्हणावेसे वाटते की, नियतीने जरी त्यावेळी त्यांना देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदावरून बाजूला होणे भाग पाडले असले तरीही तिने त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात सतत लिहिते ठेवून त्यांना डाव सार्थकी लावण्याची संधीही दिली. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, दीर्घकालीन बहुस्तरीय प्रशासकीय अनुभव, विवेकप्रधान मूल्यनिष्ठा आणि कुठल्याही विषयाचे नेमके वर्म ओळखून त्याबद्दल सखोल भाष्य करण्याची क्षमता वगैरे गुणवैशिष्टय़ांना न्याय देणारी लेखणी त्यांच्या हाती दिली, ती त्यासाठीच!
सेवानिवृत्तीनंतर माधवरावांनी जी वैचारिक साहित्यनिर्मिती केली ती कुणालाही अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. आपली संसदीय राज्यपद्धती, धर्मनिरपेक्षता व्यवहारात अमलात आणताना केल्या जाणाऱ्या राजकीय कसरती, न्याय-यंत्रणेसमोरच्या जटिल समस्या, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी करावयाच्या योजना वगैरे विषयांवर साधकबाधक चर्चा करणारी पुस्तके तर त्यांनी लिहिलीच, पण पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांच्या कारकीर्दीची परखडपणे चिकित्सासुद्धा त्यांनी केली. त्यांच्या या साहित्यिक वाटचालीमध्ये गेली पंधरा वर्षे मला त्यांच्या पुस्तकांचा (काही अनुवादित, काही स्वतंत्र) संपादक या नात्याने त्यांच्याशी चर्चा करण्याची, काही मुद्दय़ांवर शंका उपस्थित करून त्यांची भूमिका अधिक स्पष्टपणे समजून घेण्याची संधी मिळाली. ज्ञानसाधनेच्या आविष्काराचे प्रत्ययकारी दर्शन घडले. भिन्न मते असणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करत असताना सहिष्णुता बाळगणे कसे उपयुक्त ठरू शकते हेही अनुभवायला मिळाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कायम स्मरणात राहील असा प्रभाव माझ्या मनावर पडला.
माधवरावांचा माझा प्रत्यक्ष परिचय झाला तो २००६ साली. ‘द होलोकॉस्ट ऑफ इंडियन पार्टिशन : अॅन इन्क्वेस्ट’ या त्यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘राजहंस’ने प्रकाशित करावा अशी चर्चा सुरू होती. त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता गोडबोलेच तो अनुवाद करणार होत्या. काही महिन्यांपूर्वीच ‘कायदेआझम’ हे बॅ. महंमदअली जिना यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले होते. ते त्यांनी वाचले होते आणि आपापले पूर्वग्रह दूर सारून ऐतिहासिक घटनाचक्राची व्यक्तिनिरपेक्ष, संघटनानिरपेक्ष चिकित्सा करण्याचा माझा प्रयत्न त्यांना योग्यही वाटला होता. माझ्या त्या पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या विस्तृत संदर्भटिपांवरून माझा त्या विषयाचा अभ्यास जोखला होता त्यांनी. पत्राद्वारे तशी त्यांनी दादही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा’ या ग्रंथाचा अनुवाद जसजसा पुढे पुढे सरकत होता, तसतशी माझी गोडबोले दाम्पत्याशी त्या विषयाच्या विविध पैलूंबाबतची चर्चासुद्धा रंगत चालली होती. मूळ इंग्रजी मजकुराशी अनुवाद ताडून पाहण्याची, त्याबद्दल बारीकसारीक शंका उपस्थित करण्याची माझी ‘राजहंसी’ पद्धत त्यांना खटकली नाही, उलट आवडली. त्यामुळे आमच्या बोलण्यामधली प्रारंभीची औपचारिकता केव्हाच गळून पडली आणि केवळ अनुवादिकेशीच नव्हे, तर मूळ लेखकाशीही थोडीफार अवांतर चर्चाही होऊ लागली. फाळणीच्या वेळी घडलेल्या हिंसाचाराचा लेखाजोखा मांडता यावा म्हणून माधवरावांनी किती संदर्भ धुंडाळले होते, किती समकालीन प्रशासकीय अहवाल अभ्यासले होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले प्रत्येक विधान सप्रमाण असावे, बिनचूक व नेमके असावे म्हणून किती काळजी घेतली होती! सारे विलक्षण होते.
