राहुल सरवटे
महात्मा जोतिराव फुल्यांनंतरच्या काळात त्यांच्या विचारांचे नवे अन्वयार्थ लावले गेले. त्यातून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या फुलेवादी भूमिकेत ब्राह्मणविरोध आणि हिंदू आत्मभानाची जाणीव अशा दोन्ही गोष्टींची सरमिसळ दिसते. फुले यांच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालंय. यानिमित्तानं फुले-उत्तर काळातल्या ब्राह्मणेतरी चर्चाविश्वाच्या इतिहासातला एक धागा पकडून आणि त्याला पूरक निरीक्षणं नोंदवून आपल्या मराठी आधुनिकतेच्या आकलनात काही भर पडते का, ते तपासण्याचा प्रयत्न…
विचारधारांचे किंवा वैचारिक जाणिवांचे इतिहास कधीही एकपदरी किंवा एकसंध असत नाहीत. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर या विचारधारांचे अर्थ बदलतात; त्यांत काही नवी भर पडते, काही जुना भाग संदर्भहीन होतो; त्यांचा आशय, रचना आणि स्वरूप यांत बदल होतात. आणखी या विचारधारांचे नवे शिलेदार आपापल्या संदर्भांना आणि स्थळकाळाला अनुरूप असे नवे घटक त्यात समाविष्ट करतात.
थोडक्यात, कुठलीही विचारधारा ही साचलेल्या पाण्यासारखी एकाच आशयाचं प्रतिबिंब न राहता, वाहत्या जलाप्रमाणे नवे नवे आशय आणि संदर्भ रिचवत आणि त्यांना नवा अर्थ प्रदान करत पुढे जाते आणि त्यामुळेच ती निरनिराळ्या पिढ्यांसाठी समकालीन राहू शकते.
फुलेवादाची मांडणी…
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा त्यांच्या पश्चात अगदी आजवर महाराष्ट्राच्या सार्वजनिक चर्चांवर आणि वैचारिक संस्कृतीवर ठामपणे उमटलेला दिसतो. फुल्यांच्या वैचारिक मांडणीचा आलेख ‘गुलामगिरी’, ‘शेतकर्याचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ अशा अनेक ग्रंथांत आढळतो.
हिंदू समाजरचना आणि मूल्यव्यवस्था ही विषमतामूलक ब्राह्मणवादाच्या आधिपत्याखाली आहे, असं प्रतिपादन करून त्याविरोधात फुल्यांनी एतद्देशीय, अनार्य आणि कृषिप्रधान व्यवस्थेचा पुरस्कार केला. अस्पृश्यांसहित सर्व ब्राह्मणेतर समूहांना एकमय लोक मानून ब्राह्मणांखेरीज इतर सर्वांना सामावून घेणारी शूद्रातिशूद्र ही संज्ञा त्यांनी वापरली. १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचं अधिष्ठान असणार्या सत्यधर्माचा प्रसार केला.
फुल्यांची मांडणी धारदार होती. ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘विवेकसिंधू’ यांसारखे भक्ती परंपरेतले ग्रंथ शूद्रातिशूद्रांना ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली ठेवण्याच्या हेतूनं रचलेलं कारस्थान आहे, असं जोतिरावांचं प्रतिपादन आहे. इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी अशा श्रेष्ठ एकेश्वरवादी धर्मात होऊ शकणारं हिंदूंचं धर्मांतर भक्ती परंपरेमुळेच टळलं असं फुल्यांना वाटत असे.
इंग्रजी काळापूर्वी मुसलमानी आणि पोर्तुगीज अमलात हिंदूंना जबरीने मुसलमान किंवा ख्रिस्ती करण्याचे प्रयत्नही त्यांना स्वागतार्ह वाटत. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, विठ्ठल आणि विष्णू अशी ईश्वराची विविध रूपं मानण्याची परंपरा, तीर्थयात्रा करणं, श्राद्धासारखे विधी करणं अशा अनेक तत्कालीन हिंदू चालीरीतींचा फुल्यांनी कडक- प्रसंगी खिल्ली उडवूनही- निषेध केलेला आढळतो.
