वसंत सरवटे
शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी मराठी मासिकांमध्ये सुरू झालेल्या व्यंगचित्र या कलाप्रकाराचा सर्वांगीण आढावा घेणारा अभ्यासग्रंथ ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ ग्रंथाली प्रकाशनातर्फे लवकरच येतोय. व्यंगचित्रकलेचे रूप कसे कसे पालटत गेले, त्यात कोणी योगदान दिले, याचा रोचक इतिहास या ग्रंथात प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या संपादनाद्वारे सादर झालाय. यानिमित्ताने पाहता क्षणीच हसविणार्या व्यंगचित्रातील रेषेची महत्ता यावर या ग्रंथात पुनर्मुुद्रित करण्यात आलेले वसंत सरवटे यांचे चिंतन. त्याचबरोबर ग्रंथाच्या प्रयोजनाविषयी असलेले संपादकीय टिपण…
व्यंगचित्रकलेविषयी लिहिताना काही मूलभूत समजुती किंवा गैरसमजुती याबद्दल लिहिण्याचा माझा मानस आहे. व्यंगचित्र हे प्रचंड ताकदीचे माध्यम आहे हे निर्विवाद. त्याचे म्हणून एक खास वैशिष्ट्य आहे. मात्र एक उत्तम चित्र काढून कुणी प्रभावी व्यंगचित्रकार बनू शकत नाही. व्यंगचित्रांचे सातत्य आणि संख्या दोन्ही हवे. अनेक व्यंगचित्रांचा मिळून यामधून जो सामूहिक परिणाम होतो, त्यातूनच व्यंगचित्रकाराचा प्रभाव निर्माण होत असतो. हेच तत्त्व प्रयोगशील व्यंगचित्रांबाबत लागू आहे. म्हणूनच काही मोजकेच नव्हे तर अनेक व्यंगचित्रकार प्रयोगशील असतात, तेव्हाच त्या भाषेतील व्यंगचित्रकलेच्या प्रगतीच्या आशेला जागा राहते.
वृत्तपत्रीय व्यंगचित्रांच्या प्राबल्यामुळे एकूणच मराठी व्यंगचित्रांना आज एकच एक चेहरा प्राप्त झाला आहे. त्यांना साचेबंद स्वरूप आलेले आहे. समाधानाची बाब एवढीच की विषय, कल्पकता, रेखाटनपद्धती यांमध्ये नवनवे प्रयोग करून पाहणारे आज हाताच्या बोटावर मोजण्याइतके का होईना, काही व्यंगचित्रकार काम करताहेत- हीच त्यातल्या त्यात भविष्याबद्दल उमेद निर्माण करणारी गोष्ट आहे.
वाचकांच्या दृष्टीने पाहिले तर वृत्तपत्रीय व्यंगचित्र आणि अ-वृत्तपत्रीय व्यंगचित्र ही व्यंगचित्रांची दोन्ही अंगे महत्त्वाची आहेत. जीवनाकडे मिश्कीलपणाने आणि खिलाडूपणाने पाहण्याची शिकवण देण्याचे काम ही दोन्ही प्रकारांतली व्यंगचित्रे करतात.
आता काही आणखी महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल. कला महाविद्यालयातील अभ्यासक्रमात व्यंगचित्रकला शिकवली जात नाही हे खरे आहे. कारण व्यंगचित्र हा कवितेप्रमाणे सृजन प्रकार आहे. फार फार तर आजवरच्या सर्वोत्तम व्यंगचित्रांचा आस्वाद घ्यायला, त्यांची कलात्मक मीमांसा करायला शिकवता येईल; परंतु हे शिक्षण व्यंगचित्र निर्मितीसाठी कामाचे नाही. व्यंगचित्रांसाठी रेखाटनाच्या ज्या शास्त्रशुद्ध शिक्षणाची जरुरी आहे, ते या कला विद्यालयातून शिकवले जातेच. मात्र रेखाटन शैलीतील ओरिजिनॅलिटी हा तर व्यंगचित्रकाराचा चेहरा, मानबिंदू. शैली खास त्याची स्वत:चीच हवी. दुसर्या कोणाची ती नक्कल असता कामा नये. चित्रांमध्ये डिस्टॉर्शन म्हणजे विरूपीकरण किती करायचे हे ज्याची त्याची शैली ठरवत असते. चित्रणशैली ही एक प्रवाही चीज आहे.
