मकरंद जोशी
नियतीनं पायावर कोरलेल्या चक्रामुळे म्हणा किंवा आयुष्याने पायाला जोडलेल्या चाकांमुळे म्हणा, पण एक माणूस त्याच्या ऐन उमेदीच्या दिवसांपासून कधी स्वेच्छेने तर कधी मजबुरीतून उभी-आडवी भटकंती करत राहतो. देशाच्या पूर्व कोपर्यातील अनेक कारणांमुळे वेगळ्या पडलेल्या भूमीपासून ते देशाच्या मध्यभागी असलेल्या, विकास योजनांची गंगा बारमाही वाहात असूनही कोरड्याच राहिलेल्या प्रदेशापर्यंत या खंडप्राय देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, भाषिक वैविध्य अनुभवतो. या त्याच्या भटकंतीला एकच एक अशी दिशा नसली तरी त्यामागे काही एक उद्देश नक्की असतो, त्यामुळेच कलंदरपणे फिरतानाही एक सजगता, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा आपोआप जोपासला गेला. त्यातूनच मग या भ्रमंतीची झलक दाखवणारं अनुभव कथन निर्माण झालं- ‘मन रुतले क्षण!’ मुकुंद कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यातील भ्रमंतीत वेचलेले काही निवडक क्षण या पुस्तकातून आपल्या समोर ठेवले आहेत. मुकुंद कुलकर्णींच्या नजरेतून भारताचं जे चित्र वाचकांसमोर उभं केलं आहे ते एकाच वेळी आश्चर्यचकित करणारं आणि त्याच बरोबर खिन्नं करणारंही आहे. लेखकाने घेतलेले अनुभव त्यांच्या खास शैलीत वाचताना सुरुवातीला जरी रंजक वाटले, तरी हळूहळू त्यामागचं विदारक वास्तव वाचकांना अस्वस्थ करू लागतं आणि मग त्याच्या मनात रुतलेले हे क्षण वाचकांच्या मनात टोचू लागतात.
आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं म्हणून नवीन लग्न झालेलं असताना, आपल्या डॉक्टर बायकोला घेऊन देशाच्या ईशान्य कोपर्यातील अरुणाचल प्रदेशा- नागालँडसारख्या अनेकांनी फक्त भूगोलाच्या पुस्तकातच नाव वाचलेल्या राज्यात जाऊन राहायचं म्हणजे माणूस एकतर अफाट धाडसी तरी हवा किंवा कशाचीही पर्वा न करणारा तरी. लेखकामध्ये या दोन्हीचं अजब मिश्रण होतं, म्हणून तर जिथे जाण्याआधी लोक शंभरवेळा विचार करतात अशा ठिकाणी ते बिनदिक्कत गेले. भारताचा ईशान्य भाग म्हणजे जणू चेहरेपट्टीपासून ते भाषेपर्यंत आणि रुढी-परंपरांपासून ते आहाराच्या सवयींपर्यंत इतर भारतापेक्षा वेगळा पडलेला भाग… अशा ठिकाणी ऐन उमेदीतली सहा वर्षे काढायची यासाठी तर लेखकाला सलाम करायलाच हवा. पण एकूणच ज्या विचारसरणीशी नाळ जुळलेली नाही किंवा ज्या संघटनेचे कुठलेही संस्कार मनावर रुजलेले नाहीत अशा परिवाराच्या सामाजिक संस्थांमध्ये केवळ सेवाभावी वृत्तीने सामील व्हायचे; आणि शहरातली सुखासीन जीवनपद्धती सोडून दुर्गम भागात स्वत:ला मिसळायचं यासाठी तर लेखकाला साष्टांग नमस्कारच घालायला हवा.
