ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ला मुंबईत आरंभ झाला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि नाट्यअभ्यासक हिमांशू स्मार्त यांनी त्यांच्याशी संवाद साधला. लेखकावर संस्कार होतात कसे, तत्त्वज्ञानअध्यात्माचे आणि संविधानाचे आयुष्यातील स्थान, भाषिक काळजी आणि लिहिताना उमगलेल्या सत्यांचा शोध आदी मुद्द्यांची या निमित्ताने परखड चिकित्सा झाली…

माझ्यावर कुणाचा प्रभाव पडत नाही. मी कुणाचा प्रभाव स्वीकारत नाही. सत्ताधीश, लब्धप्रतिष्ठित यांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, उलट त्यांचा मला कंटाळाच येतो. कारण त्यांचा माझ्याशी काहीही संवाद होण्याची शक्यता नसते. ज्ञानापुढे मी नम्र होतो, पण त्याचाही प्रभाव माझ्यापर्यंत पोहोचतोच असे नाही. ज्याला रूढार्थाने लोक ज्ञानी समजतात, तो मला ज्ञानी वाटला पाहिजे. तिथेसुद्धा मी माझी विवेकबुद्धी शाबूत ठेवतो. माझा अनुभव वापरतो, माझे काही निकष आहेत, त्यावर मी घासून पाहतो. त्यानंतर मला समोरचा माणूस ज्ञानी वाटला, तरच त्याच्यासमोर मी नम्र होतो. पण म्हणून त्याच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडेल, अशी शक्यता कमी. मला माझी बुद्धी मर्यादित आहे हे माहीत आहे, पण कुठेतरी माझ्या वडिलांनी सांगितले होते की, ‘‘तुझी बुद्धी जिथपर्यंत तुला नेईल, तिथपर्यंत जा. इकडून-तिकडून उचलून मोठा होऊ नकोस.’’ हे कुठेतरी माझ्या डोक्यात पक्के असेल. घरात लहानपणापासून माझ्याबाबत प्रसिद्धी अशी की ‘तो कुणाचे ऐकणारा नाही, आपले तेच खरे करणारा आहे.’

प्रभावाला दुसरा मराठीतला शब्द म्हणजे संस्काराचा. माझ्याबाबत मी नाटके लिहू लागल्यानंतर कुणीतरी पसरवले की ‘महेशवर तेंडुलकरांचा संस्कार आहे.’ एकाने पसरविल्यानंतर मग सगळेच तसेच म्हणायला लागले, कारण एकदा तुम्हाला कुठल्यातरी कप्प्यात टाकले, की मग समीक्षा करायला सोपी होते. मराठी समीक्षा अशीच आहे एखाद्याला एका कप्प्यात टाकायचे, पुन्हा बाजूला करून पुन्हा तिथे आणायचे. संस्कार शब्दाचा अर्थ तुम्ही कसा घेता, त्यावर सारे आहे. लेखकाचे मूलद्रव्य हे त्यात असते, असा माझाही समज आहे. तो बरोबरच असेल, असे नाही. कदाचित तो चुकीचादेखील असेल, त्याच्याशी तुम्हाला सहमत होता येणार नाही. परंतु माझे ते मत आहे आणि मी ज्या मार्गावरून चाललो, त्याची सुरुवात कुठून झाली ते तरी मला सांगता येईल. तुम्हाला पटते की नाही, याबाबत मला काही काळजी वाटत नाही.

संस्कार म्हणजे आपल्याकडे समज असतो की चांगलेच संस्कार. आम्ही खेड्यातले. मी चार वर्षांचा असताना मला काकांकडे राहण्यास पाठविले गेले. कारण माझ्या वडिलांचा असा समज होता की, मी फार बुद्धिमान आहे. त्यामुळे मला चांगल्या शाळेत टाकायला हवे. यवतमाळला मला मोठ्या शाळेत टाकले. तर शेजारच्या बाई आमच्या काकूंना सतत येऊन सांगत की, ‘‘हा मला नमस्कार करत नाही हो. मोठा माणूस दिसला तर त्यालादेखील नमस्कार करीत नाही हो.’’ त्यामुळे मला काळजी वाटायची की आपल्यावर नक्की संस्कार होतायत की नाही?

