भूषण कोरगांवकर bhushank23@gmail.com

‘‘किती मस्त झालीयेत वांगी. तुझ्या हातात जादू आहे.’’

pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

‘‘मटण खावं तर आमच्या आक्काच्या हातचं..’’

‘‘खिचडीला काय टेस्ट आलीये. सुगरण आहेस खरी.’’

‘‘आमटी नेहमीपेक्षा तिखट लागतीये. पण मला आवडते अशी. आणि भाजी तर एक नंबर झालीये.’’

..ही अशी वाक्यं तुमच्या घरी, आसपास किती वेळा ऐकू येतात? 

आणि आता ही वाक्यं पहा..

‘‘आमच्याकडे सगळ्यांना तव्यावरच्याच पोळ्या लागतात. सकाळीच सगळं करून ठेवलं- असले फालतूचे शॉर्टकट्स चालत नाहीत.’’

‘‘फ्रिज, कूकर, मिक्सर, मायक्रोवेव यातलं अन्न म्हणजे विष असतं विष.’’

‘‘पंजाबी ड्रेस, गाऊन ही काही आपली संस्कृती नाही. निदान सणासुदीला तरी घरच्या बायकांनी भरजरी साडय़ा, दागदागिने घालूनच सगळा स्वयंपाक केला पाहिजे.’’

‘‘पुरुष माणसं कशी सांगतील त्यांना काय हवंय ते? बाईचं लक्ष नको त्यांच्या ताटाकडं?’’

..असली वाक्यं कधी ऐकली आहेत का तुम्ही?

तीन वर्षांपूर्वी मी आणि आई दादरला एका ओळखीच्या कुटुंबाच्या घरी गणपतीसाठी गेलो होतो. त्यांच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो, तरी कधीच जाणं होत नाही. या वर्षी मात्र नवव्या दिवशी त्यांच्या शेजारीच एक काम निघाल्यामुळे योग जुळून आला. चार वाजता पोचलो तर त्यांची जेवणं सुरू होती.

‘‘ही तिसरी पंगत..’’ माधव म्हणाला, ‘बाप्पाच्या दर्शनाला आलेलं कुणीही जेवल्याशिवाय जात नाही आमच्या इथं. चला, हात धुऊन या.’’

कितीही नकार दिला तरी तो आणि त्याचे वडील ऐकेचनात. ‘‘जरा गरम गरम पुऱ्या घेऊन या हो..’’ वडिलांनी किचनच्या दिशेने पाहत हुकूम सोडला. शेवटी प्रसाद म्हणून श्रीखंड-पुरीचे दोन घास खाल्ले. प्राजक्ताने घरी केलेलं श्रीखंड खूपच चविष्ट होतं. पण आमचं कौतुक ऐकत बसायला तिला सवडच नव्हती. घामाने डबडबलेली प्राजक्ता एकदा बाहेर येऊन हसून पुन्हा नवीन पाहुण्यांसाठी चहाचं आधण ठेवायला आत निघून गेली. थोडय़ा वेळाने चहा घेऊन बाहेर आली तेव्हा आई तिला म्हणाली, ‘‘तुझं जेवण तरी झालंय की नाही?’’ त्यावर ती काही बोलणार त्याच्या आतच माधव आपली ढेरी खाजवत म्हणे, ‘‘अहो मॅडम, तिचं वजन केवढं वाढलंय बघा. तरी मी रोज मागे लागत असतो सकाळी वॉकला चल माझ्यासोबत म्हणून. पण ते जमत नाही. त्यामुळं सध्या ती डायरेक्ट रात्रीचीच जेवते.’’ त्यावर त्याचे वडील हसत हसत म्हणाले, ‘‘तरीही टेष्ट करायच्या निमित्तानं तिचं र्अध जेवण होतंच दुपारी.’’

