scorecardresearch

महासम्राट बेगडी ललित-इतिहास

लेखक विश्वास पाटील यांच्या ‘महासम्राट’ कादंबरीमालेतील ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे दोन भाग प्रकाशित झाले आहेत.

Mahasamrat Novel, Begdi , Begdi History ,Author Vishwas Patil, lokrang article,
महासम्राट बेगडी ललित-इतिहास

सुरेश पाटील

लेखक विश्वास पाटील यांच्या ‘महासम्राट’ कादंबरीमालेतील ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे दोन भाग प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचे लेखन इतिहासाच्या आणि सत्याच्या धारेवरच असल्याचा दावा पाटील करीत असले, तरी वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येते. काय आहे ते?

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

विश्वास पाटील हे कादंबरी क्षेत्रातील आजचं आघाडीचं नाव. शब्दांचे कारंजे उडवून वाचकांना साखरपाकात अडकलेल्या मुंगीसारखे गुंतवून ठेवण्यात हे महाशय उस्ताद. खोटेपणा केला, थापादेखील आक्रमक प्रचारतंत्राद्वारे लोकांच्या माथी मारण्यातही यांचा हात कोणी धरणार नाही. असे हे ‘सर्वगुणसंपन्न’ आणि उच्च उच्च कोटीचे ‘इतिहासाचार्य’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘महासम्राट’ ही कादंबरीमाला घेऊन आले आहेत. त्याचा पहिला आणि दुसरा खंड ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे अनुक्रमे १ ऑगस्ट २०२२ आणि मे २०२३ मध्ये प्रकाशित झाले.

‘झंझावात’मधील ‘शिवरायांच्या शोधात..’ या मनोगतात पृष्ठ क्र. सहावर विश्वास पाटील लिहितात, ‘महासम्राट कादंबरी मालेचे लेखन इतिहासाच्या आणि सत्याच्या धारेवरच घडावे याची मी काळजी घेतलेली आहे..’ पण वास्तव वेगळेच आहे.

विश्वास पाटील यांनी आपल्या ‘झंझावात’मध्ये मांडलेला पट इतिहासकारच असलेल्या वा. सी. बेंद्रे यांच्या ‘मालोजीराजे आणि शाहाजी महाराज’ या ग्रंथावर बेतलेला आहे. इथे महत्त्वाचा फरक असा की, ऐतिहासिक पुराव्यानिशी बेंद्रे यांनी ज्या गोष्टी नाकारल्या, त्याच विश्वास पाटलांनी उचलून त्याला महारंजकतेचा साज चढवला आहे. या पार्श्वभूमीवर विश्वास पाटलांची ही ‘सत्याची धार’ इतिहासाच्या कसोटीवर उतरते का ते पाहू.

गरोदर जिजाऊंची घोडेस्वारी!

कादंबरीची सुरुवातच शिवछत्रपतींच्या मातोश्री जिजाऊ यांच्या परांडा ते दौलताबाद या प्रवासाने होते.(पृष्ठ क्र. ३) त्या परांडय़ाहून दौलताबाद किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत येतात. तिथं दरवाजाच्या जवळच लखोजीराव जाधव यांचा गोट म्हणजे तळ पडला आहे. लखोजीरावांना आपल्या जिजाऊ या कन्येबरोबर/ घरच्यांसोबत श्रावणातील पहिल्या सोमवारी (हा श्रावण ‘जेधे शकावली’तील असून श्रावण पौर्णिमेस लखोजीराव जाधव आणि त्यांच्या पुत्राची हत्या झाल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. संदर्भ – वा. सी. बेंद्रे यांचा ‘मालोजीराजे आणि शाहाजी महाराज’ ग्रंथ. पृष्ठ क्र. २९८) वेरूळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन बेल वाहायचा आहे. म्हणूनच त्यांनी परांडय़ाला खास सांडणीस्वार पाठवून जिजाऊंना बोलावून घेतलं आहे! (झंझावात पृष्ठ क्र.५) दौलताबादला आलेल्या जिजाऊ ‘मेण्या’तून आल्या असून या शाही मेण्याच्या पुढे दोनशे आणि मागे दोनशे शस्त्रसज्ज घोडेस्वार आहेत. वाटेत चोर-लुटारू किंवा शत्रूशी गाठ पडली तर त्यासाठीही जय्यत तयारी. या घटनाक्रमातील महत्त्वाची बाब म्हणजे जिजाऊ या अडीच महिन्यांच्या गरोदर आहेत.(झंझावात पृष्ठ क्र.६०) या स्थितीत त्या परांडा ते दौलताबाद हा आजच्या मापनानुसार सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आहेत! श्रावण महिना म्हणजे हे ऐन पावसाळय़ाचे दिवस. त्या काळात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे किंवा समृद्धीसारखे महामार्ग नसल्याने निबिड अरण्ये, डोंगरराने, दऱ्या-खोरी, चिखलाच्या वाटा-पायवाटा तुडवत त्या इथंपर्यंत आल्या आहेत. अन् त्यांच्यासोबत पाचशे-सहाशे लोकांचे पथक असल्याने हा प्रवास निश्चितच एक-दोन दिवसांत झाला नसावा.