चांगले संस्कार म्हणजे कुणीतरी तुमच्यावर केलेले अथवा लादलेले असतात. ‘तू आज्ञाधारक हो’, ‘तू चांगला वाग’, ‘तू व्यसने करू नको’, ‘तू खोटे बोलू नको’, ‘तू चोरी करू नको’… हे सगळे संस्कार मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी आई-बापांनी ते स्वत: असंस्कृत, खोटे बोलणारे, चोरी करणारे, पैसे खाणारे असले तरी केलेले असतात. सर्व मध्यमवर्गीय मुलांवर हे संस्कार करण्यात आले, तरी या सर्व मार्गांवरून ते किती काळ चालत राहिले, हे तपासणेदेखील गरजेचे. काही काळ आपल्याबरोबर हे रूढ-मध्यमवर्गीय संस्कार राहतातदेखील, परंतु ते कृत्रिम असतात. त्यामुळे माझे असे मत बनले आहे की, आई-वडिलांनी आपले संस्कार देण्याचे काम करावे आणि मुलांनी आपल्या पद्धतीने जगावे.

मी वेगळ्याच संस्काराकडे येतो- ज्याला आपल्या उपनिषदांपासून ते आतापर्यंत ज्या अर्थाने वापरले जाते. हे संस्कार एका दृष्टीने पाहिले, तर वाईट अथवा चांगले, असे काही नसते. क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ म्हणजे संस्कार. जन्माच्या आधीपासून हा आईच्या गर्भात आपल्याबाबत सुरू झालेला असतो. हे संस्कार आपल्या हाताबाहेरचे असतात. त्यावर आपले काहीएक नियंत्रण नसते. क्रिया-प्रतिक्रियांचा सलग चालणारा खेळ म्हणजे आपले जीवन असते. जसजसे वय वाढत जाते, तसे संस्काराचा ऐवज वाढत जातो. त्यांचे रांजण भरत जातात. त्यातून आपला पिंड बनत जातो. संस्कारांची ही प्रक्रिया कायम सुरू राहते. त्याचे पुुंज-गाठोडे बनून त्यांत संस्कार साठत जातात. हे चांगले की वाईट मला माहिती नाही. पण हे ओझे घेऊन माणूस चालत राहतो. माझे इप्सितस्थळ कुठे आहे? तिथे मी पोहोचणार का नाही? एवढा मोठा संस्काराचा डोंगर घेऊन माझी चाल वेगाने होईल, अशी शक्यता असते का?

तत्त्वज्ञानाचा हेतू काय? आधिभौतिक आणि आधिदैविक आणि आध्यात्मिक. या तीन दु:खांमध्ये आपण सापडलेेले असतो, त्यांचा नाश करणे हा तत्त्वज्ञानाचा उद्देश. बुद्ध का वाचायचे? शंकराचार्य का वाचायचे? त्यांनी कुठेतरी याबाबत काही उत्तर दिले असेल आणि त्याची आपल्याला मदत होईल असे वाटते. कारण आपल्यात आतून बदल होत नाही. आतून फक्त बुद्धीला माहिती मिळते. त्या माहितीचे ज्ञान होणे यासाठी साधना लागते. ती केल्यानंतर मग त्याचे अनुभवात रूपांतर व्हायला हवे. साधे उदाहरण म्हणजे, गुलाबाचे फूल. त्याचे वर्णन करताना त्याला असे काटे आहेत, ते दिसते कसे, हे वर्णन पेपरात लिहून दहापैकी दहा मार्क मिळविता येतील. पण विचारले तर फुलाबाबत तुम्हाला पूर्ण कळाले का, तर नाही. कारण फुलाला सुवास असतो. तो घेता येतो. पण त्याच्या त्या सुगंधाचे वर्णन नाही करता येत. माझी बुद्धी माझे ज्ञान सुवास घेतल्यानंतर त्याचे ज्ञान मिळवते. पण तो कशासारखा आहे ते सांगता येत नाही. आभाळ कसे आहे, तर आभाळासारखे आहे. इथे कुठेतरी आम्ही त्याला समांतर असे शोधू लागतो. हा अखंड चालणारा क्रिया-प्रतिक्रियांचा डोंगर किंवा संस्कार आपल्याला कामाला येतात. ते आपल्याला जखडून ठेवतात. त्यातल्या संचितातूनच लेखनाला द्रव्य मिळते. त्यातूनच लिखाण होते.