आशयानुसार तिने आपले रूप घेतले पाहिजे. ती लवचीक हवी. ती तशी नसेल तर आशयअभिव्यक्तीवर आणि विषयनिवडीवर मर्यादा पडतील. एकच एक शैलीला चिकटून राहणार्यांची व्यंगचित्रे काही काळाने ठरावीक विषयांच्या चौकटीत अडकून पडलेली दिसून येतात ते यामुळे.
व्यंगचित्राने आपला आशय बिनचूक व्यक्त करणे हे सर्वात अधिक महत्त्वाचे. हे करील ती शैली त्या चित्रापुरती उत्तम. काही आशयासाठी हे तपशील निर्दोष असणे आवश्यक असेल. उलट काहीसाठी काटेकोर चित्रण अभिव्यक्तीत कमतरताही आणील. उदाहरणार्थ, गमती गमतीने सांगायच्या गोष्टीसाठी प्रमाणबद्धता, ॲनाटॉमी, परस्पेक्टिव्ह इत्यादी बाबी बाजूला ठेवून सैल हाताने रमतगमत चित्रभर घरंगळणार्या रेषांनी केलेले डिस्टॉरटेड चित्र अधिक बोलके होईल. डिस्टॉर्शन हे व्यंगचित्रकाराच्या हातातील अत्यंत प्रभावी अस्त्र असले तरी ते हेतूपूर्वक जाणूनबुजून केलेले असले पाहिजे. प्रमाणबद्ध चित्र काढता येत नाही म्हणून झालेले असता कामा नये. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर चित्रकलेचे शास्त्रशुद्ध ज्ञान व्यंगचित्रकाराला असलेच पाहिजे.
ॲनाटॉमी आणि परस्पेक्टिव्ह यापेक्षाही व्यंगचित्रकाराच्या हातातील दोन अत्यंत प्रभावी साधने म्हणजे कंपोझिशन आणि कॅरेक्टरायझेशन (व्यक्तिचित्रण). व्यक्ती, वस्तू, इतर रेषा आणि आकार यांची चित्रांच्या चौकटीत केलेली मांडणी म्हणजे चित्राचे कंपोझिशन. योजनापूर्वक केलेल्या मांडणीच्या साहाय्याने चित्रातील विशिष्ट भागाकडे वाचकांचे लक्ष खेचून घेऊन आशय अचूकपणे पोहोचवणे शक्य होते. तर चित्रातील व्यक्तींची अंगलट, पोशाख, चित्रातील त्यांचा पवित्रा, बसण्याची, उभे राहण्याची वैशिष्ट्यपूर्ण ढब, चेहर्यावरील हावभाव यांच्या चित्रणामुळे चित्रामधला आशय अधिक गहिरा व्हायला मदत होते. ते विनोदी कल्पना मांडणारी आकृती न होता खर्या अर्थाने चित्र होते. केवळ एक गमतीदार गॅग (चुटका) यापेक्षा अधिक संमिश्र आशय त्याला प्राप्त होऊन ते वरच्या पातळीवर जाऊ शकते. राजकीय व्यंगचित्रांमधील ‘पात्रे’ ही प्रत्यक्षातली असल्यामुळे इथल्यापुरता हा प्रश्न काहीसा सुटलेला आहे. तरीसुद्धा त्या त्या व्यंगचित्रापुरता त्यामधील व्यक्तींचा पवित्रा, चेहर्यावरील भाव वगैरे प्रश्न उरतातच. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रातील राजकारण्यांचे चित्रण व्यंगचित्रकाराचे त्या त्या प्रसंगावरील भाष्य वाचकापर्यंत पोहोचवायचे काम किती प्रभावीपणे करत आहे, ते पाहण्यासारखे आहे. उत्तम व्यंगचित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्या प्रत्येकाने या दोन्ही गोष्टींचा कसून पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे.
