शरद अष्टेकर
आंतरराष्ट्रीय बुकर मिळालेली पुस्तके असोत किंवा अमेरिका-ब्रिटनमध्ये चलती असलेले कथात्मक-अकथनात्मक ग्रंथ. त्यांचे रीतसर हक्क मिळवत अनुवाद करून ‘मधुश्री’ प्रकाशन विक्रीचेही नवे विक्रम करतेय. प्रेमकहाणीतून ग्रंथविक्रीत आणि नंतर चांगली पुस्तके मराठीत आणण्याच्या हट्टाने प्रकाशन व्यवसायात उतरलेल्या प्रकाशकाची गोष्ट…
माझ्या परिवारात, नात्यात किंवा आसपास कुणीही वाचणारं नव्हतं. त्यामुळे शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त माझा वाचनाशी काहीही संबंध नव्हता. पुढे मी घरोघरी पेपर टाकू लागलो. त्या वेळी वेगवेगळ्या पुरवण्या वाचताना नकळत वाचनाची आवड निर्माण झाली. माझा पुस्तकांकडे ओढा वाढत गेला. छोटे-मोठे व्यवसाय आणि नोकर्या करत मग २०१० साली अपघाताने पुस्तक विक्रीच्या व्यवसायात आलो.
मी एका मुलीवर प्रेम करत होतो. तिला मी कधीच भेटलो नव्हतो किंवा पाहिलंही नव्हतं. फक्त फोनवर आमची ओळख होती. मी नाशिकजवळ घोटी या गावी राहायचो आणि ‘कॉलेज ड्रॉपआउट’ होतो. ती डबल ग्रॅज्युएट होती, चंद्रपूरजवळच्या भद्रावतीत राहत होती. शिवाय युनिसेफसाठी काम करायची. माधुरी तिचं नाव. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना बघायचं, भेटायचं ठरवलं आणि मी विदर्भात गेलो. मला आजही आठवतं, ती मला नागपूर स्टेशनवर घ्यायला आली होती. आम्ही पहिल्यांदा तिथंच एकमेकांना बघितलं. नंतर आठ दिवस तिच्या घरी राहिलो. तिथं तिची सहा भावंडं आणि तिची आई यांत मी रमलो. तिनं मला आनंदवन, शोधग्राम आणि हेमलकसा ही ठिकाणं आणि चंद्रपूर तसंच गडचिरोलीमधील शहरं दाखवली. या आठ दिवसांत आमचं लग्न करायचं ठरलं. पण त्यानंतर पुढे नक्की काय करायचं, हे माहीत नव्हतं.
मी जवळपास बेरोजगार होतो, पण ती माझाही सांभाळ करू शकेल इतकी खंबीर आणि ठाम होती. मी घरी परतल्यावर ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक वाचत असताना मला आठवलं की, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात पुस्तकांचं दुकानच नव्हतं. तेव्हा मी समकालीन प्रकाशनाला फोन केला आणि पुस्तक विक्रीबद्दल माहिती घेतली. मी ठरवलं की आपण चंद्रपूरमध्ये जाऊन पुस्तकं विकायची आणि पुढे माधुरीशी लग्न करायचं. सगळं ठीक होईल का, याबद्दल दोघांनाही एकदाही शंका आली नाही. मी काही भांडवल जमवलं आणि समकालीनच्या दादर ऑफिसमध्ये जाऊन काही पुस्तकंही खरेदी केली.
त्यांनीच जवळ राजहंस प्रकाशनचं ऑफिस असल्याचं सांगितलं. तिथूनही मला माहीत असलेली आणि गाजलेली काही पुस्तकं विकत घेतली. मग दोन-चार दिवसांनी मी घरच्यांना सांगितलं की मला चंद्रपूरला नोकरी मिळाली आहे. घरच्यांना वाटलं की नेहमीसारखं दोनचार महिन्यांचं काही असेल. मी घर सोडलं. चंद्रपूरमध्ये माधुरीने राहण्याची व्यवस्था केली होती. दुसर्याच दिवसापासून पिशव्यांमध्ये पुस्तकं घेऊन मी शहरभर फिरायला सुरुवात केली. तीनचार दिवस असंच फिरल्यानंतर एका कॉलेजमध्ये पहिलं पुस्तक विकलं गेलं. तिथंच मला पुस्तक विक्री कशी करायची याची दिशा मिळाली.
पुढे अडीच वर्षांनी २०१२च्या डिसेंबरमध्ये माधुरी आणि माझं लग्न झालं. त्या काळात मी पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पुस्तक प्रदर्शनं भरवत होतो. पुढे आमच्या मुलीचा मधुश्रीचा जन्म होईपर्यंत सारं सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मी चंद्रपूर आणि गडचिरोली शहरात पुस्तकांचं दुकानंही चालवून बघितलं. नंतर या शहरांत आणि नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांत बाराही महिने पुस्तक प्रदर्शन भरवू लागलो.
