डॉ. अभय बंग
महात्मा गांधी या विषयावर मराठी साहित्यिकांचा प्रतिसाद एक साहित्यिक म्हणून अतिशय कोता राहिला. मराठी साहित्यिकांनी याचा योग्य उपयोग केला नाही. या विषयावर न येथे प्रेमचंद निर्माण झाला, न येथे ताराशंकर बंदोपाध्याय निर्माण झाला. दुसऱ्या काही बाबतीत मराठीत सुंदर साहित्य निर्माण झालं. पण हा जो गांधींचा काळ आहे, गांधींचं व्यक्तिमत्त्व आहे त्यावर मराठीमध्ये ना महाकाव्य झालं, ना महाकादंबरी झाली..
साहित्य शब्दाची व्युत्पत्ती विनोबांनी अशी सांगितली आहे की ‘जे सहित चालतं ते साहित्य’. म्हणून आपण म्हणतो, स्वयंपाकाचं साहित्य, प्रयोगाला लागणारं साहित्य, अंत:क्रियेचं साहित्य. म्हणजे साहित्य हे निरपेक्ष नसतं. ते स्वत:च्या पायावर कधीच उभं राहत नाही. साहित्याला कोणता तरी संदर्भ लागतो, आधार लागतो. तो समाजाचा असेल, जीवनाचा असेल, मानवी भावनांचा असेल किंवा ऐतिहासिक असेल. कशाच्या तरी साहाय्याने साहित्य उभं राहतं. या लेखामध्ये मी मराठी साहित्याने महात्मा गांधी या संदर्भाशी काय नातं जोडलं, काय न्याय केला याचा विचार करणार आहे.
मराठी साहित्य आणि गांधी यांचा विचार करताना माझ्या मनामध्ये काही प्रश्न येतात. महात्मा गांधी हा एवढय़ा मोठय़ा उंचीचा व इतिहास घडवणारा माणूस कसा काय निर्माण झाला? अर्नोल्ड टॉयनबी यांना विसाव्या शतकाचा सर्वश्रेष्ठ इतिहासकार मानण्यात येतं. त्यांचा ‘Study of History’ हा जागतिक इतिहासाचा श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. त्यात ते इतिहासात होऊन गेलेल्या जवळपास पन्नास सभ्यतांचं विश्लेषण करतात. परिस्थितीशी सामना करताना काही सभ्यता आव्हानांसमोर हरतात, रसातळाला जातात. काही टिकतात, पण खुज्या होतात. काही मात्र जिंकतात, वर उठतात. हे कशावरून ठरतं? याचं उत्तर टॉयनबी स्वत: असं देतात की, जेव्हा त्या काळाच्या परिस्थितीमधनं एखाद्या समाजाच्या, संस्कृतीच्या अस्तित्वाला एक विराट आव्हान येतं, तेव्हा फक्त मोजक्या सभ्यतांच्या बाबतीत असं घडतं की, ‘There comes a hero’, एक महानायक येतो. तो महानायक त्यावेळच्या मानवसमूहाला उच्च स्वप्न, शब्दावली, मार्ग आणि रोज करण्याचे कार्यक्रम देतो. सगळा जनसमूह अनेक वर्षे त्या महानायकाच्या मागे जातो आणि यावरून त्या सभ्यतेचं भवितव्य ठरतं.
आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी : युवा बुद्धिबळपटूंचा दबदबा
या स्पष्टीकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर एका विशिष्ट काळातच गांधी का निर्माण झाला याचं उत्तर आपल्याला मिळायला लागतं. ब्रिटिशांच्या गुलामीचं आव्हान, भारतातली विलक्षण गरिबी-आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही प्रकारची गरिबी, भित्रे, कमजोर भारतीय, माना झुकवणारे-तुकवणारे भारतीय, जातीवादाने आणि धार्मिक भेदाने फाटाफूट झालेला हा देश, स्त्रियांना-अस्पृश्यांना कायमच वाळीत टाकलेला हा देश. अशा स्थितीच्या या विलक्षण विराट आव्हानांसमोर गांधी नावाचा एक महानायक उभा राहिला आणि पस्तीस वर्षांत त्याने या देशाचा चेहरा बदलवून टाकला. हा महानायक इतका विराट होता की, जेव्हा आपल्या देशातले लोक त्याच्या अगदी जवळ उभे राहिले, तेव्हा त्यांना फक्त त्याच्या पायातल्या वाहाणेचा अंगठाच दिसला. पुतळा फार विराट आहे. तुम्ही जेव्हा फार जवळ असता आणि जे बघायचं आहे ते फार विराट असतं, तेव्हा तुम्हाला फक्त थोडेसे मातीचे पाय दिसतात. आपलं असं झालं का? मराठी साहित्यिकांचं असं झालं का? विसाव्या शतकामध्ये गांधींसोबत, गांधी विचारांसोबत, मराठी साहित्यिकांनी न्याय केला का?
माझं ढोबळ निरीक्षण असं की, वैचारिक क्षेत्रामध्ये न्याय केला. त्याचं प्रमुख कारण साक्षात विनोबाच होते. त्यांची वैचारिक व नैतिक उंची व शुभ्रता हिमालयासारखी होती. गांधींच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी मराठीत भरपूर लिहिलं आणि तेही अशा मार्मिक सूत्रबद्ध पद्धतीने की ती मराठीत एक नवी शैलीच झाली. त्याचबरोबर काका कालेलकर, आचार्य जावडेकर, आचार्य दादा धर्माधिकारी असे गांधी विचारांचे अनेक विचारक झालेत. तिथपासून तर रामदास भटकळ, नागपुरातले सुरेश पांढरीपांडे या सर्वानी गांधी विचारांच्या बाबतीत लिहिलं आहे. पण ललित साहित्याकडे यावं तर मात्र वाळवंटच आढळतं. साने गुरुजी हे एक नाव ठळकपणे नजरेसमोर येतं. तुकडोजी महाराज हे दुसरं नाव घेता येईल. मामा वरेरकर, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, बोरकर किंवा वा. कृ. चोरघडेंच्या साहित्यामध्ये गांधींशी सहानुभूतीच्या छटा दिसतात. पण ढोबळमानाने मराठी साहित्यिकांनी गांधींची उपेक्षा केली. मग उपहास केला. नंतर उग्र विरोध केला आणि शेवटी त्या द्वेषामुळे काहींनी खून करून टाकला.
असं का घडलं? देशाच्या इतिहासामध्ये एवढं मोठं स्वातंत्र्याचं महाभारत घडलं. असं हजार वर्षांत एकदा घडतं. खांडेकरांच्या उल्का, दोन ध्रुव, क्रौंचवध अशा कादंबऱ्यांमध्ये थोडाफार संदर्भ आढळतो. (अर्थात माझं मराठी साहित्याचं वाचन अपुरं आहे). पण स्वातंत्र्ययुद्धावर किंवा गांधींवरती मराठी साहित्यात महान साहित्यकृती निर्माण झाली नाही. फ्रेंच राज्यक्रांती झाली त्या पार्श्वभूमीवर व्हिक्टर ह्युगोने ‘ला मिझरेबल’ लिहिली. रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर मॅक्झिम गॉर्कीने ‘मदर’ लिहिली. आम्ही असं का लिहिलं नाही? हे जे आधुनिक महाभारत भारतीय भूमीवर घडलं त्यात दोन पक्षही होते. सत्पक्ष होता व असत्पक्षही होता. प्रत्येकाने काही भूमिका घेतल्या. कुणी इकडे आले, कुणी तिकडे सामील झाले. प्रत्येकाची आपापली वैचारिक पार्श्वभूमी होती (की राजकीय स्वार्थ होते?) त्यानुसार त्यांनी भूमिका घेतल्या, बाजू निवडली. महाभारताच्या तोडीचं हे दुसरं महाभारत विसाव्या शतकात या भारतीय भूमीवर घडलं. उत्कृष्ट साहित्यासाठी अजून काय हवं होतं? मराठी साहित्यिकांनी त्याचं काय केलं?