काही दिवसांनी प्राजक्ता जेव्हा आईला भेटायला घरी आली तेव्हा तिची सगळी कहाणी बाहेर आली. लग्न झाल्यापासून ती गणपतीच्या दिवसांत मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या खातेय. कधी गणपती, कधी नवरात्र, कधी सत्यनारायण, कधी कुणाची लग्नं, कधी वाढदिवस, तर कधी इतर काही सोहळे. पुढे जास्तीचा रक्तस्त्राव, डोकेदुखी, मळमळ सुरू झाली. वजन बेसुमार वाढू लागलं. डॉक्टरनी गोळ्या खायला मनाई केली तसं गेल्या वर्षीपासून तिने त्या बंद केल्या. ‘‘तुम्ही आलात तेव्हा माझा दुसरा दिवस होता. ते लपवायचं टेन्शन. आपण या दिवसांत देवाकडं जायचं पाप करतोय, हे टेन्शन. पाणी भरायचं टेन्शन. आमचे दहा दिवसांचे ठरलेले मेन्यू आणि नैवेद्य असतात. ते मॅनेज कसे होतील याचं टेन्शन. उरलेलं जेवण फेकता येत नाही, आणि कमी पडलं तर ते महापाप; त्यामुळे स्वयंपाक किती प्रमाणात करायचा, हे टेन्शन. पहिले दोन-तीन दिवस जावा असतात मदतीला. नंतर मी एकटीनं सगळं करते. रोजचं ठीके हो. आपल्याच माणसांसाठी खपायचं. पण हे सणांचे दिवस म्हणजे नको जीव होऊन जातो. सकाळी अकरापासून जे पाहुणे येतात ते रात्री बारा म्हणू नका, एक म्हणू नका.. थांबतच नाहीत. झोप नाही, आराम नाही. आणि आमची ही अशी हेल्दी तब्येत पाहून कुणाला दयाही येत नाही. येणारे जाणारे ‘छान झालं’ म्हणतात, पण घरच्यांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द निघेल तर शपथ. हा, पण काही करण्यात छोटीशी जरी चूक झाली तरी पुढचे चार चार दिवस मला ऐकवलं जातं. बरं, आमच्या कामवालीला पण नेमकं गणपतीतच गावी पळायचं असतं. तिला तरी काय ओरडू? तिचा नवरा बेवडा आणि बेकार. या बायांच्या तुलनेत आम्ही कितीतरी नशीबवान म्हणायचं.. दुसरं काय?’’

आणि ही काही अपवादात्मक केस नव्हे. ‘‘कधी घरच्यांच्या आग्रहासाठी, तर कधी स्वत:च्या सोयीसाठी मुली या गोळ्या वाट्टेल तशा घेत राहतात. मग side effects दिसणारच..’’ डॉ. कौशल्या फर्नाडिस सांगतात, ‘‘मुळात बहुसंख्य बायकांच्या वाटेला उरलेलं, शिळंपाकं, निकृष्ट अन्न येत असतं. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या असतातच. आणि त्यात ही भर.’’ ज्या माणसांना कृत्रिम मिक्सर चालत नाही त्यांना मासिक पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टीचा विटाळ होतो. बरं, तेही एक वेळ ‘परंपरा’ या लेबलखाली खपवता येईल. पण हीच मासिक पाळी कृत्रिमपणे पुढे ढकलणाऱ्या गोळ्या कशा चालतात? ‘‘तुमचेच नियम आहेत ना? मग आली पाळी तर करू द्या की आम्हाला आराम. तुम्ही करा सगळी कामं तेवढे दिवस. पण तेही जमणार नाही..’’ आईचा पाठिंबा मिळाल्याने प्राजक्ताच्या बोलण्याला धार आली होती.. ‘‘माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तर पूजेच्या दिवशी सोवळ्यानं स्वयंपाक करायची प्रथा आहे. तिला बिचारीला सायनसचा त्रास आहे. पण नाही.. सर्दी काय नेहमीचीच. शेवटी आमची परंपरा महत्त्वाची.’’