२०१५ साली पहिल्यांदा हरारीचं ‘सेपियन्स’ हे पुस्तक वाचलं. मी स्वत: नॉनफिक्शन पुस्तकांचा वाचक. जगभर प्रकाशित होणारी महत्त्वाची पुस्तकं मराठीत लवकर यायला हवीत, असं मला सतत वाटायचं. त्यातूनच आपणच प्रकाशक व्हावं, ही कल्पना माझ्या मनात रुजली. ‘सेपियन्स’ या पुस्तकाने मला प्रकाशक होण्याची प्रेरणा दिली. ‘मधुश्री’नेच सेपियन्ससकट हरारीची सगळीच पुस्तकं मराठीत आणली.
२०१७ साली मी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं – ‘आय एम अ ट्रोल’. पुस्तकाचा अनुवाद तयार होता, पण कुणीही प्रकाशित करत नव्हतं. म्हणून मीच अनुवादकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हक्क मिळाले तर हे प्रकाशित करा. मूळ इंग्रजी प्रकाशकांचा नंबर घेऊन त्यांच्याशी बोललो तर त्यांनी मेल करायला सांगितलं. या पुस्तकाचे हक्क घेताना प्रकाशनासाठी अनेक नावांचा विचार सुरू होता; पण काहीच ठरत नव्हतं. त्याच वेळी जवळ खेळणार्या मधुश्रीकडे पाहिलं आणि तिच्याच नावाने मेल आयडी तयार करून ‘मधुश्री पब्लिकेशन’ हे नाव निश्चित केलं.
प्रकाशन सुरू झालं. मी विक्रेता होतो, पण पुस्तकनिर्मितीबद्दल मला काहीही माहिती नव्हती. मी चंद्रपूरमध्ये पत्रिका करणार्याकडून ले-आउट तयार करून घेतला आणि मुंबईत एका डुप्लिकेट पुस्तक छापणार्या मित्राकडून पुस्तक प्रिंट करून घेतलं. पुस्तक तर छापलं, पण वितरणाबद्दल मला फारशी कल्पना नव्हती. पुणे-मुंबईत कोणाशीही संपर्क नव्हता. पण या पुस्तकाला चांगली मागणी आली आणि बर्याच विक्रेत्यांनी संपर्क केला. त्यानंतर काम सुरू झालं. मग मी चालू असलेला पुस्तक विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद करून पूर्णवेळ प्रकाशक होण्याचा निर्णय घेतला.
मी गावोगावी पुस्तकं विकली असल्यामुळे माझा वाचकांशी थेट संवाद होता. त्यामुळे नेमकं काय प्रकाशित करायचं, याची मला स्पष्ट कल्पना होती. मी ठरवलं होतं की, ‘लोकांनी वाचलीच पाहिजेत’ अशी महत्त्वाची पुस्तकं मराठीत आणायची. त्याचबरोबर वाचकप्रिय आणि सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तकंही प्रकाशित करायची.
मी पहिल्याच पिढीतील उद्योजक आणि प्रकाशक. कोणतंही आर्थिक किंवा सामाजिक वा व्यावसायिकही पाठबळ माझ्याजवळ नसल्यामुळे व्यावहारिक निर्णय घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. त्यामुळे मी हरारी, रिचर्ड डॉकिन्स, जेरेड डायमंड, रिचर्ड फाईनमन, प्रणय लाल, रवीश कुमार अशा लेखकांच्या पुस्तकांचे हक्क मिळवले. सोबतच जागतिक बेस्टसेलर ठरलेल्या पुस्तकांचेही हक्क विकत घेतले. उदा. ‘द सट्ल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ#’, ‘झिरो टू वन’, ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’. त्याच वेळी व्यवसाय टिकून राहण्यासाठी आणि लगेच ‘कॅश फ्लो’ तयार व्हावा म्हणून डेल कार्नेगी, नेपोलियन हिल, जोसेफ मर्फी यांच्यासह अनेक राइट्स-फ्री पुस्तकांवरही काम सुरू केलं. या काळात मी आठ दिवस पुण्यातील अप्पा बळवंत चौकात लॉजवर राहायचो, तर आठ दिवस चंद्रपूरला. यात बरीच आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ओढाताण झाली. तरीही पहिल्या दोन वर्षांत मी प्रकाशित केलेल्या पुस्तकांपैकी जवळपास पन्नास टक्के पुस्तकं मराठीतही बेस्टसेलर ठरली. त्यांच्या आवृत्त्या संपू लागल्या.
