डॉ. तेजस मदन गर्गे

महाराष्ट्र राज्याच्या सर्वागीण संस्कृतींचे दर्शन घडवणारे राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय अलीकडेच शासनाने घेतला आहे. त्यामागील संकल्पना विशद करणारा लेख..

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद   (ICOM) यांनी केलेल्या व्याख्येनुसार संग्रहालय म्हणजे ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी, समाजाच्या सेवेत कार्यरत असणारी अशी संस्था- की जी सर्वसामान्यांसाठी खुली असेल, आणि ती वस्तू किंवा संकल्पनांचा संग्रह करून त्यांचे जतन व संवर्धन, तसेच त्याबद्दल संशोधन करून त्यांचे प्रदर्शन, जनसंवाद घडवून आणले आणि यातून तयार होणारे ज्ञान शैक्षणिक व करमणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवेल. प्रत्येक संग्रहालयाच्या निर्मितीमागे एक विशिष्ट उद्दिष्ट व कार्यकारणभाव असतो. जसे- बाहुल्यांच्या संग्रहालयात लहान मुलांचे भावनाविश्व व त्याच्याशी निगडित वस्तू, परिवहनविषयक संग्रहालयात मानवी प्रवासाची साधने; एवढेच नाही तर मुंबईत ‘कुष्ठरोग’ या विषयाला वाहिलेले संग्रहालय त्यामागचा विशेष उद्देश अधोरेखित करते. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी निर्माण झालेल्या बहुसंख्य संग्रहालयांचा उद्देश कलात्मक असणाऱ्या पुरावशेषांचे जतन हा होता. आज आधुनिक काळात कलामूल्यांबरोबरच मानवी इतिहासात तंत्रज्ञानाची प्रगती अधोरेखित करणाऱ्या वस्तू.. जशी की- अश्मयुगीन हत्यारे, साध्या मडक्याच्या भांडय़ांचे तुकडे, विविध काळांतील शस्त्रे, अवजारे, यंत्रं, इतकेच नव्हे तर फॉसिल्सच्या स्वरूपात असणारे प्राण्यांच्या पायांचे ठसे किंवा विष्ठा हेही संग्रहालयातील वस्तूविषय असू शकतात.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक वैभव एकाच ठिकाणी संग्रहित होऊन प्रदर्शित व्हावे ही संकल्पना पूर्वी मांडली गेली असली तरी त्यास आजवर मूर्त स्वरूप आले नव्हते. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने १५ व्या वित्त आयोगासाठी राज्य संग्रहालयाचा प्रस्ताव शासनास सादर केला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालय निर्मितीसाठी नियोजकाच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आता साठहून अधिक वर्षे झाली आहेत. तेव्हा अशा संग्रहालयाची खरंच आवश्यकता आहे काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यास्तव या संग्रहालय निर्मितीमुळे कोणती कमतरता भरून येणार आहे याचा हा ऊहापोह..

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच १९६० साली पुराभिलेख व पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची स्थापना झाली असली तरी १९७७ साली पुराभिलेख आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय ही दोन वेगळी संचालनालये म्हणून उदयास आली. हे होताना शासनाकडे ब्रिटिशकाळातील मध्यवर्ती संग्रहालय तसेच संस्थानांकडून हस्तांतरीत झालेली औंधसारखीही संग्रहालये होती. त्याबरोबरच कै. रामिलगप्पा लामतुरे व कै. बाळासाहेब पाटील यांचे वैयक्तिक संग्रह शासनाने अधिग्रहित करून त्यांच्या नावाने संग्रहालयांची स्थापना केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्षेत्रीय विभागांत संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने प्रादेशिक संग्रहालये रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक, सिंदखेडराजा येथे उभारली आहेत. नांदेड जिल्ह्यतील माहुर संग्रहालय हे तर चक्क स्मारकाचे राखणदार रामराव कोंडे यांनी केलेल्या वस्तूंच्या संचयनातून निर्माण झाले आहे. औंध येथील संस्थानिक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या रयतेस कलाशिक्षणाची गोडी लागावी, त्यांना जागतिक दर्जाच्या कलावंतांच्या कलाकृती सहज बघता याव्यात म्हणून युरोपातील उत्तमोत्तम कलाकृती मागविल्या. तसेच भारतीय नामवंत कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्याकडून उत्तम कलाकृती घडवून घेतल्या. एवढेच नव्हे तर अजिंठय़ातील लेण्यांच्या चित्रांच्या नकला त्यांनी बनवून घेतल्या होत्या. चंद्रकांत मांडरे या सिनेकलावंतांनी आपल्या चित्रकृती शासनास दान केल्या व त्यांचा समर्थपणे सांभाळ शासनाद्वारे होत आहे. थोडक्यात कलाकृतींचा संचय करणाऱ्या व्यक्तींनी केलेले दान आणि काही प्रमाणात स्थानिक वारसा जपण्याचे शासनाचे धोरण या दोन कारणांनी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणारी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली.