जाधवांच्या गोटात जिजाऊ पोहोचल्या (पृष्ठ क्र १०), पण लखोजीराव यांना आपल्या पुत्र-नातवासह निजामाच्या दरबारात जावे लागते. वडील दरबारातून परत येईपर्यंत काय करायचं म्हणून विश्वास पाटलांनी जिजाऊंना त्यांच्या मैत्रिणींसोबत लगेचच घोडय़ांवरून वेरुळच्या मंदिरात पाठवलंय (पृष्ठ क्र.१६)! निजामाच्या भेटीला गेलेल्या जाधवरावांच्या गोटात जिजाऊंच्या मैत्रिणी कशा असू शकतील, सैन्याच्या तुकडीबरोबर लखुजीराव त्यांना कशासाठी तिकडे घेऊन जातील, असे भाबडे प्रश्न विश्वासरावांना विचारण्यातही अर्थ नाही. या प्रसंगात पाटील लिहितात, ‘दौलताबादपासून वेरुळ अगदी जवळ होते.’(पृष्ठ क्र १६) अन् दरबारातलं काम आटोपल्यानंतर पिता, बंधू वगैरे परस्पर तिकडे येणार होते! पण इकडे लखोजीरावांसह जिजाऊंच्या बंधूंचीही हत्या होते. त्यामुळे त्यांचा वेरूळला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यानंतर जिजाऊ त्याच वाटेने घोडय़ावरूनच परत येतात.’ विचार करा.. दौलताबाद ते वेरूळ हे अंतर विश्वासरावांना जवळ वाटलं तरी आजच्या मोजमापानुसार सतरा किलोमीटर आहे. म्हणजे जाऊन-येऊन हा प्रवास चौतीस किलोमीटरचा. तत्पूर्वी त्या परांडा ते दौलताबाद हा सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आल्या आहेत. अरण्यातून चिखलाच्या वाटा तुडवत एखाद्या गरोदर स्त्रीस- तेही घोडय़ावरून पाठवणे हे काम शहाण्यासुरत्या लेखकाचे नव्हेच.

बरे, दोनशे किलोमीटरवर असलेल्या लाडक्या लेकीला माहेरला बोलवण्यास कारण तरी सबळ पाहिजे. विश्वासराव इथं कारण पुढे करतात ते कुटुंबीयांसोबत श्रावणातील पहिल्या सोमवारी वेरुळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन बेल वाहणे! राजघराण्यात गरोदर स्त्रीची अधिकच काळजी घेतली जाते. पण विश्वासरावांनी इथं तर जिजाऊंना चक्क घोडय़ावर बसवलं आहे. विशेष म्हणजे परांडय़ावरून येताना अश्वदळ, उंटाचं पथकही वेरुळच्या प्रवासात जिजाऊंच्या सोबत नाही! कदाचित इथल्या चोरा-चिलटांचा बंदोबस्त विश्वासरावांनी अगोदरच केला होता का, असाही प्रश्न पडतो.