माझ्यावर आरोप आहे की तू स्वत:बद्दलच लिहितो. मी म्हणतो प्रश्नच नाही. मला इतर लोक कळतच नाहीत. जे काही स्वत:बाबत थोडेबहुत मला माहिती आहे, त्यातून मी लिहितो. ९९ टक्के लोकांना मी प्रतिगामी वाटतो, त्याचा मला भयंकर आनंद होतो. याचे कारण, माझ्यावर कशाचा प्रभाव पडत गेलेला नाही. मी काय बोलतो, ते माझ्यापुरते असते. इतरांच्या बौद्धिक क्षमतेनुसार ते काय जीवन जगले त्यानुसार त्यांचा लेखनप्रवास होईल. तितकाच तो स्वीकारणीय आणि आदरणीय आहे. त्यामुळे माझे लिखाण हे वैयक्तिक, व्यक्तिगत मत आहे, म्हणून ते खोटे नसून खरे आहे.

आता इतके रांजण जमवले संस्कारांचे त्यातून कुठेतरी फूल उमलते. त्याला आम्ही कला म्हणतो. पण फूल उमलतेच असे नाही. उमलवतो असे म्हणता येईल. पाहिले आणि त्यावर लगेच काहीतरी लिहिले की त्याला कला म्हणावी का? अमुक गोष्ट पाहून त्यावर एखादी श्टोरी अथवा नाटक लिहिले की ते वाचनीय होतेदेखील. पण त्यात अनुभव असतो काय? एखादी गोष्ट पाहिली आणि त्याचा अनुभव आला, असे कधीच होत नाही.

अनुभव ही अकस्मात होणारी गोष्ट आहे. पण आपल्याकडे लोक अनुभव घ्यायला निघतात. अनुभव घेताना ते सतत बघत असतात. तो कसा घेतलाय आणि कशा पद्धतीने माझ्याकडे येतोय. ही अनुभवाची दुसरी आणि निम्न बाजू आहे. पण अकस्मात, बेसावध असताना जो प्रतिसाद असेल, तो खरा अनुभव.

सर्वांना आपण सर्जनशीलच वाटतो…

ज्याला प्रतिभेतून उमललेले लेखन म्हणता येईल, जसे जीए, ग्रेस यांचे सुरुवातीचे लेखन. त्या साहित्याचीदेखील गरज आहे. त्याचे वाचक असतात. त्यानेसुद्धा मने प्रगल्भ होतात. मी मूल्यनिर्णय करीत नाही. पण लिहायला लागलो की प्रत्येकाला आपण सर्जनशील आहोत, असे वाटायला लागते हा खरा ताप आहे. जो खरेच सर्जनशील असतो, त्याला कळत असते आपण सर्जनशील आहोत. जो ध्यास घेऊन आलेला असतो, तो कायम कामातच असतो. त्याला विचार करायला वेळच नसतो की आपण सर्जनशील आहोत की नाही. तो भोगत असतो, जगत असतो. त्यातून काही निर्माण होत असते. मग गरज वाटते तेव्हाच तो लिहितो.