आणखी वाचा-आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..
उदाहरणार्थ, एक चाळीस वर्षे चाललेलं द्वंद्व बघा. १९०९ साली गांधी आणि सावरकर दोघं लंडनमध्ये होते. इंडिया हाऊसमधल्या त्या जाहीर भाषणाच्या कार्यक्रमाला दोघांचा वाद घडला. गांधी अध्यक्ष होते आणि सावरकर प्रमुख वक्ते. त्यावेळी महात्मा गांधींना सावरकरांच्या विचारसरणीचं जे दर्शन झालं, त्याने ते फार अस्वस्थ झाले. त्यावेळी इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय तरुणांवर हा योग्य प्रभाव नाही असं त्यांना वाटलं. म्हणून गांधींनी लंडनहून दक्षिण आफ्रिकेला परतता परतता जहाजावरच ‘हिंद स्वराज्य’ लिहिलं. तेथूनच हा एक महासंघर्ष सुरू झाला – व्यक्तित्वामधला, विचारांमधला, मूल्यांमधला, कार्यपद्धतींमधला. हे द्वंद्व भारतात आल्यानंतरही सुरू राहिलं. दोघेही जेलमध्ये गेले, पण वेगवेगळय़ा कारणांसाठी. जेलमधला दोघांचा प्रतिसाद अगदी वेगवेगळा आहे. आणि गांधी हत्येच्या रूपात या द्वंद्वाचा जो शेवट झाला, त्यामध्ये सावरकरांच्या भूमिकेविषयी संशय व प्रश्नचिन्ह आहे. आता शंभर वर्षांनंतर भारताचं राजकीय पटल असं बदललेलं आहे, की सावरकरांचे फोटो आता लोकसभेत लागत आहेत. गांधी आणि सावरकरमधला संघर्षांचा शंभर वर्षांचा जो विशाल कॅनव्हास आहे, हा मराठी साहित्यिकांना एका महाकादंबरीचा विषय वाटू नये? आणि यापुढे वाटलाच तर बहुदा तो सावरकरांच्या उदात्तीकरणाच्या अंगानेच वाटेल.
महात्मा गांधी या विषयावर मराठी साहित्यिकांचा प्रतिसाद एक साहित्यिक म्हणून अतिशय कोता राहिला असं मला दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. साहित्यिक मंडळी मला क्षमा करतील, पण मला तरी असं दिसतं की, मराठी साहित्यिकांनी याचा योग्य उपयोग केला नाही. या विषयावर न येथे प्रेमचंद निर्माण झाला, न येथे ताराशंकर बंदोपाध्याय निर्माण झाला. दुसऱ्या काही बाबतीत मराठीत सुंदर साहित्य निर्माण झालं. पण हा जो गांधींचा काळ आहे, गांधींचं व्यक्तिमत्त्व आहे त्यावर मराठीमध्ये ना महाकाव्य झालं, ना महाकादंबरी झाली. याचं कारण काय असावं?
थोडा आत्मशोध घ्यायची गरज आहे. मराठी साहित्यिक एवढे आंधळे तर नव्हते. ते गांधींविरुद्ध हिरिरीने लिहीतही होते. म्हणून गांधी त्यांना दिसला नाही असं म्हणता येत नाही. मग काही मोजके अपवाद सोडले, ज्यांचा थोडा उल्लेख मी केला, तर का मराठी साहित्यिकांनी गांधींची एकतर उपेक्षा केली किंवा उपहास तरी केला? विचारार्थ वेगवेगळी कारणे मी मांडतो व तपासून पाहतो.