इथंच थांबतील ते विश्वास पाटील कसले. पुढे लखोजीरावांची हत्या झाल्यानंतर त्याच रात्री तिथं शहाजीराजे येतात(पृष्ठ क्र १९). त्यानंतरचं वर्णन करताना लेखक लिहितो, ‘रात्रीचीच शाहाजीराजे आणि जिजाऊसाहेब दोघांचीही घोडी परांडय़ाच्या वाटेला लागली होती. त्यांच्या आगेमागे सहासातशे घोडेस्वार दौडत होते. ..त्या ओल्या बोचऱ्या अंधारात घोडी ईर्षेने पुढची वाट कापत होती.(पृष्ठ क्र. २०)’ म्हणजे विश्वासरावांनी गरोदर जिजाऊंच्या माथी पुन्हा एकदा सुमारे २०० किलोमीटरचा ‘घोडय़ा’वरचा प्रवास मारला आहे! इथे गमतीचा भाग पाहा. परांडय़ाहून दौलताबादला जाताना जिजाऊ ‘मेण्या’तून गेल्या आहेत, पण परतीच्या प्रवासावेळी घोडय़ावर.. घोडय़ावरून का? त्याची कारणमीमांसा विश्वासराव अशी करतात (पृष्ठ क्र ६१).. ‘जिजाऊंना आपल्या गर्भारपणामध्ये पालखीत पाय आखडून बसणे मोठे त्रासदायक वाटायचे. अंगात कढ भरायचा. पुन्हा घोडय़ाची पाठ. रात्रीच्या त्या खाचखळग्यांनी भरलेल्या आडवाटा.’ कधी मेण्यात, कधी घोडय़ावर अशा अक्कलशून्य सोयीस्कर भूमिका घेणे, हे लेखकाचे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षणच म्हणावे लागेल.

इतिहासाशी प्रतारणा

इतिहास संशोधन क्षेत्रात वा. सी. बेंद्रे हे तसे महत्त्वाचे इतिहासकार. इतिहासक्षेत्रात पुढची जी लिखापढी झाली ती त्यांच्याच संशोधनाचा आधार घेऊन. विश्वास पाटील यांचे ‘झंझावात’ हे बेंद्रे यांच्या ‘मालोजीराजे आणि शाहाजी महाराज’ या ग्रंथावरच बेतले आहे. अन् त्याला बेभरवशाच्या, सत्याचा अपलाप करणाऱ्या विविध बखरींतील प्रसंगांची जोड देण्यात आली आहे. इथं फरक हा आहे की, बेंद्रे यांनी प्रामाणिकपणे इतिहास संशोधन केलं. ते करताना कोणाचीही तमा बाळगली नाही. श्रीशिवाजीप्रताप, शिवदिग्विजय, शेडगावकर, वगैरे अनेक बखरीतील मजकूर कसा सत्याचा अपलाप करणारा आहे, हेही बेंद्रे यांनी दाखवून दिले. विश्वास पाटलांनी आंबटशौकी रंजकतेला प्राधान्य देतानाच बेंद्रे यांनी मांडलेल्या निष्कर्षांकडे, तुलनात्मक वास्तवतेकडेही जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचेच दिसते. ही इतिहासाशी केलेली सरळ सरळ प्रतारणाच आहे.