या पुस्तकाचे तीन भाग पडतात. पहिल्या भागात ईशान्य भारतातील अनुभव, दुसर्या भागात मध्य भारतातील अनुभव आणि तिसर्या भागात एकूणच आयुष्याच्या प्रवासातील मनात रुतलेले क्षण वाचायला मिळतात. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसारख्या मुख्य भारतापासून वेगळ्या पडलेल्या प्रदेशात राहून, तिथल्या लहान मुलांना (वयोगट ६ ते १०) गीतेपासून ते परेडपर्यंत सारं काही शिकवताना लेखकाने टिपलेले क्षण… त्याला भेटलेली माणसं आणि त्याने अनुभवलेला तिथला अनोखा निसर्ग याचं अतिशय रोचक चित्रण पहिल्या भागात वाचायला मिळतं. गुवाहाटीच्या सहलीमध्ये तिथल्या हॉटेलवाल्यांची गाळण उडवणारे ‘छोटे भीम’, पारंपरिक विचारसरणींमुळे भुताखेतांवर विश्वास ठेवणारे, पण सरांबरोबर जीव मुठीत घेऊन जंगलाचा नाइट ट्रेक करणारे बालवीर, विनाकारण वरिष्ठांचा ओरडा खाल्ल्यानंतर दुखावलेल्या लेखकाच्या डोळ्यातली आसवं पुसणारी चिमुकली बोटं यांतून ओयानच्या वसतीगृहातल्या मुलांचं दर्शन घडतं. तर कुत्र्यापासून ते हत्तीपर्यंत कोणताही प्राणी खायला तयार असलेल्या लोकांनीच अपघातात जखमी झालेल्या गाईची केलेली शुश्रूषा, भाजी आणायला म्हणून बाहेर पडलेल्या आणि मुंडक्यांची माळ घेऊन हजर झालेल्या आजोबांची कहाणी, न जन्मलेल्या जुळ्या मुलांच्या शाळेची फी परत मिळावी म्हणून हटून बसलेला बाबा… हे अनुभव वाचताना अरबी सुरस कहाण्या वाचतोय असंच वाटतं.
ईशान्य भारतातील अनुभवाच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे मध्य भारतातील अनुभव. एकीकडे शिसारी येईल अशी संपन्नता आणि दुसरीकडे हादरवणारं दारिद्य्र अशा दोन टोकांवरचं जीवन लेखकानं मध्य भारतात अनुभवलं. पोरांनी खेळताना दिलेले पाच पैसे हरवले, आता पुन्हा उपाशी झोपावं लागणार म्हणून त्यांना जिवाच्या आकांताने बडवणारी आई, रोज चिलिमीचा बार भरून ढीगभर जेवण (तेही साजूक तुपातलं) ओरपणारे आखाड्यातले फक्कड, रामजीकी फिल्म दिखाओ म्हणून अपहरण करून आपल्या वस्तीत नेणारे डाकू, ऐनवेळी स्वत:चा धनुष्याचा भंग करून रामकथेची दिशाच बदलणारा रावण अशा किश्श्यांमधून मध्य भारतात लेखकाने अनुभवलेलं जे जग वाचकांसमोर उभं राहतं ते वाचकांना हतबद्ध करतं. पांढर्या कापसानं जिचं बालपणच काळं केलंय अशी वर्शी, बांधकाम मजुरांच्या कुटुंबात जन्मलेली, बांधकामाच्या साइटवर खेळता खेळताच मोठी झालेली कौशी, जुन्नर परिसरातल्या शेतात मजुरी करून घरसंसार चालवणार्या मेहनती बायका या सगळ्यांमध्ये मनाला सर्वांत स्पर्शून जातं ते मुन्नाच्या पुष्पाचं शब्दचित्र.
‘मन रुतले क्षण’ या पुस्तकातील अनुभव जितके अनोखे आहेत तितकीच त्यांना मूर्त रूप देणारी लेखकाची शब्दकळा प्रभावी आहे. ईशान्य भारतातील दुर्गम गावं काय, मेळघाटातील कुपोषित पाडे काय, मध्य भारतातील परंपरेच्या दोरखंडांनी करकचून बांधलेली गावे काय किंवा जुन्नर परिसरातल्या श्रमजीवी महिलांचं आयुष्य काय… मुकुंद कुलकर्णी यांनी अनुभवलेल्या अस्वस्थ वास्तवाचे हे कवडसे वाचकांना नजरेआडच्या भारताचं दर्शन घडवतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जी विविधता आहे त्यात असलेले समान दुवे हे दुर्दैवाने आर्थिक विषमता, धर्माने केलेली शोषणाची पक्की व्यवस्था, महिलांकडे बघण्याची पुरुषी सोयीस्कर नजर असे आहेत याची जाणीव हे अनुभव करून देतात.
‘मन रुतले क्षण’, मुकुंद कुलकर्णी
समकालीन प्रकाशन,
पाने-१६६, किंमत-२५०