अपयश ही सर्वात सुंदर गोष्ट…

चारही अंगानी जीवनातून तुमच्याकडे अनेक प्रवाह येत असतात. तुम्ही ते पचवत असता. गाणारे म्हणजे काय नुसते गातच नसतात. जगलेल्या जीवनाचा परिणाम त्यांच्याही गाण्यावर होतो. म्हणून प्रत्येक गायकाचे गाणे वेगळे असते. मी नाटके लिहू लागलो. ते लिहीत असताना मला चांगले दिग्दर्शक मिळाले. लिहिलेली काही नाटके चांगली झाली, काही पडली. माझ्यासारखा माणूस अपयशासाठीच लिहितो. नाटक यशस्वी झाले की काय होते? त्यावर लेख लिहून होतात. चांगले चालते. पुढे पुरस्कारही मिळवते. मात्र ते नाटक म्हणून थांबते. पण नाटक जेव्हा अपयशी होते, तेव्हा मला वाटू लागते कुठे चुकले माझे? कुठे अपुरा पडलो मी, माध्यम अपुरे पडले की आणखी काही झाले? असा शोधत जातो माणूस. पुढे माझ्या हातून नाटक लिहिले जाईल किंवा नाही, पण माझा आतून विकास नक्कीच होतो. म्हणून कलावंताच्या जीवनातील अपयश ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कलावंताचे आत्मचरित्र ही त्याच्या अपयशाची नोंद असली पाहिजे. यशांच्या नोंदी काय सांगता? तुम्हाला किती पारितोषिके मिळाली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते कसा गौरव झाला. त्या राष्ट्रपतींना संध्याकाळी आठवतदेखील नाही की आपण कुणाला बक्षीस दिले.

नाटककाराला प्रचंड राग येतो…

आमचे संपन्न, सुसंस्कृत कुटुंब. पण त्या घरातसुद्धा स्त्रिया या ‘सेकंड सिटिझन’च होत्या. हे भान त्या बायकांनापण नव्हते. ना आम्हाला. माझे वडील वारल्यानंतर आई माझ्याकडे राहायला आली. तर तिला पातळ आणायचे म्हटल्यावर तिला विचारले, ‘कुठल्या रंगाचे आणू?’ ती म्हणाली ‘म्हणजे काय? आण कुठल्याही रंगाची. मला आजवर विचारलेच नाही कुणी की तुला कुठल्या रंगाचे पातळ हवे. दहा पातळे आणून दिली जायची आणि सांगितले जायचे- ‘‘नेसा. उत्तम, महागडी.’’ मी विचारले, ‘‘पण ती तुला आवडायची का?’’ इतक्या नकळतपणे पुरुषसत्ताक समाजाचे वातावरण तयार व्हायचे. मी त्या माणसांबद्दल लिहितो, त्यांच्या सुख-दु:खांबद्दल लिहितो. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांबद्दल लिहितो. माझे त्या माणसांवर प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांच्याबाबत मूल्यनिर्णयात्मक न होता त्यांचा सगळा राग तुमच्यासमोर आणतो.

लेखक शैलीचा कैदी व्हायला नको…

यशानंतर लेखक स्वत:च्या शैलीत अडकतो का, हे तपासले पाहिजे. संगीतात वेगवगळी घराणी असतात. प्रत्येक गायक आपापल्या वैशिष्ट्याला जपत घराण्याची शिस्त पाळून गात असतो. लेखक मात्र स्वत:चा शैलीचा कैदी होऊन बसतो. मग स्वत:च्या यशाच्या आवृत्त्या काढू लागतो. तिथे तो संपतो. हे मला सुरुवातीपासून माहिती होते. लिहिता लिहिता मीदेखील बदलत होतो. त्यामुळे मौनरागच्या यशानंतर आता मला हे जमतेय, आता दुसरे काहीतरी करायचे आहे. मी फक्त लेखन-लेखन केले नाही, तर अनेक पातळ्यांवर जगत गेलो.

विशेषणांची गरज काय?

मराठी ‘अभिजात’ झाली म्हणून आठदहा कोटी रुपये मिळतील म्हणतात- ते कुणाला मिळतील मला माहीत नाही आणि मला त्यात गम्यही नाही. मराठी भाषा अभिजात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आज काय होणार आहे- अभिजाततेशी आज आपले नाते काय, आज मराठी भाषेची परिस्थिती काय आहे – याचा विचार करायला हवा. नाहीतर आजची मराठी भाषा जशी विनाकारण विशेषणे मिरवते तसेच ‘अभिजात’चे होईल. कालपरवा माझेच वर्णन करताना मला ‘विचारवंत’ आणि ‘अभिजात लेखक’ अशी विशेषणे लावली गेली… काही गरज होती का याची? साधी, सरळ, विशेषणविरहित भाषा अभिजात असते.