गांधी मराठी नव्हते, महाराष्ट्रातले नव्हते. जरी ते मुंबईला आणि पुण्याला येरवडा जेलमध्ये अनेक वर्षे राहिले, पण तसं त्यांचं घर महाराष्ट्रात नव्हतं. त्यांचे सगळे आश्रम महाराष्ट्राबाहेरचे आहेत. वर्धा हे त्यावेळेस महाराष्ट्रात नव्हतं; सी. पी. अॅण्ड बेरारमध्ये होतं. गांधी हा माणूस महाराष्ट्रातला नाही, मराठी नाही या संकुचित विचाराने महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का? तसं म्हणावं तर प्रश्न येतो की मराठी नसलेल्या सुभाषचंद्र बोसांविषयी ना. सी. फडक्यांनी शोनान, अस्मान, तुफान तीन कादंबऱ्या लिहिल्यात. तेथे मराठीवाद आडवा नाही आला. मग गांधींच्या बाबत काय आडवं आलं?
आणखी वाचा-पुनर्वसनाच्या कळा
जात आडवी आली का? हा बनिया माणूस होता. महाराष्ट्राचं वैचारिक, राजकीय नेतृत्व ब्राह्मणांच्या हाती आणि तेही पुण्याच्या ब्राह्मणांच्या हाती होतं. म्हणून आकस? पण तसं म्हणावं तर गांधींचे विधायक कामातले प्रमुख सहकारी आणि वैचारिक सहकारी मराठी ब्राह्मण होते. विनोबा भावे, काका कालेलकर, दादा धर्माधिकारी, अप्पासाहेब पटवर्धन, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, तुम्ही नुसती नावं घ्या. त्यांचे राजकीय सहकारी ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस बांधली त्यामध्ये गाडगीळ होते, देव होते, दास्ताने होते- सर्व ब्राह्मण! मग महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा गांधींच्या प्रति प्रतिसाद खूप अपुरा आणि कोता होता त्याचं कारण काय? शोध घेण्याची वेळ आहे.
सदानंद मोरेंच्या ‘लोकमान्य ते महात्मा’मध्ये त्यांनी काही विश्लेषण मांडले आहे. एकूणच पुण्याचा इतिहास, त्या काळचा पुण्याचा ब्राह्मणी जातीयवाद, पुण्याचा सनातनवाद. ‘हा कोण बाहेरून येऊन टपकला?’ हा विस्मय. आणि टिळकांच्या नंतर भारतीय नेतृत्वाचं सिंहासन आपल्या हाती यायला पाहिजे असा जो टिळकांच्या अनुयायांचा स्वत:विषयी गैरसमज होता तो गांधींनी चूक सिद्ध केला. म्हणून यांनी गांधींचा प्राणपणाने विरोध केला. अशी मांडणी मोरेंनी केलेली आहे.
विचारासाठी मी अजून एक हायपोथेसिस मांडतो. असं का घडलं? गांधींचा विरोध आणि टवाळी करणारे हे जे साहित्यिक होते, त्यांच्या स्वत:च्या व्यक्तित्वाचं, मन व वर्तनाचं, आवडी-निवडी, कमजोरी यांचं फ्रॉईडियन अनॅलिसिस केलं तर काय दिसतं? एक उदाहरण घेऊ या- प्र. के. अत्रे. महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध, आवडते, लोकप्रिय साहित्यिक. चटकदार बोलायचे व लिहायचे. त्यांची सगळय़ाच प्रकारची प्रतिभा. अत्रेंनी गांधींची यथेच्छ टवाळी उडवली आहे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी ब्रह्मचर्याची, दारूबंदीची, वस्त्रांची यथेच्छ टिंगल केली आहे. अत्रेंना गांधी एवढा का झोंबावा? याचं काही व्यक्तिगत पातळीवर विश्लेषण आहे का? अत्रेंचं बेफाट स्वच्छंदी जीवन, बेलगाम व अतिशयोक्तीपूर्ण लेखणी व भाषा; आणि या उलट गांधींचे सत्य, संयम, ब्रह्मचर्य, अस्वाद व्रत, दारूबंदी. अत्रेंना गांधी व्यक्तिश: झोबणं स्वाभाविक होतं.