निजामाच्या दरबारात लखोजीराव, त्यांचे पुत्र अचलोजी, राघवराव आणि त्यांचा भाचा यशवंतराव यांची हत्या होते. वा. सी. बेंद्रे यांनी हा प्रसंग आपल्या ग्रंथात पृष्ठ क्र. २२५ वर नमूद केला आहे. त्यानुसार लखोजीराव पुत्र आणि भाच्यासह निजामास मुजरा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी निजामाने लखोजीरावांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ते संतापले होते तसेच त्यांची अंगावर चालून आलेल्या निजामाच्या सरदारांशी चकमक होऊन लढता लढता ते सर्व जण धारातीर्थी पडले. हे संपूर्ण निजामाचे कटकारस्थान होते असे ऐतिहासिक पुराव्याआधारे मांडले आहे. त्याशिवाय याच निरीक्षणाच्या नोंदी इतर ऐतिहासिक साधनांच्या आधारे पृष्ठ क्र. ३०२, ३०७, ३४३, ३४७, ३६३ आदींवरही नमूद केल्या आहेत.
लखोजीराव जाधवांच्या हत्येचा प्रसंग एखाद्या कमालीच्या मारधाड हिंदी चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने विश्वासराव कसा वर्णन करतात, पाहा. (झंझावात – पृष्ठ क्र. १३, १४, १५, १६) विश्वासरावांनी इथे निजामाच्या दरबारात लखोजीरावांचा त्यांच्या पुत्र आणि नातवासमवेत शाही सन्मान ठेवला आहे. विशेष म्हणजे निजामाचे कटकारस्थान असले तरी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथे एखाद्या लग्नसमारंभासारखे वाजंत्रीही आहेत. गोऱ्यागोमटय़ा तरण्याबांड लावण्यलतिकांची हजेरी हीही विश्वासरावांच्या लेखनाची खासियत. कदाचित लेखकाकडेच रंगेलपणा नसेल तर इतिहास मचूळ/ सपक होणार नाही का, अशी भीती विश्वासरावांना वाटत असावी. तर इथेही सुवासिक फुलझडय़ा आणि हातपंखे घेऊन विशीतल्या अनेक लावण्यलतिका आणि दरबारदासी आहेत. सोबत ‘सुडौल’ बांध्याची ‘नूरानी बेगम’ बसलेली आहे. ती हमीदखानाची पत्नी असून तिचा राज्यकारभारात हस्तक्षेप तसेच निजामाशी असलेली लगटही विश्वासरावांनी नमूद करतानाच ती खलनायिका असल्याचेही ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. अन् या सुगंधी वातावरणात लखोजी ढाल-तलवार छातीशी घेऊन आदराने दरबारात उभे आहेत. त्यांच्या बाजूला त्यांचे पुत्र राघवराव, अचलोजी आणि नातू यशवंतराव उभे आहेत. त्यावेळी निजामाच्या आदेशानुसार त्याचे तीन सरदार हातात सोन्याच्या पराती म्हणजे तबके घेऊन या तिघांच्या समोर येऊन गुडघ्यावर बसतात. इथे महत्त्वाची बाब म्हणजे त्या तीन सुवर्ण थाळय़ांमध्ये रेशमी रुमालाखाली काही किमती भेटवस्तूही झाकल्याचे विश्वासरावांनी लिहिले आहे. पण त्या किमती भेटवस्तू म्हणजे तलवारी असतात. सत्कार होताना साधारणत: सत्कारमूर्ती समोर पाहात असतात; पण त्यांचं वर्णन करताना पाटील लिहितात, ‘निजामाच्या समोर आदराने खाली मुंडी घालून उभे असलेले ते तीन युवराज! (पृष्ठ क्र.१५)’ अन् विश्वासरावांनी केलेल्या वर्णनानुसार आकस्मिकपणे वाजणाऱ्या मंगलवाद्यांचा अचानक ठेका बदलतो, ते रणभेरीचे कर्कश सूर बनतात. त्या ठेक्याच्या पार्श्वभूमीवर निजामशहा आदेश देतो, ‘तामिलऽऽ’. अन् निजामशहाच्या आदेशानंतर त्याच तलवारी घेऊन निजामाचे ते सरदार या तिघांची मुंडकी उडवतात. म्हणजे पाहा- त्या तिघांनी खाली मुंडी घातल्यामुळे त्या तलवारीही कुणाला दिसल्या नाहीत, अन् त्यांच्या मुंडीही सहजपणे उडवता आल्या. त्या उडवणाऱ्यांना वेगळे कष्ट पडले नाहीत असा विश्वासरावांचा दृष्टिकोन, पण त्या तिघांनी मुंडी खाली घातली तरी त्यांचे डोळे उघडेच असतील. त्यांना त्यांच्या समोरच गुडघ्यावर बसलेले ते तीन सरदार काय करत आहेत हेही दिसत असेलच की. परंतु लेखकाकडेच आंधळेपण असेल तर काय होतं, याचा हा अस्सल नमुनाच म्हणायला हवा.