अभिजात म्हटले म्हणून मोठे झालात काय?

तुम्हाला अभिजात म्हटल्याने तुम्ही खरोखरच मोठे होता काय? विचार करा- दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत मराठी भाषेत काय लिहिले गेले हे अनेकांना आठवेल. पण गेल्या दीडशे वर्षांत असे काय मराठीत लिहिले गेले ज्याला अभिजात म्हणता येईल? मला चारपाच भाषा येतात. बंगाली आवडीने शिकलो, ती टागोरांची भाषा आहे. इंग्रजीतही गेल्या शेदीडशे वर्षांत एमिली डिकिन्सन, सिल्व्हिया प्लाथ अशी शंभर नावे तुम्हाला दिसतात. नायपॉल मला आवडत नाही, पण त्याचे इंग्रजी भाषेची अभिजातता टिकवणाऱ्यांमधले स्थान मी नाकारणार नाही. त्या साऱ्यांच्या जवळ ‘बनगरवाडी’. पण ज्याने स्टाइनबेकची ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ वाचली त्याला बनगरवाडीचे काय कौतुक? आपल्या भाषेशिवाय दुसऱ्या भाषेकडे मल्याळम, तमिळ, बंगाली, कन्नडकडे पाहताच म्हणायचे की आमचीच भाषा सर्वश्रेष्ठ, असे कसे चालेल? या अशा अभिमानाला अस्मिता म्हणत नाहीत, याला अडाणीपणा म्हणतात. कानडी लोकही म्हणतातच, कस्तुरीसारखा सुगंध असलेली त्यांची भाषा आहे. ज्यालात्याला आपापल्या भाषेचे प्रेम असणे समजू शकतो पण टोकाची अस्मिता कशी काय असते? मला सगळ्या भाषा आवडतात. मराठी साहित्याला बराच काळ मध्यमवर्गीयतेच्या- ब्राह्मणीपणाच्या- मर्यादा होत्या. त्याबाहेर भाऊ पाध्येंसारखे लोक गेले. नामदेव ढसाळने तर साहित्याच्या त्या वाटेवर सुरुंगच पेरले. पुढे त्याचाही साचा झाला तो भाग सोडून देऊ. पण अभिजाततेबद्दल म्हणायचे आहे ते असेही की, भाषा टिकवायची आहे तर आपण शासनाकडे का पाहतो आहोत? सरकारवर अवलंबून का राहतो आहोत?

समाज जोवर स्वायत्त होत नाही, सरकारवर अवलंबून राहत नाही, तोवर मराठी भाषा समृद्ध होणार नाही. पहिली ते चौथी इंग्रजीदेखील नको, मराठीच हवी फक्त.

ज्ञानग्रहणाची प्रक्रिया…

गेल्या सुमारे २० वर्षांत (२००५) मी नवे नाटक लिहिलेले नाही. माझा तो अध्याय संपला- किंवा एवढा काही मी नाट्यलेखनाला वाहून घेतलेला वगैरे नाही. त्यामुळे आता मी लिहितो ते माझ्यापुरते लिहितो. माझ्या आतमध्ये काही गुंतागुंती आहेत. किंवा काही मला नवीन सापडल्यासारखे वाटते आहे, त्याबद्दल मी लिहितो. लहानपणापासून वडिलांनी संस्कृत शिकवले, पुढे उपनिषदे मी शिकलो, अलीकडच्या काही वर्षांत ‘क्वांटम फिजिक्स’ वाचून विज्ञान क्षेत्रातल्या एका मित्राला प्रश्न विचारले; त्या दोन्हीच्या संदर्भात कार्ल गुस्ताव युंगचे म्हणणे मला आठवले. ते असे की, भोवतालचे हे जग- हे वास्तव ‘सत्य’ नाही. सत्य आणखी पलीकडे असू शकेल. क्वांटम फिजिक्स- किंवा उपनिषदे तरी- दुसरे काय सांगतात? ही ज्ञानग्रहणाची प्रक्रिया आहे.