शेवटी, शास्त्रशुद्ध चित्र म्हणजे थोर, हे कोणत्याही चित्राबाबतीतसुद्धा खरे नाही आणि व्यंगचित्राबाबतीत तर नाहीच नाही, हे विसरता कामा नये. रेषा म्हणजे तर व्यंगचित्रांची जीवनरेषाच! त्यामुळेच की काय हिच्यासंदर्भात रसिक वाचकांतच नव्हे तर खुद्द व्यंगचित्रकारांतही काही समजुती पक्क्या रुतून बसलेल्या आहेत. एक, कमीत कमी रेषा वापरलेले ते उत्तम व्यंगचित्र. दोन, ब्रशने काढलेले उच्च प्रतीचे, टाकाने काढलेले कनिष्ठ प्रतीचे. तीन, चित्रांमधल्या रेषा जोरकस पाहिजेत. ब्रशच्या फटकार्याने रेखाटलेले असेल तर सर्वोत्तम. इत्यादी.
खरे म्हणजे व्यंगचित्रांमधला आशय वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या कामात रेषेचा केवढा मोठा वाटा असतो याबद्दलच्या जाणिवेचा अभाव आणि आशयाच्या भिन्नभिन्न छटा व्यक्त करण्याच्या रेषेतल्या सुप्त क्षमतेबद्दलची अनभिज्ञता वरील समजुतींच्या मुळाशी आहे असे मला वाटते.
रेषा कागदावर आकार सिद्ध करते तेव्हा तिच्यात काही व्यक्त करण्याचे सामर्थ्य येते. आकाराच्या बरोबरीने वेगवेगळी रूपे घेऊन रेषा अगणित आशय व्यक्त करू शकते. रेषेमध्ये एवढे अमर्याद सामर्थ्य असताना, कमीत कमी रेषा, जोरकस रेषा, ब्रशची रेषा म्हणजे सर्व काही उत्तम, असे म्हणणे अज्ञान प्रकट करणे होईल.
व्यंगचित्रांबद्दल आणखी काही समजुती आपल्याकडे पसरलेल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रसंगी उच्चार होत असतो. त्यापैकी एक म्हणजे व्यंगचित्र हे दृश्य माध्यम असल्याने जे निव्वळ चित्रातून बोलते ते उत्तम. त्याला शब्दांचा आधार घ्यावा लागणे हे त्यातील कमतरतेचे लक्षण आहे. व्यंगचित्र हे पेंटिंगप्रमाणे शंभर टक्के दृश्य माध्यम आहे असे (विनाधार) गृहीत धरल्यामुळे ही समजूत प्रसृत झाली आहे. अशा अवास्तव गृहीतकामुळे व्यंगचित्र या माध्यमाचे क्षेत्र निष्कारण सीमित केले जाते आहे हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. व्यंगचित्राने केवळ दृश्यच असायला काही सबळ कारणही नाही. नृत्यकलाही दृश्यकला समजली जाते. परंतु तिच्यासोबतचे संगीत तिला अधिक आशयघन बनवत नाही काय?
जीवनात काही अनुभव असे असतात की ते फक्त चित्रातून व्यक्त करता येतील; काही असे असतात की ते चित्र व शब्द यांच्या संगतीने व्यक्त करावे लागतील. जोपर्यंत व्यंगचित्रातील चित्र स्वत:चे म्हणून काही सांगत आहे, शब्दाने व्यक्त केलेल्या आशयात भर घालते आहे तोवर तक्रारीला मला तरी कारण दिसत नाही. संपूर्ण आशय शब्दातून व्यक्त होतो आहे आणि चित्र वायफळ आहे असे असेल तर मग गोष्ट निराळी. शब्दरहित, पण बटबटीत, रटाळ विनोदी व्यंगचित्र किती तरी दाखवता येतील. त्यामुळे व्यंगचित्राची उच्च किंवा कनिष्ठ गुणवत्ता ठरते ती मुख्यत: त्याच्यामधील आशयावरून. ते शब्दरहित आहे का नाही यावरून नाही.