राजा दिनकर केळकर यांनी संग्रहित केलेल्या कलाकृती शासनास दान केल्या असता त्यांचा सांभाळ करण्याचे दायित्व शासनाने आर्थिक मदत देऊन केळकर कुटुंबीयांवर सोपवले. अशा अनोख्या पद्धतीनेही संग्रहालयांची वाटचाल  राज्यात सुरू राहिली. ब्रिटिश काळातील शासकीय अधिनियमाद्वारे शासकीय जागेत आणि काही वर्षे शासकीय निधीची मदत घेऊन विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आज कार्यरत असणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) या संस्थेने संग्रहालय विश्वात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संग्रहालयाने वेळोवेळी भरवलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शने, आपल्या दालनांची पुनर्निर्मिती, नवीन पुरावशेष व कलाकृती सातत्याने संपादित करून हे संग्रहालय अतिशय सुंदररीत्या सुरू ठेवले आहे. यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे युरोपीय व चिनी कलाकृतींबरोबरच तिबेट, हिमालयातील कलाकृती, पश्चिम भारतातील पुरावशेष, पेंढा भरलेल्या प्राण्यांच्या माध्यमातून भारतातील जैवविविधतेचे दर्शन, तसेच काही प्रमाणात आधुनिक कलाकृतींचाही समावेश होतो. या संग्रहालयाने खासगी दाते, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या सहकार्याने ‘म्युझियम ऑन व्हिल’ ही अनोखी मोहीम राबवून संग्रहालय चळवळ नि:संशयपणे एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. असे असूनही या संग्रहालयात महाराष्ट्राशी निगडित अतिशय मर्यादित वस्तूंचे दर्शन प्रेक्षकांना होते. त्यातून महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो वा भविष्यातील महाराष्ट्राची झलक दिसते असे होत नाही. अर्थात हा या संग्रहालयाचा दोष आहे असे नव्हे; तर मुळातच त्याचे उद्दिष्ट आपल्या वसाहतवादी राज्यकर्त्यांना पौर्वात्यवादाचे जे आकर्षण होते, त्या अनुषंगाने संशोधन व जतन कार्य हे असल्याने महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालय म्हणून या कसोटीस ते खरे उतरत नाही. या पोकळीतूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विविध कालखंडांचे दर्शन एकाच जागी व्हावे या भावनेतून ‘महाराष्ट्र’ या संकल्पनेला वाहिलेले संग्रहालय उभे करण्याचा संकल्प शासनाने केला आहे.

आज संग्रहालये केवळ भूतकाळातील कलाकृती ठेवण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे ठिकाण राहिलेले नाही; तर भविष्यातील पिढय़ांसाठी मानवजातीच्या इतिहासाचे ते भांडार असून, त्याविषयी माहिती देण्यासाठी संग्रहालय हे एक माध्यम आहे. राज्यातील लोकांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कामगिरीचे संग्रहालय हे उत्तम माध्यम आहे. या माध्यमातून कार्यशाळा, उत्सव, फिरती गॅलरी, प्रदर्शन, व्याख्याने या प्रकारे लोकपरंपरा, कला व संस्कृती यांचा प्रसार शक्य होतो. भारतातील अनेक राज्यांनी राज्य संग्रहालयांद्वारे त्यांच्या संस्कृतींचे प्रदर्शन करून ती भावी पिढय़ांसाठी जतन करून ठेवली आहे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात शासनाचे राज्य संग्रहालय अस्तित्वात नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही संकल्पना मूर्त स्वरूपात यावी यासाठी सब्यसाची मुखर्जी (महानिदेशक, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सल्लागार समितीचे गठन करण्यात आले. तीत डॉ. अरिवद जामखेडकर, प्रा. वसंत शिंदे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ तसेच औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर विद्यापीठांतील संबंधित विषयाच्या प्राध्यापकांच्या समावेशाने संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब या संकल्पचित्रात घेता येणे शक्य झाले. हे संग्रहालय कसे असावे हे ठरवण्यासाठी एक तीन-दिवसीय चर्चासत्र कोविड- १९ या साथीच्या काळात कठरळवउएठ (भारतीय अध्ययन केंद्र, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले गेले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांबरोबरच विद्यार्थी, संशोधक, विषयतज्ज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, नागरिक यांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला. प्रस्तावित प्रकल्पाबाबत सूचना व अभिप्राय आमंत्रित करण्यात आले व त्यांचा समावेश संग्रहालयाच्या संकल्पनेत करण्यात आला. ही चर्चासत्रे व्यापक व्हावीत तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत याकरिता ती संचालनालयाच्या यू-टय़ूब वाहिनीवर उपलब्ध करून दिली गेली.