थोडक्यात, फुल्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी समता हे वैश्विक मूल्य होतं, त्याविरोधात विषमतेवर आधारित जातिव्यवस्था आणि तिचा धार्मिक आधार असणारा ब्राह्मणवाद किंवा हिंदू धर्म यांना नकार देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्वातंत्र्योत्तर भारतात विशेषत: १९६० नंतरच्या काळातल्या समाज परिवर्तनाच्या चळवळी, आंबेडकरवादी, समाजवादी, मार्क्सवादी संघटना आणि शरद पाटील, गेल ऑम्वेट, एलेनॉर झिलीयट, रोझलिन्ड ओहन्लन, यशवंत सुमंत, राजेंद्र वोरा, वसंत पळशीकर अशा अनेक अभ्यासकांनी फुल्यांच्या विचारातला हा हिंदू/ब्राह्मणी परंपरेशी संघर्षाचा आशय हा फुलेवादाचा गाभा मानून फुल्यांच्या विचारांची मांडणी केली. आज मराठी चर्चाविश्वात ही मांडणी रूढ आहे.
पण आपण काळदृष्ट्या जर थोडंसं मागे गेलो, तर आपल्याला फुलेविचारांची काय मांडणी दिसते? फुले-उत्तर काळात ब्राह्मणेतर चर्चाविश्व जोमाने फोफावले. फुल्यांचे सहकारी आणि फुल्यांनंतर सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झालेले डॉ. विश्राम रामजी घोले, छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणेतर चरित्र लिहिणारे कृष्णराव केळुस्कर, पुढे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झालेले ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील, राजर्षी शाहू छत्रपती, क्षात्रजगद्गुरू सदाशिवराव पाटील, भास्करराव जाधव, ‘विजयी मराठा’कार श्रीपतराव शिंदे, स्पष्टवक्ते ‘प्रबोधन’कार ठाकरे, तेजतर्रार लेखणीचे दिनकरराव जवळकर, अभ्यासू वृत्तीचे वालचंद कोठारी अशा अनेकांनी सत्यशोधकी किंवा ब्राह्मणेतरी चळवळीला आकार दिला; आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जात-चिकित्सेची वैचारिक परंपरा आणखी विकसित केली.
महात्मा फुल्यांना ब्राह्मणेतर चळवळीच्या या प्रसरणशील युगात कसं वाचलं गेलं, त्यांच्या विचारांचे कुठले अन्वयार्थ लावले गेले हे थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करू.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली ब्राह्मणेतर चळवळ…
विसावं शतक उजाडलं तेच वेदोक्त प्रकरणाच्या ठिणगीसह. १८९९ सालच्या कार्तिक महिन्यात कोल्हापुरात पंचगंगेवर धार्मिक विधी करताना, आपला पुरोहित वेदांतले मंत्र न म्हणता पुराणातले मंत्र म्हणतोय, असं लक्षात आल्यावर शाहू छत्रपतींनी त्याला जाब विचारला. त्यावर तुम्ही शूद्र असल्याकारणानं तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही, असं तो पुरोहित उत्तरला. इथून मग, क्षत्रिय कोण, शूद्र कोण, धर्मशास्त्रावर ब्राह्मणांची मक्तेदारी का, सर्व हिंदूंना समान धार्मिक हक्क कसे मिळतील असे प्रश्न उद्भवले. धार्मिक बाबतीत आर्य समाजी असणार्या शाहू छत्रपतींनी हा प्रश्न अनेक पातळ्यांवर धसास लावला.
वेदोक्ताचे हक्क एकीकडे इंग्रजी कोर्टांद्वारे आणि दुसरीकडे शंकराचार्यांच्या संकेश्वर तसेच पुढे द्वारकापीठाकडून मंजूर करून घेतले. पुढे १९२० साली ब्राह्मणांची धार्मिक मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मराठा जातीतील तरुणांना पौरोहित्याचे शिक्षण देण्यासाठी श्रीशिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केली. त्याचबरोबर नव्या ब्राह्मणेतर शंकराचार्यांसाठी क्षात्रजगद्गुरूपीठाची स्थापना केली.