याच्या जोडीने असा एक समज पसरलेला आहे की, शब्द नसलेले व्यंगचित्र भाषा व देश यांच्या सीमा ओलांडून जगभर संचार करू शकते. हाही एक मोठा गैरसमज आहे. साहित्यातल्याप्रमाणेच व्यंगचित्रांमध्ये बहुसंख्य अनुभव त्या त्या भाषेच्या किंवा देशाच्या समाजरीतीशी निगडित असतात. भिन्न समाजरीती असलेल्या अन्य भाषकाला किंवा देशवासीयाला ते कळणे आणि थोडेफार कळले तर भावणे अशक्यच आहे.
उदाहरणार्थ, देवळामध्ये देवासमोर डोळे मिटून नमस्कार करणार्या आणि त्याच वेळी आपला एक पाय लांब करून आपल्या देवळाबाहेरील पादत्राणांवर ठेवलेल्या भाविकाचे (?) फडणीसांचे व्यंगचित्र शब्दाशिवाय असूनदेखील पाश्चात्त्य वाचकाला कळणे कठीण. परंतु त्यांचीच मांजराविषयीची चित्रे कोणत्याही देशवासीयाला कळायला अडचण पडणार नाही.
पाहताक्षणी व्यंगचित्र कोणालाही समजले पाहिजे हे उत्तम व्यंगचित्राचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून अनेक वेळेला सांगितले जाते. चित्रावर विचार करावा लागणे हा त्याचा पराभव आहे असेही पुढे जोडले जाते. मात्र असे म्हणताना चित्र समजणे ही गोष्ट वाचक/ प्रेक्षकसापेक्ष असते हे विसरले जाते. वाचकाची संवेदनक्षमता, त्याचे अनुभवविश्व आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे व्यंगचित्र पाहण्याचा त्याचा पूर्वसराव इत्यादी घटकांवर त्याला चित्र समजणे- न समजणे अवलंबून असते हे लक्षात घेतले पाहिजे.
व्यंगचित्र पाहताक्षणीच हसू फुटणे ही आणखी एक उत्तम व्यंगचित्राची कसोटी सर्वमान्य म्हणून सांगितली जाते. ही कसोटी पुन्हा वाचकसापेक्ष आहे. याचा माझ्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनात मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. एखाद्या चित्रापुढे एक जण येऊन फटकन मोठ्यांदा हसून दाद देतो. त्याच चित्रासमोर दुसरा एक जण चेहर्यावरच्या भावामध्ये फार बदल न करता मान हलवतो आणि प्रदर्शन पाहणे संपवून बाहेर जाताना आपल्याला त्या चित्राने खूप हसवले असे सांगून जातो! प्रत्येकाची विनोदाबाबत प्रतिक्रिया भिन्न असू शकते, एवढाच त्याचा अर्थ!
व्यंगचित्र म्हणजे केवळ हसवण्यासाठीच असा आपल्याकडे एक सर्वसाधारण समज आहे. त्याचाही इथे उल्लेख केला पाहिजे. अनेक पातळ्यांवरील अनुभव व्यक्त करण्याची क्षमता असलेले हे एक अत्यंत संवेदनशील माध्यम आहे. केवळ हसवण्याचीच त्याच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे त्या क्षमतेचा अंशत:च अनुभव घेणे आहे. पाश्चात्त्य देशांत अनेक सर्जनशील, प्रतिभावंत कलावंतांनी याला अनेक पैलू प्राप्त करून दिले आहेत. यामुळे निखळ करमणुकीपासून मानवी जीवनातील विदारक सत्य सांगण्यापर्यंतची ताकद त्यांच्या व्यंगचित्राला प्राप्त झाली आहे.
एखाद्या अर्थगर्भ साहित्यकृतीप्रमाणेच व्यंगचित्र पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटावे आणि अधिक अधिक पाहावे तसतशा त्यामधून आशयाच्या भिन्नभिन्न छटा प्रतीत व्हाव्यात अशी किमया व्यंगचित्रही करू शकेल. तेवढा सर्जनशील व्यंगचित्रकार मात्र हवा.
शेवटी सारांशाने एकच सांगावेसे वाटते की, व्यंगचित्र हे प्रामुख्याने हसवण्यासाठी असले तरी व्यंगचित्रकला ही हसण्यावारी नेण्याची बाब नाही!