धर्म आणि अध्यात्म…

उपनिषदांमध्ये ‘हिंदू’ हा शब्द तर नाहीच- तो मुळात अलेक्झांडरनंतर आला. पण उपनिषदांपर्यंतचे प्राचीन वाङ्मय हे आध्यात्मिक असले तरी कोणत्याही एका धर्माला बांधलेले नाही. धर्माचे संस्थात्मीकरण बरेच नंतर झाले. ते करताना आदिशंकराचार्यांनी जी ‘प्रस्थानत्रयी’ मानली त्यात उपनिषदे आहेत. मात्र हिंदू धर्म समजून घ्यायचा तर मग महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी लिहिलेला धर्मशास्त्राचा इतिहास- इंग्रजीत सहा हजार किंवा संक्षिप्त मराठी अनुवादाची दोनेक हजार पाने- वाचायला हवीत. उपनिषदांतून मानवी ज्ञानाच्या पाऊलखुणा शोधता येतात. तशा त्या मानसशास्त्रात, क्वांटम फिजिक्ससारख्या विज्ञानविचारातही शोधता येतात. आपल्याला जर त्या मार्गाने जायचे असेल तर आपल्या मनातली गुंतागुंत किंवा ‘अडगळ’ ज्याला म्हणतात, तीसुद्धा उकलत जाते. लेखक म्हणून मग लक्षात येते की काळ आणि अवकाश यांच्या बंधनांत राहून आपण जी कलानिर्मिती करतो ती अपुरीच राहणार. कारण मिती टाळल्याशिवाय मितींच्या पलीकडचे आपण पाहूच शकत नाही. या मिती जोवर माझ्या मनात आहेत तोवर मी या वर्तुळातच वावरत राहीन. माझ्या लक्षात आले की, संगीत तिथे- मितींच्या पलीकडे पोहोचू शकते. पण साहित्य बहुतेकदा नाही. कारण शब्द हे संदर्भांच्या बंधनांतले आहेत.

भाषेची प्रतिज्ञा तैतिरीय उपनिषदांत आहे-

ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता।

मनो मे वाचि प्रतिष्ठितम्।

आविराविर्म एधि। वेदस्य म आणीस्थ:।

श्रुतं मे मा प्रहासी: अनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि।

ऋतं वदिष्यामि। सत्यं वदिष्यामि।।

निर्मम अशा- कुणाशीही काही संबंध नसलेल्या मूलतत्त्वाची ही प्रार्थना आहे की हे मूलतत्त्वा, तू वाणी होऊन माझ्या मनात स्थापित हो आणि हे माझ्या मना, तू वाणीमध्ये स्थापित हो. मला भाषा दे. मी वेदांना- किंवा ज्ञानाला- आणीन, त्या शब्दांना अहोरात्र डोळ्यांत तेल घालून जपेन, त्यांचे रक्षण करेन. ही भाषेची मूळ प्रतिज्ञा आपण पाळतो का? पाळू शकतो का?

आपण बेसुमार, नालायक निगरगट्टपणाने भाषा उधळत राहतो. ही जी उधळण्याची भाषा आहे ती आपणच तयार केलेली आहे. मितींनी- त्याही ११ नव्हे, दोनच मितींनी बंदिस्त असलेली आपली बुद्धी जिथवर जाते तिथपर्यंतच शब्द जाऊ शकतात. कारण शब्द कृत्रिम आहेत. या शब्दांवर शतकानुशतकांच्या अनेक अर्थांचे ओझे आहे. स्वर तसे नाहीत. ऋषभ हा ऋषभच असतो, पंचम हा पंचमच असतो. शहाणा/ वेडा या शब्दांना अर्थ चिकटलेले आहेत तसे स्वरांना चिकटलेले नाहीत. या रागातल्या या स्वराचा हा अर्थ होतो असे सांगणे व्यर्थच, कारण त्या अनुभवाला काही मिती नाहीत. त्याला लिंगभाव नाही, त्याला अवकाशाचे बंधन नाही. शब्दांच्या पलीकडचा हा प्रदेश मौनाचा आहे.