त्या प्रसंगाचं वर्णन पृष्ठ क्र. १५ वर विश्वासराव पुढे असं करतात, ‘त्यांची मुंडकी धडापासून वेगळी झाली! रक्ताच्या चिळकांडय़ा उडवत नारळांसारख्या त्या मुंडय़ा समोरच्या बाजूला कोसळल्या. हे पाहून बाजूलाच उभे असलेले लखोजीराव दगड होतात, गोठून जातात. त्यांना ओरडायचंही सुचत नाही. ते अर्धवट (!) खाली बसतात. मग त्यांच्या थरथरत्या शरीराला एकदोघांनी आधार दिला.’ विश्वास पाटील पुढे लिहितात,‘लखोजींनी आपल्या पायतळी पाहिले. त्यांच्या लाडक्या लेकाचे- राघवचे ते शिर. त्याच्या मानेकडच्या तुटल्या भागातून अजून बुडबुडे टाकत बाहेर उसळणारे रक्त! (पृष्ठ क्र.१५, १६)’ पाहा बरं, विश्वास पाटील नामक या आद्यइतिहासाचार्यानी मांडलेला हा संशोधनात्मक इतिहास वाचून तुमच्याही मनाला बुडबुडे आले ना? अजून हे संपलेलं नाही. पुढे वाचा.. विश्वासराव लिहितात, ‘त्याचा गरम स्पर्श लखोजींच्या बोटांना झाला- मग मात्र क्षणार्धात उखळ तोफेसारखा त्या मर्दाचा देह गरम झाला, पेटून उठला! अन् त्यांनी खाडकन् उभे राहत आपली तलवार म्यानाबाहेर खसकन् ओढली!’

इथे लखोजींच्या बोटाला रक्त कसे लागले, किंवा कटकारस्थान सुरू असताना दरबारात निजामाच्या हुकुमाची पायमल्ली करीत गोठलेल्या, दगड झालेल्या लखोजीरावांना एक-दोघांनी आधार कसा दिला? याचेही उत्तर लेखकाने देणे अपेक्षित आहे. परंतु इतिहासाच्या नावाखाली आपण काय दिवे पाजळत आहोत, याचं भानही विश्वासरावांना राहिले नसल्याचेच दिसून येते.

या मुंडक्यांचा इतिहास पुढेही (कादंबरीभर) आहे. रंजक, बिभत्स आणि इतिहासाची ऐशीतैशी करणारा हा भाग असला तरी त्यातील संदर्भानुरूप अल्प मजकूरच इथे विचारात घेतला आहे. दरम्यान, वेरुळला गेलेल्या गर्भवती जिजाऊ गडाच्या मुख्य दरवाजासमोर असलेल्या गोटात परत आल्या आहेत. तेव्हा रात्रीचा किर्र्र अंधार आहे. अन् जिजाऊंना काहीतरी विपरीत घडल्याचे जाणवत आहे. त्यांना ‘आईऽऽ आई गं, मातोश्री!’ असे ओरडायचेही असते (पृष्ठ क्र.१७); पण त्यांना कंठच फुटत नाही असे विश्वासराव लिहितात. असे असले तरी जिजाऊंना या घडलेल्या प्रसंगाची अजून सुतराम कल्पना नाही, हेही इथे लक्षात घ्या. मग त्यांच्या पायाला ‘दगडधोंडा नव्हे, तर चोळामोळा झालेल्या मानवी शरीराचा एक गोळा’ लागतो. त्या खापरी पणतीच्या लाल प्रकाशात पाहातात तर ते मानवी धड होते, मुंडके नसलेले! मग त्यांची नजर पलीकडे जाते. तिथे त्यांना काय दिसते, तर ‘झाडावरून तुटून पडलेल्या नारळासारखे एक मुंडके. त्याच्या तळाशी अर्धवट सुकलेला रक्ताचा गोळा आहे. त्या शिराच्या टाळूवर थरथरता हात फिरवत जिजाऊ हंबरडा फोडतात, ‘यशवंतरावऽऽ बाळाऽऽ काय झालं हो हे?’ (पृष्ठ क्र.१७-१८)