अत्रेंनी व अनेक लोकप्रिय मराठी वक्त्यांनी व लेखकांनी पोटतिडिकीने गांधींची टवाळी केली. आपली पांढरपेशी नोकरी व वस्त्रं काळजीपूर्वक सांभाळत व सत्तेसमोर मुकाटय़ाने माना खाली घालत जीवन जगलेल्या मराठी साहित्यिकांना (याला अर्थातच अनेक अपवाद आहेत) सत्ता-बंदूक-काठय़ा-जेल या सर्वाना निर्भयपणे आव्हान देणाऱ्या गांधींच्या अहिंसक शौर्यापुढे फार खुजं वाटलं का? स्वत:चा दुबळेपणा मान्य न करता त्यांनी गांधींच्या अहिंसेला दुबळी म्हटलं. त्यामागे हा अपराध बोध होता का?
त्या काळात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गांधींचा उपहास ज्यांनी केला, त्या मराठी साहित्यिकांच्या व्यक्तिगत आवडी-निवडी, गुण-अवगुण, चारित्र्य, जगण्याचं वास्तव या सगळय़ांचं असं विश्लेषण करता येईल का? शंभर वर्ष झाली आहेत. आता त्या नावांमागचं कागदी वलय बाजूला करून सत्य विश्लेषण करायला हरकत नाही.
सारांश, एवढय़ा मोठय़ा महाभारताला आणि एवढय़ा मोठय़ा महापुरुषाला मराठी साहित्यिकांची आणि मराठी साहित्याची झालेली प्रतिक्रिया हा आता अभ्यासाचा विषय व्हायला पाहिजे. त्या आरशात तपासून पाहिलं तर मराठी साहित्य म्हणून काय चित्र दिसतं, ते एकदा मराठी साहित्यिकांनी तपासावं, आत्मपरीक्षण करावं. विसाव्या शतकामध्ये गांधींना महाराष्ट्राने भरभरून राजकीय प्रतिसाद दिला, पण मराठी साहित्यिकांनी, ललित साहित्यिकांनी नाही. हा एक विरोधाभास आहे. केव्हा ना केव्हा हे कोडे मराठी साहित्यिकांना व अभ्यासकांना सोडवावं लागणार आहे.
प्रश्न असा आहे की, मराठी साहित्यिक या पुढे काय करणार आहेत? अनेक प्रकारच्या कादंबऱ्या मराठी लेखकांनी हाताळल्या आहेत. मराठी लेखकांनी अगदी मृत्युंजय कर्णापासून तर संभाजीपर्यंत नायकांवर लिहिलं आहे. कादंबरीला कोणताही नायक पुरतो. ‘चरखा’ हाच एक नायक का होऊ शकत नाही? अर्थात त्याच्या मागे गांधी आहेच. चरख्याला मध्यवर्ती कल्पना करूनच कादंबरी रचता येईल. आर. के. नारायण यांनी ‘वेटिंग फॉर द महात्मा’ ही छोटीशी, पण सुंदर कादंबरी लिहिली आहे. किमान तशी कादंबरी तरी मराठीत यावी. एकविसाव्या शतकाला गांधींचे जे संदेश आहेत, उत्तरं आहेत, त्यांना घेऊन एका एका संदेशावर, एका एका विचारावर खरं म्हणजे एक एक कादंबरी लिहिली जाऊ शकते.
मराठी साहित्यिकांमध्ये कल्पनाशक्तीची, सर्जनशक्तीची कमी नाही. परंतु ती ‘मी नथुराम बोलतोय’ या दिशेने प्रकट न होता, गांधींचे एकविसाव्या शतकासाठी औचित्य आणि संदेश या दिशेने प्रकट व्हायला भरपूर वाव आहे.
search.gad@gmail.com