डॉ. गीता मांजरेकर
‘जय भवानी, जय मराठी’ ही महेश केळुसकर यांनी लिहिलेली कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली. महेश केळुसकर त्यांच्या मालवणी कवितांसाठी, विशेषत: प्रेमकवितांसाठी लोकप्रिय असले तरी त्यांनी कादंबरी लेखनही केले आहे.
महाराष्ट्रात नजीकच्या भूतकाळात घडून गेलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घटनांचा पट उलगडणारी निर्भीड कादंबरी असे केळुसकर यांच्या ‘जय भवानी, जय मराठी’ या कादंबरीचे स्वरूप आहे. सत्य घटनांना कल्पिताचे आवरण चढवून लेखकाने सर्वांना ज्ञात घटनाच पुन्हा एकदा वाचकांसमोर उत्कंठावर्धक शैलीत मांडल्या आहेत. या कादंबरीच्या कथानकात केवळ ९ दिवसांचा म्हणजे, २० जून २०२२ ते २९ जून २०२२ एवढाच काळ सामावलेला आहे. कादंबरीतील घटनांचा अवकाश मुंबई महानगर, दमण, पालघर, सुरत, गोवा इथला आहे. कथानकाची रचना चित्रदर्शी आहे.
या कादंबरीचा कथक तृतीय पुरुषी, सर्वज्ञ असा आहे. तो प्रामुख्याने घटनाक्रम उलगडतो, क्वचित काही व्यक्तिरेखांच्या मनातील अस्वस्थता, उलथापालथ व्यक्त करतो; परंतु कोणतेही भाष्य करत नाही. महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडले, तेच वाचकांसमोर सलगपणे ठेवणे एवढाच कथकाचा उद्देश दिसतो. जे घडलं त्याबद्दल पक्षपाती टिकाटिप्पणी करणं ‘जय भवानी, जय मराठी’ या कादंबरीच्या कथकाने टाळलं आहे.
२०१९ मधील महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिवसेना पक्षाने त्यांची अनेक वर्षांपासूनची भाजपबरोबरची युती संपवली आणि भाजपच्या विरोधातील राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या सोबतीने एक नवीन आघाडी स्थापन करत सत्ता मिळवली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि लगेचच आलेल्या करोना महासाथीच्या संकटाला तोंड देण्याचं आव्हान त्यांना स्वीकारावं लागलं. ते पेलत असताना, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला खरा; परंतु पक्षांतर्गत असंतोष त्यांना जाणवला नाही. त्यातच त्यांनी ज्यांना दुखावलं होतं तो भाजप हा पक्ष केंद्रात सत्ताधारी असल्यानं आणि सर्व व्यवस्था आपल्याला हव्या तशा वापरण्यात तरबेज असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील असंतुष्टांवर ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांच्या धाडी पडू लागल्या.
आपण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलो तर मुख्यमंत्री आपला बचाव करू शकतील असं नाही हे जाणवल्यानं शिवसेनेतील बिथरलेल्या नेत्यांनी भय आणि राजकीय आकांक्षेपोटी बंड केलं. या बंडाला अर्थातच भाजपतील नेत्यांचा आशीर्वाद होता. पद्धतशीरपणे उद्धव ठाकरे यांची सत्ता उलथवण्यात आली आणि अखेर अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था कोणाकडूनही अपेक्षित न्याय न मिळाल्यानं महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या विश्वासावर, एकजुटीवर उभा असलेला आणि मराठी माणसांना आपला एकमेव आधार वाटणारा प्रादेशिक पक्ष फुटला, दुबळा झाला.
भांडवलदारांच्या पैशांनी चालणारी सगळी बाजारू प्रसारमाध्यमं महाराष्ट्रातील हे राजकीय नाटक रसभरीतपणे, कंठाळी आवाजात घराघरांत पोहोचवत राहिली. हे सगळं फार झपाट्यानं झालं आणि राजकारणातील नेत्यांची सत्तेची, पैशांची हाव, त्यांनी सोडून दिलेली नैतिकता, निष्ठा या सगळ्याचं एक अत्यंत हिडीस चित्र महाराष्ट्रातील जनतेला पाहावं लागलं. महेश केळुसकर यांनी याच सगळ्या घटना कल्पिताचं वेष्टण चढवून वाचकांसमोर यथार्थपणे मांडल्या आहेत. जे काही प्रत्यक्षात घडलं त्याचा अन्वय लेखकानं जोडून दाखवला आहे. जे घडलं त्याची राजकीय व सामाजिक कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न कादंबरीनं केला आहे. पण कादंबरी कोणा एकाचीच बाजू मांडत नाही, हेही तितकंच खरं.
‘जय भवानी, जय मराठी’ ही कादंबरी मूलत: घटनाप्रधान आहे. नऊ दिवसांतले प्रसंग गतिमानपणे ती उलगडत जाते. त्यामुळे या घटनांमधील व्यक्तिरेखांच्या मनोवकाशात शिरण्याचा फारसा प्रयत्न कथक करत नाही. अवंती गडकरी, मोहक गडकरी, भैरवनाथ जाधवराव, समरेंद्र सावंत हे आणि अन्य काही प्रजासेना नामक पक्षातले लोक. बापूसाहेब देशमुख आणि त्यांचा भाचा रणसिंह हे रयतवादी पक्षाचे नेते, श्रीराम खरे, विठ्ठल धुरी, बाळा म्हात्रे हे देशभक्त नामक पक्षाचे नेते यांची अर्कचित्रे कथक रंगवतो. रामनाथ वाईरकरसारखा पत्रकार, बाबल गावडेसारखा टॅक्सी ड्रायव्हर, नंदू धुरंधर गायकवाडसारखा प्रजा सेना पक्षातील सच्चा कार्यकर्ता अशी काही सर्वसामान्य माणसे कादंबरीत येतात. बाजारू मीडियाची प्रतिनिधी म्हणून रिटा गुप्ता ही व्यक्तिरेखा कथानकात येते. लोकल ट्रेनमध्ये गावाकडून आलेल्या दोन मराठी शिक्षकांना हिणवणारे गुजराथी तरुण आणि आधी थंड बसलेले, पण नंतर चवताळून उठून हाणामारी करणारे मराठी सामान्य प्रवासी असे काही प्रातिनिधिक नमुनेही कथक दाखवतो.
एकंदर गतिमान घटनाक्रम उलगडणारी, या घटनांचा अन्वय मांडण्याचा प्रयत्न करणारी आणि या घटनांमधील व्यक्तिरेखांची जिवंत स्केचेस रेखाटत या कादंबरीचं कथानक झपाट्यानं पुढे सरकत राहतं.
एका प्रादेशिक पक्षाची, त्यातील अंतर्गत बंडाळीमुळे आणि मूल्यहीन सत्तास्पर्धेमुळे होणारी घुसमट, ही एकूण महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या अस्तित्वालाच संपवून टाकणारी ठरू शकते ही भीती या कादंबरीच्या कथनाच्या अंत:स्तरावर व्यक्त होताना दिसते. तसंच एखादा पक्ष उभा करण्यामागे ज्या लाखो कार्यकर्त्यांची जिद्द, कष्ट, निष्ठा असते त्याला या मूल्यहीन सत्तास्पर्धेत कवडीमोल ठरवलं जातं हेही या कादंबरीच्या कथानकातून ध्वनित होतं. हीच या कादंबरीची ठळक कथासूत्रे ठरतील.
‘जय भवानी, जय मराठी’, महेश केळुसकर,
डिंपल पब्लिकेशन्स,
पाने १५४, किंमत ३०० रुपये.
gbmanjrekar@gmail.com