विक्री व वितरण वाढल्यानंतरही सुरुवातीला हे सगळं काम मी एकटाच सांभाळत होतो. बाकीची बहुतांश कामं फ्रीलान्स पद्धतीने होत होती. मी स्वत: पुस्तकांच्या दुकानांत जाऊन पुस्तकं ठेवायचो. तेव्हा अनेक विक्रेते म्हणायचे, ‘‘पुस्तकं चांगली आहेत, साहेबांना सांगा लवकर ऑर्डर पाठवत जा.’’ मी फक्त हसून ‘‘हो’’ म्हणायचो. मीच त्या पुस्तकांचा प्रकाशक आहे, हे मात्र कुणालाही सांगत नव्हतो!
२०१९ साली पुण्यातील नारायण पेठेत मधुश्रीचं ऑफिस सुरू केलं. काम करण्यासाठी एक हक्काची जागा मिळाली आणि राहण्यासाठी भाड्याने घरही घेतलं. त्यामुळे काम काहीसं सोपं होऊ लागलं होतं. तेवढ्यात करोना आला आणि सगळंच काम ठप्प झालं. मी जवळपास सहा महिने गावी अडकलो. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये पुन्हा पुण्याला आलो आणि नव्याने सगळं सुरू केलं. त्याच वेळी परिवारासह कायमस्वरूपी पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढे सगळंच बदलायला आणि चांगलं घडायला सुरुवात झाली.
२०२१च्या सुरुवातीला आलेल्या मॉर्गन हाउजेलच्या ‘द सायकोलॉजी ऑफ मनी’ या पुस्तकाने मला खूप मदत केली. त्यातून मधुश्री पब्लिकेशनने नव्याने उभारी घेतली. ‘पैशाचे मानसशास्त्र’ या नावाने हे पुस्तक मराठीत आलं. तेव्हापासून आजपर्यंत या पुस्तकाची सरासरी दर महिन्याला पुनर्मुद्रणं होतात.
आम्ही चर्चेत असणारी पुस्तकं लवकर बाजारात आणतो. या पुस्तकांना मागणी असल्यामुळे फार जाहिरात करावी लागत नाही. आम्ही सगळ्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतो. त्यामुळे वेगवेगळी पुस्तकं वाचणारा मोठा वाचकवर्ग आम्हाला मिळतो. बेस्टसेलर पुस्तकं सातत्याने प्रकाशित करत असल्यामुळे प्रकाशनाची आर्थिक बाजू भक्कम होत राहिली. त्यामुळे मराठी वाचकाने वाचली पाहिजेत अशी पॉप्युलर सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयातील उत्तम पुस्तकं मराठीत आणू शकलो. अशी पुस्तकं वाचणारा मराठी वाचक मर्यादित आहे. त्यामुळे अशी पुस्तकं प्रकाशित करणं व्यावसायिकदृष्ट्या खर्चीक असतं. पण इंग्रजी वाचू न शकणार्या वाचकाने अशी पुस्तकं वाचायला हवीत असं वाटत असल्यामुळे व्यावसायिक नफ्यातोट्याचा फारसा विचार न करता मी ही पुस्तकं प्रकाशित करतो. यातूनच बेस्टसेलर आणि वरील प्रकारची गंभीर पुस्तकं यांचा आर्थिक समतोलही साधला जातो.
मराठी प्रकाशन व्यवहारात सेल्फ हेल्प पुस्तकांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने आणि तुच्छतेने पाहिलं जातं. ही पुस्तकं वाचणं तुच्छ लेखलं जातं. ही तुच्छता बाजूला ठेवून सेल्फ हेल्प पुस्तकांचा पट पाहिला की यात अनेक प्रकार असल्याचं लक्षात येऊ शकतं. सेल्फ हेल्प प्रकारात लिहिणार्या कॅल न्यूपोर्ट, डॅनियल कानेमन, ॲडम ग्रँट, माल्कम ग्लॅडवेल वगैरे लोकांना केवळ सेल्फ हेल्प लिहिणारे लोक म्हणून मोडीत काढता येणार नाही. डॅनियल कानेमनला तर अर्थशास्त्रातलं नोबेल दिलं गेलं. अशी अनेक पुस्तकं वर्षानुवर्षांच्या संशोधनातून तयार झालेली असतात. त्यामुळे ही पुस्तकं इतर पुस्तकांइतकीच महत्त्वाची आणि उपयुक्त असतात. म्हणूनच अशा पुस्तकांकडे स्वच्छ नजरेने पाहिलं जावं, असं वाटतं.