असंच अजून एक सुशिक्षित आणि शहरी घर. नवरा, बायको, मुलगा, सून, नातू, नात. नवरा रागीट आणि प्रचंड चोखंदळ. रोजच्या स्वयंपाकात एखादी गोष्ट जरा जरी कमी-जास्त झाली तरी बायकोचा आणि तिच्या माहेरचा उद्धार! हे बघत मोठा झालेल्या मुलाने दुसरं टोक गाठलं. तो निर्विकार झाला. एकाही पदार्थाला नावं ठेवत नाही. पण कौतुकाचा एक शब्दही कधी त्याच्या तोंडून निघत नाही. त्यामुळे आपण केलेलं आपल्या नवऱ्याला आवडतं की नाही याची सुनेला काहीच कल्पना नाही. शिवाय त्याला मिक्सरच्या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे तो घरात असताना मिक्सर लावण्यावर बंदी आहे. मग तो कधी वापरायचा? बाकीची कामं कधी करायची? सासऱ्यांची अनेक पथ्यं; आणि तरीही शाबूत असलेले चवीचे चोचले याचा बॅलन्स कसा साधायचा? स्वत:च्या आवडीनिवडीचं काय? अशा छोटय़ा मोठय़ा अनेक गोष्टींमुळे दोघींचीही सगळीकडून कुचंबणा. अशक्त, म्हाताऱ्या सासूच्या मदतीने सून आपली नोकरी, मुलांच्या शाळा, क्लासेस सगळं सांभाळते. इथे निदान दोघींची एकमेकींना साथ आणि सहानुभूती आहे. कित्येक ठिकाणी त्यातही मोठी फूट असते.       

मुळात स्वयंपाकपाणी, धुणी-भांडी, साफसफाई ही कामं पुरुषप्रधान व्यवस्थेने शिताफीने बायकांच्या पदरी टाकली. परदेश आणि आपल्याकडच्या मोठय़ा शहरांमधले, क्वचित गावांमधले काही अपवाद सोडले तर आजही या परिस्थितीत फार बदल झालेला नाही. ही कामं करणाऱ्या व्यक्तींना घरातल्या इतरांकडून मान मिळणं ही काही फार मोठी अपेक्षा नाही. तो देण्याची दानत, माणुसकी आपल्यात आहे का? त्यांना होता होईल ती मदत करणं, स्वत:च्या चुकीच्या सवयींमुळे त्यांची कामं वाढवून न ठेवणं आपल्याला शक्य आहे का? काळानुसार या कामांची योग्य विभागणी करायची आपली तयारी आहे का?

‘चवीचवीने’ वाचता वाचता मध्येच एकदम दाताखाली खडा आल्यासारखं वाटलं का? ‘ज्युस’ या यूटय़ूबवरच्या शॉर्ट फिल्ममधल्या खाण्यापिण्यात रंगलेल्या पुरुषांना फिल्मच्या शेवटी वाटतं तसं? का खूप कंटाळा आला? ‘द ग्रेट इंडियन किचन’ ही मल्याळम् फिल्म पाहताना बऱ्याच जणांना येतो तसा? माफ करा. पण वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची आणि संस्कृतींची ओळख करून देताना कुठेतरी या विषयावर बोलणंही गरजेचं वाटलं. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे म्हणताना या यज्ञात ज्यांच्या कष्टांच्या आहुत्या जातात त्याची जाणीव आणि त्याबद्दलची कृतज्ञता नसेल तर काय उपयोग?

आपल्या कामाची दखल घेतली जाणं आणि त्याचं वाजवी कौतुक होणं, ही संतपदाला न पोहोचलेल्या प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. मग अन्न शिजवणाऱ्या व्यक्तींची ती असली तर त्यात वेगळं ते काय? किमान एक तास आणि कमाल कितीही तास खपून आपला भारतीय स्वयंपाक बनतो. त्याचा फडशा पाडायला मात्र पंधरा मिनिटंही लागत नाहीत. मग या कष्टांचं चीज कसं होणार? तर खाल्लेल्या अन्नाच्या कौतुकाने! ते केल्याने सगळे प्रश्न सुटणार नाहीत; पण कुठेतरी त्या दिशेने पहिलं पाऊल नक्कीच पडेल. खरं तर अन्नाचा आस्वाद त्याच्या रसभरीत कौतुकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ‘मस्त झालंय!’ या दोन शब्दांनीही खूप फरक पडतो. 

करोनाचं सावट असलेलं हे साल संपून नवीन स्वप्नं आणि नवीन संकल्पांचं नवं वर्ष सुरू व्हायला फक्त एक महिना बाकी आहे. या नव्या वर्षांत आपल्या प्रत्येकामध्ये स्वत: काम करायच्या आणि दुसऱ्याच्या कामाचं कौतुक करायच्या सवयी हळूहळू भिनत जाऊन उत्फुल्ल, कृतज्ञ आणि निरामय वृत्तींनी वातावरण उजळून निघेल असा आत्तापासूनच निश्चय करू या.

(सर्व छायाचित्रे : निहाल सातपुते)