लिहिताना उमगले ते…

मी नाटक लिहू लागलो तेव्हा माझे काय चालले आहे आणि मी कुठे जातो आहे याचे काहीही भान मला नव्हते. मी लिहीत होतो. लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या नकळत अनेक अज्ञात प्रवाह त्याच्या सर्जनकक्षेत गुंतलेले असतात. आपण मागे वळून पाहू शकतो. पण घडत्या अवस्थेतली कलाकृती ही गवयाच्या तानेसारखी असते- कधी ती तान अलौकिक असेल, पण आणखी काही वेळा घटवलेलीही असेल. माझ्या नाटकांतल्या पात्रांमधून एक ‘अनलंकृत शहाणपण’ दिसते असे हिमांशु स्मार्त म्हणाले ते पूर्णत: खरे नाही. माझी आधीची- ‘पार्टी’पर्यंतच्या- नाटकांमध्ये टोकाचे वैषम्य आहे, राग आहे, त्रागा आहे, त्रास आहे, दु:ख आहे… वयाच्या २८ व्या वर्षी मी पहिले नाटक लिहिले, तेव्हापासून ते साधारण ३५/३६ वर्षांचा मी होईपर्यंत ही अवस्था होती. ‘पार्टी’नंतर आठ वर्षे मी काही लिहिलेच नाही. करिअर वगैरे संपलेच असे समजून चाललो. मग ‘वाडा चिरेबंदी’ लिहिले. ‘वाडा चिरेबंदी’ आत्मपर आहे- पण आत्मचरित्र नाही. आमची घरची परिस्थिती, माझ्या लहानपणी उत्तम होती. माझे वडील अलाहाबाद विश्वविद्यालयाचे लॉ ग्रॅज्युएट होते. आमच्या घरात व्यसने नव्हती. वाचन आणि गाणे ऐकण्याची आवड होती. घरची हजार एकर जमीन, त्यातही बरीच आईकडून आलेली- १९४९ च्या कुळ कायद्यात जाणार असताना आमच्या गांधीवादी वडिलांनी शांतपणे आम्हा भावांना त्यांच्या स्टडीमध्ये बोलावून सांगितले : हा कायदा योग्यच आहे, आपण जमीन देणार आहोत. यापुढे आपण गरीब आहोत. पण यानंतरही फरक फारसा पडलाच नाही, कारण आमची राहणी साधीच होती आधीपासून. आमचे घर कधी विनाशाकडे गेले नाही याचे कारण माझे वडील आणि आई यांचे शहाणपण. आम्हा सर्व भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरला, प्रसंगी शिक्षणासाठी दुसरीकडे ठेवले. मी शिकत असताना काकांकडे राहायचो तेव्हा, कुठे तरी नव्या पद्धतीच्या खुर्च्या पाहून आमच्या वाड्यातही तशा खुर्च्या आणाव्यात असे सांगून पाहिले. उत्तर होते- कोण बसणार त्या खुर्च्यांमध्ये? तू तर जाणार काही दिवसांनी परत काकांकडे. आम्हा कुणाला नाही सवय त्या खुर्च्यांची. किती वापर होणार आहे त्या खुर्च्यांचा… बैठक आहेच ना आपल्याकडे. माझे वडील म्हणाले, ‘‘तुला हिरा जरी दिला तरी किती पाहशील प्रकाश त्याचा? नंतर तिजोरीत बंद करूनच ठेवशील ना? मग काय उपयोग त्या हिऱ्याचा?