शाहूंचे पहिले चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी या अपूर्व उपक्रमाची तुलना ख्रिस्ती प्रोटेस्टन्ट पंथाशी केली. सत्यशोधक समाजाचे सदस्य असणार्या लठ्ठ्यांना फुल्यांनी पुरोहितशाहीला दिलेला नकार आणि शाहूंनी क्षत्रिय पुरोहिताची स्थापना करणं यात कुठलीही विसंगती नाही असं प्रतिपादन करणं महत्त्वाचं वाटत होतं.
तरीही, फुल्यांच्या आणि शाहूंच्या वर्णसंस्थेविषयक भूमिकांत मूलभूत फरक होता. मुळात फुल्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेतलं पारंपरिक विभाजन द्विज (ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य) आणि शूद्र अमान्य करून ते ब्राह्मण विरुद्ध शूद्रातिशूद्र असं केलं. पर्यायानं क्षत्रियत्वाला विशेष दर्जा न देता सर्व ब्रह्मणेतर समूह एकसमान मानले आणि या संपूर्ण विभाजनाला नकार दिला.
याउलट, शाहूंना वेदांविषयी अतिशय आस्था होती आणि त्यांच्या आर्यसमाजी भूमिकेनुसार मूळ चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध नसून गुणसिद्ध होतं. पर्यायानं दोघांचाही ब्राह्मण पुरोहितव्यवस्थेला विरोध असला तरी त्यांच्या भूमिका गुणात्मकदृष्ट्या भिन्न होत्या. क्षत्रियत्वाचा पाठपुरावा करण्याच्या या आग्रहाचे अनेक अन्वयार्थ निर्माण झाले.
एकीकडे मुकुंदराव पाटलांच्या ‘हिंदू आणि ब्राह्मण’ या संवादात्मक पुस्तकांतून ब्राह्मणविरहित हिंदू समाजाची कल्पना पुढे आली. या पुस्तकात पाच जणांमधला संवाद नमूद केलाय : एक मराठा, एक अस्पृश्य, एक मुसलमान, एक ख्रिस्ती आणि एक ब्राह्मण. संवादाचा निष्कर्ष असा की, मुसलमान किंवा ख्रिस्ती लोकांमध्ये पुरोहिताची भाषा, त्यांची धार्मिक पुस्तकं, त्यांचं अन्न, चालीरीती, सणवार या गोष्टी त्या धर्माच्या इतर सदस्यांपेक्षा निराळ्या नसतात. याउलट ब्राह्मण पुरोहित आणि मराठा, अस्पृश्य इत्यादी जातींमध्ये या बाबी सामायिक नाहीत.
अर्थात, ब्राह्मण आणि इतर लोक एकाच धर्माचे असू शकत नाहीत. मग ब्राह्मणांचा ब्राह्मण धर्म असेल, तर आमचा धर्म कुठला? तर तो हिंदू. आमच्या हिंदू धर्माचा ब्राह्मणांशी संबंध नाही. खेरीज, मुकुंदराव पाटील भक्ती चळवळीला या हिंदू असण्याशी घनिष्ठपणे जोडतात आणि सत्यशोधकी असणं आणि वारकरी असणं यात कुठलाही फरक नसल्याचं ठामपणे प्रतिपादन करतात. अशी भक्ती चळवळीशी नाळ जोडणारी नवी हिंदू सामूहिक जाणीव फुल्यांच्या मांडणीचे नवे अर्थ लावते.