मी गावोगावी विक्री केली असल्याने मला विक्रेत्यांच्या अडचणी माहीत होत्या म्हणून आम्ही कुठल्याही विक्रेत्यांवर विश्वास ठेवून पुस्तक देतो आणि या विश्वासाने आमचं क्वचित थोडंसं नुकसान झालं असेल, पण फायदा मात्र प्रचंड झाला आहे. प्रकाशन व्यवसायात वितरण हा महत्त्वाचा घटक आहे. मधुश्रीची वितरण व्यवस्था आता मजबूत झालीय. महाराष्ट्रातील कुठल्याही छोट्या-मोठ्या प्रदर्शनांत आमची पुस्तकं तुम्हाला दिसतील. आम्ही रस्त्यांवर पुस्तक विक्री करणार्यांपासून ते मॉलमध्ये पुस्तक विक्री करणार्यांपर्यंतच्या विक्रेत्यांचं जाळं विणलं. यामुळे आमच्या पुस्तकांना कायमच मागणी असते. कारण वाचक, ग्राहक, विक्रेते, ग्रंथालयं यांना कायम विविध विषयांवरच्या नवीन पुस्तकांची गरज असते, ती आम्ही पुरवतो. कार्यक्षम व परिणामकारक वितरण व्यवस्थेमुळे मधुश्रीला व्यावसायिक यश मिळालं.
मधुश्री पब्लिकेशनकडून सरासरी दर आठवड्याला एक पुस्तक प्रकाशित केलं जातं आणि सरासरी दर दिवशी आधीचं एक तरी पुस्तक रिप्रिंट होतं. मधुश्रीतर्फे मी मुख्यत: भाषांतरित पुस्तकं प्रकाशित करत असलो तरी ताज्या दमाच्या लेखकाचीही मूळ पुस्तकं आवर्जून काढली आहेत. गौरव सोमवंशी, अभिजीत कोळपकर, विनायक होगाडे या प्रत्येक तरुण लेखकाची जवळपास दहा हजार पुस्तकं मी गेल्या काही वर्षांत विकली.
माझा भर मुख्यत: नॉन फिक्शन पुस्तकं काढण्यावर असला तरी मधुश्रीतर्फे भाषांतरित कथा, कादंबर्याही आवर्जून प्रकाशित केल्या जातात. गेल्या काही वर्षांत ज्या दोन भारतीय लेखिकांना इंटरनॅशनल बुकर मिळालं, ती दोन्ही पुस्तकं ‘रेत समाधी’ आणि ‘हार्ट लॅम्प’ आम्हीच मराठीत आणली.
आमच्या प्रकाशनाची पुस्तकं विषय व आशय यांच्या निकषांवर वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कारण देश-विदेशातील इंग्रजी प्रकाशन संस्थांशी, लिटररी एजंट मंडळींशी गेल्या काही वर्षांत उत्तम व्यावसायिक संबंध तयार झाले. त्यामुळे पुस्तक अनुवादासाठी हक्क मिळवण्यात फारशा अडचणी येत नाहीत.
सध्या ‘जात जनगणना’ हा विषय चर्चेत आहे. यावर आनंद तेलतुंबडे आणि लक्ष्मण यादव या अनुक्रमे इंग्रजी व हिंदीत लिहिणार्या लेखकांची उत्तम पुस्तकं लवकरच प्रकाशित करत आहोत. ‘आरक्षण’ या विषयावर यापूर्वी मी दोन पुस्तकं काढली. मधुश्रीतर्फे लवकरच सॅम डलरिम्पल (शॅटर्ड लॅण्ड), मनू पिल्लई (गॉड्स, गन्स, अँड मिशनरीज), अरुंधती रॉय (मदर मेरी कम्स टू मी), मार्गारेट ॲटवूड (द हॅण्डमेड्स टेल), सूरज येंगडे (कास्ट : अ ग्लोबल स्टोरी), रिचर्ड डॉकिन्स (द सेल्फिश जीन) ही पुस्तकं येत आहेत.
पारंपरिक आणि प्रस्थापित मराठी प्रकाशक हा व्यवसाय आतबट्ट्याचा आहे असं म्हणत असले तरी माझा अनुभव तसा नाही. इतर कुठल्याही व्यवसायात असते तितकी व्यावसायिक जोखीम व अडचणी याही व्यवसायात आहेत. व्यवसायाशी निगडित अडचणींचं भांडवल न करता योग्य प्रयत्न केले तर या अडचणींतून मार्ग काढता येतो, यावर माझा विश्वास आहे.
मी तुलनेने नवा प्रकाशक आहे. त्यामुळे आमच्या प्रकाशन संस्थेत हळूहळू सुधारणा होत आहेत. संस्थेची नव्याने उभारणी होत आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत सगळी कामं फ्री लान्स होत होती. सध्या मधुश्रीची पुस्तक निर्मितीची सगळी प्रक्रिया आमच्या संपादकीय विभागात पार पडते. येत्या काळात आणखी आश्वासक बदल आम्ही करू, असा विश्वास आहे.
sharad@madhushreepublication.com