आवर्जून सांगितले पाहिज,े ते म्हणजे त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांनी जमा केलेल्या संदर्भसाधनांपैकी बऱ्याच लेखांच्या छायाप्रती त्यांनी आवर्जून मला देऊन टाकल्या. भारत-पाकिस्तान संबंध, फाळणी, नेहरू-माउंटबॅटन संबंध वगैरे विषय माझे कायमच जिव्हाळ्याचे राहणार, हे ओळखून त्यांनी मला कमरेएवढय़ा उंचीचा तो खजिना देऊन टाकला होता.
माधवरावांच्या लेखनाची ती वैशिष्टय़े त्यांच्या इतर पुस्तकांमधूनही दिसतात. त्यांच्या इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादाची आणखीही काही पुस्तके ‘राजहंस’तर्फे प्रकाशित झालीच; पण दिलीपराव माजगावकरांनी सुचवल्यामुळेही माधवरावांनी काही पुस्तके आधी मराठीत लिहिली आणि नंतर काही इंग्रजीतही प्रसिद्ध केली. ‘लोकपालाची मोहिनी’, ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व’, ‘इंदिरा गांधी : एक वादळी पर्व’ आणि ‘कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह’ ही ती पुस्तके.
यासंदर्भातही माधवराव पूर्वीपासूनच किती व्यासंगी होते, हे सहज जाणवत असे. दिलीपरावांनी फोनवरून एखादा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला की भावनेच्या भरात लगेच होकार देण्याचे ते टाळत. साधारणत: आठवडय़ाभराने ते त्यांचा निर्णय कळवीत. पुस्तकाची संहिता नेमकी केव्हा तयार हवी आहे, हे त्यांनी आधीच विचारून घेतलेले असे. त्या मुदतीमध्ये विषयाला यथोचित न्याय देणारे लेखन करण्यासाठी आवश्यक त्या संदर्भसाधनांची जुळवाजुळव करण्यासाठी काय काय करावे लागले, याचे मधल्या काळात त्यांनी नीट नियोजन केलेले असे. त्या, त्या विषयाचा पूर्वीच त्यांनी या ना त्या निमित्ताने अभ्यास केलेला असल्यामुळे आणि हवे ते संदर्भ कुठून कसे मिळवता येतील याची पूर्ण कल्पना असल्यामुळे ते तसे नियोजन करू शकत आणि पूर्वनियोजित अन्य कार्यक्रमांची फेररचना करून संहिता वेळेच्या आतच आमच्या हवाली करीत.
अपवाद फक्त ‘कलम ३७०: आग्रह आणि दुराग्रह’ या पुस्तकाचा. हे पुस्तक लिहीत असताना माधवरावांची तब्येत म्हणावी तशी ठणठणीत नव्हती. विषयाचा ताजेपणा लक्षात घेता पुस्तक लवकर प्रकाशित होणे गरजेचे होते. त्या विषयाशी ते पूर्वीपासून संबंधित असल्यामुळे पुस्तक लिहायला ते उत्सुकही होते. परंतु वेळापत्रक सांभाळण्यासाठी थोडी कसरत करावी लागणार होती. प्रारंभिक चर्चा करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला मोकळेपणाने परिस्थिती सांगितली आणि ‘पुस्तक पूर्ण झाल्यावर अक्षरजुळणीचे काम सुरू करण्याची नेहमीची पद्धत बाजूला ठेवून परिशिष्टे आधी सुरू करता येतील का?’ असे विचारले. तो मजकूर त्यांच्याकडे जवळजवळ तयारच होता. कारण पूर्वी ते त्या राज्याबद्दलच्या एका शासकीय समितीचे प्रमुख होते. तसे करणे सहज शक्य आहे, असे मी त्यांना म्हणालो. त्यांनी मला लगेच तो मजकूर दिलादेखील. इतर प्रकरणे मात्र जसजशी होतील, तसतशी माझ्याकडे येत गेली. युद्धपातळीवर काम करून ‘राजहंस’ने ते पुस्तक अल्पावधीत प्रकाशितही केले. अर्थात माधवरावांनी तब्येत पुरती साथ देत नसतानादेखील पूर्वीपासून असणाऱ्या व्यापक व सखोल व्यासंगाच्या बळावर ते लिहून पूर्ण केल्यामुळे!