तर दुसरीकडे, एका महाराष्ट्रव्यापी ब्राह्मणेतर ‘नेटवर्क’मधून या क्षत्रिय पुरस्कृत हिंदू धर्माची नवी मांडणी आकाराला येऊ लागली. बेळगावचे वासुदेव बिरजे, अमरावतीचे मोतीराम वानखडे, नागपूरचे गोपाळराव दळवी, शिरसगावचे काशीराव देशमुख, नगरचे क्रांतिकारी काशिनाथ दिवटे अर्थात संन्यासी आनंदस्वामी या आणि अशा अनेकांनी ब्राह्मणी वर्चस्वाचा विरोध करत क्षत्रियप्रणीत हिंदू धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेची मांडणी केली. यात हिंदू असण्याचा आर्य तसेच वैदिक असण्याशी संबंध जोडला गेला आणि हे आर्य/ वैदिक असणं क्षत्रियप्रणीत आहे, हे अधोरेखित केलं गेलं.
शिवाय श्रीराम, श्रीकृष्ण असे ईश्वरी अवतार हे क्षत्रिय असल्यामुळे, हिंदू धर्म क्षत्रियनिर्मित आहे अशीही भूमिका घेतली गेली. आता यातून एकीकडे ब्राह्मणेतर चर्चाविश्वात राजकीयदृष्ट्या हिंदू आत्मभान खोलवर रुजलं. पण तरीही ब्राह्मणविरोध प्रखर असल्याकारणाने अजूनही ब्राह्मणी व्यवस्थेचे आपण बळी आहोत, ही जाणीवही शाबूत राहिली. हिंदू धर्माचे निर्माते आणि चालक असल्याची भूमिका ही त्या धार्मिक व्यवस्थेचे शोषित असल्याच्या भूमिकेला छेद देत राहिली.
या अंतर्विरोधातून फुल्यांच्या भूमिकेचा नवा अर्थ लावण्याचा प्रयत्न होऊ लागला. १९२७ साली अकोल्याला भरलेल्या ब्राह्मण परिषदेत हिंदू धर्मातील सर्व जाती सामाजिक आणि धार्मिक हक्कांच्या दृष्टीने समान आहेत, असा ठराव पास झाला. त्यानिमित्ताने लिहिताना ‘विजयी मराठा’ या प्रख्यात ब्राह्मणेतर पत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे यांनी फुल्यांचं मूळ म्हणणं शाहूंप्रमाणे प्रत्येक हिंदूला वेदोक्ताचा अधिकार आहे, हेच होतं अशी भूमिका घेतली. प्रखर फुलेवादी असणारे आणि त्या कारणामुळे क्षात्र जगद्गुरूपदाचा निषेध करणार्या भास्करराव जाधवांच्या मते, सत्यशोधक समाज ही खर्या वैदिक हिंदूंची संघटना होती.
प्रबोधनच्या १९२३ सालच्या अंकातल्या एका इंग्रजी लेखात ब्राह्मणेतर चळवळीतले महत्त्वाचे शिलेदार केशवराव ठाकरे सांगतात की, फुल्यांना स्वत:च्या हिंदू असण्याचा अभिमान होता. ‘‘न्यायालयात त्यांची जात आणि धर्म विचारला गेल्यावर फुले निडरपणे म्हणाले, मी जातीने मनुष्य आहे आणि धर्माने हिंदू.’’
अगदी टिळक आणि चिपळूणकरांना ‘देशाचे दुश्मन’ जाहीर करणार्या जहाल दिनकरराव जवळकरांच्याही दृष्टीनं महात्मा फुल्यांचा सगळा राजकीय प्रकल्पच हिंदू धर्माला ब्राह्मणांपासून वाचवण्याचा होता. ‘देशाचे दुश्मन’मध्ये ते लिहितात : ‘‘ जोतिराव हिंदू धर्माचे कट्टे कैवारी होते… सत्यशोधक समाज म्हणजे निराळा धर्म नाही, निराळा पंथ नाही, तर हिंदू धर्माच्या उज्ज्वल तत्त्वांनी सर्व जगाला चकित करून सोडण्यास मोठ्या महत्त्वाकांक्षेने एके ठिकाणी जमलेल्या खर्या हिंदूंचा जमाव आहे.’’ जवळकरांच्या ‘देशाचे दुश्मन’मधला देश हिंदू आहे आणि ब्राह्मण हे त्याचे शत्रू.