इंग्रजीत सांगायचे तर, nothing was ever bought which one could do without. यातून पुढे कधी तरी मला लिहिताना उमगले- जे जे अनावश्यक ते ते असुंदरच असते. हे फक्त लिहिण्याबाबत नव्हे, जगण्याबाबतही खरे आहे. तरुणपणीच माझ्या नाटकांना मुंबईत प्रतिसाद मिळू लागला तेव्हा अनेकांनी- यात विजयाबाई आणि डॉक्टर लागूसुद्धा होते- मुंबईलाच स्थायिक हो असे मला सुचवून पाहिले. मी म्हणालो, का राहायचे मुंबईत. ‘करिअर घडवण्यासाठी!’- यावर मला पडलेला प्रश्न होता, असे कशाला घडवायचे करिअर? जिथे, जसा जगतो आहे, तसा न जगता?
मी फक्त लिहिले नाही, मी जगलोसुद्धा!

संविधान हाच आपला धर्म…

अध्यात्म हे शब्दांच्या पलीकडल्या प्रदेशाची जाणीव देणारे असले तरी जगण्यासाठी थेट नियमच आखण्याचा धर्माचा प्रयत्न असतो. माझ्या घरात माझा धर्म कोणताही असेल; घराबाहेर आल्यावर मात्र संविधान हा आपला सामाजिक धर्म आहे, हे सर्वांनी मान्य केल्यास बरेच सामाजिक प्रश्न कमी होतील. आपला गेल्या ७५ वर्षांतला धर्म आपली राज्यघटना संविधान हाच आहे, असे मी मानतो.

जगणे महत्त्वाचे…

मी जगत असतो, तेव्हा ‘साहित्य हेच माझे जीवन आहे’ असे कधी मानत नाही. मला अशा धपापत्या स्वरात लिहिलेली पत्रे खूप येतात. एका नवोदित कवयित्रीचे मला पत्र आले. कविता खलिल जिब्रानच्या अनुवादित. त्यावर पत्र दोन पानी की, ‘कविता माझा कसा श्वास आहे. कविता माझा कसा प्राण आहे. कवितेशिवाय कशी मी जगू शकत नाही’. असे माझ्याबाबत काहीही होत नाही. वर्षोनुवर्षे मी लिहीत नाही. माझा झोपाळ्यावर बसून आनंदाने वेळ जातो. ‘प्रेरणाफ्रेरणा’ असले शब्द मी वापरत नाही. मी लेखक असतो म्हणजे आता मी फक्त नाटककार राहत नाही. ‘आता एक विद्वान नाटक लिहावे. ते झाले की आता काय बरे लिहावे?’ असा लिहिणाऱ्यांना प्रश्न पडतो. ‘माझे जीवन म्हणजे साहित्याला वाहिलेले…’ असले माझ्याबाबत तरी काही नाही. लेखन हे जगताना आलेले बायप्रॉडक्ट आहे. जगणे मला महत्त्वाचे वाटते. मी वऱ्हाडातला. काहीच न करता जगणे याच्यात जी साधना आहे, ती तुम्हाला कळणार नाही.

सरकारचे करंटेपण…

माधुरी पुरंदरे यांनी ‘वाचू आनंदे’सारख्या उत्तम पुस्तक मालिका संपादित केल्या आहेत. सरकार या संस्थेचे करंटेपण असे की, गेल्या २० वर्षांत तिथल्या कुणालाही वाटले नाही की ही पुस्तके शाळांसाठी पाठ्यपुस्तक म्हणून नेमली पाहिजेत. आताच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका असतात, माहितीच्या चुका असतात, चुकीची माहिती असते, खोटी माहिती असते… यावर मध्यमवर्गीयांना नियंत्रण आणता येत नाही?

मी आता ८६ वर्षांचा आहे. मध्यमवर्गात होत गेलेला बदल पाहिला आहे. गरिबी असूनही नात्यातली, ओळखीची दोनतीन मुले शिक्षणासाठी ठेवून घेणारा जुना मध्यमवर्ग आता गेला. आता प्रत्येकाची बेडरूम वेगळी आणि त्यावर मुलांनीही ‘नो एन्ट्री’ वगैरे पोस्टर लावलेली दिसतात; तिथे परक्यांना कुठे प्रवेश? यांच्याबद्दल मी कधी लिहीत नाही.
शब्दांकन : अभिजीत ताम्हणे पंकज भोसले