माधवराव आयुष्याच्या उत्तरार्धात हे जे मौलिक लेखन करू शकले, ते सुजाताबाईंनी त्यांना दिलेल्या भरीव सहकार्यामुळेच. सेवानिवृत्तीनंतरच्या काळातील वैचारिक सहजीवनाचा एक आदर्श वस्तुपाठच त्या दोघांनी निर्माण केला असे म्हटले तर त्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. माधवरावांच्या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद सुजाताबाईंनी करावा आणि थॉमस वेबर- डॉ. के. पी. माथुर- डोरोथी नॉर्मन- वपाला बालचंद्रन- पास्कल नाझरेथ- जयराम रमेश प्रभृतींच्या पुस्तकांचा त्यांनी केलेला अनुवाद माधवरावांनी नजरेखालून घालावा, आवश्यक वाटले तर सुधारावा, हे त्या दोघांचे वर्षांनुवर्षे चाललेले काम मराठी साहित्यविश्वालाही समृद्ध करणारे ठरले, हे निर्विवाद!
आणि एरवी कधीही फारसे भावनाप्रधान न होणारे माधवराव आपल्या चार नातवंडांचा विषय निघाला की मात्र हळवे होत, हेही मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. अदिती, मनन, गायत्री आणि तारिणी या चार नातवंडांनाच आपली तीन-तीन पुस्तके अर्पण करणारे आजोबा या भूमिकेत माधवरावांना पाहणे आणि आपण आपल्या पुस्तकांमधून जे विचार मांडले आहेत, ते या नातवंडांच्या पिढीने तरी आत्मसात करून प्रत्यक्षात आणावेत अशी अपेक्षा व्यक्त करणारे माधवराव ऐकणे मला शक्य झाले, हे मी माझे भाग्यच मानतो.
माधवराव कर्तव्यकठोर वृत्तीचे असले, आपल्या मतांशी ठाम राहण्यासाठी किंमत मोजायला तयार राहणारे मान्यवर अधिकारी असले तरी परिचितांची भिन्न मते ऐकून घेण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. शिवाय समोरचा माणूस जर आपले मत साधार मांडत असेल तर मृदुभाषी माधवराव त्याचा प्रतिवाद तातडीने न करता आपले मत थोडक्यात व्यक्त करीत. माझ्या-त्यांच्या चर्चेत सुभाषचंद्र बोस हा विषय गेली बारा वर्षे कायम राहिला. अगदी प्रारंभीच त्यांना सुभाषबाबूंबद्दल फारसे ममत्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते आणि तरीही तो विषय टिकला, कारण त्यांना माझ्याबद्दल आस्था होती आणि मी सुभाषबाबूंच्या चरित्राचा अभ्यास करतो आहे, हे त्यांना ठाऊक होते. गोविंदराव तळवलकरांचे ‘ट्रिब्यून’मध्ये प्रसिद्ध झालेले लेख असोत किंवा साम्यवादी नेते कॉ. भूपेश गुप्ता यांनी लिहिलेले सुभाषबाबूंचा गौरव करणारे पुस्तक असो; मला मिळवून देण्याची तत्परता माधवरावांनी दाखवली होती आणि त्याबद्दलच्या माझ्या स्पष्ट प्रतिक्रिया ऐकूनही घेतल्या होत्या. असा हितचिंतक ज्येष्ठ मित्र म्हणून मला लाभला, हे भाग्यच!
माधवरावांच्या प्रदीर्घ वाटचालीकडे पाहिले की आता वाटते, ते आपला डाव पुरा करून, सार्थकी लावून गेले. ‘त्या’ तशा सेवानिवृत्तीनंतरची क्षणिक विषण्णता त्यांनी दूर सारली. अर्ध्यावर सोडलेला डाव दुसऱ्या प्रांगणात पुन्हा मांडला, दमदारपणे खेळून व पराक्रम गाजवून गेले. सुराज्यनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी देशाने व समाजाने काय काय केले पाहिजे याची प्रारूपे मांडून माधवराव गेले. त्यांचे ते स्वप्न मात्र अधुरे असल्याची खंत बाकी आहे. त्यांची चिरंतन आठवण म्हणून!
anand47hardikar@gmail.com