अतिरंजीत पोलिसी वार्तापत्रांमधील खून, मारामाऱ्यांच्या वर्णनाला शोभणारे हे लेखन. ते करताना विश्वासरावांनी लखोजीरावांच्या पत्नी गिरिजाबाई यांना तर प्रेतासारख्या अचेतन स्थितीत एका मेढीला (खांब) टेकून बसवलंय (पृष्ठ क्र.१८). त्यांच्या मांडीवर लखोजीरावांचा छिन्नविच्छिन्न देह ठेवलाय. लखोजीराव जाधवांसह इतरांची हत्या करताना निजामाच्या दरबारातील वातावरण उन्मादी होते. अशा वातावरणात तेथून हे मृतदेह खाली लखोजींच्या गोटात कुणी आणले? अन् एकीकडे मुंडके, दुसरीकडे धड असे अस्ताव्यस्त टाकून मृतदेहांचा उपमर्द का करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत. पुढे जिजाऊ आल्यानंतर भीतीने अंधारात गायब झालेले पंताजी गोपीनाथसह जाधवांचे सेवक, नोकर-चाकर, हळूहळू येतात. मग पेटून उठलेल्या जिजाऊ हे कृत्य कोणाचे म्हणत हातात तलवार घेऊन निजामाच्या किल्ल्याकडे धाव घेतात! त्यावेळी प्रेतासारख्या अचेतन असलेल्या गिरिजाबाई म्हणतात, ‘बघा बघा, आता आमची वेडी कन्या कुठे चालली-बघा! ’ (पृष्ठ क्र.१९) विश्वासरावांची ही वर्णने म्हणजे हा इतिहास आहे की मुर्खाच्या नंदनवनातील सैर असा प्रश्न पडतो.

पुढे जिजाऊ काही अंतर गेल्या असताना अंधारातून दहा-बारा घोडय़ांच्या टापांचा आवाज येतो. तिथे घोडय़ावरून येणारे ते शाहाजीराजे असतात! मग ते जिजाऊच्या घोडय़ाचा लगाम खेचतात. त्यांना थांबवतात. तेव्हा ते म्हणतात, ‘जिऊ, अहो आवरा स्वत:ला. तुमच्या पोटात बाळ आहे जिऊ. खूप नाजूक अवस्था आहे आपली!’ (पृष्ठ क्र.१९) पोटातल्या बाळाची जाणीव करून देताच जिजाऊ थरारल्या, गांगरल्या.. असेही लेखक लिहितो. मग पुढे त्या निजामाचा किल्ला पेटवून देण्याची भाषा करीत शाहाजीराजांना म्हणतात, ‘त्या अन्यायी घातकी दरबाराची राख प्राशन करायचे डोहाळे लागलेत. होऽऽ चला राजे आमचे डोहाळे पुरवा.’ (पृष्ठ क्र.२०) सत्याची धार म्हणत इतिहासाची अशी राखरांगोळी करणारा विश्वास पाटील यांच्यासारखा पट्टीचा साहित्यिक आजपर्यंत आमच्यातरी पाहण्यात नाही.

उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यानुसार तेव्हा शाहाजीराजे परांडा किल्ल्यावर होते. म्हणजे तेथून २०० किमी अंतरावर. पण पाटलांनी त्यांनाही येथे पाचारण केले आहे. म्हणे, जिजाऊ तेथून निघाल्या तेव्हा राजांनी तिकडे येण्याचे त्यांना आश्वासन दिले होते. कथेचा घातलेला हा ऐतिहासिक घोळ (मेळ!) पाहिला तर लेखकाची गणना शहाण्या माणसात करणेही धाष्र्टय़ाचे ठरेल.