फुलेवाद आणि ब्राह्मणेतर हिंदुत्व
फुल्यांच्या काळातली ब्राह्मणविरोधाची धार या पुढच्या टप्प्यावर आणखी टोकदार झालेली दिसते. पण सोबतच फुल्यांच्या विचारांना नव्या हिंदूपणाच्या चौकटीत स्थापित केलं गेलं. शिंदे, जाधव, ठाकरे किंवा जवळकर हे सगळेच राजकीय जीवनात दीर्घकाळ कार्यरत असणारे आणि ब्राह्मणेतर चळवळीशी सखोल बांधिलकी असणारे विचारवंत नेते होते. त्यांचा फुल्यांच्या लिखाणाशी आणि जीवनाशी दीर्घ परिचय होता. फुल्यांच्या मूळ लिखाणात हिंदू हा शब्दही क्वचितच येतो.
तर या फुले विचारांचे पाईक असणार्या मंडळींनी दिलेल्या फुल्यांच्या विचारधारेच्या हिंदू निर्वाळ्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? यासंबंधी काही तर्क करता येऊ शकेल. एक तर फुल्यांना संपूर्णपणे हिंदू सामाजिक आणि वैचारिक रचनेच्या बाहेर पाहणं ही बाब फुले-आंबेडकर विचारप्रवाहाच्या निर्मितीतून आकाराला आली.
स्वातंत्र्योत्तर काळातला बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय हा जातविरोधी चर्चाविश्वात जहालपणाचं मोजमाप ठरू लागल्यानंतर आंबेडकरांची हिंदू धर्माला नाकारण्याची भूमिका त्यांचे गुरू आणि वैचारिक पूर्वसुरी असणार्या फुल्यांनाही आपसूक लागू झाली. पुढे शरद पाटील, गेल ऑम्वेट वगैरे मंडळींनी मार्क्सवादी प्रवाहांतर्गत केलेल्या फुल्यांच्या वाचनातून त्यांचं हिंदूविरोधी असणं अधिकच गडद झालं. पण ही बाब आपल्या अधिक नजीकच्या भूतकाळात घडली.
प्रत्यक्षात मात्र जातविरोधी भूमिकेच्या अनेक छटा कार्यरत होत्या. या दीर्घ परिप्रेक्षाचा विचार करता शिंदे, ठाकरे किंवा जवळकरांनी लावलेला फुलेविचारांचा अर्थ ब्राह्मणेतरी चर्चेत कायमच उपस्थित होता. एक तर फुल्यांनी हिंदू धर्म सोडण्याच्या किती तरी शक्यता उपलब्ध असूनही तो मार्ग नाकारलेला होता आणि धर्मांतराला उत्तेजन दिलं नव्हतं.
दुसरं असं की, फुल्यांचे जवळचे सहकारी असणारे डॉ. घोले, त्यांचे जावई डॉ. रघुनाथराव खेडकर अशी ब्राह्मणेतर मंडळी वेदांती तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती होती. घोल्यांनी भगवद्गीतेच्या तीन हजार प्रती लोकांना वाटल्याचे उल्लेख त्यांच्या चरित्रात आहेत. टिळकांच्या गीतारहस्याच्या वीसेक वर्षे पूर्वीच ‘आपल्या आर्यतत्त्वज्ञांनी प्रतिपादलेले गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य’ लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून, कृष्णराव केळुसकरांनी गीतेवर सान्वय- सार्थ- सटीक नऊशे पानी टीका लिहिलेली होती.