या चर्चासत्रांतून व जनतेकडून आलेल्या सुचनांनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचा महाराष्ट्राचा वैभवशाली प्रवास दाखवणारे असे एक संग्रहालय असणे ही काळाची गरज आहे, हे अधोरेखित झाले. या संग्रहालयामध्ये अश्मयुग, प्रागैतिहासिक महाराष्ट्र, सातवाहन काळ, वाकाटक काळ, राष्ट्रकुट काळ, शिलाहार-यादव काळ, इस्लामिक काळ, मराठा काळ, ब्रिटिशकालीन महाराष्ट्र, सामाजिक चळवळींमधला आणि स्वातंत्र्यलढय़ातील महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्राची कृषी संस्कृती व औद्योगिक प्रगती, आदिवासींचा महाराष्ट्र आणि आधुनिक महाराष्ट्र हे सर्व कालखंड त्या काळाच्या सामुग्रीच्या आधारे उभे केले जातील. कला आणि स्थापत्य, मंदिरे व किल्ले यांचा काळानरूप विकास, धर्म, समाज, अर्थव्यवस्था, साहित्य, राहणीमान, उपयोगातील विविध वस्तू, भांडी, दागदागिने, पेहराव, खाद्यसंस्कृती, त्या- त्या काळातील खेळ हे भित्तीचित्रे, छोटय़ा प्रतिकृती व थ्रीडी प्रतिमा (miniature and 3 d models), दृक्श्राव्य संकल्पना, त्रिमितीचित्रात्मक प्रतिकृती (Dioramas), आभासी वास्तव (Virtual reality) इत्यादी माध्यमांतून दर्शवले जातील.

हे संग्रहालय महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक चळवळी प्रतिबिंबित करेलच; त्याचबरोबर येथील कला व सांस्कृतिक चळवळीसुद्धा- जशी बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट, प्रोग्रेसिव्ह कला चळवळ इत्यादी अधोरेखित करेल. तसेच मॅडम तुसॉं म्युझियमच्या धर्तीवर महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्वे, महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्त्वे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावणारे अशांचे मेणाचे पुतळे उभारले जातील. याशिवाय महाराष्ट्र व देशातील इतिहासाशी जोडणारे कार्यक्रम, कथाकथन, गायन आणि नृत्याविष्कार, जुन्या काळातील भांडी, अश्मयुगीन हत्यारे, जुने पेहराव आणि कपडय़ांचे प्रकार, वेशभूषा, केशभुषा, जुने मणी व जुने विविध प्रकारची दागिने यांची माहिती देतानाच ते बनवण्याच्या कार्यशाळा, मोडी, ब्राह्मी, खरोष्ठी इत्यादी जुन्या लिपी शिकवण्याच्या कार्यशाळा तसेच लहान मुलांसाठी लुटुपुटूचे उत्खनन, गवेषण आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय संग्रहालयामधील उपाहारगृह हे विशेषकरून खास महाराष्ट्रीय पदार्थाचे असेल. इथे महाराष्ट्रीय पदार्थ कसे बनवतात, तसेच त्यासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि ते बनवण्याच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातील. आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे दिव्यांगजनांसाठी आणि इतरांसाठीही हे संग्रहालय विशेष ठरेल. कारण ब्रेल लिपी, ध्वनिनिर्देशक, आभासी वास्तव, तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा इथे उपयोग केला जाईल. असे सर्वसमावेशक, आधुनिक, राज्याचा संपूर्ण इतिहास दर्शवणारे संग्रहालय उभे करणे आवश्यक आहे. हे केवळ संग्रहालय न होता महाराष्ट्रातील कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे महासंस्कृती केंद्र ठरावे, ही अपेक्षा आहे.                                                              

(लेखक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक आहेत.)