शिवाय जिजाऊ वेरुळहून आल्यानंतर लेखकाने जाधवांच्या गोटाच्या केलेल्या वर्णनामध्ये लेखकाचा अक्षम्य बावळटपणाच दिसून येतो. पाटलांच्या वर्णनानुसार हा गोट पूर्ण कलथून गेला आहे. त्यातून भिरभिर रातवारा वाहत आहे. पाटलांचं तमाशाप्रेम सर्वश्रुत आहे; पण जागा सोडताना तमाशाच्या कनातींची अवस्थाही अशी नसते. पुढे रंजकतेचा डोस वाढवताना त्या गोटात अनेक जण अंगाचे मुटकुळ करून पडलेले, कोण तसेच कलंडलेले, तर कोण हताश होऊन पडलेले असंही विश्वासराव लिहितात. गोटात अंगाचे मुटकुळ करून पडण्याइतकी सुरक्षितता असेल तर बाकीचे अंधारात का पसार झाले, याचे उत्तर विश्वासराव देतील का? पण लखोजीरावांसह त्यांचा पुत्र व भाच्याची हत्या झाल्यानंतर वाचलेले जीव वाचवण्यासाठी पळ काढणार नाहीत का? ते तेथेच कशाला थांबतील? हे साधे लॉजिक आहे. पण लेखकाचे भान सुटले तर इतिहासही कसा हास्यास्पद होतो याचे हे मूर्तिमंत ताजे उदाहरण आहे.

जाधवांची दरबारात अमानुष हत्या झाल्यानंतर पुढे काय होते, याबाबत वा. सी. बेंद्रे यांच्या ‘मालोजी राजे आणि शाहाजी महाराज’ या ग्रंथातील पृष्ठ क्र. २२६ वर अब्दुल हमीद लाहेरींच्या ‘बादशाहानाम्या’तील काही इंग्रजी भाषेतील नोंदी आहेत. तो मजकूर असा आहे- ‘लखोजीरावांचा भाऊ जगदेवराव, त्यांचा मुलगा बहादुरजी, त्यांची पत्नी आणि इतर काही जण वाचले. आपली सुटका करून घेताना त्यांनी दौलताबादहून जालनापूरजवळच्या िशदघरला (सिंदखेड) पळ काढला. हा त्यांचा मुलुख होता.’ तर कृ. अ. केळुस्कर आपल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या ग्रंथात पृष्ठ क्र. २२ व २३ वर लिहितात- ‘पितापुत्र मोठय़ा शौर्याने लढले; परंतु यवनसरदारांपुढे त्यांचे काहीएक न चालून शेवटी ते तेथेच ठार झाले. जाधवरावांची बायको गिरिजाबाई व बंधू भातोजीराव हे काही सैन्यासह शहराबाहेरील हौदापाशी उतरले होते. त्यांना हे घोर वर्तमान कळताच ते आपली फौज घेऊन सिंदखेडास पळून गेले.’ हे ऐतिहासिक सत्य टाळून विश्वास पाटील ‘मुंडकी’ उडवण्याचा इतिहास मांडून काय साधू इच्छित आहेत? कधी निजामशाही, कधी मोगलशाही असे वर्तन लखोजीरावांकडून झाल्याने निजाम चिडून होता व त्यातूनच या हत्या झाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. (मालोजीराजे आणि शाहाजीमहाराज- पृष्ठ क्र.२०६) विश्वास पाटील यांनी उगाच रक्तरंजित रंजकतेच्या पाठीमागे न लागता अशा घटनांवर प्रकाश टाकला असता तर त्याला इतिहास म्हणता आले असते.

आपल्याच पूर्वजांच्या इतिहासाविषयी घोर अज्ञान आणि अनास्था असलेल्या सध्याच्या परिस्थितीत विश्वास पाटलांसारख्या बेगडी ललित-इतिहासकारांनी सत्याच्या नावाखाली मांडलेल्या ‘असत्य’ इतिहासाकडे कुणी डोळसपणाने पाहायचे, हा प्रश्न आहे.
sureshpatilmm@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×