क्षात्र जगद्गुरू बेनाडीकर गीतारहस्य लिहून टिळक प्रच्छन्न ब्राह्मणेतर बनले असल्याचं प्रशस्तिपत्र टिळकांना देत होते. तरुण वयात टिळकांच्या गीतारहस्यावर जडवादी भूमिकेतून टीका करणारे वा. रा. कोठारी प्रौढपणात टिळकांचा श्रेष्ठपणा सांगत गीतारहस्य-सार प्रसिद्ध करत होते. तर अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे जनरल सेक्रेटरी असणारे आणि कट्टर ब्राह्मणविरोधी भूमिकेतून लिखाण करणारे मोतीराम वानखडे अमरावती हिंदू महासभेचे उपाध्यक्षही होते. फुल्यांना मानणारा ग्रामीण आणि शेतकरी असा बराचसा बहुजन वर्ग सत्यशोधक असतानाही वारकरी परंपरेशी घनिष्ठपणे निगडित राहिलेला होता. या आणि अशा अनेक ‘हिंदू’ भूमिका या फुलेवादी असण्यात किंवा राजकीयदृष्ट्या ब्राह्मणेतर असण्यामध्ये समाविष्ट होत्या.
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, ब्राह्मणेतर राजकीयता ही तत्कालीन इतर अनेक राजकीय आणि सामाजिक प्रवाहांनी प्रभावित होत होती. भारतीय राष्ट्रवादाचा आणि वसाहतविरोधी भूमिकेचा या चळवळीवर प्रभाव पडू लागलेला होता. जवळकरांसारख्या कट्टर ब्राह्मणेतराच्या लिखाणातही ‘देश’ ही संकल्पना केंद्रस्थानी येऊ लागलेली होती.
पोथीनिष्ठा नको…
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात दोन ठळक विचारधारांच्या खुणा दिसू लागतात. एक जात-चिकित्सेची, धर्म-सुधारणेची परंपरा, ज्यात अनेक उपप्रवाह आहेत, ज्याला ढोबळमानाने फुले- शाहू- आंबेडकरांची परंपरा म्हणून पाहिलं जातं. आणि दुसरी राष्ट्रवादाची, हिंदू संघटनेची परंपरा. यातही अनेक उपप्रवाह आहेत, जे पुरेसे नीटपणे नोंदवले गेलेले नाहीत. पण याला साधारणपणे चिपळूणकर, टिळक, सावरकर परंपरा म्हटलं जातं.
आज या दोन्ही विचारधारांचे आपापले स्वतंत्र मतदारसंघ आहेत, स्वतंत्र पुराणे आहेत, स्वतंत्र दैवतं आणि पोथ्या आहेत. त्यांचे गंभीर इतिहासही आहेत, पण सुट्टे आणि स्वतंत्र- जणू यांच्या अनुयायांसारखे यांचे कालावकाशही एकमेकांपासून फटकून आहेत. पण या दोन्ही परंपरा भारतीय आधुनिकतेची निर्मिती आहेत आणि त्यामुळे एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्राह्मणेतर चर्चाविश्व हिंदू आत्मभानाशी जैविकदृष्ट्या जोडलेलं होतं आणि दुसरीकडे हिंदू राजकीयताही समतावादी दृष्टीमुळे प्रभावित झालेली होती.
एक विचारधारा किंवा राजकीय तत्त्वज्ञान या अर्थी फुलेवादाचा विचार करताना केवळ फुलेकृत लिखाण आधारभूत मानलं तर पोथीनिष्ठेच्या आधाराने फुल्यांच्या विचारांचे हे ब्राह्मणेतर चळवळीतल्याच मंडळींनी लावलेले अर्थ चुकीचे मानले जाऊ शकतात. पण महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाच्या सम्यक आकलनासाठी अनेक विचारधारांचा एकत्रित विचार करणं आवश्यक ठरतं.
कुठल्याही विचारधारेचा सार्वकालिक सुनिश्चित आणि एकच अर्थ असावा ही अपेक्षा अनैतिहासिक ठरेल आणि नव्या पोथीनिष्ठेला आमंत्रण ठरेल. आणि पोथीवाद नाकारणार्या महात्मा फुल्यांच्या मानवी स्वातंत्र्य आणि समतेचा आग्रह धरणार्या जीवनदृष्टीशी ते निश्चितच समर्पक असणार नाही.
राहुल सरवटे (लेखक अहमदाबाद युनिव्हर्सिटीत इतिहासाचे प्राध्यापक आहेत.)
urahul.sarwate@gmail.com
